प्रासंगिक : हसण्यास कारण की... | पुढारी

प्रासंगिक : हसण्यास कारण की...

चांगल्या आरोग्यासाठी हास्य नावाची गोळी अत्यंत उपयुक्त ठरते आणि आपल्याजवळ ती असूनही आपण ती विसरून गेलो आहोत. गेल्या काही दशकांत झालेल्या शास्त्रीय संशोधनातून हास्याचा आपल्या शरीरावर सखोल सकारात्मक परिणाम होतो असे दिसून आले आहे. हसण्यामुळे केवळ आजारच दूर राहतात असे नाही. गंभीर आजारांशी लढण्याचे बळही मिळते. आज जागतिक हास्यदिन. त्यानिमित्ताने…

कोणताही विनोद झालेला नसताना स्वतःला हसविणे, ही कला आहे आणि या कलेचे आपल्या समाजातील महत्त्व वाढतच चालले आहे. तणाव आणि नैराश्य आपल्या समाजात सातत्याने वाढत आहे. सतत कोणत्या तरी दबावाखाली राहणारी माणसे हसणे विसरून जात आहेत. तणावामुळे आजकाल अनेक लोकांना वेगवेगळे आजार जडत आहेत. सुमारे 70 ते 80 टक्के आजार ताणतणावाशी संबंधित असल्याचे अभ्यासांती स्पष्ट झाले आहे. आजारांवरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि कष्टाने कमावलेला पैसा लोक उपचारांवर खर्च करीत आहेत. परंतु चांगल्या आरोग्यासाठी लाफ्टर म्हणजेच हास्य नावाची गोळी अत्यंत उपयुक्त ठरते आणि आपल्याजवळ ती असूनही आपण ती विसरून गेलो आहोत.

गेल्या काही दशकांत झालेल्या शास्त्रीय संशोधनांत असे दिसून आले आहे की, हास्याचा आपल्या शरीरावर सखोल सकारात्मक परिणाम होतो. हसण्यामुळे केवळ न झालेले आजार दूर राहतात असे नाही तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, आर्थरायटिस, मधुमेह आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी लढण्याचे बळही आपल्याला हास्ययोगातून मिळते. आनंदाकडे वाटचाल करताना आपल्याला हास्यरसाचा आधार घ्यावा लागतो. धकाधकीच्या जीवनात विसरून गेलेली हास्य नावाची गोष्ट आपण आपल्या जीवनात परत आणली पाहिजे.

परंतु आजकाल लोक हसणे जणू काही विसरूनच गेले आहेत. लोक आनंदी नाहीत किंवा त्यांच्या भोवतालात नकारात्मकता भरलेली आहे म्हणून ते हसत नाहीत, असे नाही. लोक आपल्या व्यक्तिगत प्रगतीशी बांधले गेले आहेत आणि भौतिक गोष्टींमध्येच सुख शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. अशा भौतिक गोष्टींमधून मिळणारे सुख हे खूपच क्षणिक स्वरूपाचे असते आणि आनंद मिळाला तरी समाधान मिळत नाही. आपल्या हसण्याचे दोन प्रकार आहेत. एखाद्या गंभीर व्यक्तीप्रमाणे हसणे आणि लहान मुलांसारखे हसणे. जेव्हा आपले वय वाढत असते, तेव्हा हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचे आकलन होत जाते. त्यावेळी आपण ठरवतो की, आपण कोणत्या गोष्टींवर हसायचे आणि कोणत्या गोष्टींवर हसायचे नाही.

लहान मुलांचे हसणे वेगळ्या स्वरूपाचे असते. त्यांचे हसणे उन्मुक्त असते आणि मेंदूच्या नव्हे तर शरीराच्या साह्याने मुले हसतात. त्यांचे हसणे त्यांच्या संपूर्ण शरीरभाषेतून प्रतीत होते. हसून हसून मुलांच्या पोटात गोळा येतो. मुले हसत हसत खेळताना दिसतात. नीट निरीक्षण केले नसेल, तर लहान मुलांचे हसणे एकदा अभ्यासपूर्ण नजरेतून पाहायला हवे आणि त्यांच्याकडूनच हसण्याची कला मोठ्यांनी शिकायला हवी. लहान मुलांसारखे हसणे आपण विसरून गेलो आहोत. आपण दिवसेंदिवस गंभीर होत चाललो आहोत आणि हसण्याच्या संधीही खूपच कमी होत चालल्या आहेत. त्यासाठीच आपल्याला हास्ययोगाची गरज भासते आहे. भले आपण खोटे खोटे हसलो तरी आपल्या मेंदूवर त्याचा सखोल परिणाम होत असतो.

शरीर आणि मनासाठी हसणे हे सर्वोत्कृष्ट औषध अगदी पूर्वीपासून मानले जात आहे. परंतु हसणे कुठे आणि कसे मिळेल, याची व्यवस्था केल्याचे समाजात दिसत नाही. कोणत्याही करमणुकीचा किंवा मनोरंजनाचा अंतिम हेतू हसणे हाच असतो. परंतु हास्ययोगाने या प्रक्रियेला एक नवे स्वरूप दिले आहे. हे एक असामान्य तंत्र असून, हास्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा आग्रह करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या नियंत्रणात राहू शकतात. हास्ययोग प्रत्येकाला हास्यरसाच्या प्रभावाखाली आणू इच्छितो. जे अत्यंत गंभीर, अंतर्मुख आणि हसणे टाळणारे असतात, त्यांनाही यात समाविष्ट करणे हा हेतू आहे.

हसण्याचे फायदे आणि शास्त्रीय विवेचन असणारे लेख वाचल्यानंतर 1995 मध्ये मी सर्वप्रथम पाच लोकांना एकत्र घेऊन एका सार्वजनिक उद्यानात हास्य क्लब सुरू केला. सुरुवातीला लोकांनी काही गमतीदार किस्से, कथा आणि विनोद सांगितले. परंतु लवकरच हे इंधन संपुष्टात आले आणि एकमेकांची थट्टामस्करी करणारे किस्से येऊ लागले. त्याच वेळी मी ज्या मार्गाच्या शोधात होतो, तो मला सापडला. मला एक शास्त्रीय विवेचन आठवले. त्यानुसार आपले शरीर खोटे हसू आणि खरे हसू यात फरक करू शकत नाही आणि दोहोंचा समान परिणाम दिसून येतो. या वास्तवावर भरवसा ठेवून हसणे हा एक व्यायाम म्हणून विकसित करण्याचे मनावर घेतले. एके दिवशी सकाळी सर्व सदस्यांना सांगितले की, एक मिनिट आपण हसण्याचा सराव करू. अनेक शंका-कुशंका मनात घेऊन सर्वजण तयार झाले. परंतु जो परिणाम साध्य झाला, तो अद्भुत होता. काही जणांसाठी हे खोटे हास्य होते; परंतु लवकरच त्याचे रूपांतर खर्‍या हसण्यामध्ये झाले.

हसणे संसर्गाप्रमाणे विस्तारू शकते, हेही स्पष्ट झाले. हा समूह अशा प्रकारे हसू लागला, जणू पूर्वी कधी हसलाच नव्हता. दहा मिनिटे सलग हसणे सर्वांना जमू लागले. याच समूहाने हसण्यावर अनेक प्रयोग केले. ते एकमेकांना भेटत, तेव्हा हसत. फोनवर बोलतानाही हसत. सातमजली हास्यापासून मनातल्या मनात हसण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांचा अभ्यास झाला. संपूर्ण आरोग्याचा विचार करून मी हास्य आणि योग यांचे मिश्रण करून हास्याला स्ट्रेचिंग आणि ब्रीथिंग याची जोड दिली. अशा तर्‍हेने हास्य योगाच्या रूपाने आनंद आणि आरोग्याचा ठेवाच तयार झाला. ज्यांनी ज्यांनी हा मार्ग अवलंबिला, त्यांना आपल्या आत महत्त्वाचे परिवर्तन घडून येत असल्याचे लक्षात आले. आज संपूर्ण जग या मार्गाचा अवलंब करीत आहे.

हास्य योग ही अशी संकल्पना आहे, ज्यात कोणतेही कारण नसताना व्यक्ती विनाकारण हसण्यास सुरुवात करते. कोणताही विनोद ऐकण्याची त्यासाठी गरज नसते. हसणे हा एक व्यायाम म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. या प्रक्रियेत डोळे उघडे ठेवले जातात आणि आपल्या हसण्यात हळूहळू लहान मुलाप्रमाणे निरागसता येते. बनावट हास्याचे रूपांतर लवकरच खर्‍याखुर्‍या हसण्यात होते. हसण्याचा संबंध योगामधील श्वसन आणि ताण (स्ट्रेच) या घटकांशी जोडला गेल्यामुळे या प्रक्रियेला हास्य योग असे म्हटले जाते. शरीर आणि मेंदूला यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे व्यक्तीची ऊर्जा वाढते. हास्ययोग पूर्णतः शास्त्रीय असून, आपले शरीर खोट्या आणि खर्‍या हास्यामध्ये फरक करू शकत नसल्यामुळे तोच परिणाम साध्य करता येतो, या गृहितकावर हे शास्त्र आधारलेले आहे. खोटे हसू हळूहळू खरे बनत राहते.

खोटे खोटे का हसायचे, असा प्रश्न अनेकजण नेहमी विचारतात. त्याऐवजी एखादी विनोदी मालिका किंवा कार्यक्रम पाहणे उचित नाही का, असाही प्रश्न विचारला जातो. याचे उत्तर असे की, हसण्याचे शास्त्रीय परिणाम साध्य करायचे असतील तर हसणे दीर्घकाळ टिकले पाहिजे. चांगला लाभ होण्यासाठी किमान 10 ते 15 मिनिटे सलग हसता आले पाहिजे. विनोद ऐकून आपण जेव्हा हसतो, तेव्हा ते 3 ते 4 सेकंदांपेक्षा अधिक टिकत नाही. शरीरावर किंवा मेंदूवर सकारात्मक परिणाम साधण्यासाठी हे पुरेसे नसते. हास्य योग एक अभ्यास म्हणून केला जात असल्यामुळे लोक आपल्याला हवे तितका वेळ हसणे टिकवू शकतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे फायदे मिळतात.

आपल्याकडे पोट धरून हसणे ही संकल्पना आहे. हसण्याचे आरोग्यासाठीचे फायदे प्राप्त होण्यासाठी हसणे खोलवर असले पाहिजे. ड्रायफ्राम हा भाग पोट आणि छातीच्या मध्ये असतो. तिथून हसणे जमायला हवे. आपल्या सामाजिक वातावरणात इतक्या जोरजोरात हसणे शिष्टसंमत मानले जात नाही. परंतु हास्य क्लबमध्ये आपण तसे हसू शकतो. हास्य क्लबवर सामाजिक बंधने नसतात. हसण्यासाठी आपण जर दरवेळी कारण शोधत राहिलो, तर बर्‍याच वेळा हाती आलेली संधीही निसटून जाताना दिसते. हसण्याचे कारण शोधणार्‍यांना तशी संधी फारच कमी वेळा मिळते. म्हणूनच हसणे आपण दैवावर सोडून दिले, तर हसायला मिळणारच नाही.

हास्य योगात विनाकारण आम्ही मंडळी हसतो. हसणे ही आमची बांधिलकी मानतो. तेव्हाच आरोग्यास फायदे मिळतात. दमदार हसल्यामुळे मूड बदलतो. आपली अनेक कामे मूडवर अवलंबून असतात. हास्य योग आपला मूड चांगला करतो. एरोबिक्स किंवा कार्डिअ‍ॅक एक्झरसाइज आणि हास्य योग यात फारसा फरक नाही. यामुळे आपल्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक होतो आणि ऊर्जा निर्माण होते. हास्य योगामुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारते. एकत्र हसल्यामुळे लोक एकमेकांशी घट्ट जोडले जातात. जेव्हा आपण अधिक हसतो, तेव्हा आपल्याला अधिक मित्र बनवावेसे वाटतात. जगण्यात जेव्हा बदल येतात, तेव्हा आपण हसणे विसरून जातो. हास्य योग आपल्याला सकारात्मक मानसिकता प्रदान करतो आणि त्यामुळे आपण बदल स्वीकारण्यास अधिक ऊर्जेने तयार राहू शकतो. परिस्थितीशी लढू शकतो.

डॉ. मदन कटारिया,
संस्थापक, हास्य योग चळवळ

Back to top button