बहार विशेष : महाकंपन्यांचे महायुद्ध

बहार विशेष : महाकंपन्यांचे महायुद्ध

मायक्रोसॉफ्ट ही गुगलची प्रतिस्पर्धी कंपनी. चॅट जीपीटीच्या रूपाने मायक्रोसॉफ्टने गुगलच्या मक्तेदारीला शह दिला. चॅट जीपीटीचा बोलबाला वाढल्यानंतर त्याला गुगलने बार्ड या चॅटबॉटच्या रूपाने उत्तर दिले. येत्या काळात तंत्रज्ञान विश्वातील या दोन दिग्गज कंपन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होईल. त्यातून आपल्या जगण्यावर परिणाम घडविणार्‍या ए.आय.च्या क्षेत्रात कोणत्या उलथापालथी होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

इंटरनेट विश्वातील सर्वांत वेगवान, प्रगत आणि व्यापक सर्च इंजिन म्हणून गुगलचा नावलौकिक आहे. जीमेलपासून अँड्रॉईडपर्यंत आणि गुगल पेपासून गुगल मॅपपर्यंत आज गावाखेड्यातला माणूसही गुगलशी जोडला गेलेला आहे. जगातील अक्षरशः कोणतीही माहिती 'गुगल'ला विचारल्यास काही सेकंदांत हे सर्च इंजिन त्यासाठीचे दुवे (लिंक्स) आपल्यासमोर सादर करते. यामागे इंटरनेट तंत्रज्ञानाच्या महासागरातील या महाशक्तीची महाकाय यंत्रणा काम करत असते. त्याच वेळी समोर येणार्‍या दुव्यांसाठीचा व्यापारही मोठ्या प्रमाणावर सुरू असतो. एखादा मुद्दा सर्च केल्यानंतर समोर येणार्‍या दुव्यांची क्रमवारी ठरवण्यासाठी हा व्यापार चालतो आणि त्याचा गुगलच्या एकंदरीत अर्थकारणात 50 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.

गुगलला जाहिरातीतून मिळणारा महसूल अब्जावधींमध्ये असून सालागणिक तो वाढतच चालला आहे. 2021 मध्ये गुगलने एकूण 256 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. त्यातील 209 अब्ज डॉलर्स जाहिरातींच्या माध्यमातून आलेले होते. गुगलवर होणारा शोध हा या टेक जायंट कंपनीच्या जाहिरातींसाठीचा हुकमी एक्का आहे. गुगलच्या सर्चबारवर काहीही टाईप केल्यानंतर समोर येणार्‍या माहितीतील बहुतांश दुवे हे जाहिरात स्वरूपाचे असतात. जाहिरातदार विशिष्ट 'कीवर्ड'साठी बोली लावतात. वापरकर्ता जेव्हा समोर येणार्‍या लिंकवर क्लिक करतो तेव्हा गुगलला पैसे मिळतात. ही बाब अनेकांना माहीतही नसते. पण गुगल या माध्यमातून अनेक वर्षे भरमसाट पैसे मिळवत आहे. या क्षेत्रातील मक्तेदारीमुळे आणि गुगलच्या महाकाय साम्राज्यामुळे तिला आव्हान देणारी तोडीस तोड अशी अन्य कंपनी उभीच राहिली नाही. मायक्रोसॉफ्ट ही गुगलची प्रतिस्पर्धी कंपनी. परंतु तिलाही गुगलच्या या मक्तेदारीला शह देणे आजवर शक्य झाले नव्हते. वस्तुतः पूर्वीच्या काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या विश्वात मायक्रोसॉफ्टचेच वर्चस्व होते; पण अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम आणून गुगलने आपल्या प्रतिस्पर्ध्याला चितपट केले. साहजिकच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस् हा डाव पलटवण्यासाठी संधीच्या शोधात होतेच. ती संधी त्यांना मिळाली ती चॅट जीपीटीच्या रूपाने.

वास्तविक 2015 मध्ये सॅम अल्टमॅन नावाच्या व्यक्तीने अ‍ॅलन मस्कसोबत 'चॅट जीपीटी'ची सुरुवात केली होती. पण विक्षिप्तपणाबाबत ओळखल्या जाणार्‍या मस्क यांनी अचानकपणे हा प्रकल्प सोडून दिला. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हयात घालवणार्‍या बिल गेटस् यांच्या मुत्सद्दी नजरेने या सॉफ्टवेअरचे महत्त्व अचूकपणे हेरले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे यामध्ये गुंतवणूक केली. आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या 'चॅट जीटीपी'ने तंत्रज्ञानाच्याच नव्हे तर कला, संस्कृती, साहित्य, शिक्षणविश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली. अवघ्या काही महिन्यांत 'दुसरे गुगल' म्हणून याकडे पाहिले जाऊ लागले.

कालौघात त्याची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर ते गुगलपेक्षाही वेगळे आणि सरस असल्याचे स्पष्ट झाले. चॅट जीपीटी हे जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर लँग्वेज मॉडेल आहे. सर्च बॉक्समध्ये लिहिलेले शब्द समजून घेऊन लेख, तक्ता, बातम्या, कविता अशा फॉरमॅटमध्ये उत्तर देऊ शकते. जेव्हा यूजर्स ते वापरतात, तेव्हा व्याकरणही दुरुस्त करते. ही संकल्पना जगभरातील इंटरनेट यूजर्सना विलक्षण आकर्षून गेली. 'चॅट जीपीटी'चे आगमन झाल्यानंतर अवघ्या 8 दिवसांत 10 लाखांहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले. आजघडीला चॅट जीपीटी वापरणार्‍यांची संख्या काही कोटींमध्ये पोहोचली आहे. आजवर आपल्याला हवी ती माहिती सर्च इंजिनवर शोधायची आणि आलेल्या लिंक्सवर जाऊन ती वाचायची इथवरच ही माहिती क्रांती मर्यादित होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीचे आकलन करणे, पृथःकरण करणे आणि अन्वयार्थ काढून विश्लेषण करणे यासाठी मानवी बुद्धिमत्तेची गरज अनिवार्य होती.

उदाहरणच घ्यायचे झाल्यास एव्हरेस्ट पर्वतावर आधारित एखादा निबंध तयार करायचा असेल तर या शिखराविषयीची इत्थंभूत माहिती, त्याचा इतिहास सर्व काही आपल्याला गुगलवर मिळतो. त्याचा अभ्यास करून आपल्याला स्वतःला निबंध लिहावा लागतो. पण चॅट जीपीटीचे तसे नाही. आपण त्याला एव्हरेस्टवर निबंध हवा आहे, असे सांगितले आणि त्यामध्ये कोणकोणते मुद्दे असावेत याचा तपशील दिल्यास हे सॉफ्टवेेअर आपल्याला निबंधच लिहून देते. साहजिकच अशा भन्नाट तंत्रामुळे जगाला त्याची भुरळ पडली. सुरुवातीला त्याचे प्रचंड गोडवे गायन आटोपल्यानंतर या रेडिमेड तंत्रामुळे उद्भवणारे धोके चर्चिले जाऊ लागले. शिक्षणपद्धतीपासून ते साहित्यसृष्टीपर्यंत चॅट जीपीटीच्या वापरामुळे अनेक नोकर्‍यांवर गदा येईल का, याची चर्चा सुरू झाली. त्यातून चॅट जीपीटीचा बोलबाला अधिक वाढला. तसेच यामुळे गुगलवर जाऊन सर्च देण्याची गरजच काय, असाही सवाल उपस्थित केला जाऊ लागला. 'गुगल' या आव्हानाचा मुकाबला कसा करणार याचीही उत्सुकता सर्वांना निर्माण झाली. त्याचे उत्तर 'गुगल'च्या बार्ड या चॅट जीपीटीशी साधर्म्य असणार्‍या तंत्राने दिले.

वस्तुतः 'गुगल' गेल्या सहा वर्षांपासून यावर काम करत असल्याचे सांगितले जाते. अलीकडेच ही नवी चॅटबॉट सेवा 180 देशांमध्ये लाँच करण्यात आली असून त्या माध्यमातून 'गुगल'ने आपल्या जुन्या प्रतिस्पर्ध्याला तगडा प्रतिशह दिला आहे, असे म्हणावे लागेल. 'अल्फाबेट' या गुगलच्या मातृसंस्थेकडून ही एआय चॅटबॉट सर्व्हिस डेव्हलप केली गेली आहे. 'बार्ड'विषयी जाणून घेण्याआधी याच्याशी संबंधित एक महत्त्वाची घटना नमूद करणे गरजेचे आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये गुगलच्या समभागांमध्ये एकाच दिवसात मोठी घसरण झाली आणि या कंपनीचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलर्सनी घसरले. काय होते याचे कारण? तर 'बार्ड' या गुगलच्या एआय चॅटबॉटने दिलेल्या उत्तरात चूक आढळली. त्यामुळे 'गुगल'ला या क्षेत्रात टिकाव धरता येणार नाही, असा सूर आळवला गेला. 'गुगल'साठी हा खूप मोठा धक्का होता. परंतु हे फीचर प्रायोगिक तत्त्वावर असल्याचे सांगून गुगलने या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 'बार्ड'वर प्रचंड वेगाने काम करण्यात आले. त्यातील अनेक उणिवा दूर करताना काही नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आल्या. अखेरीस काही दिवसांपूर्वी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी 'बार्ड'चे लाँचिंग केले.

'बार्ड'चा पाळणा हलल्यानंतर चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी आणण्यात आलेल्या गुगलच्या या नव्या बाळाला पाहण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. जगभरात पसरलेले इंटरनेटचे जाळे सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने जात असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. सोपी रिसर्च पद्धत ही काही दिवसांत एआय रिसर्च पद्धतीत रूपांतरित होईल. या गोष्टीची गुगलला चांगलीच कल्पना असल्याने त्यांनी बार्डचे डिझाईन नव्याने केले. सध्या तीन भाषांना सपोर्ट करणार्‍या 'बार्ड'मध्ये येत्या काळात 40 भाषांना सपोर्ट करणारी क्षमता विकसित केली जाणार आहे. बार्डचा एकूण लुक पाहता तो चॅट जीपीटीपेक्षा आकर्षक असून क्लीन आणि क्लासिक श्रेणीत मोडणारा आहे. परंतु इंटरफेसपेक्षाही त्याची उपयुक्तता कशी आहे याची सर्वांना उत्सुकता होती. याचे मूल्यमापन चॅट जीपीटीच्या पार्श्वभूमीवर केले जाणे स्वाभाविक होते. त्यानुसार विचार करता अद्यापही 'बार्ड' हे चॅटबॉटच्या तुलनेने बाल्यावस्थेत असल्याचे दिसते. विशेषतः हा चॅटबॉट बर्‍याचशा चुका आजही करताना दिसतो.

गुगलनेही याबाबत यूजर्सना सावध केले आहे. यावर जास्त भाषांचा सपोर्ट नसणे ही एक मोठी अडचण आहे. सद्य:स्थितीत हिंदीमधून आपण एखादा प्रश्न विचारल्यास बार्डला उत्तर देता येत नाही. याउलट चॅट जीटीपी 2021 पर्यंतच्या माहितीवर आधारीत असले तरी तोवरची सर्व माहिती हे फीचर अत्यंत सुरेख पद्धतीने आणि योग्य स्वरुपात देते. काही प्रकरणात या चॅटबॉटलाही उत्तरे देता येत नाहीत, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. पण बार्ड आणि चॅटजीटीपीमध्ये माहितीच्या विश्लेषणाबाबत एक गुणात्मक फरक जाणवतो. तो म्हणजे बार्डची भाषा ही बर्‍याच अंशी संगणकीय परिभाषेशी साधर्म्य असणारी आहे. याउलट चॅटजीटीपीवरुन मिळणार्‍या रिसपॉन्सला एक प्रकारचा ह्युमन टच किंवा मानवी स्पर्श असल्याचे जाणवून जाते.

वापरादरम्यान चॅटजीपीटीचा अनुभवही बार्डपेक्षा चांगला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसेच चॅट जीपीटीवर हिंदीमधून प्रश्न विचारला गेल्यास उत्तर मिळते, तथापि, चॅट जीपीटी-4 साठी शुल्क मोजावे लागते. परंतु बार्ड हे पूर्णतः निःशुल्क आहे. ही सर्वांत मोठी जमेची बाब आहे. त्याचबरोबर बार्ड हे रिअल टाईम किंवा लाईव्ह माहितीशी जोडलेले असल्यामुळे त्यावरुन मिळणार्‍या उत्तरांमध्ये अद्ययावतता अधिक आहे. विद्यार्थी वर्गासाठी ही बाब अधिक जमेची ठरणारी आहे. मायक्रोसॉफ्टने चॅटजीपीटीला बिंग या आपल्या सर्च इंजिनशी जोडलेले असल्यामुळे तेथे आपल्याला अधिक विस्तृतपणाने माहिती मिळते. तसेच मोबाईल आणि वेब अशा दोन्ही व्हर्जन्समध्ये ते उपलब्ध आहे. दुसरीकडे बार्ड'ला गुगलने आपल्या सर्च इंजिनशी जोडलेले आहे. कंपनीचा मुख्य फोकस हा मोबाईल युजर्सवर आहे. त्यामुळे गुुगलच्या आगामी अँड्राईड 14 मध्ये बार्ड बेस्ड फीचर्स असणार आहे.

बार्ड आणि चॅट जीटीपीमध्ये येत्या काळात आणखी सुधारणा होत जाताना दिसतील. त्यासाठी तंत्रज्ञानाच्या विश्वातील या दोन दिग्गज कंपन्यांच्या लढाईची सुरुवात आता खर्‍या अर्थाने झाली आहे, असे म्हणावे लागेल. जगभरातील अनेक कंपन्यांनीही या स्पर्धेसाठी शड्डू ठोकले आहेत. बायडू या चीनच्या सर्च इंजिन कंपनीनेही एआय चॅटबॉट लाँच करण्याची घोषणा केली होती. एमआयटीसारख्या अनेक इन्स्टिट्यूटस्ही आता जनरेटिव्ह एआय टूलवर संशोधन करताना दिसत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये या स्पर्धेत काही भारतीय कंपन्याही सहभागी झालेल्या दिसू शकतात.
या स्पर्धेतून येणार्‍या काळात कोणकोणत्या उलथापालथी होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. कारण आज चॅटजीपीटीच्या धोक्यांबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये चॅटजीपीटीचा वापर वाढताना दिसू लागला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून असाईनमेंट बनवण्यासाठी हे फीचर कामी येत आहे. आता येत्या काळात 'बार्ड'चेही अशाच प्रकारचे फायदे समोर येताना दिसतील. त्यातून इंटरनेटवरील अवलंबित्व वाढत जाणार आहे.

अनके विचारवंतांच्या मते, मानवी प्रतिभेला कृत्रिम बुद्धीमत्ता कधीही मागे सारु शकणार नाही. परंतु चॅटजीपीटीमध्ये आपण काही मुद्दे सांगितल्यास ते कविताही करुन देते. ही पुढील धोक्याची नांदी आहे का, याचा विचार करायला हवा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवनवीन फीचर्स आणून, लोकांना त्याकडे आकर्षित करुन, त्यावरील अवलंबित्व वाढवून त्यांची विचारशक्ती कुंठीत तर होणार नाही ना, याची भीती अधिक आहे. ही भीती निराधार नाही. अशा प्रकारचे बौद्धिक पंगुत्व आज भवताली आपल्याला सहज दिसते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास पूर्वीच्या काळी टेलिफोन असताना अनेकांना 20-25 जणांचे नंबर तोंडपाठ असायचे. परंतु मोबाईल हातात आल्यानंतर त्यातच सर्वांचे नंबर सेव्ह करण्याची सुविधा उपलब्ध झाली. परिणामी आज कुटुंबियांचेही मोबाईल नंबर पाठ नसणार्‍यांची संख्या वाढली आहे. यामध्ये दोष कुणाचा यापेक्षा ही मानवी मानसिकता विचारात घेऊन या नव्या गोष्टींकडे पाहावे लागेल.

आज चॅटजीपीटी आल्यानंतर विद्यार्थ्यांकडून शिक्षणाबाबत प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्यातून मिळणार्‍या माहितीपुढे त्यांना शिक्षकांकडून मिळणारे ज्ञान अपुरे वाटू लागले आहे. वास्तविक, चॅट जीपीटी असो वा बार्ड त्यावरील माहितीला कोणतीही अधिमान्यता नसते. त्यांच्या विश्वासार्हतेची हमी नसते. परंतु तरीही चुटकीसरशी आणि विनासायास उपलब्धता ही बहुतेकांना आकर्षित करुन जाते. या मानसिकतेचाच बहुराष्ट्रीय कंपन्या फायदा घेत असतात हे विसरता कामा नये. यातील आणखी एक महत्त्वाचा भाग पहा. गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा विस्तार झाल्यानंतर असंख्य प्रकारची माहिती आंतरजालामध्ये दाखल झाली. आजघडीला असा कोणताही विषय नसेल ज्याविषयी इंटरनेटवर माहिती मिळणार नाही. अगदी बॉम्ब बनवण्यापासून ते लाडू बनवण्यापर्यंत आणि पर्यटनस्थळापासून ते दुर्मिळ किटकांपर्यंत सर्व काही माहिती इंटरनेटवर मिळते. ती सर्व भाषांमध्ये मिळते. आता याच माहितीचा वापर बार्ड किंवा चॅट जीपीटीकडून युजर्सना हव्या असणार्‍या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी शुल्कही आकारले जाणार आहे. गुगलचे बार्ड आजघडीला निःशुल्क असले तरी येत्या काळात ते राहीलच याची हमी देता येत नाही. बहुराष्ट्रीय किंवा पाश्चिमात्य राष्ट्रांच्या या दूरदर्शीपणाला किंवा व्यवसायचातुर्याला काय म्हणायचे?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news