बहार विशेष : चांद्रमोहिमेची गरुडझेप | पुढारी

बहार विशेष : चांद्रमोहिमेची गरुडझेप

भारताने गेल्या शतकात 50-60 च्या काळात अंतरिक्ष विज्ञान जगतात पाऊल टाकण्यास सुरुवात केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) माध्यमातून आज आपण अंतराळ संशोधन विकासात खूप मोठा पल्ला गाठला आहे. विशेषत: भारताचे दोन प्रक्षेपण यान पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही हे खूपच विश्वासार्ह आहेत. 2008 रोजीच्या पहिल्या चांद्रयान-1 अभियानास सुरुवातीला अयशस्वी मोहीम म्हणून हिणवले गेले. पण चंद्रावर पाणी असणे आणि त्याचे होणारे बाष्पीभवन याची खातरजमा करण्यासाठी या मोहिमेचे मोठे योगदान राहिले. चंद्रावरून आणलेल्या मातीत पाणी असण्याचे पुरावे अनेक वर्षांपासून मिळत होते आणि त्यास दुजोरा मिळवण्याची आखली गेलेली मोहीम ही मानवता आणि विज्ञान जगासाठी मोठे योगदान देणारी होती. अंतराळात पाणी असण्याला खूपच महत्त्व आहे.

या आधारे पृथ्वीबाहेरही आणखी एक जीवसृष्टी असण्याच्या शक्यतांना बळकटी मिळाली. अर्थात चंद्रावर अशा प्रकारची जीवसृष्टी असण्याची सूतराम शक्यता नाही, मात्र या संशोधनाचे लक्षणीय यश म्हणजे अंतराळात पाणी असेल तर अंतराळातच पुढची मोहीम आखणे किंवा परत येण्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे विघटन करून इंधन तयार करता येणे शक्य आहे. म्हणूनच चंद्रावर पाणी आहे की नाही, याचा शोध घेतला जात आहे. काहींच्या मते, चंद्रावरील गुहेत आणि खड्ड्यात पाणी हे बर्फाप्रमाणे असू शकते. कारण तेथील काही भागात सूर्यकिरणे पोचणे शक्य नाही. म्हणजेच चांद्रयान-1 च्या मोहिमेचे यश म्हणजे पाणी असण्याच्या दाव्याला पुष्टी मिळवणे होय.

चांद्रयान-2 अभियानाला देखील अपयशी मोहीम म्हटले जाते. मात्र शास्त्रज्ञांना हे मान्य नाही. कारण विज्ञानात अपयश नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. कारण यात शिकण्याची निरंतर प्रक्रिया सुरू असते आणि यात आपण एक एक पाऊल पुढे टाकत असतो. चांद्रयान-3 हे त्याच दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. या अभियानाचा उद्देश मागच्या अभियानाप्रमाणेच चंद्रावरच्या वातावरणाचा अनुभव घेणे, तेथील भूकंपीय हालचालींचे आकलन करणे आणि संभाव्य खनिज पदार्थााचा शोध लावणे, हा आहे. अशा वेळी यास एक जागतिक अभियानही म्हणता येईल. या मोहिमेच्या माध्यमातून एक गोष्ट शोधण्याचा प्रयत्न होत असून तो म्हणजे पृथ्वीवर अभाव असलेल्या खनिजांंचा चंद्रावर शोध घेऊन त्याचा वापर करता येईल का? अर्थात या उद्देशांशिवाय अशा अभियानाचे आणखी एक ध्येय असते आणि ते म्हणजे तंत्रज्ञानाची क्षमता सिद्ध करणे. पहिले यश हे चंद्रावर उतरताच मिळते, दुसरे यश म्हणजे सॉफ्ट लॅडिंग, जेणेकरून चंद्रावर उतरल्यानंतर उपकरणांचा वापर करून तेथील माहिती गोळा करता येईल. एका अर्थाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि पृष्ठभागावर रोवर उतरवणे हे भारताच्या अंतरिक्ष इतिहासात एक मोठे यश मानले जाईल.

पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही हे भारताचे सर्वाधिक विश्वासार्ह प्रक्षेपक यान आहेत. भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे हे दोन आधारस्तंभ आहेत. शास्त्र लपवून ठेेवण्याची गोष्ट नाही. चुका होतात आणि त्यापासून शिकतच वाटचाल करत असतो. आज प्रक्षेपणाच्या आघाडीवर यशाचे प्रमाण हे जगातील अन्य देशांच्या तुलनेत चांगले आहे. आपले 90 टक्के प्रक्षेपण यशस्वी राहिले आहेत. प्रारंभीच्या काळात अमेरिका आणि पूर्वीचा सोव्हिएत रशियाच्या अपयशाचा दर हा अधिक होता. तेव्हा ते देखील शिकतच होते आणि भारतही त्यांच्याच खांद्यावर बसून पुढे गेला. आजच्या काळात प्रक्षेपण यानात भारताने नेत्रदीपक यश मिळवत जगात सन्मान वाढवला. यामागचे आणखी एक मोठे कारण म्हणजे अन्य देशाच्या तुलनेत भारत हा कमी खर्चात लाँचिंग सेवा उपलब्ध करून देतो आणि यशस्वी होण्याचे प्रमाणही चांगले आहे.

भारत या दोन यानांसाठी लिक्विड आणि सॉलिड असे दोन्ही प्रकारचे इंधन स्वत:च तयार करतो. अंतराळ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लहान उपग्रहांना घेऊन जाणे आणि त्यांना योग्य कक्षेत स्थापित करणे हे कठीण तंत्रज्ञान मानले जाते. त्याचवेळी जड उपग्रहांना योग्य कक्षेत सोडणे देखील हे वेगळ्या प्रकारचे कौशल्य मानले जाते. भारताने दोन्ही तंत्रज्ञान मिळवले आहे. उपग्रहांना अवकाशात सोडण्याच्या मोहिमा सुरू राहतात. मात्र आता भारताचा पुढचा टप्पा हा मानव अभियानाचा आहे. याद़ृष्टीने वर्षाखेरीस त्याची पूर्ण तयारी होईल आणि भारत लवकरच अवकाशात मानवाला पाठवेल, अशी आशा बाळगली जात आहे. यात आपण यशस्वी ठरलो तर भारताच्या अंतरिक्ष इतिहासात मैलाचा दगड सिद्ध होईल. अर्थात चीन याबाबतीत भारताच्या खूप पुढे गेला आहे आणि तो सतत मानवाला अंतराळात पाठवत आहे. भारताने चीनकडूनही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत.

कारण शास्त्रात वैर नसते. अंंतराळ शास्त्राच्या क्षेत्रात आर्थिक संधीवर बरीच चर्चा केली जाते. मात्र एका अंंदाजानुसार आगामी काळात जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेचा आकार हा एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोचेल. परंतु विज्ञानाच्या पायाभूत गोष्टी समजल्याशिवाय नवीन मोहीम आखणे अशक्य आहे. जडत्व, वेग, गती, संवेग या गोष्टी कळल्याशिवाय ना सायकल तयार होते ना मोटार ना रॉकेट. प्रत्यक्षात या गोष्टी आपण विज्ञानांकडून शिकतो तेव्हा त्याचवेळी दुसर्‍या देशातील विज्ञानात होणार्‍या प्रगतीचेही आकलन करत असतो. ते आपली गोष्ट जाणून असतात आणि आपणही त्यांच्या गोष्टी समजून घेत असतो. उदा. अफगाणिस्तानसारख्या देशातील लोक अंतराळ विज्ञानाच्या चर्चेत फारसे सहभागी होत नाहीत आणि त्यांना समजणे कठीण. भारतात मात्र विज्ञान समजणारा आणि एाळखणारा मोठा गट आहे. हाच गट विज्ञानाला पुढे नेणारा असतो. अंतरिक्ष विज्ञानाचा फायदा इथूनच मिळू लागतो. मात्र माझ्या मते, आपण प्रत्येकवेळी लगेचच फायदा मिळण्याची गोष्ट करू नये. विज्ञानात आपल्याला अलौकिक यश मिळाले तर त्याचा फायदा आपोआपच मिळत राहतो.

आज जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा सहभाग हा दोन ते तीन टक्के मानला जातो. 2020 मध्ये हेच प्रमाण 2.1 टक्के म्हणजे 9.6 अब्ज डॉलर होते. चीनच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्यावर्षी चीनने प्रत्येक महिन्यात सरासरी तीन प्रक्षेपण केले. भारताने गेल्या वर्षी पाच प्रक्षेपण केले. अशावेळी भारताने अंतराळ शास्त्रात मिळवलेले कौशल्य आणि त्यापासून मिळणार्‍या उत्पन्नाचा विचार केला तर अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. मात्र जगात भारताची एाळख प्रस्थापित होत आहे. कारण अंतराळ विज्ञानात स्पर्धक देशांची संख्या खूपच कमी आहे. आगामी काळात भारताला अंतरिक्ष मोहिमा वाढवाव्या लागतील आणि पायाभूत शास्त्र विकसित केल्याशिवाय तसेच संशोधनाशिवाय क्षमता वाढणार नाही, हे देखील तितकेच खरे. अंतराळ संशोधनात आतापर्यंत मिळवलेल्या यशात इस्रोने अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. यासाठी एकच मार्ग म्हणजे अधिकाधिक शिक्षण संस्थांस अंतराळ विज्ञानाच्या संशोधनाला जोडणे.

गौहर राजा,
माजी मुख्य शास्रज्ञ, सीएसआयआर

Back to top button