अर्थकारण : मोबाईल निर्यातदार भारत

भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा मोबाईल फोन उत्पादक म्हणून नावारूपाला आला आहे. सरकारला यावर्षी एक लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची निर्यात अपेक्षित आहे. 2025-26 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने निर्यात करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यापैकी 120 अब्ज डॉलर मोबाईल फोन निर्यातीतून येणे अपेक्षित आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आशियातील सर्वांत मोठे तंत्रज्ञान व्यासपीठ असणार्या भारतीय मोबाईल काँग्रेस (आयएमसी) च्या सातव्या सत्राचे उद्घाटन केले. आयएमसी हे आशियातील सर्वात मोठे दळणवळण, माध्यम आणि तंत्रज्ञानविषयक व्यासपीठ आहे. यामागचा हेतू देशाची दळणवळण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगती अधोरेखित करणे, महत्त्वाच्या घोषणा करणे तसेच स्टार्टअप कंपन्यांच्या माध्यमातून नवीन उत्पादने घेणे किंवा नवीन योजना कार्यान्वित करून देणे हा आहे.
आयएमसी 2023 मध्ये सुमारे 22 देशांच्या एक लाखांहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. त्यात सीईओ स्तरावरचे 5000 प्रतिनिधी, 230 कंपन्या, 400 स्टार्टअप्स आणि अन्य भागीदार सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या टेक इव्हेंटच्या सातव्या सत्रात 6 जी, 5 जी नेटवर्क सुधारणा, दळणवळण आणि अन्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. भारत आता 6 जी तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रत्यक्षात 6 जी असो, एआय असो, सायबर सुरक्षा असो, सेमी कंडक्टर असो, ड्रोन असो, डीप सी असो… आगामी काळात अशा असंख्य नावीन्यपूर्ण गोष्टी या क्षेत्रात पाहायला मिळणार आहेत. ही एका परिवर्तनाची सुरुवात आहे. यातील आनंददायी बाब म्हणजे तरुण पिढीकडून या भविष्याचे नेतृत्व होत आहे.
इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकडेवारीचा संदर्भ देताना, भारत हा मोबाईलच्या आघाडीवर आयातदारकडून निर्यातदार कसा झाला, याविषयीची माहिती कथन केली. त्याचबरोबर अॅपल, गुगलसारख्या मोठ्या कंपन्या देशात मोबाईल उत्पादन करण्यासाठी सज्ज असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात 6 जी टेस्चबेडचे लाँचिंग करण्यात आले. यावेळी त्यांनी देशातील शंभर विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये 5 जी अॅप विकास प्रयोगशाळेचे अनावरण केले. या प्रयोगशाळेत 5 जीशी संबंधित अनेक तांत्रिक चाचण्या होणार आहेत. देशातील मनुष्यबळ आणि अन्य स्रोतांसह तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यास सरकारचे प्राधान्य असणार आहे. अलीकडेच गुगलने भारतात पिक्सल फोन तयार करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंगचा फोल्ड फोन आणि अॅपलच्या आयफोन 15 ची निर्मिती भारतात केली जात आहे. जगभरात आता मेड इन इंडियाच्या मोबाईल फोनचा वापर होत आहे. देश जगातील आघाडीच्या तीन स्टार्टअप इको सिस्टीमपैकी एक झाला आहे. भारताने युनिकॉर्नची एक पिढी तयार केली आहे आणि जगातील आघाडीच्या तीन स्टार्टअप इको सिस्टीमपैकी एक म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. 2014 च्या अगोदर भारतात शंभरच्या आसपास स्टार्टअप होते आणि आज ती संख्या एक लाखापेक्षा अधिक पोचली आहे.
मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने घेतलेली भरारी हे ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांचे फलित मानावे लागेल. अन्यथा भारत ही नेहमीच प्रगत पाश्चिमात्य राष्ट्रांसह चीनसारख्या जगाचे उत्पादन केंद्र असणार्या देशासाठी एक मोठी बाजारपेठच राहिला आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या आणि या लोकसंख्येच्या अवाढव्य गरजा यामुळे उत्पादन क्षेत्रात प्रगत असणार्या राष्ट्रांसाठी भारत हा एक ग्राहक म्हणून महत्त्वाचा राहिला आहे. वास्तविक पाहता भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती, कुशल मनुष्यबळ, वीज, जमीन, पाणी, रस्तेमार्ग, रेल्वेमार्ग, बंदरे या सर्वांचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या सर्व गोष्टी उद्योगांसाठीची प्राथमिक गरज मानल्या जातात. त्यांची पूर्तता असूनही भारत विदेशातून आयात केलेल्या वस्तूंवर अवलंबून राहिल्यामुळे देशांतर्गत उद्योगविकासाला, स्थानिक कौशल्याला दुर्लक्षिले गेले.
मोबाईल फोन, एसी, फ्रीजबाबतही तीच स्थिती दिसून आली. या आयातीमुळे भारताची चालू खात्यावरील तूट नेहमीच वाढत राहिली. परंतु गेल्या 8-9 वर्षांमध्ये बहुतांश वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन घडवण्याच्या प्रक्रियेला बळकटी देण्यात आली. कोविडोत्तर काळातील आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मोबाईल फोननिर्मितीच्या क्षेत्राकडे भारताने विशेष लक्ष दिले. परिणामी आजघडीला परदेशात भारतातून होणारी मोबाईल फोनची निर्यात लक्षणीयरीत्या वधारली आहे. सरकारला यावर्षी एक लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची निर्यात अपेक्षित आहे. आज देशातून अनेक मोबाईल फोन्स निर्यात होताहेत.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात मोबाईल फोनची निर्यात दुप्पट होऊन 5.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 45,700 कोटी रुपये झाली आहे. मोबाईल फोनची निर्यातीतील ही वाढ 80 टक्क्यांहून अधिक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतातून मोबाईल फोनची निर्यात 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 11.12 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे 2022 या आर्थिक वर्षात ती 45,000 कोटी रुपये होती. सरकारच्या अपेक्षेनुसार 2025-26 पर्यंत 300 अब्ज डॉलर्सची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने निर्यात करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यापैकी 120 अब्ज डॉलर मोबाईल फोन निर्यातीतून येणे अपेक्षित आहे. 2025-26 पर्यंत मोबाईल फोन निर्यात 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त योगदान देईल असा अंदाज आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन वाढावे यासाठी सरकारने विविध प्रोत्साहन योजना राबविल्या असून त्याचा परिपाक म्हणून याकडे पाहावे लागेल. भारत सध्या संयुक्त अरब आमिराती, अमेरिका, नेदरलँडस्, ब्रिटन आणि इटली या पाच देशांना मोबाईल फोनची निर्यात करत आहे; तर भारतात विकले जाणारे 97 टक्क्यांहून अधिक स्मार्टफोन आता स्थानिक पातळीवर तयार केले जात आहेत.
भारतात 2027 पर्यंत अॅपलच्या 45 ते 50 टक्के आयफोनचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. 2022 पर्यंत 80 ते 85 टक्के आयफोनचे उत्पादन चीनमध्ये होत होते. 2022 अखेर अॅपलच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 10 ते 15 टक्के आयफोन निर्मिती भारतात सुरू झाली. भारतात आयफोन 12, 13, 14 आणि 15 प्लसचे उत्पादन केले जाते. त्यामुळे भारत जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वांत मोठा मोबाईल फोन उत्पादक म्हणून नावारूपाला आला आहे. केवळ मोबाईल फोन निर्मितीच्या क्षेत्रातच भारताने भरारी घेतलेली नाही; तर भारतात मोबाईल ब्रॉडबँडचा सरासरी वेग हा गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन पटींनी वाढला आहे.
मोबाईल ब्रॉडबँडच्या वेगात भारत 118 व्या स्थानावर होता आणि आज 43 व्या स्थानावर पोचला आहे. रॅकिंग आणि संख्येव्यतिरिक्त भारतातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी अणि वेगात सुधारणा होत असल्याने डिजिटल जीवनमानात सुलभता आली आहे. 21 व्या शतकाचा हा कालखंड भारताच्या एका अर्थाने ‘थॉट लीडरशिप’चा काळ आहे. आपण काही क्षेत्रात थॉट लीडर झालो आहोत. यूपीआय ही आपल्या थॉट लीडरशिपच्या नव्या विचाराचा परिणाम आहे. आज डिजिटल व्यवहार प्रणालीच्या आघाडीवर भारत संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे. कोरोना साथीच्या काळात लसीकरणाच्या काळात कोविन अॅपने मोलाची भूमिका बजावली आहे.
आशियातील या सर्वात मोठ्या तंत्रज्ञानविषयक व्यासपीठावर एआय अॅप्लिकेशन, एज कॉम्प्युटिंग, इंडस्ट्री 4.0 आणि इंडिया स्टॅकवरून देखील नवनवीन माहिती उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर या परिषदेत ब्रॉडकास्ट, सॅटेलाईट कम्युनिकेशन, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेमी कंडक्टरसारख्या संबंधित टेक्नॉलॉजी डोमेनचा विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले. वास्तविक आयएमसीचा प्रमुख उद्देश हा भारताला टेक्नॉलॉजीचा डेव्हलपर, दळणवळण निर्माते आणि निर्यातदार यांना चालना देणे हा आहे. या माध्यमातून एकाअर्थाने भारताला टेक्नॉलॉजीचे हब करण्याचे नियोजन केले जात आहे. यंदा ‘आयएमसी’ची संकल्पना ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन होती. यात ड्रोन, सॅटेलाईट कम्युनिकेशन, मोबाईल मॅन्युफॅक्चर, सायबर सुरक्षा आणि स्टार्टअप आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सध्याच्या काळात इंटरनेट तंत्रज्ञानावरचे अवलंबित्व सायबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटीचे महत्त्व वाढविणारे आहे. त्यामुळे आगामी काळात सायबर सुरक्षा निश्चित करण्यासाठी नेटवर्क उपकरणांच्या बाबतात आत्मनिर्भरता आवश्यक झाले आहे.
भारताला टेक्नॉलॉजीचा पॉवरहाऊस म्हणून प्रस्थापित करण्यासाठी बहुविध स्तरावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. ‘आयएमसी’ या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. इंडिया मोबाईल काँग्रेसचे सर्वप्रथम आयोजन 2017 मध्ये करण्यात आले होते. गेल्या सहा वर्षांपासून हा कार्यक्रम भारताला जागतिक पातळीवर आघाडी मिळवून देण्याचे काम करत आहे. ‘आयएमसी’ने तंत्रज्ञान उद्योगात नेतृत्व करण्यासाठी, डिजिटल इन्होव्हेशनला भविष्यात आकार देण्यासाठी मोलाचे स्थान प्रस्थापित करण्यास मदत केली आहे.