वन्यजीवन : चित्ता आणि चिंता… | पुढारी

वन्यजीवन : चित्ता आणि चिंता...

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चित्त्यांच्या मृत्यूंमुळे वन्यजीवप्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे. मृत्यूचीकारणे उष्माघात, कुपोषण आणि उपचारांच्या प्रयत्नांना प्रतिसाद न मिळणे, अशी सांगितली आहेत. इथले हवामान आणि वातावरण या चित्त्यांसाठी प्रतिकूल ठरत आहे का? याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार्‍या अनेक नव्या बाबी समोर येतील.

भारतातील चित्ते नामशेष घोषित झाल्यानंतर 70 वर्षांनी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘प्रोजेक्ट चीता’ ही योजना हाती घेण्यात आली. यांतर्गत दक्षिण आफ्रिकेतील देशांतून दोन तुकड्यांमध्ये चित्ते येथे आणण्यात आले. गेल्यावर्षी 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय उद्यानात पाच मादी आणि तीन नरांसह आठ नामिबियाच्या चित्त्यांना सोडण्यात आले होते. यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते येथे आणण्यात आले. या प्रकल्पाची बरीच चर्चा झाली. परंतु, सध्या मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूंनी चिंतेचे वातावरण पसरले आहे. चित्त्यांच्या मृत्यूची ही मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने हा प्रकल्पही प्रश्नांच्या भोवर्‍यात सापडला आहे. या मृत्यूंना, चित्त्यांच्या ढासळत्या आरोग्याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपल्याकडील वनाधिकार्‍यांना चित्त्यांचा नैसर्गिक अधिवास आणि वर्तनाची फारशी माहिती नसल्याची टीकाही होत असून, ती गैर म्हणता येणार नाही. कारण, एकामागून एक असे तीन वयस्कर चित्ते आणि तीन बछड्यांचा चार महिन्यांतच मृत्यू झाला आहे. चित्ता प्रकल्पासाठी हा मोठा धक्का आहे.

23 मे रोजी चित्त्याच्या बछड्याचा मृत्यू झाला तेव्हा तो अशक्त असल्याचे कारण सांगितले गेले. आईचे दूधदेखील तो कमी घेत होता. असे असतानाही त्याच्यावर उपचार करण्याचे ठोस प्रयत्न दिसून आले नाहीत. तो सुस्त पडल्यानंतरच उपचार सुरू झाले. देखरेख करणार्‍या पथकाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बछड्याची हालचाल मंदावल्याचे सांगितल्यानंतर धावाधाव झाली. या देखरेख यंत्रणेत भारतीय तज्ज्ञांबरोबर नामिबियाचे दोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या चार तज्ज्ञांनी कुनोत तळ ठोकला आहे; पण आजारी बछडा दूध घेत नसल्याचे पाहून तज्ज्ञांना वेळीच जाग का आली नाही, असा प्रश्न आहे. वास्तविक, या वयात शावकांसाठी सर्वात पौष्टिक अन्न म्हणजे आईचे दूधच असते. ही पिल्ले साधारणत: दोन महिन्यांची असतानाच अशक्त झाली असतील तर त्याचा अर्थ त्यांना आईकडून पुरेसे दूध मिळत नव्हते, असा होतो. तसे असल्यास आई पुरेसे दूध का देत नव्हती, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर मिळणे गरजेचे आहे. ते न मिळाल्यास या शावकांवर आणि मादी चित्त्यावर पुरेसे लक्ष नसल्याचे स्पष्ट होईल.

चित्त्याच्या बछड्यांच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्यासाठी केला जाणारा युक्तिवाद हा मखलाशी स्वरूपाचा आहे. मांजर (कॅट ब्रिड) प्रजातीत चित्त्याच्या बछड्यांचा मृत्यू दर सर्वाधिक असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामध्ये काहीअंशी तथ्य आहे. चित्ता ही अतिशय संवेदनशील प्रजाती असून, त्यांच्यामध्ये आनुवंशिक विविधताही कमी असते. त्यामुळे तो अतिसंवेदनशील गटात गणला जातो; पण प्रश्न असा की, चारपैकी तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याने हा दर 75 टक्क्यांवर पोहोचला आहे. वनाधिकार्‍यांना ही स्थिती असामान्य वाटत नाही का?

9 मे रोजी मादी चित्ता ‘दक्षा’ हिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुनोतील वनाधिकार्‍यांना प्राण्यांच्या हालचालीविषयी व्यावहारिक ज्ञान नसल्याची टीका करण्यात आली आणि ती योग्य आहे. कारण, ‘दक्षा’शी जोडी करण्यासाठी एकाचवेळी दोन नर चित्ते सोडण्यात आले होते. वस्तुतः, मांजर प्रजातीतील नर प्राण्यांत मादीशी संबंध ठेवण्यावरून होणारा संघर्ष आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही सामान्य बाब आहे. तरीही त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले नाही. चित्त्यांच्या मीलनाचा कालावधी सांगता येत नाही. मीलनाची परिस्थिती चित्त्याभोवतीच्या वातावरणावर अवलंबून असते. साधारणतः, त्यांचा मीलन कालावधी 14 दिवसांचा असतो. या मीलनाच्या काळात मादी चित्ता अनेक नर चित्त्यांच्या संपर्कात येते आणि सोबत करू शकते. एकापेक्षा जास्त चित्त्यांच्या संपर्कात असल्याने वादाची परिस्थिती निर्माण होते. कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ‘दक्षा’वर झालेल्या हल्ल्यामागे हेच कारण आहे. चित्ता मीलनासाठी तयार होत नव्हता, म्हणून ‘दक्षा’चा नर चित्त्याशी संघर्ष झाला आणि ती जखमी झाली. ‘दक्षा’वर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याकडे नैसर्गिक बाब म्हणून व्यवस्थापनाने कानाडोळा केला. मात्र, तिच्यावरचे उपचार निरुपयोगी ठरू लागले तेव्हा त्यांना हल्ल्याची तीव्रता कळून चुकली. विशेष म्हणजे, चित्त्यांच्या गळ्यात कॉलर आयडी आहे आणि अधिवासात कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. असे असताना या प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञांना, अधिकार्‍यांना वेळीच बचावात्मक उपाययोजना का करता आल्या नाहीत.

25 एप्रिल रोजी ‘उदय’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. यामागचे कारण देताना ‘उदय’चे हृदय बंद पडल्याचे सांगितले गेले. परंतु, शवविच्छेदनानंतर त्याला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ‘उदय’ हा एका ठिकाणी विपन्नावस्थेत पडून राहिल्यानंतर त्याच्या स्थितीचे वन विभागाला आकलन झाले. 27 मार्च रोजी 20 चित्त्यांपैकी सर्वप्रथम मादी ‘साशा’च्या मृत्यूची बातमी आली. या मृत्यूमागे किडनी खराब झाल्याचे कारण सांगितले. हा गंभीर आजार तिला नामिबियातच झाला होता. या आजाराची कल्पना भारतीय अधिकार्‍यांना दिली होती, असे सांगितले जाते; मग आजारी चित्त्याला आणण्याचा हट्ट कशासाठी केला गेला? पण वन व्यवस्थापन या प्रश्नावर मौन बाळगून आहे.

एकंदरीत पाहता, चित्त्यांच्या मृत्युकांडामुळे आपल्याकडील वन विभागाचा बेजबाबदारपणा, ढिसाळपणा नव्याने समोर आला आहे. आतापर्यंत 24 पैकी सहा चित्त्यांंचा मृत्यू झाला असून, परिस्थिती अशीच राहिली तर या प्रकल्पाचे भवितव्य काय असेल, यावर शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

वास्तविक पाहता, परदेशी चित्त्यांना भारतीय हवामान कधीच मानवले नाही, असे इतिहास सांगतो. त्यांना आपल्याकडे आणण्याचे आणि अधिवासाचे प्रयत्न केले गेले. एकेकाळी चित्त्याचा वेग हा भारतीय जंगलाची अस्मिता आणि भूषण होते. परंतु, 1947 चे वर्ष उजाडताच चित्त्यांची संख्या पूर्णपणे शून्यावर आली. 1948 मध्ये शेवटचा चित्ता छत्तीसगडच्या सरगुजा येथे पाहावयास मिळाला. त्याला मारण्यात आले. 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात चार चित्ते आणले. परंतु, सहा महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयात पुरेसे उपाय केले गेले. त्यांचा वंश वाढेल, अशी अपेक्षा होती. वंशवाढीच्या प्रयत्नातून संख्या वाढली, तर चित्ते अन्य प्राणिसंग्रहालयात सोडण्यात येतील, अशी योजना आखली; पण प्राणिसंग्रहालयातील प्रजननातील यश अपवादात्मक असते. परिणामी, प्रजननापूर्वीच चित्त्यांचा मृत्यू होतो.

गेल्या शतकात चित्त्यांची संख्या एक लाखापर्यंत होती. आफ्रिकेतील गवताळ जंंगलापासून भारतासह जवळपास सर्वच आशियायी देशांत आढळून येणारा चित्ता आता आशियायी जंगलांत फार कमी प्रमाणात राहिला आहे. राजा चित्ता (एसिनोनिक्स रेक्स) हा झिम्बाब्वेत सापडतो. आफ्रिकी जंगलातदेखील चित्त्यांचे प्रमाण कमीच राहिले आहे. टान्झानियात सेरेगती राष्ट्रीय उद्यान आणि नामिबियाच्या जंगलातदेखील निवडक चित्ते राहिले आहेत. प्रजननासंबंधी आधुनिक शास्त्रीय उपाय असतानाही जंगलात या वेगवान आणि चपळ हालचालींसाठी ओळखल्या जाणार्‍या प्राण्यांची वंशवृद्धी करण्यात अपयश येत आहे. एकुणातच निसर्गापुढे शास्त्रीय उपचारदेखील कुचकामी ठरत आहेत. जिओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनच्या अहवालानुसार, जगात 91 टक्के चित्ते हे 1991 पर्यंत नामशेष झाले आहेत. आता केवळ 7,100 चित्ते जगात राहिले आहेत. इराणमध्ये केवळ 50 चित्ते आहेत. केनियात मासिमार हा चित्त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता तेथेही तुरळक संख्या राहिली आहे.

गेल्या शतकातील पाचव्या दशकात चित्ते हे अमेरिकेच्या प्राणिसंग्रहालयातही पाहावयास मिळत होते. प्राणितज्ज्ञांच्या अनेक प्रयत्नांनंतर या चित्त्यांनी 1956 मध्ये बछड्यांना जन्म दिला. परंतु, कोणत्याच बछड्यांना वाचवता आले नाही. प्राणिसंग्रहालयात एखाद्या चित्त्याची जोडी तयार करण्याचा तो पहिला प्रयत्न होता आणि अपयशी ठरला. हिस्र प्राण्यांच्या प्रजननामुळे प्राणिसंग्रहालयातील अन्य प्राण्यांच्या हालचालींवर परिणाम होतो. म्हणून वाघ, सिंह, बिबट्या यांच्या जोड्या प्राणिसंग्रहालयात ठेवल्या जात नाहीत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. कुनोमधील चित्त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकल्पाचे पुढे काय करायचे? याचा निर्णय सरकार घेईलच; पण दीर्घकालीन द़ृष्टिकोन अंगीकारून हा प्रयोग योग्य पद्धतीने पुढे नेला, तर चित्त्यांच्या आरोग्याशी निगडित काही नवे पैलू समोर येऊ शकतात आणि ते जगभरातील जीवशास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरू शकतात.

भारतातील चित्ते नामशेष घोषित झाल्यानंतर 70 वर्षांनी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘प्रोजेक्ट चीता’ ही योजना हाती घेण्यात आली. यांतर्गत दक्षिण आफ्रिकेतील देशांतून दोन तुकड्यांमध्ये चित्ते येथे आणण्यात आले. गेल्यावर्षी 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय उद्यानात पाच मादी आणि तीन नरांसह आठ नामिबियाच्या चित्त्यांना सोडण्यात आले होते. यानंतर यावर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते येथे आणण्यात आले. या प्रकल्पाची बरीच चर्चा झाली. परंतु, सध्या मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या मृत्यूंनी चिंतेचे वातावरण पसरले आहे. चित्त्यांच्या मृत्यूची ही मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने हा प्रकल्पही प्रश्नांच्या भोवर्‍यात सापडला आहे. या मृत्यूंना, चित्त्यांच्या ढासळत्या आरोग्याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आपल्याकडील वनाधिकार्‍यांना चित्त्यांचा नैसर्गिक अधिवास आणि वर्तनाची फारशी माहिती नसल्याची टीकाही होत असून, ती गैर म्हणता येणार नाही. कारण, एकामागून एक असे तीन वयस्कर चित्ते आणि तीन बछड्यांचा चार महिन्यांतच मृत्यू झाला आहे. चित्ता प्रकल्पासाठी हा मोठा धक्का आहे.

23 मे रोजी चित्त्याच्या बछड्याचा मृत्यू झाला तेव्हा तो अशक्त असल्याचे कारण सांगितले गेले. आईचे दूधदेखील तो कमी घेत होता. असे असतानाही त्याच्यावर उपचार करण्याचे ठोस प्रयत्न दिसून आले नाहीत. तो सुस्त पडल्यानंतरच उपचार सुरू झाले. देखरेख करणार्‍या पथकाने पशुवैद्यकीय डॉक्टरांना बछड्याची हालचाल मंदावल्याचे सांगितल्यानंतर धावाधाव झाली. या देखरेख यंत्रणेत भारतीय तज्ज्ञांबरोबर नामिबियाचे दोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या चार तज्ज्ञांनी कुनोत तळ ठोकला आहे; पण आजारी बछडा दूध घेत नसल्याचे पाहून तज्ज्ञांना वेळीच जाग का आली नाही, असा प्रश्न आहे. वास्तविक, या वयात शावकांसाठी सर्वात पौष्टिक अन्न म्हणजे आईचे दूधच असते. ही पिल्ले साधारणत: दोन महिन्यांची असतानाच अशक्त झाली असतील तर त्याचा अर्थ त्यांना आईकडून पुरेसे दूध मिळत नव्हते, असा होतो. तसे असल्यास आई पुरेसे दूध का देत नव्हती, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर मिळणे गरजेचे आहे. ते न मिळाल्यास या शावकांवर आणि मादी चित्त्यावर पुरेसे लक्ष नसल्याचे स्पष्ट होईल.

चित्त्याच्या बछड्यांच्या मृत्यूचे प्रकरण दाबण्यासाठी केला जाणारा युक्तिवाद हा मखलाशी स्वरूपाचा आहे. मांजर (कॅट ब्रिड) प्रजातीत चित्त्याच्या बछड्यांचा मृत्यू दर सर्वाधिक असल्याचे कारण सांगितले जात आहे. त्यामध्ये काहीअंशी तथ्य आहे. चित्ता ही अतिशय संवेदनशील प्रजाती असून, त्यांच्यामध्ये आनुवंशिक विविधताही कमी असते. त्यामुळे तो अतिसंवेदनशील गटात गणला जातो; पण प्रश्न असा की, चारपैकी तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याने हा दर 75 टक्क्यांवर पोहोचला आहे. वनाधिकार्‍यांना ही स्थिती असामान्य वाटत नाही का?

9 मे रोजी मादी चित्ता ‘दक्षा’ हिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुनोतील वनाधिकार्‍यांना प्राण्यांच्या हालचालीविषयी व्यावहारिक ज्ञान नसल्याची टीका करण्यात आली आणि ती योग्य आहे. कारण, ‘दक्षा’शी जोडी करण्यासाठी एकाचवेळी दोन नर चित्ते सोडण्यात आले होते. वस्तुतः, मांजर प्रजातीतील नर प्राण्यांत मादीशी संबंध ठेवण्यावरून होणारा संघर्ष आणि त्यामुळे होणारे मृत्यू ही सामान्य बाब आहे. तरीही त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले नाही. चित्त्यांच्या मीलनाचा कालावधी सांगता येत नाही. मीलनाची परिस्थिती चित्त्याभोवतीच्या वातावरणावर अवलंबून असते. साधारणतः, त्यांचा मीलन कालावधी 14 दिवसांचा असतो. या मीलनाच्या काळात मादी चित्ता अनेक नर चित्त्यांच्या संपर्कात येते आणि सोबत करू शकते.

एकापेक्षा जास्त चित्त्यांच्या संपर्कात असल्याने वादाची परिस्थिती निर्माण होते. कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता ‘दक्षा’वर झालेल्या हल्ल्यामागे हेच कारण आहे. चित्ता मीलनासाठी तयार होत नव्हता, म्हणून ‘दक्षा’चा नर चित्त्याशी संघर्ष झाला आणि ती जखमी झाली. ‘दक्षा’वर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याकडे नैसर्गिक बाब म्हणून व्यवस्थापनाने कानाडोळा केला. मात्र, तिच्यावरचे उपचार निरुपयोगी ठरू लागले तेव्हा त्यांना हल्ल्याची तीव्रता कळून चुकली. विशेष म्हणजे, चित्त्यांच्या गळ्यात कॉलर आयडी आहे आणि अधिवासात कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. असे असताना या प्रकल्पाशी संबंधित तज्ज्ञांना, अधिकार्‍यांना वेळीच बचावात्मक उपाययोजना का करता आल्या नाहीत.

25 एप्रिल रोजी ‘उदय’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. यामागचे कारण देताना ‘उदय’चे हृदय बंद पडल्याचे सांगितले गेले. परंतु, शवविच्छेदनानंतर त्याला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ‘उदय’ हा एका ठिकाणी विपन्नावस्थेत पडून राहिल्यानंतर त्याच्या स्थितीचे वन विभागाला आकलन झाले. 27 मार्च रोजी 20 चित्त्यांपैकी सर्वप्रथम मादी ‘साशा’च्या मृत्यूची बातमी आली. या मृत्यूमागे किडनी खराब झाल्याचे कारण सांगितले. हा गंभीर आजार तिला नामिबियातच झाला होता. या आजाराची कल्पना भारतीय अधिकार्‍यांना दिली होती, असे सांगितले जाते; मग आजारी चित्त्याला आणण्याचा हट्ट कशासाठी केला गेला? पण वन व्यवस्थापन या प्रश्नावर मौन बाळगून आहे.

एकंदरीत पाहता, चित्त्यांच्या मृत्युकांडामुळे आपल्याकडील वन विभागाचा बेजबाबदारपणा, ढिसाळपणा नव्याने समोर आला आहे. आतापर्यंत 24 पैकी सहा चित्त्यांंचा मृत्यू झाला असून, परिस्थिती अशीच राहिली तर या प्रकल्पाचे भवितव्य काय असेल, यावर शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.

वास्तविक पाहता, परदेशी चित्त्यांना भारतीय हवामान कधीच मानवले नाही, असे इतिहास सांगतो. त्यांना आपल्याकडे आणण्याचे आणि अधिवासाचे प्रयत्न केले गेले. एकेकाळी चित्त्याचा वेग हा भारतीय जंगलाची अस्मिता आणि भूषण होते. परंतु, 1947 चे वर्ष उजाडताच चित्त्यांची संख्या पूर्णपणे शून्यावर आली. 1948 मध्ये शेवटचा चित्ता छत्तीसगडच्या सरगुजा येथे पाहावयास मिळाला. त्याला मारण्यात आले. 1993 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातून दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात चार चित्ते आणले. परंतु, सहा महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयात पुरेसे उपाय केले गेले. त्यांचा वंश वाढेल, अशी अपेक्षा होती. वंशवाढीच्या प्रयत्नातून संख्या वाढली, तर चित्ते अन्य प्राणिसंग्रहालयात सोडण्यात येतील, अशी योजना आखली; पण प्राणिसंग्रहालयातील प्रजननातील यश अपवादात्मक असते. परिणामी, प्रजननापूर्वीच चित्त्यांचा मृत्यू होतो.

गेल्या शतकात चित्त्यांची संख्या एक लाखापर्यंत होती. आफ्रिकेतील गवताळ जंंगलापासून भारतासह जवळपास सर्वच आशियायी देशांत आढळून येणारा चित्ता आता आशियायी जंगलांत फार कमी प्रमाणात राहिला आहे. राजा चित्ता (एसिनोनिक्स रेक्स) हा झिम्बाब्वेत सापडतो. आफ्रिकी जंगलातदेखील चित्त्यांचे प्रमाण कमीच राहिले आहे. टान्झानियात सेरेगती राष्ट्रीय उद्यान आणि नामिबियाच्या जंगलातदेखील निवडक चित्ते राहिले आहेत. प्रजननासंबंधी आधुनिक शास्त्रीय उपाय असतानाही जंगलात या वेगवान आणि चपळ हालचालींसाठी ओळखल्या जाणार्‍या प्राण्यांची वंशवृद्धी करण्यात अपयश येत आहे. एकुणातच निसर्गापुढे शास्त्रीय उपचारदेखील कुचकामी ठरत आहेत. जिओलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनच्या अहवालानुसार, जगात 91 टक्के चित्ते हे 1991 पर्यंत नामशेष झाले आहेत. आता केवळ 7,100 चित्ते जगात राहिले आहेत. इराणमध्ये केवळ 50 चित्ते आहेत. केनियात मासिमार हा चित्त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. आता तेथेही तुरळक संख्या राहिली आहे.

गेल्या शतकातील पाचव्या दशकात चित्ते हे अमेरिकेच्या प्राणिसंग्रहालयातही पाहावयास मिळत होते. प्राणितज्ज्ञांच्या अनेक प्रयत्नांनंतर या चित्त्यांनी 1956 मध्ये बछड्यांना जन्म दिला. परंतु, कोणत्याच बछड्यांना वाचवता आले नाही. प्राणिसंग्रहालयात एखाद्या चित्त्याची जोडी तयार करण्याचा तो पहिला प्रयत्न होता आणि अपयशी ठरला. हिस्र प्राण्यांच्या प्रजननामुळे प्राणिसंग्रहालयातील अन्य प्राण्यांच्या हालचालींवर परिणाम होतो. म्हणून वाघ, सिंह, बिबट्या यांच्या जोड्या प्राणिसंग्रहालयात ठेवल्या जात नाहीत, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. कुनोमधील चित्त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकल्पाचे पुढे काय करायचे? याचा निर्णय सरकार घेईलच; पण दीर्घकालीन द़ृष्टिकोन अंगीकारून हा प्रयोग योग्य पद्धतीने पुढे नेला, तर चित्त्यांच्या आरोग्याशी निगडित काही नवे पैलू समोर येऊ शकतात आणि ते जगभरातील जीवशास्त्रज्ञांना मार्गदर्शक ठरू शकतात.

रंगनाथ कोकणे,
पर्यावरण अभ्यासक

Back to top button