Bahar article : कोटीत कमाई, बोटीत एन्जॉय

Bahar article : कोटीत कमाई, बोटीत एन्जॉय
Published on
Updated on

(Bahar article) हौस म्हणून हातगाड्याला चारचाकीचं टेरिंग बशीवता येत न्हाई आणि बशीवलंच तर ते शोभणार का? ज्या प्रमाणात पैसा त्यामानानं हौसा असत्यात. वुलनचा कोट आणि खिशात बिड्या असं न्हाई चालत.

रेशन कार्डावर चालतीला लागण्यापुरतं जसं जे हाय ते आणि असंल तसलं थोडं थोडं का असंना मिळतंय. तसंच आता कसं का असंना थोडं थोडं सगळं सुरू झालंय. बारक्या का असंनात निवडणुका बी होण्याच्या मार्गावर हायत. कोंचा बी धंदा म्हणा न्हायतर व्यवसाय म्हणा त्यातला 'सराव' म्हंजेसुद्धा कागदावर न दिसणारं; पण फायदा मिळवून देणारं 'भांडवल' हाय. निवडणुका झाल्या न्हाईत, त्या पुढं ढकलल्या त्या कारणानं कार्यकर्त्यांचा, इच्छुक उमेदवारांचा सराव खंडित झाला.

आता त्यातला बी मेन मुद्दा म्हंजे 'गाठीभेटी' आणि नेमकं त्याचंच वावडं होतं. बरं नुसत्या फोनवर म्हणलं तर सगळं बोलता येत न्हाई. शब्द देणं, समजूत काढणं, थांबवणं, आतल्या अंगानं म्होरं चाल देणं आणि कुठंतरी कामप्रोमॅज करणं या बाबी एवढ्या सोप्या न्हाईत. त्या प्रत्यक्ष भेटीतल्या ओलाव्यानंच सुरात लागत्यात. आराम देणारी गादी मऊसूत गुबगुबीत पायजे तर त्यासाठी मग कापूस बी तेवढाच पिंजावा लागतो. सत्ता पायजे तर मतं फुलाय लागत्यात आणि त्यासाठी आख्ख्या मतदारसंघातलं घर नि घर पिंजाय लागतंय.

कुणाशी कसं? काय? केवढं बोलायचं ह्याचं कार्यकर्त्यास्नी ट्रेनिंग द्याय लागतंय. पैली, दुसरी, तिसरी तसं या भागातली, त्या भागातली अशा फळ्या तयार कराय लागत्यात. पुढं वाटप असतंय करायचं कामाचं, जबाबदारीचं. हे संस्कार तसं अंगवळणी पडायचं झालं तर त्याला पिढीजात परंपरा लागती. वसा, वारसा नसानसात भिनावा लागतो. उगाच कुणाला बी जमत न्हाई हे सामाजिक काम. आता याला जर आपण घराणेशाही म्हणून नावं ठेवायची तर ती आपली चूक हाय. ज्याचा त्याचा व्यवसाय त्याच्या पुढच्या पिढीला चालवायला चालतोय, मग ह्यो राजकीय वसा त्या अनुभवी, चाणाक्ष घराण्यांनी पिढ्यांपिढ्या चालवला तर त्येचं एवढं वावडं का?

सगळी जर सारख्याच सोभावाची असती तर आपण बोलायचं कशावर हुतं सांगा बरं तुमीच? मिरची म्हणल्यावर तिखटच खरं त्यात बी बेडगी, गुंटुर, लवंगी, सिमला हे प्रकार हायत तसंच हाय हे. आता बघा श्रीमंतांची, मोठ्या माणसांची पोरं चुकीचं वागत्यात असं आपण म्हंतो. अवो, ते वय हाय म्हणल्यावर चुकायचीच.

आपली बी पोरं चुकत्यात खरं त्याला प्रसिद्धी मिळंल एवढी आपण मोठी माणसं न्हाई आणि पोरांच्या बी चुका कसपटावरच्या कीड्यावानी. मुळात सामान्य माणूस कर भरण्याच्या पात्रतेचा नसतो तिथं त्यो कर बुडवून पोरास्नी हौस कर असं कोंच्या तोंडानं म्हणंल? हौस म्हणून हातगाड्याला चारचाकीचं टेरिंग बशीवता येत न्हाई आणि बशीवलंच तर ते शोभणार का? ज्या प्रमाणात पैसा त्यामानानं हौसा असत्यात.

आपल्याकडं लई भारी म्हणी हायत ह्या वरनं त्यातली एक आठवली. वुलनचा कोट आणि खिशात बिड्या असं न्हाई चालत तर चिरूट पायजे. तसं मग कोटीत कमाई म्हणल्यावर बोटीत एन्जॉय. कष्टकर्‍याचं ते व्यसन आणि मोठ्यांचा तो एन्जॉय. हिथं एखाद्या हिताच्या योजनेचं जेवढं बजेट नसतंय त्येच्या दुप्पट तिथं स्वत:च्या चैनीवर उधळलं जात्यात.

आरं खरं गरीब देशात एवढं पैसे कुठनं येत्यात? गोरगरीब पोटाला मिळंल तसलं खात्यात तर धनदांडगे लाखाची ब्रँडेड पित्यात. आपल्या खिशातलं थोडच जात्यात. कर बुडीवत्यात आणि चैनीवर उडीवत्यात वाईट वाटून घेण्यासारखं, जीवाला लागण्यासारखं काय न्हाई. नुकसान करणारा पाऊस आणि प्रसिद्धी देणारी चैनीहौस या दोन्ही बी गोष्टी वरच्या लेव्हलच्या हायत. सगळं त्रासाचं, धोक्याचं वाटाय लागलं तर आपला जन्म चुकीच्या काळात झालाय, अशी मनाला समजूत घालून वरच्यावर विश्वास ठेवून शांत बसावं. (Bahar article)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news