टेक इन्फो : स्मार्ट छत्री

स्मार्ट छत्री
स्मार्ट छत्री

सध्या जमाना स्मार्ट असण्याचा आहे. पूर्वी व्यक्ती स्मार्ट असत, आता उपकरणे स्मार्ट बनत चालली आहेत. वाहने, घरे, रेफ्रिजरेटर, टी.व्ही., फोन जर स्मार्ट होऊ शकतात; तर छत्री का नाही. कुणी म्हणेल आता या मामुली छत्रीमध्ये काय स्मार्ट वैशिष्ट्ये असू शकतील?

नेमेचि येतो पावसाळा… हे सृष्टीचे कौतुक सर्वांनाच माहीत असते. प्रत्येक जण (दरवर्षी उशीर करणार्‍या) पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि एकदा का पाऊस चार-चार दिवस न थांबता पडायला लागला की, तो कधी थांबेल, अशी इच्छा करू लागतो. यामागचे कारण असे की, कामाला निघालेल्या व्यक्तीला इथे एकेक मिनिट महत्त्वाचे असते आणि गर्दीत वा ट्रॅफिकमध्ये खिशातल्या वस्तू, हातातली बॅग किंवा पाठीवरची लॅपटॉपची सॅक सांभाळताना पाऊस पडू लागला की, होणारी तारांबळ खरे तर कोणलाच मनातून नको असते. कारण, त्यावेळी पावसाचे रूप कितीही धुंद आणि मनमोहक असले, तरी ते एन्जॉय करण्याची परिस्थिती नसते! तशातच छत्री नसली, मोडली किंवा हरवली तर विचारूच नका… पण थांबा. आधुनिक जीवनशैलीच्या सर्वच पैलूंना स्पर्शणारे नवतंत्रज्ञान आता चक्क छत्रीमध्येही शिरले आहे आणि छत्रीचे परंपरागत रूप तसेच ठेवूनही त्याने तिला अधिक सोयीस्कर बनवले आहे.

सध्या जमाना स्मार्ट असण्याचा आहे. पूर्वी व्यक्ती स्मार्ट असत, आता उपकरणे स्मार्ट बनत चालली आहेत. वाहने, घरे, रेफ्रिजरेटर, टी.व्ही., फोन जर स्मार्ट होऊ शकतात; तर छत्री का नाही. वर्षातले किमान चार महिने पावसात हा सवंगडी आपल्याला साथ देतो आणि भरउन्हात जायची वेळ आली तर आपले रक्षण करतो. कुणी म्हणेल आता या मामुली छत्रीमध्ये काय स्मार्ट वैशिष्ट्ये असू शकतील? स्मार्ट छत्री ही अशी एक छत्री आहे, ज्यामध्ये अंगभूत सेन्सर असतात जे रिअल-टाईममध्ये दाब, तपमान, आर्द्रता आणि सूर्यप्रकाश या सर्वांची माहिती गोळा करतात. यात हवामानाचे अंदाज, हरवली तर रिअल टाईम ट्रॅकिंग, दांड्याचा सुरक्षेसाठी वापर, आपत्कालीन गजर, असे अनेक बहुउपयोगी वैशिष्ट्ये असतात.

आपण मुळात आज पाऊस पडेल की नाही? या यक्षप्रश्नापासूनच सुरुवात करू. छत्रीच्या दांड्यामध्ये बसवलेली प्रणाली, तीमधील अ‍ॅपच्या साहाय्याने, हवामानाचा अंदाज पुरवू शकते. हे अ‍ॅप वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमधील आयओएस किंवा अँड्रॉईड ओएससोबत काम करते. अ‍ॅपद्वारे, नेटवरून, स्थानिक हवामानाच्या स्थितीची माहिती घेतली जाते. याद्वारे पावसाबरोबरच कडक उन्हाचीही सूचना मिळत असल्याने या माहितीनुसार मुळात छत्री नेण्याची गरज आहे वा कसे हे आपण ठरवू शकतो. दुसरे असे की, छत्री उघडण्याचे आणि बंद करण्याचे काम करण्यासाठी छत्रीच्या दांड्यात चक्क बॅटरीवर चालणारी मोटरच बसवलेली आहे! तिला एक मायक्रोचिप कंट्रोलरही आहे. लिथिअम आयन प्रकारची ही बॅटरी एकदा चार्ज झाल्यावर 150 वेळा छत्रीची उघडझाप करू शकते आणि सहा महिने स्टँडबायवर राहू शकते तसेच छत्री उघडायला व बंद करायला प्रत्येकी 2 सेकंद पुरतात.

आता छत्री उघडण्यासाठी मोटर कशाला? हाताने नाही का उघडता येत? हा प्रश्न तसा वाजवी आहे. परंतु, कडेवर लहान मूल अथवा दोन्ही हातांत पिशव्या इत्यादी असताना किंवा वादळी वारा-पावसाच्या परिस्थितीत हाताने छत्री उघडणे, विशेषतः बंद करणे, अवघड असते हेदेखील मान्य व्हावे! शिवाय मोटरला बायपास करून छत्री हाताने उघडण्याची सोय असल्याने बॅटरी डेड झाल्यास गैरसोय होत नाही.

आता छत्री हरवण्याच्या वा विसरण्याच्या मानवी स्वभावाकडे वळू. जीपीएस, ट्रॅकिंग सेन्सर्स यासारख्या यंत्रणा नवीन कार्समध्ये वापरलेल्या आपल्याला आढळतात. हा ट्रॅकिंग डिव्हाईस ऊर्फ टाईल सेन्सर साधारणपणे काडेपेटीच्या आकाराचा असतो आणि त्याच्या पाठीवरचे चिकट पॅड वापरून तो महत्त्वाच्या वस्तूवर चिकटवून ठेवता येतो. त्याच्या आत साधारणत: 50 ते 100 फुटांपर्यंत काम करणारी लो एनर्जी ब्लूटूथ यंत्रणा असते. वापरकर्त्याच्या स्मार्टफोनशी संलग्न असल्याने त्याने विचारणा करताच संबंधित वस्तूचा ठावठिकाणा फोनवर दाखवला जातो. छत्री आणि तिच्या मालकातील अंतर वाढू लागल्यास तसा संदेश फोनवर पाठवला जातो. टाईल सेन्सरच्या मदतीने हरवलेली छत्री शोधण्याचे दोन मार्ग आहेत. वर म्हटल्याप्रमाणे छत्री स्मार्टफोनपासून 50 ते 100 फुटांच्या अंतरात असेल तर छत्रीतून एक विशिष्ट संगीत (ट्यून) प्रसारित केले जाते. अंतर जास्त असल्यास छत्रीचे स्थान नकाशावर दाखवले जाते. शिवाय, याला 'कम्युनिटी फाईंड'ची सुविधा आहे. म्हणजे अशाच प्रकारचे टाईल सेन्सर वापरणारी कोणी व्यक्ती या छत्रीच्या आसपास असल्यास छत्रीच्या मालकाप्रमाणेच तिलाही हे स्थान कळवले जाते.

छत्री वापरणार्‍यांना आणखी एका समस्येचा सामना करावा लागतो – जोराचा वारा! वार्‍यामुळे उलटलेली छत्री सरळ करणे वाटते तेवढे सोपे नसते… शिवाय त्यात वेळ गेल्याने भिजायला होतेच! परंतु, या नव्या छत्र्यांच्या घुमटाची (कॅनोपी) आणि काड्यांची रचना अशी आहे की, ताशी 80 ते 120 कि.मी. वेगाने वाहणार्‍या वार्‍यातदेखील ती उलटत नाही.

आता यात सौरऊर्जा निर्मितीचे प्रकल्पही सुरू आहेत. सौर छत्र्यांमध्ये छत्रीवर एक सौर पॅनेल सेटअप आहे जे विद्युतस्रोतामध्ये रूपांतर करते आणि साठवते. या ऊर्जेचा वापर आपण कुठेही करू शकतो. आपण घरी अथवा कार्यालयात आहात, तर आपण आपली सौर छत्री गच्ची, बाल्कनी (जिथे लख्ख सूर्यप्रकाश आहे) तिथे उघडून ऊर्जानिर्मिती करू शकता. एकंदर काय, पूर्वीची साधी छत्री आता बहुगुणी स्मार्ट बनली आहे व आपले आयुष्य सुखकर बनवत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news