दुर्घटना : निमिषात संपला खेळ

टायटॅनिक
टायटॅनिक

'टायटॅनिक' जहाज जिथे बुडाले तो भाग आंतरराष्ट्रीय सागरात मोडतो. त्यामुळे 'पाण्याखालील सांस्कृतिक वारसा जतन' करण्याचे नियम या जहाजालाही लागू होतात. हा वारसा पाहण्यासाठी गेलेल्या प्रवाशांचा झालेला दुर्दैवी अंत अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. तसेच निसर्गाच्या विराट शक्तीची पुन्हा एकदा जाणीव करून देणाराही आहे.

पाणबुडीतून 12 हजार 500 फूट खोलीवरच्या 'त्या' जागी जाण्यासाठी आठ तास लागतात आणि हा अतिशय धोकादायक; पण थरारक असा प्रवास करण्यासाठी अडीच लाख अमेरिकी डॉलर खर्च करावे लागतात. ती जागा आहे, सेट जॉनच्या किनार्‍यापासून जवळपास सुमारे 612 कि.मी. अंतरावर! तसे पैसे खर्च करून हमिश हार्डिंग, शहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान आणि पॉल-हेन्री नार्गोलेट हे चार प्रवासी आणि ओशनगेट एक्सपीडिशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॉकटन 'ती' जागा आणि 'त्या' जागेवरील जहाज पाहण्यासाठी निघाले होते. त्यांनी आपला पाण्याखालचा प्रवास 'टायटन' या पाणबुडीने सुरू केला. ती 3,500 मीटर खोलीवर गेली आणि पाण्याच्या प्रचंड दाबाने तिचा जणू चुरगळा झाला.

त्यावेळी त्या पाणबुडीवर आयफेल टॉवरच्या वजनाइतके वजन होते. ते तिला सहन झाले नाही आणि निमिषातच होत्याचे नव्हते झाले. म्हणजे झाले असे की, पाण्याच्या प्रचंड दाबाने 'टायटन' पाणबुडीचे बाह्य कवच ताशी अडीच हजार कि.मी. वेगाने पाणबुडीच्या आतल्या बाजूस घुसले. काय होत आहे हे पाणबुडीतल्या कुणालाही कळायच्या आतच सर्व खेळ संपून गेला. साहजिकच, पाणबुडीचा संपर्क तुटला; मग धावपळ सुरू झाली. 'टायटन' आणि त्यातील हौशी, धाडसी, धनवान प्रवाशांचे काय झाले आहे? याचा अंदाज सर्वांनाच आला; मग 'टायटन'चा शोध घेणे सुरू झाले. दि. 29 जूनच्या बातम्यांप्रमाणे फुटलेल्या, तुटलेल्या 'टायटन'चे अवशेष सापडले आणि ते पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. आता त्यांचा अभ्यास करण्यात येईल आणि हा दुर्दैवी अपघात कशामुळे झाला, याचा शोध घेतला जाईल.

ही पाणबुडी कार्बन फायबरची बनवलेली होती आणि तिचे बाहेरचे कवच हे टिटॅनियमचे होते. तिचा आकार दंडगोलाकृती (सिलिंड्रिकल) होता. सामान्यतः, पाणबुडीवर सर्व दिशांनी पाण्याचा दाब सारख्या प्रमाणात यावा, यासाठी ती गोलाकार बनवली जाते. शिवाय, ती बनवताना टिटॅनियमसारख्या दणकट धातूचा वापर केला जातो. 'टायटन'ची बांधणी करताना हे नियम पाळले गेले नाहीत. कार्बन फायबर वापरून उभ्या आकाराची पाणबुडी बनवली गेली आणि तिच्यावर टिटॅनियमचे आवरण चढवले गेले. 'टायटन'च्या बांधणीची ही पद्धत चुकीची आहे. पाण्याच्या दाबापुढे कार्बन फायबरवरचे टिटॅनियमचे आवरण टिकणार नाही, बाह्य आवरणाला अतिसूक्ष्म तडे जातील, त्यातून पाणी आत घुसेल, असा इशारा संबंधितांना देण्यात आला होता. सागरामध्ये प्रचंड खोलीवर जाणार्‍या पाणबुड्यांची बांधणी करणार्‍या इंजिनिअर्सनी 'टायटन'ची बांधणी करणार्‍या कंपनीला पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, 'तुम्ही जे करत आहात, ते प्रायोगिक स्वरूपाचे आहे. असा प्रयोग करायला हरकत असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, प्रायोगिक स्वरूपाची बांधणी केलेल्या पाणबुडीतून माणसांना समुद्राच्या तळाशी पाठवणे हे धोक्याचे ठरू शकते.' पण, या सर्वच इशार्‍यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट आमच्याबरोबर येणारे प्रवासी सुखरूपपणे सागरतळाशी जातील आणि तितक्याच सुखरूपपणे परत येतील, याची आम्ही नेहमीच काळजी घेतो. याचे कारण प्रवाशांची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे, असे आम्ही मानतो, असे ओशनगेटचे एक भागीदार गुलेर्मो सोनलीन यांनी सांगून टाकले आहे.

यासंदर्भात अतिशय भेदक भाष्य 'टायटॅनिक' हा चित्रपट बनवणारे जेम्स कॅमरून यांनी केले आहे. ते म्हणतात, 'टायटॅनिक' जहाज काय किंवा 'टायटन' पाणबुडी काय, दोन्हींना झालेल्या अपघातांत एक साम्य आहे. ते म्हणजे दिलेल्या पूर्वसूचना किंवा इशारे यांच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येऊन आपलाच हेका चालवल्याने हे अपघात झाले. 'टायटॅनिक' जहाजाच्या कप्तानाला 'तू ज्या मार्गावरून जात आहेस, तिथे सागराच्या पाण्यात हिमनग आहेत,' असा इशारा देण्यात आला होता. तरीसुद्धा अवसेच्या काळ्याकुट्ट अंधार्‍या रात्री त्याने आपली बोट वाजवीपेक्षा अधिक वेगाने चालवण्याचा हुकूम दिला; तर 'टायटन'ची बांधणी अशी करू नका, असे सांगूनही तिकडे कानाडोळा केला गेला. त्यामुळे 'टायटॅनिक' जहाज आणि 'टायटन' पाणबुडी यांना अपघात झाले. खरे तर कार्बन फायबर हे चांगलेच दणकट असते. विमानाचे पंख बनविण्यासाठी त्याचा वापर केला जातो; पण प्रश्न असा आहे की, 12,550 फूट खोलीवर जाताना पडणारा पाण्याचा दाब सहन करण्याइतके ते दणकट असते का? या अपघातानंतर हा प्रश्न कळीचा ठरणार आहे, हे नक्की.

आता 'टायटन'चे अवशेष सापडले आहेत. त्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. ज्या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी हे धनवान धाडसी प्रवासी निघाले होते, ते 'टायटॅनिक' हे प्रचंड आकाराचे जहाज, इंग्लंडहून अमेरिकेकडे जाताना दि. 15 एप्रिल 1912 या दिवशी बुडाले. त्यावेळी त्या जहाजावर प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकंदर 2,224 जण होते. त्यापैकी 1,500 जणांना जलसमाधी मिळाली. जहाजावर 325 प्रवासी हे फर्स्ट क्लासने प्रवास करणारे होते. त्यापैकी 123 जणांना वाचता आले नाही. मात्र, फर्स्ट क्लासने प्रवास करणारे सर्वच धनवान होते. त्यांच्याबरोबर असलेली संपत्तीही जहाजाबरोबरच पाण्यात गेली. प्रचंड आकाराचे ते जहाज, त्याला झालेला अपघात, त्यामध्ये झालेली मनुष्य आणि वित्तहानी या सार्‍याच भोवती एक गूढतेचे वलय निर्माण झाले. 1985 सालामध्ये म्हणजे 'टायटॅनिक' बुडाल्यानंतर 73 वर्षांनी 'नॅशनल जिओग्राफीक'चे एक शोधक बॅलार्ड आणि फ्रान्सचे समुद्रअभ्यासक मायकेल यांनी समुद्राच्या तळाशी विसावलेल्या या जहाजाचा छडा लावला. ते नेमके कुठे आहे, ते शोधून काढले. त्यानंतर अमेरिकेच्या संसदेने त्या जहाजाला सामुद्रिक स्मारकाचा दर्जा द्यावा, असा प्रस्ताव मांडला. त्यानुसार बॅलार्ड पुन्हा एकदा त्या जहाजावर गेला आणि त्याने त्या जहाजावर एक फलक ठेवला. जहाज असलेला समुद्राचा तळ आहे तसाच राहू द्यावा, तिथे कुणीही कसलीही ढवळाढवळ करू नये, अशी विनंती करणारा तो फलक हा त्या जहाजाबद्दल अमेरिकी माणसांच्या मनात असलेल्या भावनाच व्यक्त करणारा आहे.

परंतु, त्या भावना फलकावरच राहिल्या. उलट त्या जहाजावरच्या वस्तू, विशेषतः कलाकृती, आपण मिळवून त्या जपून ठेवल्या पाहिजेत, अशी भावना बळावू लागली. त्याप्रमाणे 1987 सालातच 'टायटॅनिक व्हेंचर्स लिमिटेड पार्टनरशिप' आणि फ्रान्समधील ङफखपीींर्ळीीींं ऋीरपलरळी वश ठशलहशीलहश र्िेीी खफएुश्रिेळींरींळेप वश श्रर च शी यांनी टायटॅनिक जहाजावरील वस्तू काढून सुरक्षित ठेवण्याची मोहीम अधिकृतपणे आखली. त्या मोहिमेत जहाजावरच्या 1,800 वस्तू मिळवण्यात आल्या आणि त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या. लवकरच त्यामध्ये काही जणांना 'आर्थिक फायदा' दिसायला लागला. नंतर 'आरएमएस टायटॅनिक इन्कॉर्पोरेशन' या कंपनीने 'टायटॅनिक' जहाजावरून पाच हजार वस्तू मिळवल्या. त्यामध्ये दागदागिने होतेच; पण जहाजावरील अत्यंत सुंदर अशा जिन्याचाही एक भाग होता. या सार्‍याचा त्या कंपनीने लिलाव केला. दरम्यान, जहाजावरील वस्तू मिळवून त्या सुरक्षित ठेवण्यावरून आधी स्पर्धा आणि मग वाद सुरू झाले. प्रकरण कोर्टात गेले; पण सागरतळाशी विसावलेल्या 'टायटॅनिक'वरील मोहिमा सुरूच राहिल्या.

या मोहिमांत सागरी संशोधक, जहाजावरील वस्तू गोळा करणारे आणि 'टायटॅनिक' हा सिनेमा बनवणारे जेम्स कॅमरून यांच्यासारख्या लोकांचा समावेश होता. त्यातूनच ते जहाज पाहण्यासाठी प्रवासी नेण्याची कल्पना पुढे आली. 1998 साली 'डीप ओशन एक्सपीडिश्न्स' या ब्रिटिश कंपनीने 'टायटॅनिक' पाहण्याची इच्छा असणार्‍या धाडसी प्रवाशांसाठी मोहीम आखली. त्यासाठी तिकीट होते, प्रत्येकी 32 हजार 500 अमेरिकी डॉलर! त्याला यश मिळाल्याने अमेरिकेतली ब्ल्यू फिश कंपनीसद्धा अशा मोहिमा आखू लागली. अशा मोहिमा वाढू लागल्या आणि त्यांचा अनिष्ट परिणाम सागरतळाशी विसावलेल्या 'टायटॅनिक' जहाजावर दिसू लागला. 1995 पासूनच जहाजाचे काही भाग कोसळून पडत असल्याचे स्पष्ट झाले. मुळातच लोहभक्षक जीवाणू आपले काम करत होतेच. त्यांनी जहाजाचा लोखंडी भाग स्वाहा करण्यास सुरुवात केली होतीच. त्यात त्या स्थळाला दिल्या जाणार्‍या आणि वाढतच गेलेल्या भेटींची भर पडली. 'टायटॅनिक'जवळ हळूहळू बीअरच्या बाटल्या, सोड्याच्या बाटल्या, सामान बांंधण्याच्या साखळ्या असा 'कचरा' साठत चालला. एका मोहिमेत एक पाणबुडी थेट 'टायटॅनिक'लाच जाऊन धडकली. त्यामुळे त्या जहाजाचे व्हायचे ते नुकसान झालेच; पण ती गोष्ट दीर्घकाळ दडवून ठेवण्यात आली. मोहिमा सुरूच राहिल्या.

'टायटॅनिक' जहाज जिथे बुडाले तो भाग आंतरराष्ट्रीय सागरात मोडतो. त्यामुळे 'पाण्याखालील सांस्कृतिक वारसा जतन' करण्याचे नियम या जहाजालाही लागू होतात. तसे ते 2012 सालात लागू करण्यात आले. हा वारसा पाहण्यासाठी गेलेल्या प्रवाशांचा आता दुर्दैवी अंत झाला आहे. तो अनेक प्रश्न निर्माण करणारा आहेच; पण निसर्गाच्या विराट शक्तीची पुन्हा एकदा ठळकपणे जाणीव करून देणाराही आहे. निसर्गाशी खेळ खेळताना पथ्य पाळणे आवश्यकच आहे, हे तरी आपण शिकणार का?

श्रीराम शिधये

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news