आंतरराष्‍ट्रीय : पेटलेलं सुदान आणि ऑपरेशन कावेरी | पुढारी

आंतरराष्‍ट्रीय : पेटलेलं सुदान आणि ऑपरेशन कावेरी

खनिजसंपत्तीने समृद्ध असणार्‍या सुदानमध्ये प्रचंड हिंसाचार माजला आहे. यामुळे तेथील चार हजार भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. भारताने ‘ऑपरेशन कावेरी’ नावाची मोहीम हाती घेतली. कशी आहे ही मोहीम..?

रशिया-युक्रेन युद्धसंघर्ष सव्वा वर्षानंतरही कायम असल्याने संपूर्ण जग चिंतेत असताना एका नव्या संघर्षाने जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा संघर्ष आहे, आफ्रिकेतील सुदान देशामधला. सुदान हा भौगोलिकद़ृष्ट्या तिसर्‍या क्रमांकाचा मोठा देश असून या देशात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा हिंसाचार माजला आहे. त्यात 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची तीव्रता इतकी भयंकर आहे की, तिथे रस्त्यावर मृतदेहांचा खच पडलेला आहे. यामुळे संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष सुदानकडे वळले आहे. साधारण वर्षभरापूर्वी जी परिस्थिती युक्रेनमध्ये उद्भवली होती किंवा त्यापूर्वी अफगाणिस्तानात जो हिंसाचार माजला होता, तशाच पद्धतीने सुदानमध्ये रक्तरंजित हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. या हिंसाचाराचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी सुदानविषयी जाणून घ्यायला हवे.

सुदान देशाची विभागणी दोन दशकांपूर्वी दोन देशांमध्ये झाली. एकाला दक्षिण सुदान म्हणतात आणि दुसर्‍या देशाला उर्वरित सुदान म्हणतात. ही विभागणी झाली नसती तर हा देश आफ्रिकेतला सर्वांत मोठा देश राहिला असता. दक्षिण सुदान हा संयुक्त राष्ट्रसंघाचा 193 वा सदस्य देश आहे. इस्लामिक रिपब्लिक असणार्‍या या देशात बहुसंख्य ख्रिश्चन लोकांचा समावेश आहे. सुदानची लोकसंख्या सुमारे चार कोटींच्या आसपास असून दक्षिण सुदानची लोकसंख्या सव्वा कोटींच्या आसपास आहे. हा देश खनिज संपत्तीने समृद्ध देश आहे. प्रामुख्याने इथे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. इतिहास काळात अनेक पाश्चिमात्य वसाहतवादी देश सोन्याच्या शोधासाठी सुदानमध्ये आले होते. येथे तेलाच्या खाणीही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश म्हणून सुदान ओळखला जातो. पूर्वी हा देश पारतंत्र्यात होता. काही काळ तेथे इंग्लंडचे साम्राज्य होते; तर काही काळ तेथे इजिप्तची राजवट होती. 1950 च्या दशकामध्ये सुदानला स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्य मिळूनही तेथे शांतता टिकलीच नाही.

1950 च्या दशकात कमालीचा हिंसाचार झाला. याचे कारण तेथे आफ्रिकी आदिवासींच्या काही छोट्या टोळ्या आहेत. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर रक्तपात आणि संघर्ष सुरू असतो. हा रक्तपात इतका भयंकर असतो की, महिनोन्महिने तो थांबत नाही. या संघर्षामध्ये लक्षावधी लोक मरण पावलेले आहेत. त्यामुळे तेथे लोकशाही खर्‍या अर्थाने नांदलीच नाही. लोकशाहीचे प्रयोग झाले त्यावेळी लष्कर प्रभावी बनताना दिसून आले. सुदानमध्ये अंतर्गत वाद आहेतच; पण शेजारील देशांबरोबरही त्यांचे अनेक वाद आहेत. त्यामुळे या देशाकडे सैन्य मोठ्या संख्येने आहे. भारताची लोकसंख्या 142 कोटी असून आपल्याकडे 10 लाखांचे सैन्य आहे; पण सुदानची लोकसंख्या 4 कोटी असून त्यांच्याकडे 4.5 लाखांचे लष्कर आहे. कारण या देशाला सातत्याने अंतर्गत आणि बाह्य अस्थिरतेचा, हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. दक्षिण सुदान फुटून बाहेर पडला तशाच प्रकारे तेथील काही प्रदेशांमध्ये यादवी युद्ध रंगले आहे.

गेल्या तीन दशकांपासून सुदानमध्ये लष्करी हुकूमशहांचे साम्राज्य आहे. या लष्करी हुकूमशहांचा लोकशाही व्यवस्थेकडे सत्ता हस्तांतरित करण्याचा नकार असतो. त्यातून अनेक लष्करी बंड होतात, उठाव होतात आणि सत्ता आपल्या हाती घेतली जाते. सध्याच्या संघर्षाचे स्वरूप पाहिल्यास सुदानमध्ये एकीकडे लष्कर आहे तसेच स्पेशल प्रोटेक्शन फोर्स नावाचे निमलष्करी सैन्यही आहे. सुदान हा प्रामुख्याने अरब देश आहे. साधारणतः 2003 मध्ये सुदानच्या पश्चिमेकडील भागात असणार्‍या काही मूळ आफ्रिकी वंशाच्या अल्पसंख्याक लोकांनी सुदानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बंड किंवा उठाव मोडून काढण्यासाठी तत्कालीन लष्करी हुकूमशहाने आपल्या उपप्रमुखाला तेथे पाठवले. त्याने हे बंड शमवण्यासाठी एक फोर्स तयार केली. त्यालाच स्पेशल प्रोटेक्शन फोर्स म्हटले जाते. या फोर्सची संख्या वाढत वाढत एक लाखापर्यंत गेली. आता ती इतकी मोठी झाली आहे की, ते एक नवे सत्ताकेंद्र बनले आहे. या स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचा प्रमुख आणि सध्याचा लष्करप्रमुख यांच्यामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. थोडक्यात लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात सध्या रणकंदन माजले आहे.

सुदानचे सैन्यप्रमुख जनरल अब्देल-फताह बुर्‍हान आणि आरएसएफचे प्रमुख जनरल मोहम्मद हमदान दागालो यांच्यातील सत्तासंघर्षामुळे सुदान आज होरपळून निघत आहे. बुर्‍हान यांनी स्पेशल प्रोटेक्शन फोर्सला मूळ सैन्यात समाविष्ट होण्याचे आवाहन केले. परंतु तसे झाल्यास दागालो यांचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे या दोघांत संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष सुदानची राजधानी खार्तुम येथे सुरू आहे. राजधानीतील या संघर्षात प्रचंड हिंसाचारामुळे तेथील परकीय देशांच्या दूतावासांना धोका निर्माण झाला आहे. परिणामी 15 एप्रिलनंतर भराभर अनेक देशांनी आपले दूतावास बंद करण्यास सुरुवात केली. सर्वांत प्रथम अमेरिकेने आपल्या दूतावासातील अधिकारी तेथून काढून घेतले. त्यानंतर सौदी अरेबियाने काढून घेतले. त्यामुळे भारतात ही मागणी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.

सुदानमध्ये साधारणतः 2800 भारतीय वास्तव्यास आहेत. याखेरीज मूळ भारतीय वंशाचे 1200 लोक तेथे अनेक वर्षांपासून राहात आहेत. या चार हजार भारतीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या संघर्षामुळे ऐरणीवर आला. त्यामुळे या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमची सुटका करण्यात यावी, असे आवाहन केले. त्यानंतर भारताने यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ नावाची मोहीम हाती घेतली आणि ही अत्यंत यशस्वीपणे काम करत आहे. भारत दोन्ही प्रकारे प्रयत्न करत आहे. एकीकडे आपल्या प्रचंड क्षमता असणार्‍या महाकाय सी-14 विमानांचा यासाठी वापर करण्यात येत आहे. परंतु खार्तुम हे राजधानीचे शहर संघर्षाचे केंद्र बनले आहे. अफगाणिस्तानातही अशाच प्रकारे काबूल हे राजधानीचे शहर संघर्षाचे केंद्र बनले होते. अशा स्थितीत आपल्या नागरिकांची सुटका करणे अधिक आव्हानात्मक आणि कठीण बनते. त्यामुळे भारताने तांबड्या समुद्रामध्ये असणार्‍या खार्तुमच्या बंदरामध्ये प्रवासी जहाज पाठवले आणि 500 जणांना सुरक्षितपणे सोडवून आणले आहे. आतापर्यंत जवळपास 3500 जणांची ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुटका करण्यात आली आहे.

ऑपरेशन कावेरी याला एक वेगळे महत्त्व आहे. कावेरी ही नदी कर्नाटक, तामिळनाडूमध्ये वाहते. या नदीला एक धार्मिक महत्त्व आहे. भारताने अलीकडील काळात केलेल्या ऑपरेशन्सचे वेगळेपण म्हणजे आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशांच्या नावाने ती राबवली गेली. उदाहरणच द्यायचे झाल्यास मागील वर्षी युक्रेनमध्ये भारताने ‘ऑपरेशन गंगा’ राबवले होते. त्यापूर्वी अफगाणिस्तानात राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला ‘ऑपरेशन दैवी शक्ती’ असे नाव दिले होते. तुर्कस्तानमध्ये राबवलेल्या ऑपरेशनला ‘ऑपरेशन दोस्त’ असे नाव दिले गेले. या संपूर्ण मोहिमेवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष असून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही याबाबत प्रमुख भूमिका बजावत आहेत. याखेरीज परराष्ट्र राज्यमंत्री एस. मुरलीधरन हे सौदी अरेबियामध्ये आहेत. कारण सुदान हा अरेबिक देश असल्याने तेथे सौदी अरेबियाचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यामुळे सौदीच्या मदतीने भारत आपल्या नागरिकांची सुटका करत आहे. सौदीने आपले विमानतळ खुले केल्यामुळे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
परराष्ट्र धोरण विश्लेषक

Back to top button