रहस्‍यरंजन : टोरेडचा रहस्यमय माणूस! | पुढारी

रहस्‍यरंजन : टोरेडचा रहस्यमय माणूस!

तो माणूस टोरेड नावाच्या देशातून आल्याचे सांगत होता, हा देश मुळात पृथ्वीवर अस्तित्वातच नाही. मग हे टोरेड प्रकरण आहे तरी काय? टोरेडचे रहस्य आजही कुणी उलगडू शकले नाही वा त्या व्यक्तीबद्दलचं सत्य बाहेर येऊ शकले नाही.

असं म्हटलं जातं की, संपूर्ण जग रहस्याने भरलेलं आहे. काही रहस्ये छुपी आहेत तर काही डोळ्यांदेखत घडलेली आहेत. पण काही रहस्ये आपल्याला समजणे अशक्यप्राय आहे. कधी कधी अशा घटना घडतात की, ज्यावर विश्वास करणे कठीणच नाही, तर अशक्यच ठरते. अशाच एका रहस्यमय माणसाची ही कथा, ज्याची आजही जगात कुठे कुठे चर्चा होते. मात्र, तो कोण होता, कोणत्या देशातून आला होता, कशासाठी आला होता, हे मात्र शेवटपर्यंत समजले नाही.

जपानच्या विमानतळावर घडलेली घटना, जी आजही चर्चेत आहे. ही जुलै 1954 मधली घटना आहे. दुपारी साडेबारा वाजले होते. एक युरोपीयन विमान टोकियोतील हेनेडा विमानतळावर उतरले. विमानातील सर्व प्रवासी खाली उतरले. सर्व प्रवासी चेक आऊट काऊंटरकडे गेले. विमानतळावर बसलेले अधिकारी सर्वच प्रवाशांचे पासपोर्ट तपासत होते. तेव्हा त्यांना असा एक प्रवासी भेटला, ज्याचा पासपोर्ट पाहून ते आश्चर्यचकित झाले.

तो असा एक प्रवासी होता, जो जपानमध्ये एका कामासाठी आला होता. त्याच्या पासपोर्टवर ‘टोरेड’ नावाच्या देशाचे नाव होते. पण टोरेड हा देश आहे तरी कुठे?

विमानतळावरील तपास अधिकार्‍यांनी यापूर्वी अशा कोणत्याही देशाचे नाव ऐकले नव्हते वा कुणाच्या पासपोटर्वरही पाहिले नव्हते. विमानतळावरील अधिकार्‍यांना तो प्रवासी संशयास्पद वाटला. म्हणून त्यांनी सुरक्षा अधिकार्‍यांना याची माहिती दिली. अधिकार्‍यांनी त्या प्रवाशाला चौकशीसाठी नेले. एका वेगळ्या खोलीत नेऊन त्याची चौकशी केली. अधिकार्‍यांनी त्याला सर्वप्रथम जपानला येण्याचे कारण विचारले. त्यावर त्याने सांगितले की, मी एक व्यापारी असून केवळ व्यवसायानिमित्त येथे आलो आहे. अधिकार्‍यांनी कसून चौकशी केली.

सुरक्षा अधिकारी त्या रहस्यमय प्रवाशाच्या पासपोर्टची तपासणी करतात की, त्याचा देश टोरेड जगाच्या नकाशात आहे तरी कुठे? खरंच असा काही देश आहे का, याचा शोध ते घेऊ लागले. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे अधिकार्‍यांनी विचारले असता त्याने सांगितले की, जपानला येणे हा त्याचा पहिला प्रवास नाही. या पासपोर्टवर त्याने युरोपमधील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. त्याचे बोलणे ऐकून अधिकारीही संभ्रमात पडले. कारण त्याच्या पासपोर्टवर इतर देशांचे शिक्के होते.

तो प्रवासी ज्या देशातून आला होता ते ठिकाण प्रत्यक्षात पृथ्वीवर कुठेतरी आहे, हे मान्य करण्यास अधिकारी तयार नव्हते. इतकंच नाही, तर अधिकार्‍यांनी त्याला नकाशा दाखवला आणि त्याचा देश नकाशात दाखवण्यास सांगितले. यावर त्याने ‘अंडोरा’ नावाच्या देशावर बोट ठेवत हा आपला देश असल्याचे सांगितले. मात्र येथे ‘टोरेड’ऐवजी ‘अंडोरा’ असे का लिहिले आहे, हे अधिकार्‍यांना समजले नाही. ही व्यक्ती स्वत:ला एका ‘काल्पनिक’ देशातून आल्याचे का सांगत आहे हे ऐकून अधिकार्‍यांना आणखी आश्चर्य वाटले. पण त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रे पाहता तो खरे बोलतोय, असेही वाटले. आता तो गूढ प्रवासी खरे बोलतोय की खोटे हे कळण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे तो ज्याला व्यवसायानिमित्त भेटायला आला होता, त्याला शोधणे!

अधिकार्‍यांनी त्याला तू कुणाला भेटायला आला आहेस? तुला कुठं जायचे आहे? असं विचारलं, तेव्हा त्यानं कंपनीचं नाव सांगितलं. तसेच त्याला कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे होते तेही त्याने सांगितले. त्यानंतर अधिकार्‍यांनी कंपनी आणि हॉटेलशी संपर्क साधला. मात्र त्यांनी अशा कोणत्याही व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचे सांगितले. मग मात्र हा कोणीतरी लबाड आणि गुन्हेगार आहे, दहशतवादी आहे, जो आपली ओळख लपवून काही विचित्र घटना घडवण्यासाठी, काही कारस्थान करण्यासाठी किंवा घातपात घडवण्यासाठी जपानमध्ये आलेला आहे, असं सुरक्षा अधिकार्‍यांना वाटलं. दुसर्‍या महायुद्धाच्या आगीत होरपळून गेलेल्या कोणत्याही जपानी नागरिकाला असं वाटणं साहजिकच होतं. त्यातूनही ते पडले सुरक्षा अधिकारी.

संशय आणखी बळावताच अधिकार्‍यांनी त्याचे सर्व साहित्य जप्त केले आणि पोलिसांच्या कडक पहार्‍यात त्याला हॉटेलच्या खोलीत बंद केले.

दुसर्‍या दिवशी खोलीचा दरवाजा उघडला असता खोलीत कोणीच नसल्याचे पाहून पोलिसांना धक्काच बसला. खोलीच्या बाहेर पोलिसांचा पहारा होता आणि खोलीच्या सर्व खिडक्या आधीच सील केलेल्या होत्या. विमानतळावर जप्त केलेला त्याचा पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रेही गायब असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिस चक्रावूनच गेले. आता हे सगळं कसं झालं हे कोणालाच समजत नव्हतं. या घटनेचे अनेक किस्से चांगलेच चर्चिले गेले आहेत. काहीजण म्हणतात की ही रहस्यमय व्यक्ती दुसर्‍या जगातून आली होती; तर काहीजण म्हणतात की, तो टाईम मशिनद्वारे चुकून येथे आला असावा आणि त्याचे रहस्य उलगडणार असल्याचे पाहून तो कुठेतरी गायब झाला. आता हे खरे आहे की खोटे, हे कोणालाच माहीत नाही, परंतु या रहस्यमय घटनेवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यापैकी एक डिरेक्टरी ऑफ पॉसिबिलिटीज हे पुस्तक आहे.

– ऋतुपर्ण

Back to top button