क्राईम : ड्रग्जविरुद्धची लढाई

क्राईम : ड्रग्जविरुद्धची लढाई

गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा राज्यातच नव्हे, तर सबंध देशभरात वाढत चालला आहे. खरे तर हे 'प्रॉक्सी वॉर' आहे. गेल्या वर्षभरात 25 हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज (अमली पदार्थ) तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्यूरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहे. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे.

पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्ज रॅकेटप्रकरणी फरार असणार्‍या ललित पाटील याला नुकतीच अटक करण्यात आली. श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी जेरबंद केले. ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून, 2020 मध्ये तो ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ललित प्रदीर्घकाळ ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली होती आणि त्याचा उपयोग करून तो ससूनमधून निसटला होता. अटकेनंतर त्याच्या चौकशीतून ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, अलीकडील काळात राज्यातच नव्हे, तर सबंध देशभरात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

वस्तुतः, अमली पदार्थ किंवा ड्रग्ज हा विषय अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट स्थापन होण्यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असणार्‍या 'आयएसआय'चा मोलाचा वाटा होता. किंबहुना, 'आयएसआय'च्या समर्थनावरूनच तालिबानचे राज्य अफगाणिस्तानात स्थापन झाले. पाकिस्तानची भारताबाबतची रणनीती अत्यंत स्पष्ट आहे. प्रत्यक्ष युद्धामध्ये भारताला पराभूत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानने छद्मयुद्धाचा मार्ग निवडला. त्याअन्वये दहशतवादी कारवाया करून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे आणून भारताची प्रगती रोखणे, हे धोरण म्हणून पाकिस्तानने स्वीकारले. तथापि, भारताच्या संरक्षण यंत्रणांनी आणि सैन्याने पाकिस्तानचे हे मनसुबे वेळोवेळी हाणून पाडले. आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्येही पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. 'ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्' असे म्हणत भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकिस्तानचीच कालोघात शकले झाली आणि बांगला देश वेगळा झाला. तेव्हापासून पाकिस्तानने कधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर कधी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला; परंतु भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय जनता या तिघांनी एकत्र येऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत केले. आता भारतातील तरुणांभोवती अमली पदार्थांचा विळखा घालण्याचे षड्यंत्र 'आयएसआय'ने रचले आहे.

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असण्याबरोबरच सर्वाधिक तरुणांचाही देश आहे. 15 ते 35 वयोगटातील तरुणांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येमध्ये मोठे आहे. ही तरुण पिढी म्हणजे भारताची संपत्ती आहे. लोकसंख्येच्या परिभाषेत त्यांना 'डेमोग्राफिक डिव्हिडंड' असे म्हटले जाते. कार्यकुशल मनुष्यबळाची उपलब्धता हा आर्थिक व औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. तरुण पिढीचे हे योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तानने भारतातील तरुणाईला व्यसनाधीन करून टाकण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी कधी हवाई, कधी जमिनी मार्गाने तर कधी समुद्री मार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरॉईन यासारखे अमली पदार्थ पाठवत आहे. हे प्रमाण साधेसुधे नसून, अक्षरशः काही टन अमली पदार्थ पाकिस्तानातून तस्करीच्या मार्गाने भारतात येत आहेत. यातील काही अमली पदार्थांची किंमत ही काही हजारांमध्ये असते.

उदाहरणच घ्यायचे झाल्यास, एक ग्रॅम हेरॉईनची किंमत अफगाणिस्तानातून विकले जाते तेव्हा समजा 100 रुपये असेल, तर मुंबईच्या बाजारात ते 10 हजारांना विकले जाते. यातून एकीकडे भारतातील समाजव्यवस्थेत विष पेरायचे आणि दुसरीकडे प्रचंड नफा कमवायचा, असा दुहेरी डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अन्य काही संस्थांच्या, तपास अधिकार्‍यांच्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे की, अमली पदार्थांच्या व्यापारातून-तस्करीतून मिळालेला पैसा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी वापरला जातो. म्हणजेच तुमच्याच पैशाने तुमच्याच देशात दहशतवाद पसरवायचा, लोकांना मूलतत्त्ववादी बनवायचे, लोकांना शस्त्रास्त्रे पुरवायची, बॉम्ब बनवायला मदत करायची, असा पाकिस्तानचा डाव आहे. यासाठी अलीकडील काळात वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी पाकिस्तानकडून वापरल्या जात आहेत.

सुरुवातीला पाकिस्तानने जमिनीखाली बोगदे तयार करून पंजाब, काश्मीर यासारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, 'बीएसएफ'च्या जवानांनी हे बोगदे तपासण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तानचा हा डाव हाणून पाडला. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे पाठवण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ड्रोन्सच्या माध्यमातून होणारा अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यामध्ये यश येत आहे. त्यानंतर आता महिलांचा कुरिअर म्हणून वापर करत पाकिस्तान अमली पदार्थ भारतात पाठवत आहे. तसेच समुद्री मार्गाने कांडलासारख्या बंदरामधून कंटेनर्समधून टनांनी हेरॉईन पाठवण्याचा प्रयत्न केला आहे.

थोडक्यात, हवाई, समुद्री आणि जमिनी अशा तिन्ही मार्गांनी पाकिस्तान तरुण पिढीला बरबाद करणारे हे विष भारतात पेरत आहे. मध्यंतरी असे आढळून आले होते की, काही पाकिस्तानी स्मगलर श्रीलंकेच्या तुरुंगातून समुद्री मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचे नियोजन करत होते. आपल्याकडे मुंबई विमानतळावर युगांडा, नायजेरिया आदी ठिकाणांहून येणार्‍या अनेक स्मगलरना मागील काळात रंगेहाथ पकडण्यात आपल्या तपास यंत्रणांना यश आले आहे. तथापि, यातील दुर्दैवाची बाब म्हणजे, आपल्याकडील तरुणपिढी यामध्ये प्रचंड प्रमाणात गुरफटत चालली आहे. अगदी मोठमोठ्या, प्रतिष्ठित शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेणारे अनेक तरुण हे या अमली पदार्थांचे सेवन करत आहेत. अगदी आयआयटीसारख्या संस्था असोत किंवा व्यवस्थापनाची महाविद्यालये असोत, या परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणारे अड्डे तयार झाले आहेत.

गेल्या वर्षभरात 25 हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे. आज आपला मुलगा अमली पदार्थांचे सेवन करत आहे की नाही, हे पालकांना तोपर्यंत माहीत नसते जोपर्यंत तो पूर्णपणे व्यसनाधिन होत नाही. हे लक्षात घेता आपल्या पाल्यांबाबत अत्यंत जागरुक राहण्याची वेळ आजच्या काळात पालकांवर आली आहे. आजच्या पालकांची संगोपनाची व्याख्या पाहिल्यास बहुतांश आई-वडिलांचा कल मुलांना भरपूर पैसे आणि भौतिक सुविधा देण्याकडे असल्याचे दिसते. पण याखेरीज मुलांना पालकांनी क्वालिटी टाईम देणे गरजेचे आहे. तसेच ते काय करतात, ते कोणाबरोबर राहतात, त्यांची संगत कशी आहे, फ्रेंडसर्कल कसे आहे, त्यांच्या सवयींमध्ये काही बदल झाला आहे का, आपले मूल आपल्याशी काही लपवल्यासारखे वागते आहे का यावर पालकांचे अत्यंत सजगपणाने लक्ष असले पाहिजे. अमली पदार्थांच्या आहारी गेलेले अनेक तरुण आपल्या वडिलांच्या व्यवसायातून पैसे चोरतात, क्रेडिट कार्डचा वापर करुन कर्जबाजारी होतात; पण तरीही पालकांना याचा थांगपत्ता नसतो.

काही पालक हे लक्षात आले तरी तरुण वय आहे, पैसा लागतोच असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, हे चुकीचे आहे. मुलांचे डोळे कसे आहेत, त्याच्यात काही सिंड्रोम्स दिसताहेत का, तो बावचळल्यासारखा, भ्रमिष्टासारखा वागतोय का, त्याची एकाग्रता कमी झाली आहे का, झोप कमी अथवा जास्त झाली आहे का या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण पालकांनी केले पाहिजे. कोणतेही व्यसन हे सुरुवातीला गंमत किंवा थ्रील म्हणून केले जाते. पण पाहता पाहता आपण त्याच्या मगरमिठीत कसे अडकत जातो हे समजत नाही. याबाबत पालकांना वेळोवेळी मुलांना सावध केले पाहिजे. अगदी हुशार म्हणवली जाणारी मुलेही काही दिवसांत व्यसनाधिनतेच्या वाटेवर जाताना पाहायला मिळाली आहेत आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. अशी उदाहरणे मुलांसमोर आणली पाहिजेत.

ड्रग्ज पुरवठा करणारे पेडलर खरेदीदार तरुणांना आणखी चार जणांना तू ड्रग्ज घ्यायला प्रोत्साहन दे, तसे केल्यास तुला आम्ही मोफत ड्रग्ज देऊ असे सांगतात. त्यातून हा संसर्ग वाढत जातो. दुसरीकडे, हे तरुण एजंट बनून जातात आणि यामागचा मुख्य सूत्रधार लांब निघून जातो. परिणामी, पोलिसांच्या किंवा तपास यंत्रणांच्या जाळ्यातही हीच नवखी तरुण मंडळी सापडतात. त्यातून यामागच्या मास्टरमाईंडचा शोध घेणे कठीण होऊन बसते.

हा सेल्फ जनरेटिंग, कमी श्रमाचा आणि प्रचंड पैसा असलेला व्यवहार आहे. त्यामुळे यांचे मूळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात असले तरी आपल्यातीलच काही लोक त्यांना मदत करण्यासाठी पुढे येताना दिसतात. त्यांना यातील धोका माहीत नसतो असे नाही; पण झटपट पैशांची चटक त्यांच्यावर हावी होते. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा, स्वतःचा विचार न करता ही मंडळी या व्यवसायात सहभागी होतात. हे वास्तव लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनीही केवळ आपल्या हिकमतीवर अमली पदार्थांचा विळखा मोडीत काढता येईल या भ्रमात न राहता प्रचंड मोठ्या संख्येने पोलिस मित्र तयार करण्याची गरज आहे. जनतेला जितक्या मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी केले जाईल तितक्या सुलभरित्या याबाबतची माहिती मिळवणे सोपे होईल आणि त्यातून हा विळखा तोडता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news