व्यक्‍तिचित्र : ‘सुल्तान’ एर्दोगन

सुल्तान एर्दोगन
सुल्तान एर्दोगन
Published on
Updated on

एर्दोगन स्वत:ला ओटोमन साम्राज्याच्या सुल्तानाच्या रूपात बघतात. तब्बल दोन दशके सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी जनतेचा कौल जिंकण्याची कामगिरी एर्दोगन यांनी साधली आहे. एर्दोगन यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार करण्याची पाश्चिमात्य देशांना घाई झाल्याचे प्रचार यंत्रणेने मतदारांच्या मनावर ठसवले. परिणामी, मतदारांनी राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेखाली पुन्हा एकदा एर्दोगन यांना निवडून दिले.

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या दुसर्‍या व अंतिम फेरीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली आहे. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीपूर्वी पाश्चिमात्य माध्यमांनी एर्दोगन यांचा पराभव होत असल्याचे चित्र रंगवले होते. ढासळती अर्थव्यवस्था, अलीकडे झालेल्या भूकंपाने झालेली प्रचंड हानी, मानवाधिकारांचे पाशवी उल्लंघन आणि सन 2002 पासून तुर्कस्तानच्या राजकारणाच्या व सत्तेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे एर्दोगन यांच्याविरुद्ध हळुवार शिजलेला असंतोष, या बाबींमुळे तुर्की जनता राजकीय बदलावावर शिक्कामोर्तब करेल, ही आशा भाबडी ठरली आहे.

प्रचारादरम्यान ज्या बाबी एर्दोगन यांच्या पथ्यावर पडल्यात त्यात पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या अतिउत्साहाचासुद्धा समावेश आहे. परकीय प्रसारमाध्यमांनी, विशेषत: युरोपीय माध्यमांनी एर्दोगन यांच्या संभावित पराभवात विशेष रूची घेतल्याचा फायदा एर्दोगन यांनाच झाला. एर्दोगन यांच्या प्रचार यंत्रणेने पाश्चिमात्य माध्यमांतील चर्चेला परकीय हस्तक्षेपाचा आणि पाश्चिमात्य देशांना एर्दोगन यांच्या नेतृत्वातील तुर्कस्तानविषयी असलेल्या असुयेचा रंग चढवला होता. एर्दोगन यांना राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार करण्याची पाश्चिमात्य देशांना घाई झाल्याचे त्यांच्या प्रचार यंत्रणेने मतदारांच्या मनावर ठसवले. परिणामी, मतदारांनी राष्ट्रीय अस्मितेच्या भावनेखाली पुन्हा एकदा एर्दोगन यांना निवडून दिले. एर्दोगन आरूढ असलेल्या तुर्की राष्ट्रवादाच्या रथाची घोडदौड थांबवणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे विरोधक केमाल किलिकदरोग्लू यांनी स्वत: सीरियातून आलेल्या निर्वासितांच्या मुद्द्याला हात घातला होता.

सीरियातून आलेल्या लाखो निर्वासितांमुळे तुर्कीच्या जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाल्याची बाब या निवडणुकीत सतत चर्चेत होती. या निर्वासितांना त्यांच्या मायभूमीत परत पाठवण्याची कडक भूमिका किलिकदरोग्लू व एर्दोगन या दोघांनीही घेतली होती. एर्दोगन यांच्या कारकिर्दीत हे निर्वासित तुर्कस्तानात आल्याचे खापर सत्ताधारी पक्षावर फोडण्याचा विरोधकांचा प्रयत्न ही त्यांची अखेरची खेळी होती, जी यशस्वी ठरली नाही. एर्दोगन सरकारच्या धोरणांमुळे सीरियातून लाखो निर्वासित तुर्कस्तानात आलेत, या टीकेऐवजी या निर्वासितांना परत पाठवण्याची किमया एर्दोगनच करू शकतात, हे प्रतिमारंजन एर्दोगन समर्थकांना अधिक भावले. तब्बल दोन दशके सत्ता गाजवल्यानंतर पुनश्च 5 वर्षांसाठी जनतेचा कौल जिंकण्याची कामगिरी एर्दोगन यांनी साधली ही निश्चितच ऐतिहासिक घटना आहे.

मागील दोन दशकांत तुर्की राजकारणात प्रथमच 6 प्रमुख विरोधी पक्षांनी एर्दोगन यांच्याविरुद्ध संयुक्त आघाडी उभारली होती. 'टेबल ऑफ सिक्स' म्हणून ओळखल्या गेलेल्या या आघाडीचे राष्ट्राध्यक्षीय उमेदवार किलिकदरोग्लू हे यापूर्वी एर्दोगन यांच्याविरुद्ध अनेकदा पराभूत झाले होते. मात्र, विरोधकांच्या एकीमुळे यावेळी त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. किलिकदरोग्लू यांनी अंतिम फेरीत 47.8 टक्के मते मिळवत तुर्कस्तानात एर्दोगन यांना असलेला विरोध ठळकपणे अधोरेखित केला आहे; पण एर्दोगन यांच्या पाठीशी मागील किमान 10 वर्षांपासून उभ्या असलेल्या 51 ते 52 टक्के मतदारांपैकी किमान 2 ते 3 टक्के मतदारांना आपल्याकडे वळवण्यात किलिकदरोग्लू यांना यश आले नाही.

एर्दोगन यांचे हे 52 टक्के भक्कम पाठीराखे कोणत्याही परिस्थितीत त्यांची साथ सोडावयास तयार नाहीत. एर्दोगनवाद्यांच्या मते, एर्दोगन यांनी तुर्कस्तानच्या सामाजिक जीवनात इस्लामला प्रतिष्ठा मिळवून दिली, तुर्कस्तानला जागतिक राजकारणात ताठ मानेने उभे केले, देशातील विघटनकारी शक्तींचा ठामपणे सामना केला आणि त्याचबरोबर देशाच्या घायाकुतीला आलेल्या अर्थव्यवस्थेला सांभाळण्याचे कसब त्यांच्याकडेच आहे. एर्दोगन यांच्या प्रतिमेची ही अभेद्य चौकट आहे जी विरोधकांच्या एकत्र येण्याने अधिकच बळकट झाली. असे असले तरी, किलिकदरोग्लू यांच्या नेतृत्वात विरोधकांनी एर्दोगन यांच्याविरुद्ध एकजूट केलेली 47.8टक्के मते दुर्लक्षित करता येणार नाहीत.

तुर्कस्तानातील लोकशाहीवादी, शहरी शिक्षित वर्ग, वांशिक अल्पसंख्याकांच्या प्रादेशिक स्वायत्ततेची मागणी करणार्‍या संघटना, समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते या सर्वांनी आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवत एर्दोगन यांना शह देण्याचा प्रयत्न केला. या सर्वांची भावना एकच होती की, एर्दोगन यांचे राजकारण तुर्कस्तानला प्रतिगामी करणारे आहे. एर्दोगन यांनी मागील 20 वर्षांमध्ये एकीकडे देशातील वाळीत टाकलेल्या प्रतिगामी शक्तींना मुख्य प्रवाहात आणले, तर दुसरीकडे सामान्य जनतेच्या मनात वैज्ञानिक द़ृष्टिकोन, सर्वसमावेशकता आणि इस्लामेतर विचार यांच्याविषयी प्रचंड तिटकारा निर्माण केला. तुर्कस्तानची ही वाटचाल सौदी अरेबियाच्या दिशेने होते आहे, अशी एर्दोगन विरोधकांची भावना आहे. इथून पुढील 5 वर्षे एर्दोगन राष्ट्राध्यक्षपदी असताना धर्मनिरपेक्षता व लोकशाहीवाद्यांची एकजूट टिकवणे आणि किमान पाच टक्के एर्दोगन समर्थकांना संभाव्य धोक्याची जाणीव करून देणे हे मोठेच आव्हान तुर्कस्तानातील विरोधकांपुढे आहे. केमाल किलिकदरोग्लू यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा आता पुरेशा स्पष्ट झाल्याने विरोधी गटाला नव्या चेहर्‍याचा शोध घेणे अत्यावश्यक झाले आहे. किलिकदरोग्लू यांच्याच रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे इस्तंबूल शहराचे 53 वर्षीय महापौर एक्रेम इमामोग्लू हे विरोधकांचे नवे नेते म्हणून आकारास येण्याची ठाम शक्यता आहे.

किलिकदरोग्लू यांच्या पराभवानंतर एक्रेम इमामोग्लू यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. इमामोग्लू यांनी म्हटले आहे की, 'जुन्या पद्धतीनेच कार्य करत नव्या प्रकारच्या निकालाची अपेक्षा करता येणार नाही.' भविष्यात इमामोग्लू हेच आपले प्रतिस्पर्धी असण्याची चाहूल एर्दोगन यांनासुद्धा लागली आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील विजय साजरा करताना केलेल्या भाषणात पुढील लक्ष्य इस्तंबुल महानगरपालिका असेल, हे जाहीर केले आहे.

21 व्या शतकात जगात सर्वत्र वाढलेल्या बहुसंख्याकवादाचे अगदी सुरुवातीचे फळ रेसेप एर्दोगन हे आहेत. धार्मिक अथवा वांशिक भावनांना राष्ट्रवादाची झालर चढवत देशातील बहुसंख्याकांना संकुचित्वाची साद घालणार्‍या राजकारणाचे 21 व्या शतकातील उद्गाते एर्दोगन आहेत, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. हे एर्दोगन स्वत:ला ओटोमन साम्राज्याच्या सुल्तानाच्या रूपात बघतात. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी ओटोमन साम्राज्याचा जो दरारा होता तो एर्दोगन तुर्कस्तानला पुन्हा प्राप्त करून देत आहेत, असा त्यांच्या समर्थकांचा ठाम विश्वास आहे.

पूर्वाश्रमीचे ते वैभव इस्लामिक राहणीमान व नीतिमूल्यांमुळे होते, असा एर्दोगन यांच्यासह त्यांच्या असंख्य चाहत्यांचा समज आहे. त्यामुळे ते पूर्ववैभव व दरारा पुन्हा निर्माण करण्यासाठी संपूर्ण तुर्की समाजाने इस्लामिक जीवनपद्धती अंगीकारली पाहिजे, या मतप्रवाहावर एर्दोगन आरूढ आहेत. नेमक्या याच विचारप्रणालीविरुद्ध संघर्ष करत पहिल्या महायुद्धानंतर मुस्तफा केमाल अतातुर्क यांनी आधुनिकतावादाच्या पायावर तुर्कस्तानची रचना केली होती. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एर्दोगन यांनी केलेला 'बाय बाय केमाल'चा उद्घोष हा केवळ किलिकदरोग्लू यांची राजकीय कारकीर्द संपल्याचे सांगण्यासाठी नव्हता, तर आधुनिक तुर्कस्तानचा पाया रचणार्‍या मुस्तफा अतातुर्कच्या आधुनिकता व धर्मनिरपेक्षता यावर आधारित वैचारिक चौकटीला तिलांजली देत असल्याची ती घोषणा होती.

तुर्की समाजाने काळाप्रमाणे स्वत:त बदल न केल्यामुळे धर्म व राजसत्तेची फारकत घेतलेल्या आणि सार्वजनिक जीवनात धर्मापेक्षा व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व देणार्‍या युरोपीय देशांपुढे एकेकाळी बलाढ्य असलेल्या ओटोमन साम्राज्याची शकले उडालीत, असे अतातुर्कवाद्यांचे ठाम मत होते. त्यामुळे तुर्कस्तानला प्रतिस्थापित करायचे असल्यास जुन्याला तिलांजली देत नव्याची साथ जोडण्यावर अतातुर्क व त्यांच्या समर्थकांनी कमालीचा भर दिला होता. आता इतिहासाची चक्रे उलटी फिरावयास लागली आहेत आणि धार्मिक जोखडातून बाहेर न आलेल्या तुर्की कुटुंबांना एर्दोगन यांच्या रूपात त्यांचा सुल्तान प्राप्त झाला आहे.
(लेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट, पुणे इथे कार्यरत आहेत)

परिमल माया सुधाकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news