दहशतवाद : मानवी बॉम्बर्सचे बदलते रूप

दहशतवाद : मानवी बॉम्बर्सचे बदलते रूप
Published on
Updated on

मानवी बॉम्बद्वारे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. तो दिवस होता 21 मे 1991. हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. 1983 ते 2022 पर्यंत जगातील चाळीस देशांत 5113 आत्मघाती हल्ले झाले असून त्यात 45 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. या काळात आत्मघाती मानवी बॉम्बर्सची रूपे कशी बदलत गेली हे पाहणे उद्बोधक ठरेल.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. एलटीटीईच्या मानवी बॉम्बद्वारे झालेल्या हत्येने देशाचे राजकारण बदलून गेले. मानवी बॉम्बच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. अ) एक किंवा दोन दहशतवाद्यांनी अनेक लोकांना मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी स्वत:ला स्फोटकांनी उडवून देणे (श्रीपेरंबूरमध्ये राजीव गांधी आणि धानू) ब) दहशतवादी गटांनी मानवी बंदिवानांचा बॉम्ब किंवा स्फोटक बांधून केलेला वापर. (बोको हराम, आयएसआयएल आणि अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांचे रामबाण अस्त्र. बोको हरामचे आतंकवादी तर त्यांच्या कैदेतील तरुण मुली आणि मुलांना आयईडी बसवलेले जॅकेट घालून आत्मघाती, मानवी बॉम्बधारक हल्लेखोर म्हणून तैनात करतात). क) आत्मघाती बॉम्बस्फोट, ज्यात एखादी व्यक्ती इतर लोकांना मारण्यासाठी बॉम्बचा स्फोट करून आत्महत्या करते (पॅरिसच्या मॉलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे झालेल्या 150 हत्या) ड) आत्मघाती हल्ल्यांसाठी निष्पाप मुला-मुलींचा वापर. युनिसेफच्या अहवालानुसार 1 जानेवारी 2017 पासून आजतायगत 83 मुला-मुलींचा वापर 'मानवी बॉम्ब' म्हणून करण्यात आला आहे. त्या आधी ही संख्या सात होती. या भयावह वाढीमुळे युनिसेफ अत्यंत चिंतित आहे. कारण यामध्ये 14 वर्षांखालील 55 मुली आणि 28 मुले होती. लहान मुलांचा अशा प्रकारे मानवी बॉम्ब म्हणून वापर करणे हा अत्याचार आहे. याकडे सरकार व प्रशासनानी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

या सर्वांचा अन्वयार्थ असा की मानवी बॉम्ब हा एक आत्मघाती बॉम्बर असतो, तो स्वतःवर बांधलेल्या स्फोटकांचा स्वतःहून स्फोट करून, शक्य तितके मोठे नुकसान करतो आणि त्या प्रक्रियेत स्वतः मरतो. आत्मघाती बॉम्बर्स त्यांच्या अविवेकी स्वभावामुळे विश्वासार्ह नसतात. ते, कुठेही, केव्हाही, काहीही करू शकतात. त्यांच्याकरवी केल्या गेलेल्या आत्मघातकी स्फोटांत अनेक निष्पाप नागरिकही बळी पडतात. पण त्यांचे मुख्य लक्ष्य राजकीय नेते, महत्त्वाच्या व्यक्ती आणि लष्करी कर्मचारी असतात. आत्मघातकी बॉम्बस्फोटांमागे मुख्यत्वे करून बॉम्बर्सची त्यांच्या स्वत:च्या हातून मरण्याची (आत्महत्या) इच्छा असते. सर्व आत्मघाती बॉम्बस्फोट, राजकीय, धार्मिक, सुडाची ऊर्मी किंवा न शमलेल्या तक्रारींशी संलग्न असतात. आत्मघाती हल्लेखोर अनेकदा त्यांची स्फोटके स्वतःच्या कपड्यांखाली घालतात, बॅकपॅकमध्ये ठेवतात (1984 मध्ये लंडन मेट्रोच्या अंडरग्राऊंड स्टेशनमधील आत्मघाती स्फोट), दुचाकी किंवा सायकलची फ्रेम (2009, जीनिव्हाच्या सडकेवर झालेला आत्मघाती स्फोट), टिफीन बॉक्स, ट्रांझिस्टरसारख्या रोजच्या वापरातील गोष्टींमध्ये लपवतात (2022 श्रीलंकेतील चर्चममध्ये झालेला आत्मघाती स्फोट) किंवा आणखी मोठे नुकसान करण्यासाठी स्फोटकांनी भरलेली वाहने वापरतात (2019 पुलवामा सीरपीएफ कॉन्व्हॉय अटॅक).

आत्मघाती बॉम्बस्फोटांची संकल्पना 1981 मध्ये लेबनॉन संघर्षात उदय पावली. पण, पहिला मोठा आत्मघातकी बॉम्बस्फोट 1983 मध्ये दोन माणसांनी बैरूतमधील अमेरिकन दूतावासावरील हल्ल्यामध्ये केला होता. त्यामध्ये 63 अमेरिकन मारले गेले. 1983 नंतर आत्मघाती बॉम्बस्फोट श्रीलंका, चेचन्या ते अफगाणिस्तानपर्यंत सर्वच दहशतवादी गटांचे सर्वात आवडते हत्यार बनले. याचा संकेत सतत वृद्धिंगत होणार्‍या आत्मघाती हल्ल्यांच्या संख्येतून मिळतो. 1981 मध्ये फक्त एक आत्मघातकी हल्ला झाला होता. ती संख्या 2007 मध्ये 400 आणि 2019 मध्ये 800 पेक्षा जास्त झाली.

1990 मध्ये मानवी बॉम्बस्फोटांचे तंत्रज्ञान आजच्या इतके विकसित आणि व्हायरल झालेले नव्हते. आजमितीला ते ऑनलाईन, सूचना पुस्तिका, व्हिडीओ आणि इतर प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून इंटरनेटवर सहज सर्वत्र उपलब्ध आहे. एखादा लहान मुलगाही इंटरनेटवरील मार्गदर्शनाने घरी सहजगत्या बॉम्ब तयार करू शकतो. यासाठी आत्मघातास तयार व्यक्ती, त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था, संघटन आणि हे आमच्या भल्यासाठीच आहे हे मानणारा समाज मदत करतात.

मानवी बॉम्बर्स आपले शस्त्र सहजगत्या लपवू शकतात, टार्गेटवर पोचताना अंतिम क्षणी सुधारणा करू शकतात, टार्गेट कितीही कडेकोट बंदोबस्तात असले तरी तेथपर्यंत जाऊ शकतात. 2003-04 पासून आत्मघाती बॉम्बस्फोट ही धार्मिक कारणांसाठी आतंकवादाचे समर्थन करणार्‍या गटांची मक्तेदारी झाली आहे. यात प्रामुख्याने इस्लामी, ख्रिश्चन व इतरधर्मीय ग्रुप्स असतात.

आत्मघाती बॉम्बर्समुळे होणार्‍या अंदाधुंद हत्येचे औचित्य सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःचा जीव घेण्याच्या नैसर्गिक तिरस्कारावर मात करण्यासाठी, आतंकवादी गटाचे, त्यांच्या बाजूने बोलणारे नेते, धार्मिक श्रद्धेच्या आडून बॉम्बरला धर्मयुद्धात ओढतात. त्यामुळे बॉम्बरसाठी अशा आत्मघाती बॉम्बस्फोटाची कृती, सामाजिक किंवा धार्मिक विकृती न बनता एक पवित्र कर्तव्य बनते.

विकसित समाजातील बहुतांश मानवी बॉम्बर, जगण्यासाठी काहीही कारण नसलेले, विकृत किंवा रानटी धर्मांध नसतात. अनेक बॉम्बर्स, लक्षणीय उत्पन्न साधने आणि उच्च शैक्षणिक पातळी असलेले दिसून येतात. पण त्या सर्वांचा सखोल बुद्धिभेद केला गेलेला असतो. उलटपक्षी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आजारी, गरीब किंवा काही कारणांमुळे समाजापासून दुरावलेल्या व्यक्तींची भरती ही इराक आणि अफगाणिस्तानमधील आत्मघाती बॉम्बस्फोटांमधील लक्षणीय, व्यापक प्रवृत्ती आहे. कुठल्याही प्रकारची वैचारिक असामंजस्यता तसेच प्रचलित लोकशाहीवर सर्वंकष दबाव आणण्याची ही एक प्रभावी पद्धत आहे.

आत्मघाती बॉम्बस्फोट राजकीय हिंसाचाराची प्रभावी युक्ती असून तिला आळा घालणे अशक्य नसले तरी कठीण आहे. राजकीय व धार्मिक हस्तक्षेपासारख्या अडचणींना तोंड देत, आत्मघातकी हल्ल्यांचा सामना करणार्‍या राज्यांनी हे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. हे उपाय सक्रिय किंवा आक्षेपार्हही असू शकतात.

चाणाक्य कालखंडातील विषकन्या किंवा दुसर्‍या महायुद्धातील जपानी कामकाझी पायलटस् हे एक प्रकारचे मानवी बॉम्बर्सच होते. त्यानंतर 1983 मध्ये मानवी बॉम्बचे पुनर्निर्माण झाले. 1983 ते 2022 पर्यंत जगातील चाळीस देशांत 5113 आत्मघाती हल्ले होऊन त्यात 45 हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे. 1983 ते 2023 या कालखंडात आत्मघाती मानवी बॉम्बर्सनी बरीच रूपे बदलली. आत्मघाती हल्ला आणि मानवी बॉम्बमध्ये थोडाच फरक आहे. मानवी बॉम्बर स्वतःवर स्फोटक बांधून स्फोट करतो व मरतो. आत्मघाती हल्लेखोर विमानांनी हल्ले करणे (अमेरिकन ट्विन टॉवर्स 2001), गाड्यांमध्ये स्फोटके भरून हल्ला करणे (लेबनानमध्ये अमेरिकन/फ्रेंच बराकींवरील हल्ला 1983), स्वतःहून (लंडन अंडरग्राऊंड मेट्रो हल्ला 2005) आणि हत्यारांनी (मॉस्को थिएटर होस्टेज क्रिसिस 2002) हल्ले करतो व स्वतः मरतो. आजची एकंदर परिस्थिती पाहता उद्याच्या काळात छोट्या पेट्यांमध्ये भरलेले लहान, अर्धा टन वजनाचे न्यूक्लियर डर्टी बॉम्ब, सुटकेस बॉम्ब, जैविक बॉम्ब घेऊन येणारे मानवी बॉम्बर्स दिसू लागले तर नवल वाटण्याचे कारण नाही. आधी काहींचीच हत्या करणारा मानवी बॉम्ब यापुढे हजारो, लाखोंची हत्या सहज करू शकेल. यावर उपाय शोधायचा कसा हे मोठं प्रश्नचिन्ह आहे.

कर्नल अभय पटवर्धन  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news