मनोरंजन : राजकारणाचा मनोरंजक बाजार | पुढारी

मनोरंजन : राजकारणाचा मनोरंजक बाजार

गतविधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातल्या नाट्यमय घडामोडी वाढतच चालल्या आहेत. महाराष्ट्राच्या समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकणार्‍या या घडामोडींनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सगळ्यांनाच आपल्या अवतीभोवती खिळवून ठेवलंय. मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेतही याचे पडसाद उमटलेत. ’सिटी ऑफ ड्रीम्स त्याचंच एक उदाहरण आहे.

गेल्याच महिन्यात शेजारच्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली. शेजारची परिस्थिती बघून महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातही वातावरण आता चांगलंच तापलंय.

गेल्या काही वर्षांतलं महाराष्ट्राचं राजकारण बघून ‘सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी,’ अशी भावना आणखीनच बळकट होत चाललीय. दुसरीकडे, या राजकारणात कधी काय घडतंय याकडे मात्र लोकांचं लक्ष अजूनही लागून राहिलं आहे. लोकांना राजकारणात असलेला हा रस मनोरंजनाच्या चंदेरी दुनियेसाठी मात्र फायद्याचा ठरतोय.

संबंधित बातम्या

‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारा विषय प्रेक्षकांना उपलब्ध करून दिला जातोय. त्यात माफक सेन्सॉरशिप असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वाटा निश्चितच मोठा आहे. भारतातल्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या डिज्नी-हॉटस्टारवर ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या गाजलेल्या राजकीय वेबसीरिजचा नुकताच रीलिज झालेला तिसरा सीझन हे याच ठळक उदाहरण आहे

‘इक्बाल’, ‘धनक’, ‘लक्ष्मी’सारख्या दर्जेदार सिनेमांमधून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य अजमावणार्‍या नागेश कुकनूर यांचं ओटीटी क्षेत्रातलं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही वेबसीरिज. मार्च 2019 मध्ये या सीरिजचा पहिला सीझन डिज्नी-हॉटस्टारवर रीलीज झाला. अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी, आदिनाथ कोठारे असे मराठी सिनेसृष्टीतले अनेक नामवंत सिनेकलाकार यामध्ये आहेत.

स्वप्न दाखवणारी मायानगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईत हा राजकीय ड्रामा घडतो. राज्यात सत्तेत असलेल्या महाराष्ट्र जनशक्ती पक्षाचे मोठे नेते अमेयराव गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. त्या हल्ल्यानंतर गायकवाडांच्या कौटुंबिक आणि राजकीय जीवनातल्या एकेक घडामोडी उलगडत जातात. महाराष्ट्र जनशक्ती पक्षासोबतच गायकवाड घराण्याच्या राजकारण, अर्थकारण आणि समाजकारणातल्या अनेक दुव्यांवर ही मालिका भाष्य करते.

सत्तासंघर्ष, विश्वासघात, नैतिक-अनैतिक प्रेमसंबंध, पत्रकारिता, गुंतागुंतीचे राजकीय-आर्थिक हितसंबंध अशा एक ना अनेक विषयांवर आधारित उपकथानकांचा भरणा असलेली ही वेबसीरिज अनेक कारणांनी गाजली. पहिल्या सीझनमध्ये काहीसं संथ वाटणारं कथानक दुसर्‍या सीझनमध्ये अधिक वेगवान होत धक्कातंत्राच्या जोरावर प्रेक्षकांना खिळवून ठेवतं.

26 मे रोजी रीलिज झालेल्या या तिसर्‍या सीझनमध्येे अनेक नव्या कलाकारांचा भरणा आहे. राज्यातल्या आणि देशातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी साकारलेल्या भूमिकांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. यात पत्रकाररूपी कळसूत्री बाहुले आहेत, पात्रतेपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षा बाळगणारे राजकारणी आहेत आणि आपल्या धडावर सत्ताधार्‍यांचं डोकं ठेवून आपलं प्रशासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारीही आहेत.

हा सीझन पहिल्या दोन्ही सीझनपेक्षा निश्चितच वेगळा आहे; कारण बर्‍याचदा तो नवनव्या उपकथानकांच्या मागे धावून मूळ कथानकापासून भरकटल्याचं दिसून येतं. यातल्या उपकथानकांचा विचार केला, तर गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अगदी आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा त्यांच्यावर ठळकपणे प्रभाव दिसून येतो.

महाराष्ट्रात गेल्यावर्षी झालेलं सत्तांतर, राजकारण्यांसोबतच पत्रकारांकडूनही माध्यमस्वातंत्र्याची केली गेलेली गळचेपी, अमली पदार्थांच्या रॅकेटचा तपास करणार्‍या यंत्रणांचा आणि अधिकार्‍यांचा फोलपणा अशा बर्‍याच वास्तव घटनांचा संदर्भ या काल्पनिक कथानकात दिग्दर्शकाने खुबीने पेरलाय. या संदर्भांवर आधारित असलेली उपकथानकं सुरुवातीला योग्य वाटत असली, तरी पुढे त्यांचा प्रभाव ओसरू लागतो आणि या सीझनची गल्लाभरू विसंगती अधोरेखित होऊ लागते.

मुंबईतल्या राजकारणाची भुरळ

महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे पूर्ण देशाचं लक्ष लागून असतं. साहजिकच, या शहरातलं राजकारण तितकंच महत्त्वपूर्ण ठरतं. मुंबईतल्या वास्तव राजकीय परिस्थितीचं काल्पनिक चित्रण आपल्या सिनेमात करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरलेला नाही; मग ते जब्बार पटेलांचं ’सिंहासन’ असो, राम गोपाल वर्मांची ‘सरकार’त्रयी असो किंवा आताआताची ‘सिटी ऑफ ड्रीम्स!’

गेल्यावर्षी झालेल्या पक्षफुटीच्या घटनेचे राजकीय पडसाद मनोरंजन जगतातही उमटले. त्या घटनेवर अनेक लोकगीतं आली. या घटनेची विनोदी स्वरूपात मांडणी करणारी ‘मी पुन्हा येईन’ ही एक मराठी वेबसीरिजही मधल्या काळात येऊन गेली. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्येही पक्षफुटीसोबत इतर अनेक संदर्भ दिग्दर्शकाने वापरले आहेत; ज्यातले काही रंगतदार आहेत, तर काही प्रचंड विसंगत आहेत.

महाराष्ट्रातलं राजकारण हा कायमच अनेकांच्या कुतूहलाचा विषय राहिलाय. त्यात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातली बदललेली राजकीय समीकरणं कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. महाराष्ट्राच्या समाजमनावर मोठा परिणाम करणार्‍या राजकीय घडामोडी या कालखंडात घडल्या. 2019 च्या शपथविधीच्या पहाटेपासून 2022 मधल्या पक्षफुटीच्या लाटेपर्यंतचं प्रत्येक राजकीय नाट्य महाराष्ट्रातल्या मतदारांनी मोठ्या उत्साहाने पाहिलंय.

हे सगळं राजकीय नाट्य रुपेरी पडद्यावर आणून त्यातून आयता प्रेक्षक आणि पैसा कमावणं हे कुठल्याही दिग्दर्शक-निर्मात्याला नक्कीच आवडेल. त्यात काही चूकही नाही; पण अशा वास्तव घटनांचा काल्पनिक कथानकात तात्पुरत्या तडक्यासारखा वापर करताना मूळ कथानकाचं महत्त्व कमी होणार नाही, याचीही खबरदारी घ्यायला हवी. एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून निव्वळ प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी घटनांचा कथानकात वापर होतोय. सध्याच्या स्पर्धात्मक युगात हे गैर नाही; पण नागेश कुकनूरसारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकानेही निव्वळ मार्केटिंग म्हणून या घटना वापरणं आणि त्यांना योग्य तो न्याय न देणं हे दुर्दैवी आहे.

प्रथमेश हळंदे

Back to top button