संशोधन : एग्ज फ्रीझिंगचे वरदान | पुढारी

संशोधन : एग्ज फ्रीझिंगचे वरदान

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी आपण वयाच्या तिशीमध्ये एग्ज फ्रीझिंग केल्याचा खुलासा केला होता. दक्षिणेकडील सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी त्याची पत्नी उपासना या जोडप्यानेही अलीकडेच एग्ज फ्रीझिंग केल्याची माहिती समोर आली होती. यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची उत्सुकता वाढली आहे. महिलांमधील वाढत्या वयात घटत जाणार्‍या प्रजननक्षमतेच्या आणि वंध्यत्वाच्या समस्येवर एग्ज फ्रीझिंग हे वरदान ठरत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होत असणार्‍या संशोधनातून अनेक नवनवीन उपचारपद्धती आणि तंत्रांचा विकास होत असून यामुळे मानवी आरोग्याशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या समस्यांची सोडवणूक होण्यास मोलाची मदत होत आहे. पूर्वीच्या काळी असाध्य असणार्‍या अनेक रोगांवर आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने नियंत्रण मिळवण्यात मानवाला यश आले आहे. कोरोना महामारीचे संकट भलेही भीषण होते; पण प्रतिबंधात्मक लसीच्या निर्मितीने त्यावर नियंत्रण आणण्यात आले. प्रसूतीदरम्यान होणार्‍या माता आणि शिशूंच्या मृत्यूंचे प्रमाण पूर्वी प्रचंड होते; परंतु आज आधुनिक वैद्यकीय संसाधनांनी, उपचारांनी हे मृत्यू बर्‍याच अंशी कमी झाले आहेत. असे असले तरी बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढलेल्या ताणतणावांमुळे, वायूप्रदूषणामुळे अनेक नवनव्या व्याधी, आजार, शारीरिक-मानसिक समस्या यांचे प्रमाणही वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

मधुमेह, कर्करोग, रक्तदाब यांसारख्या व्याधींची बरीच चर्चा होत असते. पण त्याचबरोबरीने वंध्यत्वाची समस्याही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चालली आहे. विशेष म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही वंध्यत्वाची समस्या वाढताना दिसत आहे. परिणामी विवाहानंतर दीर्घकाळ अपत्यप्राप्ती न झाल्यामुळे अनेक जोडपी नैराश्येच्या गर्तेत जाताना दिसून येत होती. विशेषतः स्त्रियांमध्ये मातृत्वाची ओढ पूर्ण न होण्याचे दुःख मोठे असते. शिवाय तिला समाजाच्या मानसिकतेलाही तोंड द्यावे लागते. तथापि, गेल्या तीन-चार वर्षांमध्ये आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायजेशन) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. आयव्हीएफ हे सुरक्षित तंत्रज्ञान असून आईपण सोपे करणारी ही पद्धत वरदान म्हणून पुढे आली आहे.

‘आयव्हीएफ’च्या बरोबरीने अलीकडील काळात एग्ज फ्रीझिंग या पद्धतीचीही बरीच चर्चा ऐकायला मिळते. अलीकडेच बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, ती 30 वर्षांची असताना तिने बीजांड फ्रीझिंग तंत्राचा वापर केला होता. सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका एका मुलीची आई झाली आहे. दक्षिणेकडील सुपरस्टार रामचरण आणि उद्योजिका असणारी त्याची पत्नी उपासना या जोडप्यानेही मध्यंतरी एग फ्रीझिंग केल्याची माहिती समोर आली होती.

पूर्वीच्या काळात मुली आपले घर, कुटुंब, लग्न आणि मुले यांना प्राधान्य देत असत. आज त्या आपल्या करिअरबद्दल खूप जागरूक झाल्या आहेत. मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण वाढत चालल्याने करिअरला प्राधान्य देण्याबाबत त्यांच्यातील ठामपणाही वाढत आहे. त्यामुळे विवाहानंतर लवकर आई होण्याचा विचार या तरुणी करत नाहीत. परंतु वाढत्या वयाबरोबर महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. सामान्यतः 20 ते 30 वर्षे हे महिलांसाठी आई बनण्यासाठीचे योग्य वय मानले जाते. त्यानंतर स्त्रियामधील बीजांड निर्मितीची संख्या घटत जाते आणि त्यांची गुणवत्ताही कमी होत जाते. यामुळे प्रजननक्षमता बाधित होते. त्यामुळे करिअरमध्ये स्थिरस्थावर होऊनही आई बनण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. हाताशी पैसा भरपूर असूनही प्रजननासाठी आवश्यक असणारी शारीरिक स्थिती पोषक नसल्यामुळे अडचणी उद्भवतात. भविष्यात उद्भवणार्‍या या समस्यांचा वेध घेऊन अनेक तरुणी लग्नानंतर आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तरुण वयात बीज गोठवण्याचा म्हणजेच एग्ज फ्रीझिंग करण्याचा पर्याय निवडतात. जास्त वयात सहजपणे आई बनण्यासाठी आणि गरोदरपणात येणार्‍या समस्यांपासून वाचण्यासाठी एग्ज फ्रीझिंग एक उत्तम उपाय आहे.

एग्ज फ्रीझिंगच्या प्रक्रियेमध्ये महिलांचे बीजांड काढून प्रयोगशाळेत सुरक्षितपणे साठवले जाते. यासाठी 20 ते 30 वर्षे वयात हे करणे योग्य ठरते. कारण या काळात स्त्रियांचे शरीर प्रजननासाठी पोषक मानले जाते. तसेच जीवनशैलीमुळे किंवा अन्य कारणांंनी जडणार्‍या व्याधींचीही या वयात लागण झालेली नसते. त्यामुळे अशा वयातील बीजांडाचे फ्रीझिंग केल्यास त्यातून अपत्यप्राप्तीच्या यशाची हमी अधिक असते. याउलट जास्त वयात एग्ज फ्रीझिंगचा पर्याय निवडल्यास त्यासाठी महिलांना अधिक बीजांडे द्यावी लागतात. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही संख्या जवळपास दुप्पट असू शकते. म्हणजेच 32-33 वर्षांच्या एका महिलेला जर 10 बीजांडे फ्रीझ करावी लागत असतील तर 35-36 नंतर बीजांडे या प्रक्रियेसाठी द्यावी लागतात. चाळीशी उलटल्यानंतर खरे तर या प्रक्रियेतून मिळणार्‍या यशाची शक्यता कमी होत जाते. त्यामुळे अशा वयात जवळपास 55 ते 60 बीजांडे काढून घेतली जातात.

ही बीजांडे 10-15 वर्षांपर्यंत फ्रीझ करून ठेवता येऊ शकतात. या काळात ही बीजांडे जशी होती तशाच स्थितीत राहतात, हे या तंत्राचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जेव्हा त्या स्त्रीला आई होण्याची इच्छा निर्माण होते तेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे त्याचे फलन केले जाते आणि ही फलित झालेली बीजांडे स्त्रीच्या शरीरात दाखल करण्यात येतात. गर्भधारणेचे वय उलटून गेल्यानंतरही या तंत्राद्वारे स्त्रीला मातृत्वाचे सुख अनुभवता येते.

अर्थात लेखी परिभाषेत वाटते तितकी ही प्रक्रिया सोपी नाही, हे लक्षात घ्यावे. एग्ज फ्रीझिंग करण्याआधी सर्वप्रथम त्या महिलेची संपूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. विशेषतः यामध्ये महिलांची हिपॅटायटिस आणि एचआयव्ही चाचणी करून घेतात. महिलांच्या शरीरातील बीजांडे फ्रोझन करण्याआधी त्यांचे हार्मोन्स उत्तेजित करण्यासाठी 10-12 दिवस आधी औषधे गरजेनुसार दिली जातात. इंजेक्शनद्वारे हे हार्मोन्स उत्तेजित केले जातात. कोणत्या महिन्याची बीजांडे जपून ठेवायची याचा निर्णय या तपासण्यानंतर घेतला जातो. त्यानुसार बीजांडे काढण्यापूर्वी गरजेनुसार महिलांवर उपचारही केले जाऊ शकतात. बीजांडे काढण्याची ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म असून त्यासाठी छोटी शस्त्रक्रिया केली जाते. याअंतर्गत अतिशय पातळ सुईने बीजांडे काढली जातात आणि ती फ्रीझ केली जातात. या प्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्या आणि आसपासच्या संरचनेला दुखापत होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते; परंतु हे केवळ 1 टक्के दुर्मीळ प्रकरणांमध्ये घडते. मातृत्वाचे सुख देणार्‍या या प्रक्रियेचे दुष्परिणाम जाणवत नाहीत. बीजांडे काढण्याच्या प्रक्रियेनंतर पोटदुखी, संसर्ग, योनीमार्गातील रक्तस्राव यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पण औषधोपचारांनी त्यावर नियंत्रण आणले जाते.

एग्ज फ्रीझिंगचे तंत्रज्ञान सुरक्षित आणि यशस्वीतेची शक्यता सर्वाधिक असणारे असले तरीही भारतात अजूनही याबाबत फारशी जागृती नाही. पाश्चिमात्य प्रगत देशांत या तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. माजी मिस वर्ल्ड डायना हेडन, टीव्ही अभिनेत्री मोना सिंग, अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी, प्रियांका चोप्रा अशा अनेक सेलिब्रिटींनी एग्ज फ्रीझ केल्याचे सांगितले आहे. अशा सेलिब्रेटी महिला बीजांडे गोठवण्याच्या प्रवासाबद्दल भाष्य करतात तेव्हा या विषयावर चर्चा रंगते.

वास्तविक जीवनातील अशा कथा लोकांना एग्ज फ्रिझिंगबाबत अधिक प्रोत्साहित करतात. तरुण वयात जर मुलींनी एग्ज फ्रीझिंग केले असेल तर त्यांना आयुष्यभर आई बनण्याबाबत काळजी वाटण्याचे कारणच उरत नाही. कोणत्याही वयात त्या आईपणाचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे करीअरस्टिक महिलांसाठी हे तंत्र वरदान ठरणारे आहे. जाता जाता एक महत्त्वाची बाब सांगणे आवश्यक वाटते. आधुनिक विज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या आयव्हीएफ, एग्ज फ्रीझिंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा विचार हा पर्याय म्हणून करायला हवा. मूलतः योग्य वयात आणि नैसर्गिकरीत्या झालेली गर्भधारणा ही स्त्रियांसाठी आणि तिच्या बाळांसाठी पोषक ठरणारी असते. 22 ते 30 या वयामध्ये गर्भधारणा होऊन प्रसूती झाल्यास प्रसूतीनंतर निर्माण होणार्‍या समस्या, शारीरिक बदल, संगोपनादरम्यानचे प्रश्न या सर्वांचा स्त्री म्हणून सामना करणे हे केव्हाही अधिक सोपे असते. सबब, योग्य वयात योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

डॉ. महेश बरामदे

Back to top button