महामार्गांवरील अपघात टाळण्यासाठी… | पुढारी

महामार्गांवरील अपघात टाळण्यासाठी...

डॉ. दीपक शिकारपूर

महामार्गांवरील अपघात व त्यातून होणारे मृत्यू हे आपल्या देशात कुठल्याही साथ आजारांपेक्षा जास्त आहेत. यावर अनेक उपाय झाले; पण मृत्यू काही कमी होत नाहीत. वाहनांतील तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. चालकांना महामार्गावर गाडी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे; परंतु फारच थोड्या कंपन्या अशा प्रकारचे प्रशिक्षण देतात. 90 टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच गाडी महामार्गावर आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. महामार्गावर झालेल्या एकूण अपघातांपैकी 75 टक्के अपघात हे मानवी चुकीमुळेच (चालकाच्या) होतात.

काही प्रवासी वाहनांना झालेल्या अपघातामागे चालकावर असलेला अतिताण हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. चालकाला अजिबात विश्रांती न मिळणे हे अनेक अपघातांमधील एक प्रमुख कारण आहे. काही वेळा चालकालाही आपल्याबद्दल नाहक आत्मविश्वास असतो. मी सलग 20 तास गाडी चालवतो, हे तो मोठ्या अभिमानाने सांगत असतो. मालकालाही आपला चालक न थकता कितीही तास गाडी चालवितो, असे सांगण्यात मोठेपणा वाटत असतो.

मात्र, त्यातूनच अपघाताला निमंत्रण मिळते. परदेशाचा विचार केला, तर तेथे चालकाच्या कामाचे तास ठरलेले असतात. किंबहुना, तेथे गाड्यांमध्येच तशी सोय असते. त्याला एक कार्ड दिलेले असते. त्यात त्याच्या कामाची सुरुवात आणि शेवट ही वेळ नोंदलेली असते. त्यामुळे तो जेव्हा गाडी चालविण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याला ते कार्ड स्वाईप करावे लागते आणि त्याची कामाची वेळ संपते तेव्हा गाडी आपोआप बंद होते. त्यामुळे अशा चालकावर ताण राहत नाही आणि अपघात टळतात.

महामार्ग वा रस्त्यांवर होणार्‍या अपघातांची जबाबदारी ही शेवटी चालकाचीच असते. चालकच चुका करतात आणि अपघात होतात. मग तो चालक दुसर्‍या गाडीचा असो वा कुणीही. ड्रायव्हिंग करताना चालकाला डुलकी लागल्यास त्या एक सेकंदाच्या अवधीत काय घडू शकते, याची वर्णने आपण दररोजच वाचतो-पाहतो-ऐकतो.

अपघातग्रस्तांमध्ये 25 ते 45 या वयोगटातील तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे आकडेवारी सांगते. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणं, बेपर्वाईने वाहन चालवणं, सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षेचा विचार न करणं ही सगळी आपल्याकडच्या वाहनचालकांची व्यवच्छेदक लक्षणं झाली आहेत. महामार्ग वा रस्ते अपघातात मरण पावलेले अनेकजण हे केवळ सीट बेल्ट वापरला असता, तरी वाचू शकले असते.

त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे (विशेषतः रात्री व प्रथम प्रहरी) प्रवास करताना कळीचा ठरतो व तो म्हणजे चालकाला आलेली झोप व क्षणिक डुलकी. त्यासाठी अनेक उपाय योजले जातात. संगीत, इतर प्रवाशांनी न झोपता चालकाशी गप्पा मारणे, दर एक तासाने थोडा ब्रेक घेऊन चहा पिणे इत्यादी. चालकाने प्रत्यक्ष डुलकी घेण्याआधी त्याचे डोळे विशिष्ट अधिक काळ बंद राहिले तरी समोरील रस्त्याकडे त्याचे होणारे दुर्लक्ष वाहनाची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. शिवाय, बदलत्या स्थितीला वेगाने प्रतिसाद/प्रतिक्रिया देऊन ती काबूत आणण्यास लागणारा अधिक वेळ (म्हणजेच चालकाची सावधानता, सजगता कमी होणे) अपघाताला निमंत्रण देऊ शकतो.

अचानक डुलकी लागणे फक्त वाहनचालकाच्याच बाबतीत धोक्याचे असते असे नाही. गुंतागुंतीच्या वा वेगवान यंत्रांवर काम करणारे ऑपरेटर्स, सुरक्षारक्षक, तुलनेने निर्जनस्थळी काम करणार्‍या व्यक्ती (कारण त्यांना जागे ठेवणारे कोणीच नसते!) अशांबाबतही याप्रसंगी जोखीम उद्भवू शकते. परंतु, आता अशा व्यक्तींना अक्षरशः धक्का देऊन जागे करणारे एक साधन बाजारात मिळू शकते व ते आपल्यापैकी बहुतेकांचा जीवनसाथी बनलेल्या स्मार्टफोनसोबत वापरता येते! याचे नाव आहे व्हिगो (Vigo).

आपणास डुलकी लागण्याआधी सर्वसाधारणतः तिची पूर्वचिन्हे दिसतात – पापण्या लवण्याचा कालावधी (ब्लिंकिंग पीरिअड) वाढणे, मानेची हालचाल, नजरेतील ‘फोकस’ नष्ट होणे, मेंदूची सजगता मंदावल्यामुळे होणार्‍या ढिल्या शारीरिक हालचाली इत्यादी. नेमक्या याच बाबींची ‘व्हिगो’द्वारे नोंद घेतली जाते व त्यांचे प्रमाण पूर्वनिश्चित मर्यादांपेक्षा वाढू लागताच संबंधित व्यक्तीला तशी जाणीव करून दिली जाते. ‘व्हिगो’ हे साधन साध्या ब्लूटूथ हेडसेटसारखेच दिसते आणि ते स्मार्टफोनला जोडूनच वापरायचे असते. अँड्रॉईड किंवा आयओएस यापैकी ऑपरेटिंग सिस्टीम असणारा आणि ब्लूटूथ 4.0 वापरणारा कोणताही स्मार्टफोन यासाठी चालतो. या कामासाठी खास ‘अ‍ॅप’ तयार केले गेले आहे. इन्फ्रारेड सेन्सर्स आणि अ‍ॅक्सिलरोमीटर्स (विविध दिशांत होणार्‍या हालचाली आणि कंपनांची तीव्रता मोजण्याची यंत्रणा) याद्वारे मिळणारी माहिती व वर सांगितलेल्या शारीरिक लक्षणांचे मोजमाप यांचा एकत्रित विचार करून संबंधित व्यक्तीला केव्हा आणि कसे जागे करायचे, हे या अ‍ॅपद्वारे ठरवले जाते.

माणूस जागा असल्याचे मूलभूत लक्षण म्हणजे काही तरी पाहणारे त्याचे डोळे! म्हणूनच डोळ्यांची उघडझाप होण्याचे प्रमाण, त्या क्रियेला लागणारा वेळ, डोळे प्रत्यक्ष बंद असण्याचा कालावधी या बाबी ‘व्हिगो’द्वारे प्राधान्याने मोजल्या जातात. डोळे मर्यादेपेक्षा जास्त वेळ बंद राहू लागले की, ‘व्हिगो’संबंधित व्यक्तीला अक्षरशः धक्का देते! अर्थात, हा धक्का पोहोचवण्याच्या पद्धती ‘कस्टमाईझ’ करता येतात – व्हायब्रेटर, संगीत, एलईडी दिवे लागणे इत्यादी.

ही माहिती साठवून ठेवण्याची सोय असल्याने कालांतराने हिचे ‘मंथली रेकॉर्ड’ तयार करून संबंधित व्यक्तीला विशिष्ट वेळेत वा विशिष्ट स्थितीत डुलकी लागते काय, याचा शोध घेता येतो! तशी परिस्थिती आढळल्यास त्यानुसार तिची ड्यूटी बदलून तिला त्यावेळी विश्रांती देता येते. यामुळे एकंदर कार्यक्षमतादेखील वाढून संभाव्य जोखीम कमी होण्यास मदत होऊ शकते.

‘व्हिगो’चे वजन फक्त 20 ग्रॅम आहे. यामध्ये ARM² कॉर्टेक्सचा 16 MHz प्रोसेसर, ब्ल्यूटूथ 4.0 चिप, इन्फ्रारेड सेन्सर, 6 अक्षांवर काम करणारा अ‍ॅक्सिलरोमीटर आणि गायरोस्कोप आहे. या घटकांना ऊर्जा पुरवण्यासाठी रिचार्जेबल लिथिअम-पॉलिमर बॅटरी आहे. वापराच्या प्रमाणानुसार ती दोन-तीन दिवस पुरते. या उपकरणाची अधिक माहिती https://www.wearvigo.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Back to top button