क्रीडा : जिगरबाज जोकोव्हिच | पुढारी

क्रीडा : जिगरबाज जोकोव्हिच

नोवाक जोकोव्हिच याची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती अफाट आहे, याचा प्रत्यय अनेक वेळेला आला आहे. कारकिर्दीत 23 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवीत त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा पुरुष खेळाडू हा विक्रम नोंदविला. विशेष म्हणजे, त्यापैकी अकरा विजेतेपदे त्याने वयाची तिशी ओलांडल्यानंतर मिळविली आहेत.

संयमाला चिकाटी, आत्मविश्वास आणि कष्टाची जोड दिली, तर अवघड गोष्टीही पार करता येतात, हेच नोवाक जोकोव्हिच आणि इगा स्विआतेक यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद पटकावताना दाखवून दिले. वयाच्या छत्तीसाव्या वर्षीही ग्रँडस्लॅम जिंकू शकतो याचा प्रत्यय जोकोव्हिचने घालून दिला. विजेतेपद मिळवण्यापेक्षा ते टिकवणे जास्त अवघड असले, तरी ते साध्य होऊ शकते हे स्विआतेक हिने सिद्ध केले.

टेनिसमध्ये अनेक युवा खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवत असतात. काही बुजुर्ग खेळाडू असे आहेत की, त्यांच्या सर्वोच्च यशाच्या मार्गात वयाचा अडथळा कधीच येत नाही. रॉजर फेडरर, राफेल नदाल व जोकोव्हिच या खेळाडूंनी वयाची तिशी ओलांडल्यानंतरही ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविले आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धांचे संघटक व चाहते युवा विजेता होण्याचे स्वप्न पाहत असले, तरीही त्यांची ही स्वप्ने धुळीस मिळवीत या तीन खेळाडूंनी आपण अजूनही खेळासाठी तरुण खेळाडूच आहोत, हे सिद्ध केले आहे.

फ्रेंच स्पर्धा ही लाल मातीच्या कोर्टवर आयोजित केली जाते. या मैदानावर झंझावती व बिनतोड सर्व्हिसपेक्षाही कलात्मक खेळाला जास्त वाव असतो. अशा मुलखावेगळ्या कोर्टवर चौदावेळा एकेरीचे विजेतेपद पटकावीत नदाल याने लाल मातीचा सम्राट असा नावलौकिक मिळविला. फेडरर याने यापूर्वीच निवृत्ती स्वीकारली आहे, तर नदाल याने स्वतःहून यंदाच्या फ्रेंच स्पर्धेत सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्लोस अल्कारेझ, अलेक्झांडर जेव्हेरेव्ह आदी युवा खेळाडूंबरोबरच जोकोव्हिच हा विजेतेपदासाठी मुख्य दावेदार मानला गेला होता.

विक्रमी विजेतेपद

जोकोव्हिच याची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती अफाट आहे, याचा प्रत्यय अनेक वेळेला आला आहे. कारकिर्दीत 23 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवीत त्याने सर्वाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा पुरुष खेळाडू हा विक्रम नोंदविला. विशेष म्हणजे, त्यापैकी अकरा विजेतेपदे त्याने वयाची तिशी ओलांडल्यानंतर मिळविली आहेत. यावरून त्याच्या जिगरबाज खेळाची कल्पना येऊ शकते. ग्रँडस्लॅमच्या इतिहासात मार्गारेट कोर्ट या महिला खेळाडूने 24 वेळा ग्रँडस्लॅममध्ये एकेरीचे विजेतेपद मिळविले आहे. खरं तर हा विक्रम जोकोव्हिच याने यापूर्वीच मोडला असता.

इसवी सन 2020 मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या वेळी त्याने नजरचुकीने एका ‘लाईन’ पंचांना चेंडू मारला त्यामुळे त्याला स्पर्धेतूनच बाद व्हावे लागले होते. त्यानंतर इसवी सन 2022 मध्ये कोरोना लस न घेतल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन व अमेरिकन खुल्या स्पर्धेत प्रवेश घेण्यापासून मनाई करण्यात आली होती; अन्यथा यापूर्वीच त्याने ग्रँडस्लॅम विजेतेपदाची पंचविशी पूर्ण केली असती. जगातील सर्वोत्तम आठ खेळाडूंमध्ये एटीपी टूरची अंतिम स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेतही जोकोव्हिच याने सहावेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यापैकी पाच विजेतेपदे त्याने 2011 नंतर जिंकली आहेत.

कोणत्याही विजेतेपदासाठी प्रतिस्पर्ध्याचा बारकाईने अभ्यास करणे महत्त्वाचे असते. प्रतिस्पर्धी खेळाडू केव्हा मानसिक दडपण घेतो, त्याच्या जमेच्या बाजू आणि कमकुवत गोष्टी कोणत्या आहेत. टेनिस कोर्टवर तो कशी सर्व्हिस करतो, परतीचे फटके कोठे मारतो इत्यादी सर्व बाजूंबाबत अतिशय बारकाईने निरीक्षण करावे लागते. जोकोव्हिच याला फेडरर व नदाल या श्रेष्ठ आणि तुल्यबळ खेळाडूंविरुद्ध अनेक वेळेला महत्त्वाच्या लढतींमध्ये खेळावे लागले आहे. या लढतींचा फायदा जोकोव्हिच याला मिळाला आहे. यंदाच्या फ्रेंच स्पर्धेतही उपांत्य फेरीत अल्कारेझ आणि अंतिम फेरीत कॅस्पर रूड यांच्याविरुद्ध खेळताना त्याला हीच अनुभवाची शिदोरी उपयोगास आली. अल्कारेझ याला उपांत्य फेरीत म्हणावा तसा खेळ करता आला नाही. त्याला लयही सापडली नाही आणि दुखापतीच्या वेदनांमुळेही तो क्षमतेइतके शंभर टक्के कौशल्य दाखवू शकला नाही. अर्थात, जोकोव्हिच हा त्याच्यापेक्षा अनुभवांमध्ये खूपच वरचढ असल्यामुळे अल्कारेझ याची डाळ शिजली नाही.

अनुभवाचा फायदा

अंतिम फेरीतील जोकोव्हिच याचा प्रतिस्पर्धी रूड याला ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीचा थोडासा अनुभव होता, तरीही जोकोव्हिच हा त्याच्या द़ृष्टीने खूपच वरचढ प्रतिस्पर्धी होता. अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये सलग तीन गेम्स घेत रूड याने झंझावती सुरुवात केली होती. मात्र, अफाट चिकाटी असलेला जोकोव्हिच याला चौथ्या गेमपासून सूर गवसला आणि त्याने शेवटपर्यंत या सामन्यावर आपले वर्चस्व राखले. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत गेला. टायब्रेक एकतर्फी घेत जोकोव्हिच याने विजेतेपदाच्या द़ृष्टीने आपली बाजू भक्कम केली होती. उर्वरित दोन सेटस्मध्ये रूड याने स्वतःच्या क्षमतेइतका खेळ करण्याचा प्रयत्न केला; मात्र अनुभवी जोकोव्हिचपुढे त्याच्या मर्यादा स्पष्ट दिसून आल्या. जोकोव्हिचपेक्षा वयाने बारा वर्षे तरुण असूनही रूड याला युवा खेळाडूंमध्ये असलेले कौशल्य दाखविता आले नाही.

त्याने नेटजवळून प्लेसिंगचे काही चांगले शॉटस् मारले, परतीचे फटकेही मारले आणि खोलवर सर्व्हिसही केल्या; तथापि त्याच्या प्रत्येक फटक्याला किंवा सर्व्हिसला जोकोव्हिचकडून चपखल उत्तर होते. त्यामुळेच जोकोव्हिच याने सरळ तीन सेटस्मध्ये रूड याचे आव्हान संपुष्टात आणले आणि 23 व्या ग्रँडस्लॅम किताबावर आपले नाव कोरले. टेनिसच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या मैदानांवर खेळावे लागते. ईव्हान लेंडल याने सारे जग जिंकले; पण त्याला विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवरील विजेतेपदापासून वंचितच राहावे लागले. जोकोव्हिच याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत दहावेळा, फ्रेंच स्पर्धेत तीनवेळा, विम्बल्डनमध्ये सातवेळा, तर अमेरिकन स्पर्धेत तीनवेळा विजेतेपद मिळविले आहे. या कामगिरीद्वारेच ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी कसा चतुरस्र खेळ असावा लागतो, हे जोकोव्हिच याने दाखवून दिले आहे.

नदाल याला आदर्श मानणारी स्विआतेक या 22 वर्षीय खेळाडूने सन 2020 मध्ये फ्रेंच स्पर्धेत विजेतेपद मिळवीत प्रथमच ग्रँडस्लॅम जेतेपदावर आपली मोहर नोंदवली होती. त्यानंतर गतवर्षी तिने फ्रेंच आणि अमेरिकन स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. जेव्हा तुम्ही मागील वर्षीचे विजेते म्हणून एखाद्या स्पर्धेत उतरता तेव्हा अप्रत्यक्षपणे तुमच्यावर त्या विजेतेपदाचे दडपण असते. त्यामुळे की काय स्विआतेक ही यंदाच्या फ्रेंच स्पर्धेत सुरुवातीपासूनच थोडीशी दडपणाखाली खेळत होती.

अनेक मानांकित खेळाडूंना पराभूत करीत अंतिम फेरी गाठणार्‍या कॅरोलिना मुचोवा हिचे आव्हान स्विआतेकसमोर होते. खरं तर पहिला सेट घेत स्विआतेक हिने चांगली सुरुवात केली होती. तथापि, दडपणाखाली दुसर्‍या सेटमध्ये अपेक्षेइतके नियंत्रण तिला ठेवता आले नाही. विशेषतः, परतीचे फटके व नेटजवळून प्लेसिंग याबाबत तिच्याकडून नकळत चुका होत गेल्या त्याचा फायदा मुचोवा हिने घेतला नाही तर नवलच. हा सेट गमावल्यानंतर स्विआतेक हिने पुन्हा खेळावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तिला यशही मिळाले. स्विआतेक ही नेहमीच आक्रमकता हाच सर्वोत्तम बचावात्मक खेळ असतो, अशी मानणारी खेळाडू आहे. बेसलाईनवरून ताकदवान फोर हँड आणि बॅक हँड परतीचे फटके, खोलवर सर्व्हिस, टॉप स्पिन फटके, नेटजवळील प्लेसिंग असा बहारदार खेळ करण्यात ती माहिर खेळाडू आहे.

सामाजिक बांधिलकी

जोकोव्हिच व स्विआतेक यांच्यात एक समान धागा आहे तो म्हणजे हे दोन्ही खेळाडू आपल्याला मिळणार्‍या बक्षीस आणि अन्य स्वरूपाच्या उत्पन्नातला बराचसा भाग उपेक्षित आणि दुर्लक्षित समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाकरिता, क्रीडा विकासाकरिता खर्च करीत असतात. तसेच ते अनेक युवा खेळाडूंना टेनिसचे प्रशिक्षणही देत आहेत.

क्ले कोर्टवरील फ्रेंच स्पर्धा संपत नाही तोच ग्रास कोर्टवरील विम्बल्डन स्पर्धेचे वारे वाहू लागतात. कोर्टमधील हा बदल अनेक खेळाडूंना जड जात असतो. त्याकरिता बरेचसे खेळाडू या स्पर्धेची पूर्वतयारी असलेल्या दोन-तीन स्पर्धांमध्ये भाग घेत असतात, जेणेकरून कोर्टमधील फरक आपल्याला फारसा जड जाणार नाही. अर्थात, लागोपाठच्या या दोन स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवणे हे अनुभवी व श्रेष्ठ खेळाडूंना जमते. त्यामुळेच आता उत्सुकता आहे ती जोकोव्हिच याच्या आणखी एक विक्रमी विजेतेपदाचीच आणि स्विआतेक हिच्या आणखी एका किताबाचीच!!

मिलिंद ढमढेरे

Back to top button