मनोरंजन : सिनेमातला बापही सुपरहीरो | पुढारी

मनोरंजन : सिनेमातला बापही सुपरहीरो

प्रथमेश हळंदे

सनी देओलने पासष्टी ओलांडलीय. रजनीकांतही सत्तरीच्या पलीकडे गेलाय. वय त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकतंय. अर्थातच, त्यांना ते लपवणं सहज शक्य आहे; पण प्रेक्षकांना काय आवडतं, हे दोघांनाही बरोबर समजलंय. त्यामुळे तरुण असण्याचं खोटं अवसान न आणता, वयाचा मान ठेवत त्यांनी बापाची भूमिका साकारलीय. अभिनयाच्या करिष्म्यामुळे त्यांच्या स्टारडमचं ‘बाप’पण सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरलेत.

ऑगस्टमधला गेला वीकेंड हा व्यावसायिक सिनेमांसाठी वरदानच ठरलाय. कमाईच्या अनेक वेगवेगळ्या विक्रमांनी या आठवड्यात तिकीटबारी गाजवली. साधारणतः, मोठमोठ्या सिनेमांना एकत्र रीलिज झाल्याने फटका बसताना दिसतो; पण गेल्या आठवड्यात आमने-सामने रीलिज झालेल्या ‘गदर 2’, ‘जेलर’, ‘ओएमजी 2’ आणि ‘भोला शंकर’ या चारही मोठ्या सिनेमांनी दणक्यात कमाई केली. त्यातही ‘गदर 2’ आणि ‘जेलर’ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद अक्षरशः अद्भुत आहे. स्टारडमच्या प्रस्थापित व्याख्यांना सुरुंग लावत या सिनेमांनी आपलं वर्चस्व तिकीटबारीवर जमवलंय. प्रमोशन आणि मार्केटिंगच्या वेगवेगळ्या आयडिया लढवत आपलं नसलेलं स्टारडम उगाच मोठं करून दाखवणार्‍या युवा पिढीला अस्सल स्टारडम काय असतं, हे सध्या ‘गदर 2’मधून सनी देओल आणि ‘जेलर’मधून रजनीकांत दाखवून देतोय.

2001 मध्ये ‘गदर : एक प्रेम कथा’ रीलिज झाला. सनी देओल, अमरीश पुरी आणि अमिषा पटेल हे तिघे यात मुख्य भूमिकेत होते. फाळणी, भारत-पाक वैर, आंतरधर्मीय प्रेम कथा आणि देश प्रेमाची झालर लावलेला हा सिनेमा त्यावेळी तुफान चालला. यातले कित्येक संवाद आणि प्रसंग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत, याची पोचपावती म्हणजे ‘गदर 2’ची कमाई.

आपल्या बजेटच्या चारपट कमाई करणारा ‘गदर 2’ हा ‘गदर : एक प्रेम कथा’चा सिक्वेल आहे. ही कमाई पाहता, देओल कुटुंबाचा लाडका दिग्दर्शक अनिल शर्मा 22 वर्षांनंतरही पहिल्या ‘गदर’सारखं यश मिळवण्यात यशस्वी ठरलाय, असंच म्हणावं लागेल. दिवंगत अभिनेते अमरीश पुरींची ‘सीजीआय’च्या मदतीने साकारलेली व्यक्तिरेखा हे या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य.

‘गदर 2’ची कथा पहिल्या ‘गदर’च्या सतरा वर्षांनंतर सुरू होते. 1971 च्या तिसर्‍या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी या कथेला लाभलीय. पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या आपल्या लेकाला वाचवायला जाणारा बाप ही या सिनेमाची साधी सरळ कथा; पण या बाप-लेकाच्या कथेला देश प्रेमाचा बूस्टर डोस पाजला गेल्यामुळे हा सिनेमा तिकीटबारीवर कोट्यवधीची उलाढाल करताना दिसतोय.

सनी देओलने साकारलेला तारा सिंग आता म्हातारा झालाय; पण त्याच्या मनातली देशभक्ती अजूनही जवानच आहे, हे पदोपदी जाणवत राहतं. पहिल्या ‘गदर’मधला ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’चा गाजलेला प्रसंग इथेही आहे; पण त्याला ‘वंदे मातरम्’ जोडल्याने देशभक्तीचा मीटर आणखीनच उंचावला गेलाय.

एकीकडे, तिकीटबारीवर लागलेला देशभक्तीचा मीटर जोरात पळतोय, तर दुसरीकडे रजनीभक्तीच्या लाटेत तिकीटबारी दिवसरात्र धुऊन निघतेय. सुपरस्टार रजनीकांतची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘जेलर’ हा मूळचा तमिळ सिनेमा कन्नड, तेलगू, हिंदी आणि मल्याळम भाषेत रीलिज केला गेलाय. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमारचा हा चौथा सिनेमा. आता ‘जेलर’च्या निमित्ताने ओळीने चार हिट देत नेल्सन आता महत्त्वाच्या तमिळ दिग्दर्शकांपैकी एक बनलाय.

काही वर्षांपूर्वी ‘जेलर’ असलेल्या बापाने आपल्या एसीपी असलेल्या पोरासाठी एका कुख्यात तस्कर टोळीशी घेतलेला पंगा, ही ‘जेलर’ची मूळ कथा. या अगदीच साधारण वाटणार्‍या या कथेला खास रजनी टच लाभलाय.

तामिळनाडूमधे रजनीकांत ‘तलैवा’ म्हणून ओळखला जातो. ‘तलैवा’ म्हणजे बॉस, स्वामी. साडेचार दशकांहून अधिक काळ रंगलेली रजनीकांतची सिनेकारकीर्द कोणत्याही सिनेकलाकाराला हेवा वाटावी अशीच आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर रजनीकांत तमिळ अस्मितेचं एक महत्त्वाचं प्रतीक बनलाय. तमिळ सिनेरसिकांच्या प्रेमामुळे जिवंतपणीच देवत्व लाभलेल्या रजनीकांतचा कुठलाही सिनेमा आजही एक लोकोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. ‘जेलर’ही त्याला अपवाद नाही.

‘जेलर’ कॉर्पोरेट वीकेंडच्या एक दिवस आधीच म्हणजेच 10 ऑगस्टला रीलिज झाला. त्या दिवशी तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईत लोकोत्सव होणं साहजिकच होतं; पण त्याचबरोबर हैदराबाद, बंगळूरमध्येही ऑफिसला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. रजनीकांतची लोकप्रियता आणि भक्ती ही कुठल्याही प्रादेशिक-भाषिक चौकटीपुरती मर्यादित नाही, हेच या सुट्ट्या छातीठोकपणे सांगताहेत.

‘गदर 2’ आणि ‘जेलर’ला सर्वच आर्थिक वर्गातल्या प्रेक्षकांचा लाभलेला प्रतिसाद हा स्टारडमच्या प्रस्थापित व्याख्यांना सुरुंग लावणारा ठरलाय. पन्नाशीनंतरही तरुण दिसण्यासाठी ‘सीजीआय’ची मिनतवारी करणारे, पिकलं पान असलं तरी आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करणारे, मार्केटिंग आणि पीआरवर भरमसाट खर्च करणारे सगळेच स्वयंघोषित स्टार आणि त्यांचा तथाकथित स्टारडम या दोन सिनेमांनी प्रश्नांकित केलाय.

सनी देओलने पासष्टी ओलांडलीय. रजनीकांतही सत्तरीच्या पलीकडे गेलाय. त्यांचं वय त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट झळकतंय. अर्थातच, त्यांना ते लपवणंही सहज शक्य आहे; पण प्रेक्षकांना काय आवडतं हे दोघांनाही बरोबर समजलंय. त्यामुळे तरुण असण्याचं खोटं अवसान न आणता, वयाचा मान ठेवत त्यांनी बापाची भूमिका साकारलीय. साहजिकच, त्यांच्या अभिनयाच्या करिष्म्यामुळे त्यांच्या स्टारडमचं ‘बाप’पण सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरलेत.

‘तुका म्हणे नेदी गांजू आणिकांसी। उदार जीवासी आपुलिया॥’ या तुकोबांच्या ओळींना साजेसा बाप सनी आणि रजनीकांतने पडद्यावर उभा केलाय. तो हळवा आहे, जरासा भोळसटही आहे; पण आपल्या कुटुंबाला धक्का लागू नये यासाठी प्रसंगी कणखर होण्याची ताकदही तो बाळगतो. सिनेमातल्या आयांना प्रेक्षकांनी आजवर प्रचंड प्रेम दिलंय; पण सिनेमातले बाप मात्र त्या तुलनेत बरेच उपेक्षित राहिलेत. हे चित्र आता हळूहळू बदलतंय. सिनेमातली आई जशी ‘केजीएफ’मध्ये सांगितल्याप्रमाणे योद्धा म्हणून गौरवली जातेय, तसाच सिनेमातला बापही आता सुपरहीरोंच्या रांगेत जाऊन बसतोय. कुणी कितीही स्टारडमच्या गप्पा मारल्या, तरी खरा स्टार हा बापच असतो. आपल्या बाप असण्याचा सोहळा दिमाखात साजरा करणारे सनी आणि रजनीकांत त्यांच्या ‘गदर 2’ आणि ‘जेलर’च्या कमाईमधून हेच सांगताहेत.

Back to top button