बिबट्या बोलतोय!

बिबट्या
बिबट्या
Published on
Updated on

तुमाला कुत्री नकोत, मगरी नकोत, बिबट्या नको, चिमण्या-कावळं नकोत, तुमाला दावणीला बैलं नकोत, रानात साप नकोत, वाघ नकोत, अस्वलं नकोत… तुम्हाला तुमच्याबिगर इथं कुणी नगो, असं कसं चालणार?

तुमी आमच्या जंगलात घुसलात, झाडं तोडून तस्कर्‍या केल्यात, आमच्या घरावर अतिक्रमण करून तुमची फार्म हाऊस बांधलीत, दारू ढोसून-दंगा करत जंगलात मस्ती केलीत, तुमाला दगडं पायजेत म्हणून मशिनरी लावून डोंगरच्या डोंगर घशात घातलात, माती-मुरुमासाठी खणी काढल्यात, तुमी वाळूसाठी नदी पोखरून खाल्लीत, तुमी तुमच्या कारखान्याचं केमिकल पाण्यात सोडलंत, जंगलांना आगी लावल्या, जहागिरी असल्यासारख्या आमच्या शिकारी केल्या, कायदा खिशात घातलात, आमच्या जिंदगीशी खेळलात, आमच्या हक्काच्या जंगलात घुसून आमचं अन्न, पाणी, घरदार आणि आमची वंशावळ संपवायला निघालात… इतकं सोसल्यावर पोटासाठी जरा तुमच्या अंगणात आलो तर लगेच खटक्यावर बोटं ठेवायला लागलायसा… इतकी मग्रुरी बरी नाय. माणसात आहात तर जरा माणसात रहा. बिबट्यांच्या नादाला लागू नगा.

तुमी समजता कोण स्वत:ला? तुमच्या देवांनी पण आम्हा प्राण्यांना कधी धक्का लावला नाही, उलट त्यांचं वाहन केलं. आमाला आमच्याच घरातनं हाकलून, आमचंच अन्नपाणी खाऊन आम्हालाच सरळ गोळ्या घालायची कसली भाषा करताय? आमी जनावरं आहोत तोवर ठीक. माणसं झालो तर जड जाईल. ही धमकी नाय, मजबुरी हाय. समजून घ्या.

बिबट्या बिबट्या म्हणून किती सोसायचं? मांजराचं कुळ हाय आमचं. पुणे साईडला जुन्नर-घोडेगाव भागात जरा आमची भावकी जादा. चांदोली जंगलाच्या कराड-कोयना साईडलापण आमची संख्या बर्‍यापैकी. तिथली माणसं जरा बिबट्याळल्यात; पण तुमच्या भागाकडंं जरा लईच शहाणी माणसं. मायती ना फियती. उगाच आमी दिसलो की, दंगाधुडगूस नुसता. जंगलातनं बाहेर यायची चोरी. आलोच तर लगेच धरता आन् राधानगरी-दाजीपूर-चांदोलीच्या जंगलात नेऊन सोडतासा.

लेको, आपला जगभर वट हाय. आपलं भावबंद तिकडं दक्षिण अमेरिकेत असतात – जॅग्वार, नाव ऐकलंय? गाडी नव्हं, जित्ता बिबट्या. त्याच्या छप्प्यांत काळं ठिपकं असत्यात आन् आमच्यात नसत्यात इतकंच. आमच्यातलंच काळं बिबटं तिकडं दक्षिणेकडच्या दाट जंगलात राहत्यात. आसाम-नेपाळात-आफ्रिकेत माऊंट केन्याच्या जंगलातपण आमची भावकी लागती. या ठिपक्यांनी घोळ केलाय तुमचा. आमी दिसलो की, तुमाला वाटतं आला चित्ता; पण भारतात तुमी चित्ता ठेवलायसा कुठं? पार संपवलाच… आता आमाला संपवायच्या नादाला लागलाय तुम्ही. आमचा नाद करायचा नाय पण.

साधं गणिताय, तुम्ही जंगलात घुसला नसता, तर आमी तुमच्या गावात-रानात-घरात घुसलो नसतो. हाय काय तुमच्या गावात? पानपट्टी-मावा-गुटखा. पाय ठिवला नसता इथं. तुमच्यामुळं त्वांड बघाय लागलं गावाचं. एक तर आमी कुणाच्या नादाला लागत नाय आन् आमच्या नादाला कुणी लागलं तर त्याचा करेक्ट कार्यक्रमच करतो मग. जंगलात तुमी माकडं, उंदरांच्या जमाती, सरपटणार्‍या जाती, पक्षी, किडं सोडा पण चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा कुणालाच ठेवलं नाय. आमचं अन्न तुमी खाल्लात. आमच्या पोटावर मारलंत. तुमी गावाकडं रोजगार नसला तर काय करता? सिटीकडं पळताच का नाय? तसंचाय आमचं पण. जंगलात तुमी काय ठिवलं नाय म्हणून मग चलो सिटी. त्यात तो वन्यजीव विभाग कुठं असतो, काय करतो मायती नाय. ना कसला अभ्यास, ना कसला रिसर्च. आमी दिसलो म्हणून फोन आला की पळालीच. महापालिका काय, पोलिस काय, फॉरेस्टवाली काय… आमी पुढं, खातं मागं.

दोन साल झाले. आमच्यातला एक बहाद्दर सांगलीत घुसलावता. कशी पाचावर धारण बसलीवती? आठवतंय का? चौदा तास बहाद्दरानं घाम फोडलावता. मग रातीच्या अंधारात त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून, पिंजर्‍यात जेरबंद करून, वन विभाग कार्यालयात नेऊन, आमच्या आमच्या इलाक्यात सोडायची वेळ आलती; मग कुठं तुमचा जीव भांड्यात पडला. असाच तुमच्यातला कुणी आमच्या जंगलात आला तर आमी काय करावं? बोला. काय करावं? आमी असं संचारबंदीबिंदी करत बसत नाय. जंगल का कानुन. जाग्यावर पलटी; पण आमी तसं करत नाय. पोट भरल्यावर पण गठूळं बांधून ठिवायला आमी माणूस नाय, जनावरं हाय.

एक तर आमा बिबट्यांना कळपानं रहायची सवयच नाय पहिल्यापासून. एकटा जीव सदाशिव; पण पोटापाण्याचं बघायला लागतंच की. आमी काय उपाशी मरावं काय? घुसलो मग तुमच्या इलाक्यात आणि खाल्ली एक-दोन कुत्री, रेडकू, शेळी तर काय पाप केलं का? राहिलो चार दिवस तुमच्या उसात तर काय सात-बारावर करून घेतलं का काय रान? उसात सुरक्षित वाटतं. खायला मिळतं. पिलं द्यायला सोपं होतं, म्हणून राहतो. आमी बिनकामाचा कधी कुणावर स्वत:हून हल्ला करत नाय, माणसाला तर आपण खातच नाय. लय बेचव जमात. सिटीतत आलोच चुकून तर जरा बिचकल्यागत होतं, टेन्शन येतं आन् मग बिथरतो. तुमच्यासमोर अचानक आमी आलो तर ओली होतेच ना तुमची? मग? आमी घेतलाच की आमच्यात बदल करून, आता जरा आप भी बदलो लेको.

तुमच्या माणसांसारखं आमचं नसतं. गठुळं साठवायची सवय आमाला नाय. आमाला तुमच्यागत दहावा-तेरावा वेतन आयोगबियोग नसतो. पेन्शन नसती. आमची पोरंबाळं आमच्यागतच स्वाभिमानी. ती बापजाद्यांच्या एफडीवर, जमीनजुमल्यावर, पैशाअडक्यावर जगत नायत. स्वत: शिकार करतात. रोज पोटाला मिळावं, सुरक्षा मिळावी, आपली वंशावळ वाढावी असं आम्हालापण वाटतं. यात काय चुकलं?

जग काय तुमची जहागिरी आहे काय? तुम्ही लेको नदीत घरं बांधली, वसाहती केल्या. मतदार वाढतोय म्हणून सारी गपगार बसली. तुमी नदीत केमिकल सोडली, तुमी नदीत गटारं सोडली. त्यानं लाखो मासे हकनाक मेले. मगर-माशांना जीव नसतोय काय? तुमच्यावर तर आमीच सदोष मासेवधाचा गुन्हा दाखल करायला पायजे. आता नदीतल्या मगरीपण तुमाला डचायला लागल्यात. नदी मगरी-माशांची का तुमची? नदी कुणाची? त्यांना नदीतनं हाकला म्हणणारे तुमी कोण? तुमी नदीत आलाय त्यांच्या. तुमी नदीतनं बाहेर व्हा, नायतर नदी घुसतीच तुमच्यात दरसाल.

बांधावर झाड ठेवलं नाय. सगळी तोडातोड; मग पाखरांनी जायचं कुठं? चिमण्यांची जमात संपवली तुमी. घुबडं-घारी-कावळा नजरंला पडना. कुठं गेली सगळी? कुणी घालवली? रानात अन्न नाय म्हणून माकडं गावात शिरायला लागलीत आता. तर त्यांना हाकला म्हणता तुमी. तुमाला कुत्री नकोत, मगरी नकोत, बिबट्या नको, चिमण्या-कावळं नकोत, तुमाला दावणीला बैलं नकोत, रानात साप नकोत, वाघ नकोत, अस्वलं नकोत… तुम्हाला तुमच्याबिगर इथं कुणी नगोे. असं कसं चालणार? तुमी नव्हता इथं तवापासनं आमी हावोत इथं. हाकलायची भाषा तर आमी करायला पायजे. शाणं व्हा. जरा जनावरागत वागा. तुमी आमच्या वाटंला जाऊ नगा, आमी तुमच्या वाटंला येत नाय. संपलं.
– तुमचाच बिबट्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news