संस्‍कृती : हस्ती मिटती नहीं हमारी! | पुढारी

संस्‍कृती : हस्ती मिटती नहीं हमारी!

डॉ. सच्चिदानंद शेवडे

उदयनिधी हा सिनेअभिनेता आणि वितरक असून सांप्रत काळात त्याच्या वडिलांच्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री आहे. सनातन निर्मूलन परिषदेत त्याने आपल्या अकलेचे तारे तोडले. आर्य, सनातन, वैदिक, हिंदू अशा वेगवेगळ्या नावांनी हा धर्म ओळखला जातो, हे त्याला माहिती असण्याचे काही कारण नाही. आर्य म्हणजे सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षितांचा धर्म होय. सनातन म्हणजे जो कधी निर्माण झाला ते ठाऊक नाही, पण जो कधीही नष्ट होणार नाही असा, नित्य नूतन धर्म.

काहीही बोलायला तीन गोष्टी आवश्यक असतात. तोंडात जीभ, स्वरयंत्र आणि बोलण्याची ताकद. यात अभ्यास, वाचन, चिंतन, सत्यता पारखणे आदींची आवश्यकता नसते, असे मूर्ख वक्तव्य करणार्‍यांना वाटते. आपल्याकडे राजकारणी व अभिनय क्षेत्रात काम करणार्‍यांना कित्येकजण विचारवंत समजतात! त्यातून अविचाराने केलेल्या बाष्कळ बडबडीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही मिळते. ती मिळत असताना आपण ‘सेल्फ गोल’ करीत आहोत का, याचे भानही बडबडकर्त्याला राहात नाही. याची अलीकडच्या काळात घडलेली अनेक उदाहरणे आहेत. उदयनिधीच्या निमित्ताने एकदा राजकीय मंडळींच्या बेताल बोलावरही द़ृष्टी टाकू, म्हणजे यात एखादा छुपा अजेंडा दडला आहे का हा निव्वळ तोंडाळपणा, याचा जनसामान्यांना सहज विचार करता येईल.
स्वामी प्रसाद मौर्य (सपा) – हिंदू हा धर्म नसून ती एक फसवणूक आहे.

चंद्रशेखर यादव (राष्ट्रीय जनता दल) – रामायण द्वेष शिकवते आणि इस्लाम मोहब्बत!
सतीश जारकीहोळी (काँग्रेस) – हिंदू हा शब्द फारसी असून त्याचा अर्थ घाणेरडा आहे.
राजेंद्र पाल गौतम (आप) – हिंदू देव-देवता खोट्या असून ब्रह्मा, विष्णू, महेश, सरस्वती, दुर्गा असे काही नसते.
छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस) – सरस्वतीने आम्हाला कधी शिकवले नाही, मग तिची पूजा कशासाठी?
उदयनिधी स्टॅलिन (द्रमुक) – सनातन धर्मामध्ये समानता नसल्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन होणे गरजेचे आहे.
ए. राजा (द्रमुक) – सनातन धर्म म्हणजे एडस् वा कुष्ठरोगासारखा आहे. त्याला नष्ट करायला हवे.

ही काही उदाहरणे झाली. यूपीए सरकारने तर श्रीराम झाले नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. यातील भुजबळ वगळता अन्य सगळेजण हे I.N.D.I.A. या नूतन आघाडीचे घटक आहेत. यातील कोणीही उदयनिधीच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याची हिंमत अद्याप तरी दाखवलेली नाही. ही आघाडी हिंदूद्वेषी लोकांनी भरली आहे, असा प्रचार भाजप करणार हे स्वच्छ आहे. एकूण या वक्तव्यामुळे उदयनिधीने ‘सेल्फगोल’ केला आहे.

अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक्रम:।
एकस्य दंशति श्रोत्रमन्य: प्राणैर्वियुज्यते।
(दुष्टरूपी नागाची मारायची रीत वेगळीच असते. तो एकाच्या कानाला चावतो अन् दुसराच प्राणाला मुकतो.)

आता अशी अवस्था मोदी विरोधकांची होणार आहे. थांबा, विचार करा आणि व्यक्त व्हा या गोष्टी विरोधकांच्या गावीसुद्धा नसाव्यात याचे आश्चर्य वाटते. आत्ताही 18 सप्टेंबरपासून विशेष अधिवेशन बोलावले म्हणून यांनी गणेशोत्सवाच्या नावावर आरडाओरडा केला. मोदी कसे हिंदू उत्सव विरोधी असल्याची आवई उठवली. त्याच उत्सवाच्या दिवसापासून नव्या संसद इमारतीत अधिवेशन भरणार असून बुद्धिदात्या देवतेचा सन्मानच पंतप्रधानांनी केल्याचे दाखवून सर्व विरोधकांचे दात घशात घातले!

तुमचे विरोधक जेव्हा आत्महत्या करायचे ठरवतात तेव्हा त्यांना थांबवायचे नसते, असे म्हटले जाते. उदयनिधी आणि अन्य वायफळ बडबड करणारे विरोधी नेते तेच करीत आहेत याची एकाही नेत्याला जाणीव होऊ नये याचा विस्मय वाटतो.

द्रमुक नेते हे रामसामी पेरियारच्या विचारांचे असल्याची टिमकी वाजवीत असतात. पेरियारने जे मांडले आहे, त्याला विचार म्हणणे म्हणजे विचार या शब्दाचे अवमूल्यन केल्यासारखे होईल. सातत्याने देवादिकांना शिव्या घालत स्वतंत्र द्रविडस्तानाची मागणी रेटत राहणे. हिंदी भाषा म्हणजे उत्तरेतील आर्यांची भाषा द्रविडी लोकांवर लादण्याचे षड्यंत्र आहे येथपासून ते ब्राह्मण हेच जातिव्यवस्थेचे मूळ आहेत, अशी अनैतिहासिक मांडणी करणारे लेखन हेच पेरियारचे कार्य होय. स्वराज्य मिळण्याच्या काळात त्याला पाकिस्तानप्रमाणे स्वतंत्र द्रविडस्तान निर्माण करायचा होता. या मागणीला तेथील जनतेने अजिबात साथ दिली नाही. पेरियारच्या हयातीतच करुणानिधी आणि एमजीआर यांच्यात संघर्ष उभा राहिला. परिणामी द्रविड चळवळ फुटली. दोघांनी आपले वेगळे पक्ष काढले. पेरियारना स्वतःच्या हयातीतच आपल्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे पाहावे लागले. ईश्वर, धर्म, ब्राह्मण, काँग्रेस, गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भरपूर टीका करण्याचे त्यांचे उद्योग होते.

हे सांगण्याचे कारण म्हणजे उदयनिधीची विचार(?) परंपरा जाणून घेणे होय. त्याच्या वडिलांचे नाव स्टॅलिन. रशियात लक्षावधी लोकांना ठार करणार्‍या स्टॅलिनचे नाव आपल्या सुपुत्राला ठेवण्यामागे करुणानिधींचा काय उद्देश होता, तेच जाणोत! तोंडाने सतत संविधान आणि लोकशाही मूल्ये यांचा गजर करीत हिंसाचाराचे समर्थन करणे हे अशा लोकांचे वैशिष्ट्य असते. वामपंथी विचारधारा हेच शिकवते. लोकांच्या श्रद्धा खुशाल ठोकरा, पण त्याचवेळी लोकशाहीचा उदो उदो करण्याची काळजी घ्या, ही या नास्तिकवादी म्हणविणार्‍या लोकांची कार्यपद्धती असते.

उदयनिधी हा सिनेअभिनेता आणि वितरक असून सांप्रत काळात त्याच्या वडिलांच्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री आहे. तो नास्तिकवादी मंचावर बोलायला गेला होता. सनातन निर्मूलन परिषदेत त्याने आपल्या अकलेचे तारे तोडले. मंत्री असताना घेतलेल्या शपथेचेसुद्धा अशा वेळी सोयीस्कर विस्मरण होत असावे. आर्य, सनातन, वैदिक, हिंदू अशा वेगवेगळ्या नावाने हा धर्म ओळखला जातो, हे त्याला माहिती असण्याचे काही कारण नाही. आर्य म्हणजे सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षितांचा धर्म होय. सनातन म्हणजे जो कधी निर्माण झाला ते ठाऊक नाही, पण जो कधीही नष्ट होणार नाही असा, नित्य नूतन धर्म. ज्याचे वेद हे मूळ आहेत म्हणून वैदिक धर्म आणि जो आपल्यातील हिण दूर करतो असा म्हणून हिंदू धर्म होय. वस्तुतः धर्माला नाव नसते. हे सर्व त्या बिचार्‍याला ठाऊक असायचा काही संभव नाही.

सनातन धर्मात समानता नाही असे म्हणणार्‍या उदयनिधीला समानता कोणत्या धर्मात आहे ते सांगता आले नाही. इस्लाममध्ये अनेक पंथ आहेत. यातील काहींमधून तर विस्तवही जात नाही. ते एकमेकांची प्रार्थनागृहे नष्ट करतात; तर काहींना ते मुसलमानही मानत नाही. ख्रिश्चनांमध्ये समानता असती तर खुद्द दक्षिणेत दलित ख्रिश्चनांसाठी वेगळी चर्चेस का आहेत? तथापि असे प्रश्न विचारायचे नसतात. सनातन धर्म समजूनही न घेता त्यावर वाटेल तसे आणि निरर्गल भाषेत टीका करणे खूप सोपे असते. अन्यांवर केली तर थेट मृत्यूभय असते ना, ही त्याच्यासारख्याची अडचण आपण समजून घेतली पाहिजे! पण हे टीकाकार एक गोष्ट मात्र विसरतात की,

युनान रोम मिस्र, सब मिट गये जहां से ।
कुछ बात हैं की,
हस्ती मिटती नहीं हमारी ॥

यातील ‘कुछ बात’ म्हणजे नेमकी कोणती, ते समजून घ्यायला बहुधा शिकवणी लावावी लागेल!

‘वसुधैव कुटुंबकम’ ही संपूर्ण जगाबद्दल भावना ठेवणारे सनातन धर्मीच असतात. ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ अशी सर्व प्राणिमात्रांच्या सौख्याची प्रार्थना करणारेही सनातनीच असतात. जगातील सर्वांना, मग ते कोणत्याही धर्म वा पंथाचे असोत, उत्तम गती मिळावी म्हणून प्रतिदिनी जल अर्पण करीत प्रार्थना करणारेही सनातन धर्माचा निर्वाह करणारे असतात. यातील एक तरी भावना जगातील कोणत्याही धर्माची असते का?

माणसांमधील भेदभावांना राजकारण्यांनी जोपासले आणि वाढवले हे सत्य नाकारता येण्यासारखे आहे का? सनातन धर्माने खूप परिवर्तन घडवून आणले. अन्य धर्मांमधील परिवर्तनाबद्दल नुसते बोलून पाहा! जो माझ्या धर्माचा नाही त्याला कायम नरकात जावे लागते असा विचार सनातन धर्मात नाही.

उदयनिधीचे आजोबा वैदिकांना बोलावून वेदोच्चारण करवून घेतात, त्याच्या मातोश्री वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी जातात आणि दानधर्म करतात. इथे हे सुपुत्र मात्र लोकसभा निवडणुकांच्या ऐन भरात सेल्फगोल करण्यात मग्न आहेत. त्यांचे मित्रपक्ष घोर निद्रेत आहेत. तामिळनाडूतील सीटस् राखून देशातील सत्ता मिळत नसते हे या सर्वांच्या लक्षात येईल तोवर उशीर झालेला असेल!

Back to top button