क्रीडा : विंडीज, झिम्बाब्वेची वाताहत का झाली?

क्रीडा : विंडीज, झिम्बाब्वेची वाताहत का झाली?

कधीकाळी नामांकित असलेले वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचे क्रिकेट संघ यंदाच्या विश्वचषकात खेळताना दिसणार नाहीत. पात्रता फेरीतच स्कॉटलँडने विंडीजपाठोपाठ झिम्बाब्वेलाही विश्वचषक स्पर्धेपासून रोखले. आंतरराष्ट्रीय पातळीवर विंडीज क्रिकेटची वाताहत एका दिवसातच घडलेली नाही. दुर्धर आजार टप्प्याटप्प्याने बळावत जातो, तसाच प्रकार कॅरेबियन क्रिकेटबाबत घडला आहे.

ज्यांच्या क्रिकेट साम्राज्यावरून ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सूर्य मावळत नव्हता, त्या वेस्ट इंडिजचा संघ यंदाच्या विश्वचषकात खेळताना दिसणार नाही. तब्बल 48 वर्षांनंतर ही सनसनाटी घटना घडत आहे. झिम्बाब्वेत नुकत्याच पार पडलेल्या पात्रता फेरीतच शाय होपच्या नेतृत्वाखालील विंडीजच्या संघाला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिका, नेपाळ, नेदरलँडस् यांसारख्या क्रिकेटचा श्रीगणेशा केलेल्या संघांविरुद्ध पात्रता फेरीतील सामने खेळण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. तथापि, तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. क्रिकेट विश्वाला बसलेला हा मोठा धक्काच म्हटला पाहिजे. जिथे फुले वेचली, तिथे गोवर्‍या वेचायची वेळ या एकेकाळच्या दादा संघावर आली आहे. विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपर सिक्स टप्प्यात स्कॉटलँडकडून झालेला पराभव म्हणजे विंडीजसाठी शवपेटीवरील अखेरचा खिळा ठरला. यामुळे भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान होऊ घातलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत विंडीजच्या खेळाडूंना प्रेक्षकांत बसून सामने पाहावे लागतील.

सुवर्णमयी भूतकाळ असलेल्या वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये झळाळत्या विश्वचषकावर नाव कोरले होते. 1983 मध्ये भारताने त्यांच्यावर रोमांचकारी विजय मिळवून क्रिकेट जगतात चमत्कार घडविला होता. तरीदेखील विंडीजचा संघ तेव्हा उपविजेता ठरला होता. त्यानंतर मात्र या संघाला उतरती कळा लागली. आता तर त्यांनी तळ गाठला आहे.

वेस्ट इंडिजला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता सामने खेळावे लागले याचे कारण म्हणजे ते सुपर लीगमध्ये नवव्या स्थानावर होते. पात्रता फेरीमध्ये अ गटात झिम्बाब्वेे, नेदरलँड, अमेरिका आणि नेपाळसह विंडीजचा समावेश करण्यात आला होता. पात्रता फेरीची सुरुवात त्यांनी अमेरिका आणि नेपाळविरुद्ध विजयाने केली. तथापि, नंतर झिम्बाब्वे आणि नेदरलँडकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अर्थात, येथे प्रश्न विंडीजचा कसा पराभव झाला हा नाही. मुख्य मुद्दा असा आहे की, या धक्क्यातून हा संघ बाहेर कसा येणार? आंतरराष्ट्रीय पातळीवर विंडीज क्रिकेटची वाताहत झाली असली तरी हे सगळे एका फटक्यात घडलेले नाही. दुर्धर आजार जसा टप्प्याटप्प्याने बळावत जातो, तसाच प्रकार कॅरेबियन क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो.

सेहवागचे जळजळीत ट्विट

विंडीजचे आव्हान पात्रता फेरीतच आटोपल्यानंतर भारताचा धडाकेबाज माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने केलेल्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. तो म्हणतो, वेस्ट इंडिजचे वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय न होणे ही लाजिरवाणी बाब आहे. फक्त गुणवत्ता असून चालत नाही, हे यातून दिसून येते. अजूनही लक्ष केंद्रित करण्याची, चांगल्या व्यवस्थापनाची गरज या संघाला आहे. क्रिकेट प्रशासकांचा कारभार राजकारणमुक्त असायला हवा. यातील दिलासादायक बाब म्हणजे, आता यापेक्षा इथून त्यांना आणखी खाली जाता येणार नाही. एखादे भेदक हास्यचित्र अनेक बातम्या आणि लेखांपेक्षाही कसे प्रभावी ठरू शकते त्याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे सेहवागचे हे जळजळीत ट्विट.

शाय होप याने स्कॉटलँडकडून झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना संघातील दुखरी नस समोर आणली. तो म्हणतो, कोणताही सामना खेळताना एखादा झेल सुटणे किंवा क्षेत्ररक्षणात चुका होणे हा खेळाचाच अविभाज्य भाग आहे. जगातील नामवंत खेळाडूसुद्धा अगदी सोपा वाटणारे झेल सोडतात. मात्र, तुम्ही जर कोणत्याही तयारीविना मैदानात उतरलात तर तुम्हाला यश मिळणे केवळ अशक्य असते. मी कोणत्याही एका खेळाडूला यासाठी दोष देणार नाही. हे सांघिक अपयश आहे. त्यामुळे प्रत्येकानेच आपण कुठून कुठे चाललो आहोत यावर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे विंडीजमधील क्रिकेट रसिकांनीदेखील या पराभवानंतर फारशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाहीत. कारण त्यांनाही विंडीजचे क्रिकेट अतिदक्षता विभागात गेल्याची जाणीव ठळकपणे झाली आहे. तिथल्या क्रिकेट मंडळाचा कारभार तर संवेदनाहीन म्हणावा अशा पद्धतीने सुरू आहे. बोकाळलेली वशिलेबाजी, आर्थिक चणचण, दूरद़ृष्टीचा अभाव आणि क्रिकेटपेक्षा बास्केटबॉल, मैदानी खेळ व फुटबॉलमध्ये धो धो वाहणारा पैसा कॅरेबियन बेटांवरील तरुण रक्ताला खुणावू लागला आहे. ब्रायन लारा आणि रिचर्ड रिचर्डसनसारख्या माजी तालेवार खेळाडूंनीही आपल्या संघाच्या पराभवानंतर फारशी खळखळ केलेली नाही. आडातच नसेल तर पोहर्‍यात येणार कुठून हे त्यांनाही कळून चुकले आहे. कयामत से कयामत तक अशा पद्धतीने विंडीजच्या क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आहे. ही अधोगती कोण रोखणार, या प्रश्नाला तूर्त कोणाकडेच उत्तर नाही. त्यामुळे यापुढील काळात वेस्ट इंडिजचा संघ कोणत्याही प्रकारच्या विश्वचषकात खेळू शकला नाही तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

झिम्बाब्वेचा स्वप्नभंग

आफ्रिकेतील लढवय्या संघ म्हणून समोर आलेल्या झिम्बाब्वेलाही यंदाच्या विश्वचषक स्पर्धेची दारे बंद झाली आहेत. पात्रता स्पर्धेत विंडीजप्रमाणेच स्कॉटलंडने त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. या संघाची कथा तर विंडीजपेक्षा दारुण आणि करुण. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या चमूने 1983 सालच्या विश्वचषक स्पर्धेत डंकन फ्लेचरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाला 17 धावांनी पराभूत केले होते तेव्हा ती घटना जणू परिकथाच बनली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसीचे सहसदस्यत्व मिळवले. अखेर जुलै 1992 मध्ये या संघाला आयसीसीने कसोटीचा दर्जा बहाल केला. त्यानंतर प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत या संघाकडे जायंट किलर म्हणून पाहिले जायचे. कारण त्यांच्या खेळाची शैली विंडीजसारखीच होती. दोन्हीकडील खेळाडूंची शरीरयष्टीदेखील अतिशय कणखर. हा कणखरपणा वंश परंपरेने चालत आलेला. हे साम्य आता पराभवाच्या पातळीवरही दिसू लागले आहे.

पात्रता फेरीत स्कॉटलँडने वेस्ट इंडिजनंतर झिम्बाब्वेचा वप्नभंग केला. झिम्बाब्वेला सुपर 6 फेरीत आधी श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मुख्य स्पर्धेत पोहोचण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्कॉटलँड विरुद्धचा सामना जिंकणं भाग होते. थोडक्यात सांगायचे तर झिम्बाब्वेसाठी हा 'करो या मरो' असा होता. या आरपारच्या सामन्यातच स्कॉटलँडने झिम्बाब्वेला तडाखा दिला. म्हणजेच स्कॉटलँडने वेस्ट इंडिजपाठोपाठ झिम्बाब्वेला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होण्यापासून रोखले. झिम्बाब्वेच्या या पराभवामुळे आपल्या घरातच वर्ल्ड कपमध्ये पोहोचण्याची इच्छा अपुरी राहिली. स्कॉटलँडने झिम्बाब्वेेवर 31 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर झिम्बाब्वेचे खेळाडू आणि चाहते ढसाढसा रडले. ते स्वाभाविकच. तथापि, कोणत्याही खेळात भावूक होऊन यश मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. तुमच्याकडे उत्तम व्यूहरचना असणे आवश्यक असते. प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे दुवे हेरून त्यावर हल्लाबोल करावा लागतो. या बाबतीत झिम्बाब्वेचा संघ कमी पडला.

यशाचा उतरता प्रवास

1998 मध्ये याच संघाने कसोटी मालिकेत पाकिस्तान आणि त्या पाठोपाठ भारतासारख्या दिग्गज संघांना धूळ चारली, तेव्हा झिम्बाब्वेचे केवढे कौतुक झाले होते. त्यानंतर या संघाने जणू कात टाकली. तशाच 4 ऑगस्ट 2011 रोजी झिम्बाब्वेच्या क्रिकेट मंडळाने रीबॉक या क्रीडाविषयक साहित्यांचे उत्पादन करणार्‍या जगप्रसिद्ध कंपनीशी दहा लाख अमेरिकी डॉलरचा करार केला. त्यामुळे आर्थिक चिंता थोडीफार मिटली. अँडी फ्लॉवर, ग्रँट फ्लॉवर, हीथ स्ट्रीक, मरे गुडविन, डेव्हिड हॉटन, नील जॉन्सन, पॉल स्ट्रिंग, हेन्री ओलोंगा अशी किती तर गुणवंत क्रिकेटपटूंची जंत्री झिम्बाब्वेच्या बाबतीत सांगता येईल. अप्रतिम कामगिरी बजावत असतानाच या संघाला राजकारणाचे ग्रहण लागले. याला तेथील रॉबर्ट मुगाबे यांची राजवट मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरली. क्रिकेट मंडळाच्या कारभारात तेथील सरकारची ढवळाढवळ एवढी वाढली की, त्याची गंभीर दखल घेऊन आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने झिम्बाब्वेला 19 जुलै 2019 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले. गरिबी, उपासमार, क्रिकेट मंडळाच्या खजिन्यात पैशांचा खडखडाट आणि सरकारचा प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप यामुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटची दशा दशा झाली आहे.

अधूनमधून एखादा विजय मिळवायचा आणि सतत पराभव स्वीकारायचे हेच या चमूचे प्राक्तन बनले आहे. स्कॉटलँडविरुद्धच्या पात्रता सामन्यातही त्यांना जिगर दाखवता आली नाही. त्यामुळे त्यांचा पराभव हे जणू विधिलिखितच होते. झालेही तसेच. 'आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना' असे चित्र झिम्बाब्वेेच्या बाबतीत दिसून येते. तीव्र इच्छाशक्ती, राजकारणमुक्त क्रिकेट मंडळ आणि वशिलेबाजीला तिलांजली ही त्रिसूत्री अवलंबली तरच या संघाला थोडीफार आशा बाळगता येईल. अन्यथा वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे कधी काळी क्रिकेटमधील नामांकित संघ होते हा इतिहास पुढील पिढीला सांगावा लागेल.

सुनील डोळे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news