संशोधन : फलित चांद्रयान-3 मोहिमेचं! | पुढारी

संशोधन : फलित चांद्रयान-3 मोहिमेचं!

श्रीराम शिधये

दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ‘उडी’ महत्त्वाची आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हेसुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो.

भारताचं चांद्रयान-3 ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आपल्या इतिहासात एका नवीन झगझगीत यशाचा अध्याय लिहिला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर आपलं यान उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश ठरला! या यशामुळं दुसर्‍या ग्रहावर यशस्वीपणं जाण्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान आपल्याकडं आहे हे अधोरेखित झालंच; पण अशा मोहिमांसाठी आवश्यक असणारा आत्मविश्वासही मिळाला. अशी क्षमता असणार्‍या जगातील मोजक्या देशांच्या रांगेत आता भारत जाऊन बसला आहे. आज अमेरिका, रशिया, चीन आणि जपान हे देश अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांच्याशी अवकाश संशोधनाबाबत भारताला आता सन्मानानं, बरोबरीच्या नात्यानं बोलणी करता येतील, इतकी भारताची मान इस्रोनं उंच केली आहे.

चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोनं (भारतीय अवकाश संशोधन संस्था) ठरवलेली तीनही उद्दिष्टं पूर्ण झाली आहेत. ही तीन उद्दिष्टं म्हणजे – चंद्राच्या भूमीवर आपला विक्रम लँडर अलगद उतरवणं, चंद्रावर प्रज्ञान रोव्हर ही गाडी चालवणं आणि चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग करणं. या तीनही गोष्टींमध्ये इस्रोला यश मिळालं आहे. त्यामुळं ही मोहीम यशस्वी झाली, असं अभिमानानं म्हणता येतं. चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस काम केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरला ‘निद्रिस्त’ करण्यात आलं. त्यानंतर विक्रम लँडरचं इंजिन 12 दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आलं. ते सुरू केल्यानंतर लँडर हे चंद्राच्या जमिनीपासून 40 सें.मी. वर उचलण्यात आलं. इतकंच नाही, तर त्यानं त्या उंचीवर राहून एक छोटा प्रवास केला. म्हणजे ते जिथं उतरलं होतं, त्या जागेपासून ते 30 ते 40 सें.मी. दूर गेलं आणि पुन्हा एकदा अलगद चंद्राच्या भूमीवर उतरलं. चंद्राच्या भूमीवर विसावलेल्या विक्रम लँडरनं हवेत मारलेली ही उडीच होती. ती मारण्यापूर्वी त्याचे रॅम्प आणि उपकरणं बंद करण्यात आली होती. नवीन जागेवर विक्रम लँडर उतरल्यानंतर ती पुन्हा एकदा चालू करण्यात आली. त्या उपकरणांनी आपलं कामही सुरू केलं आणि घेतलेल्या नोंदी पृथ्वीकडं पाठवून दिल्या.

इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून हवेत उडी घेणं आणि आपल्या जागेपासून काही अंतरावर जाऊन पुन्हा अलवारपणं चंद्राच्या जमिनीवर उतरणं हा एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग होता. असा प्रयोग यापूर्वी म्हणजे 17 नोव्हेंबर 1967 रोजी अमेरिकेनं केला होता. (सन 1966 ते 1968 या काळात अमेरिकेनं ‘सर्व्हेयर’ नावाची मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये एकंदर सात यानं चंद्रावर पाठविण्यात आली. ती सर्वच मानवविरहित होती. या यानांपैकी पाच यानं चंद्राच्या भूमीवर अलगद उतरली होती. नासाच्या ‘अपोलो’ मोहिमेची मी पूर्वतयारीच होती!) त्यादिवशी अमेरिकेच्या चंद्रावर उतरलेल्या ‘सर्व्हेयर-6’ या यानानं हवेत झेप घेऊन ते थोड्या दूरवरच्या अंतरावर जाऊन उतरलं होतं. त्यानंतर 56 वर्षांनी तोच प्रयोग इस्रोनं केला. तो करण्यामागं मोठा हेतू होता. तो असा की, यापुढच्या काळात माणसाला चंद्रावर घेऊन जायचं आहे. तिथं काही काळ राहून त्यांना परत आणायचं आहे. काही यानं चंद्रावर पाठवून तिथली माती, दगड यांचे नमुने गोळा करायचे आहेत आणि त्यांच्यावर सखोल संशोधन करण्यासाठी ते परत पृथ्वीवर आणायचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे दूरवरच्या अवकाशप्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथं अवकाशतळ उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीवरून घेतलेली ‘उडी’ महत्त्वाची आहे. याचं कारण ही उडी म्हणजे एक महत्त्वाची चाचणीच होती.

विशेष म्हणजे विक्रम लँडर अशी ‘उडी’ घेणार आहे, हे इस्रोनं अगोदर जाहीर केलं नव्हतं. त्यामुळं लँडरनं घेतलेली लहानशी झेप हा आपल्यासाठी सुखद धक्का आहे, तर बाकीच्या देशांसाठी ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. चंद्राच्या भूमीवरील आपल्या लँडरला हवेत झेप घेण्याच्या आज्ञा देणं, त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करणं, लँडरनं हवेत झेप घेऊन काही अंतरावर जाऊन पुन्हा सुखरूपपणं उतरणं याचा अर्थ आपण भविष्यातील मोहिमांची किती आणि काय तयारी करत आहोत, त्याची एक झलक आहे. ती अवघ्या जगाला बघायला मिळाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम चंद्रावरच्या एक दिवसाची (पृथ्वीवरील 14 दिवस!)आहे, असं जाहीर झालं होतं. पण आता लँडरला निद्रिस्त करण्यात आलं आहे. पण त्यामध्ये थोडी ऊर्जा शिल्लक आहे. चंद्रावरच्या रात्रीत तिथलं तापमान उणे 120 अंशपर्यंत जातं. अशा अतिथंड तापमानात लँडर आणि त्यावरील उपकरणं या उर्जेमुळं तग धरू शकणार आहेत आणि या भागात पुन्हा एकदा सूर्याची किरणं पसरली की आपलं काम सुरू करतील, अशी अपेक्षा इस्रोमधील संशोधकांना वाटत आहे. त्यांची आशा खरी ठरली तर विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर आणखीन काही काळ काम करू शकणार आहे. मोहिमेचा कालावधी वाढवण्याबाबतसुद्धा इस्रोनं अवघ्या जगाला आणखीन एक मोठा धक्का दिला आहे. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारत आता कुठं आहे, हेच यावरून स्पष्ट झालं आहे.

या मोहिमेमध्ये विक्रम लँडर आणि त्यावरील प्रज्ञान रोव्हर यांनीही मोलाची कामं केली आहेत. लँडरवरील चास्ते (चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपरिमेंन्ट) या उपकरणानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे तापमान काय आहे, याचा शोध घेतला. हे उपकरण उभ्या स्थितीत, सरळच्या सरळ, 10 सेंमी खोलवर जाऊ शकतं. या उपकरणावर एकंदर 10 तापमापक सेन्सर आहेत. त्यांच्या मदतीनं चंद्राच्या मातीच्या विविध स्तरांवर किती तापमान आहे, हे आपल्याला समजू शकतं. या उपकरणानं आपलं काम चोखपणं केलं. चंद्राच्या भूमीपासून एक सेंमी उंचीवर तापमान 56 अंश सेल्शियस आहे, तर चंद्राच्या मातीत आठ सेंमी खोलवर तापमान आहे, उणे 10 अंश सेल्शियस! चंद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 50 अंश सेल्शियस, तर पृष्ठभागापासून सात सेंमीवर तापमान शून्य अंश सेल्शियस!

चंद्राच्या पृष्ठभागावरील जमिनीत गंधक, अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्लोरियम, टिटॅनियम, मँगनिज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याचंही आढळून आलं आहे. चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे फार महत्त्वाचं आहे. याचं कारण त्यामुळं चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो. दुसरं असं की साधरणपणं गंधक हा ज्वालामुखीतून बाहेर पडतो. चंद्राच्या मातीमध्ये गंधक असणं यावरून चंद्राच्या भूतकाळातील संभाव्य घडामोडींवर प्रकाश पडू शकतो. शिवाय चंद्रामध्ये काय काय दडलं आहे, याचाही अंदाज बांधता येतो. चंद्राच्या भूमीवर रोव्हर गाडी 100 मीटर फिरली. ती फिरताना चंद्राच्या भूमीवरील कंपनांची नोंद मइल्साफ या उपकरणानं केलीच, पण चंद्राच्या भूमीत निसर्गतःच काही हालचाली होत असल्याचंही या उपकरणानं आपल्या लक्षात आणून दिलं.

ही मोहीम यशस्वी होण्यासाठी इस्रोनं सणसणीत तयारी केली होती. चांद्रयान-2च्या मोहिमेमध्ये अगदी अखेरच्या टप्प्यात लँडरशी संपर्क तुटला होता. परिणामी, लँडर अलगदपणं उतरलं नाही, तर ते आदळलं, हे समजायलाही आपल्याला थोडा वेळ लागला होता. त्यामुळंच या मोहिमेत विक्रम लँडरची सर्व माहिती लागलीच मिळेल, अशा प्रकारानं लँडरची रचना करण्यात आली. विक्रम लँडरच्या पुढे, मागे आणि वरच्या बाजूला अँटेना बसविण्यात आले. इस्रोच्या नियंत्रण कक्षाबरोबर संपर्क साधता आला नाही, तर सध्या चंद्राच्या भोवती फिरणार्‍या चांद्रयान-2च्या मदतीनं विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची यंत्रणा विक्रम लँडरवर बसविण्यात आली. बेंगलोरच्या जवळ असलेल्या इंडियन डीप स्पेस नेटवर्कच्या मदतीनं इस्रोला विक्रम लँडरशी संपर्क साधता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली. वेळप्रसंगी नासा आणि युरोपीय स्पेस एजन्सीच्या विविध देशांतील नेटवर्कची मदत घेता येईल, अशी तजवीज करण्यात आली.

या मोहिमेच्या संदर्भात इस्रोचं माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांचं भाष्य फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, मभारताची ही चांद्रयान मोहीम ही इतर ग्रहांसाठीच्या मोहिमांसाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे. अमेरिका आणि युरोपातील काही देशांसोबत इस्रोनं अनेक व्यावसायिक करार केले आहेत. या यशानंतर अवघं जग अवकाश संशोधनाबाबतची भारताची तांत्रिक क्षमता आणि प्रक्षेपण यंत्रणेची गुणवत्ता स्वीकारेल. आता इस्रो आपल्या सर्व अंतराळ मोहिमांसाठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरते. त्यामुळंच भारताचा अवकाश मोहिमांचा खर्च हा इतर देशांच्या तुलनेनं 50 ते 60 टक्क्यांनी कमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चांद्रयान-3नंतर भारत लवकरच, म्हणजे सन 2024-25मध्ये, चंद्रावर पुन्हा एकदा जाणार आहे. पण ती मोहीम जपानच्या सहकार्यानं होणार आहे. मल्युपेक्सफ असं त्या मोहिमेचं नाव आहे. आता आपलं सगळ्यांचं लक्ष मगगनयानफ या मोहिमेकडं लागलं आहे. भारतीय अवकाशवीरांना अवकाशात घेऊन जाऊन परत आणणारी ही मोहीम म्हणजे भारतीय अवकाशवीरांना चंद्रावर नेण्याची पूर्वतयारी आहे. ती यशस्वी होईल, यात शंकाच नाही.

Back to top button