राज्‍यरंग : पापलेटवर सरकारी मोहोर | पुढारी

राज्‍यरंग : पापलेटवर सरकारी मोहोर

डॉ. स्वप्नजा मोहिते

पापलेटची पर्यटकांमधील पसंती, स्थानिक पातळीवरील खाद्यसंस्कृतीमधील त्याचे अनन्यसाधारण स्थान आणि सर्वात महत्त्वाचे आर्थिक उलाढाल विचारात घेऊन पापलेट अर्थात सिल्व्हर पॉम्फ्रेटला शासनाने राज्य मासा म्हणून मान्यता दिली आहे. निर्यातीत पापलेटचा क्रमांक अव्वल असला तरीही पापलेटच्या उत्पादकतेतील घसरण खूप चिंताजनक आहे.

देश-परदेशातील पर्यटकांना कोकणच्या किनारपट्टीचे कायम आकर्षण राहिले आहे. त्याची कारणे दोन. एक म्हणजे कोकण किनारपट्टीतील निसर्गरमणीय समुद्र किनारे आणि दुसरे म्हणजे याच किनारपट्टीत मिळणारी विविध प्रकारची मासळी आणि त्यांची अनन्यसाधारण चव. माशांच्या विविध जातींपैकी जगभरात सुपरिचित असणारा मासा म्हणजे सिल्व्हर पॉम्फ्रेट अर्थात पापलेट. याला खवय्यांकडून सर्वाधिक पसंती असते. कोकणातील खाद्यसंस्कृतीमध्ये पापलेट माशाला प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. राज्याच्या सागरी किनारपट्टीतील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यांतील मच्छीमारांना जाळ्यात पापलेट मिळाले की ते सुखावूनच जातात. कारण त्यांतून होणारी आथिर्र्क प्राप्ती मोठी होत असते. पापलेटची पर्यटकांमधील पसंती, त्याच बरोबर स्थानिक पातळीवरील खाद्यसंस्कृतीमधील त्यांचे अनन्यसाधारण स्थान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांतून मोठ्या प्रमाणातात होणारी आर्थिक उलाढाल विचारात घेऊन पापलेट अर्थात सिल्व्हर पॉम्फ्रेटला शासनाने नुकताच राज्य मासा म्हणून मान्यता दिली आहे.

सागरामधील विविध वादळे, सागरी पर्यावरणीय समस्या, सागरी प्रदूषण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाल्यावस्थेतील पापलेटची होणारी धरपकड यामुळे सिल्व्हर पॉम्फ्रेटचे प्रमाण कमी होत असल्याची समस्या समोर आली आणि म्हणूनच राज्यातील यांत्रिक मासेमारीमुळे धोक्यात असलेल्या सिल्व्हर पॉम्फ्रेट म्हणजेच पापलेट या माशाला वाचवण्यासाठी सरकारकडे निर्णायक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली होती. स्ट्रोमॅटिडी कुळातील पॅम्पस अर्जेन्टियस (झर्रािीी रीसशपींर्शीी) म्हणजेच पापलेट हा मासा भारताच्या किनारपट्टीवरील महत्त्वाचा टेबल फिश मानला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला सर्वाधिक मागणी आहे. देशाच्या पश्चिम किनार्‍यावरील महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा तर पूर्व किनार्‍यावरील पश्चिम बंगाल हे पापलेट माशांच्या विपुलतेचे प्रमुख क्षेत्र आहेत. अरबी समुद्रात त्याची उपलब्धता गल्फ ऑफ कच्छपासून गल्फ ऑफ कँबेपर्यंत आढळते.

कोकण किनारपट्टीतील पालघर जिल्ह्यामधील सातपाटी गावातील कोळी समाज अनेक दिवसांपासून राज्य आणि केंद्र सरकारकडे या माशांच्या संरक्षणासाठी मागणी करत होता. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे आणि पालघरमधील सातपाटी येथे पापलेट मासा मोठ्या प्रमाणात पकडला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून या माशाचे उत्पादन कमी होत चालले होते. गेल्या काही दशकांमध्ये केवळ या पापलेटचे उत्पादन जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, समुद्राच्या तापमानवाढीमुळे पॉम्फ्रेटसह अनेक मासे गुजरातच्या किनार्‍याकडे आणि तेथून पाकिस्तानजवळील किनर्‍याकडे स्थलांतर करत आहेत. पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन 1962 ते 1976 या काळात 8 हजार 312 टन होते. 1991 ते 2000 या काळात ते 6 हजार 592 टनांपर्यंत घटले. 2001 ते 2010 दरम्यान 4 हजार 445 टन तर 2010 ते 2018 मध्ये 4 हजार 154 टन पापलेट उत्पादनाची नोंद झाली. सुपर पॉम्फ्रेट (500 ग्रॅम आणि त्याहून अधिक वजनाचे) 1990-91 मध्ये 1,46,797 किलोग्रॅम मिळाले होते, ते 2022-23 मध्ये 4,508 किलोग्रॅमपर्यंत घसरलेले दिसून आले. याचबरोबर या माशाचा आकारही लहान झाला आहे. निर्यातीत पापलेटचा क्रमांक अव्वल असला तरीही पापलेटच्या उत्पादकतेतील घसरण खूप चिंताजनक आहे.

पापलेट माशाचे जीवशास्त्र हा जगभरातील अनेक संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे. गिल नेट, डोल नेट यांच्या मदतीने पकडल्या जाणार्‍या माशाचा सप्टेंबर ते जानेवारी हा मुख्य पकडण्याचा काळ मानला जातो. पापलेटच्या प्रजननक्षम माद्या वर्षभर आढळतात. पापलेट नर साधारणपणे 20 सें.मी.ला तर माद्या 24 ते 27 सें.मी.ला प्रजननक्षम होतात आणि साधारणपणे 33 सें.मी. इतका वाढतो. या माशाचा मुख्य प्रजनन काळ फेब्रुवारी ते ऑगस्ट असल्याचे दिसून येते. म्हणजेच याचा प्रजनन काळ हा खूप मोठा आहे. मुंबईच्या किनारपट्टीत हा मासा ऑक्टोबर – डिसेंबरदरम्यान प्रजनन करतो असे आढळले आहे आणि याची पिल्ले जानेवारीपासून किनार्‍याजवळ आढळतात. गुजरातच्या वेरावळ किनारपट्टीत याची पिल्ले फेब्रुवारी – मार्च आणि ऑगस्ट दरम्यान आढळतात. 1 ते 2 कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे सफेद किंवा सिल्व्हर पापलेट रु. 1200 ते 1500 प्रति कि.ग्रॅ. भावाने विकले जाते आणि असे मोठे पापलेट हे खवय्यांसाठी मोठीच पर्वणी असते.

सिल्व्हर पॉम्फ्रेट मिळणे म्हणजे मासेमारांसाठी एक लॉटरीच असते. झळाळत्या चंदेरी रंगाचा हा मासा घेण्यासाठी ग्राहक, पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिकांची गर्दी नेहमीच हर्णे, सातपाटी, पालघर इथे बघायला मिळते. याला असलेली मागणी बघून मच्छीमारही मोठ्या प्रमाणात हा मासा पकडत गेले. याचा परिणाम ग्रोथ ओव्हर फिशिंगमध्ये झाला आणि मोठ्या आकाराचे पापलेट मिळणे दुरापास्त होत गेले. यामुळे मासेमार छोट्या आकाराच्या, ज्याला बिस्कीट पापलेट म्हणून ओळखले जाते, अशा पापलेटच्या पिल्लांकडे वळले. याच मागणीमुळे ह्या मौल्यवान कॅचने समृद्ध असलेल्या भागात हजारो कोळी मच्छीमार, स्थानिक पातळीवर सारंगा म्हणून ओळखले जाणारे सिल्व्हर पॉम्फ्रेट पकडण्याच्या नादात त्याची अनियंत्रित मासेमारी करत होते. यासाठी पायाभूत सुविधांचा योग्य विकास झाला नसल्याने ही मासेमारी करणे लोकांच्या जीवावरही बेतत होते. यामुळे सिल्व्हर पॉम्फ्रेट पकडण्यासाठी त्याचे वजन 350 ग्रॅम असावे म्हणजे त्यांमध्ये यशस्वी प्रजनन होईल, अशी मागणीही मासेमारांनी केली आहे. सध्या पकडल्या जाणार्‍या पापलेटमध्ये 150 ग्रॅम आकाराचे मासे आहेत आणि याचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे पापलेटच्या आकारावर नियंत्रण आणल्यास त्याचे साठे संरक्षित होतील आणि भविष्यात हा मासा पुन्हा पकडता येईल, असा मासेमारांचा विश्वास आहे.

ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन सिल्व्हर पॉम्फ्रेट वाचवायचं असेल तर त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी योग्य पावले आत्ताच उचलायला हवीत. लोकप्रियतेमुळे सिल्व्हर पॉम्फ्रेटची मासेमारी प्रजननक्षम माशांना प्रजननाची संधी मिळण्यापूर्वीच आणि पिल्लांना वाढीसाठी योग्य काळ मिळण्याआधीच होत आहे असे आता मच्छीमारांच्याही लक्षात आले आहे. गेल्या काही वर्षांत किनारपट्टीच्या पाण्यात पापलेटचे प्रमाण कमालीचे घटले आहे. सिल्व्हर पॉम्फ्रेटची घटती संख्या पाहता या प्रजातीचे पूर्ण वाढलेले मासे पकडणे कठीण आहे असे आता वाटू लागले. मुंबईतील केंद्रीय मात्स्यिकी सर्वेक्षण संस्थेने वेळोवेळी चिंता व्यक्त केली होती. पापलेट विणीच्या हंगामात एप्रिल-मे काळात कर्ली डोल पद्धतीने मासेमारी बंद करणे, जाळी, बोटींची संख्या मर्यादित करणे, हे उपाय संस्थेने दोन दशकांपूर्वीच सुचविले होते.

जगभरात पापलेट मासा इतका लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे त्याची चव आणि त्यापासून बनवल्या जाणार्‍या डिशेस! शिजवल्यावर त्याला मऊ, लोणीयुक्त चव असते. कोकणातील भरले पापलेट हे तर खवय्यांच्या गळ्यातील ताईतच बनले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्णयामुळे या प्रजातींचे संरक्षण होईल आणि राज्यात त्यांची पकड वाढेल अशी अपेक्षा आहे. यासाठी सरकारने सिल्व्हर पॉम्फ्रेटचे डाक तिकीटही काढले आहे. म्हणूनच कठोर शिस्त आणि अभ्यास यांची सांगड घालून आपला राज्य मासा, सिल्व्हर पॉम्फ्रेट नक्की वाचवता येईल. (लेखिका मत्स्यमहाविद्यालय, रत्नागिरी येथे मत्स्य जीवशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)

Back to top button