समाजभान : यू ट्यूब गुरूंचा सुळसुळाट | पुढारी

समाजभान : यू ट्यूब गुरूंचा सुळसुळाट

हल्ली यू ट्यूब गुरूंचा सुळसुळाट झाला आहे. त्यातून समाजाने प्रगतीच्या काळात मागे सारलेल्या अनेक अंधश्रद्धांना, बुरसटलेल्या रीती-परंपरांना नव्याने समोर आणले जात आहे. त्यामुळं यावरील ज्ञान किती आणि कसं घ्यायचं हे तारतम्यानं ठरवलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच आणि तो टाळावा हे महत्त्वाचं.

आजच्या आधुनिक जगात सल्लागार, समुपदेशक अशा सर्व भूमिकांमध्ये यू ट्यूबवरील तथाकथित गुरू मोलाचे ठरू लागल्याचे दिसत आहे. कोणतीही समस्या असो, अडचण असो, सर्वांवर खात्रीलायक इलाज, सल्ला यू ट्यूबवर मिळतो, ही सामूहिक धारणा द़ृढ होत चालली आहे. रोजच्या आयुष्यातील अशा असंख्य लहान-मोठ्या गोष्टींबाबतचं ज्ञान यू ट्यूबच्या महासागरात शोधलं की सापडतं आणि तिथून पुढं आपोआप तशा प्रकारचं ज्ञान तुमची इच्छा असो किंवा नसो समोर येत राहतं. शास्त्रीय माहिती, ऐतिहासिक माहिती, पदार्थांविषयी माहिती, सौंदर्याविषयी माहिती, वयापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसा याविषयी माहिती कशाकशाची म्हणून वानवा नाही. पण ही झाली एक बाजू. मोबाईलनं जग जवळ आणल्याचं कौतुक यामुळं वाटतं आणि ते खरंच आहे. पण… याचा अतिवापर होतो आहे का? त्यातून अ‍ॅडिक्शन वाढतंय का? हा चिंता करायला लावणारा प्रश्न आहे. सुक्याबरोबर ओलंही जळतं, तशी गत आहे.

आजच्या तणावपूर्वक वातावरणात प्रत्येकजण घुसमटत आहे. काहीही करावं, पण यातून बाहेर पडावं, असं प्रत्येकाला वाटतं! त्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. शांत, निवांत आयुष्य, तणावरहित आयुष्य प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं! त्यासाठी हवा तो मार्ग अनुसरण्याची तयारी प्रत्येकाची आहे. इथंही यू ट्यूब गुरू तयार आहेतच…. त्यांचा उपयोग करावा, फायदा घ्यावा. पण किती कोणाच्या आहारी जावं ते आपणच ठरवायचं असतं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच आणि तो टाळावा यातच सगळं आलं. समाजाने प्रगतीच्या काळात मागे सारलेल्या अनेक अंधश्रद्धांना, बुरसटलेल्या रीती-परंपरांना नव्याने समोर आणले जात आहे. त्यांचा त्याग मात्र केलाच पाहिजे.

पूर्वीच्या चित्रपटात घड्याळ बंद पडणं, देवाजवळचा दिवा शांत होणं या सार्‍या गोष्टी एखाद्या दु:खद घटनांची नांदी देणार्‍या आहेत, असं दाखवलं जायचं. इकडे दिवा विझला की तिकडे कोणाचा तरी प्राण गेलाच असं समजाचयं! साधेसे ठोकताळे होते. त्याला विज्ञानाचा आधार नव्हताच. श्रद्धेतले विचार होते ते. आजही याच ठोकताळ्यांचा वापर सर्रास होताना दिसतो. कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकांमध्ये या घटना आपल्याला बघायला मिळतात. विशेषत: गृहप्रवेशाचा प्रसंग असला की हमखास हा दिवा शांत झालाच पाहिजे, हळदी-कुंकवाचं तबक कोणाच्याही धक्क्यानं सांडलंच पाहिजे. झाला मग अपशकुन! सुरुवातीला ते पाहून वाईट वाटायचं; पण आज ते पाहताना हसू येतं! खरंच या गोष्टींना, घटनांना काही अर्थ आहे का?

आपल्या मनावर या शकून-अपशकुनांचा जबरदस्त पगडा आहे. कितीही मॉडर्न विचारांची, शिकली सवरलेली आई तबकातला दिवा शांत झाला की कासावीस होते. यामागील कारणं, आपल्या मनावर असलेला वर्षानुवर्षांचा संस्काराचा पगडा! आपल्यापैकी अनेक जणी यातल्या असतील; मात्र कुठेतरी हे संपायला हवं.

कारण या रूढी-परंपरा, श्रद्धा-परंपरेचा भाग म्हणून आपण जपल्या असतीलही; पण यू ट्यूब आणि अन्य सोशल मीडियातून त्याचा अतिरेक होताना दिसत आहे. त्याचा बाजार मांडलेला दिसत आहे. घराबाहेर पडताना उजवा पाय बाहेर टाका, घराच्या मुख्य दरवाजाला नमस्कार करा, खिशात हे ठेवा, ते ठेवा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, चप्पल उजव्या पायातील आधी घाला, अशा अनेक गोष्टी सांगणारे अगणित व्हिडीओ यू ट्यूबच्या सागरात तरंगताना दिसत असतात. याखेरीज आज हे करा, 24 तासांत चमत्कार घडेल, तुमच्या सर्व समस्या दूर होतील, हे सांगणारे व्हिडीओ तर प्रत्येकाच्या मोबाईलवर त्याची इच्छा नसताना समोर प्रकट होतात. काही काळ प्रत्येक जणच त्याला भुलतो; पण लगेचच त्यातील फोलपणा लक्षात येतो. तरीही मन वेडं असतं. ते दिवसभर त्याची वाट बघत राहतं. मनात दुसरे विचार येत नाहीत. नाही झालं तसं तर आपलंच काही करायचं राहिलं म्हणून नाही झालं, असं म्हणत स्वत:ला समजावलं जातं आणि पुन्हा त्याच मार्गावरून मार्गक्रमण सुरू राहतं. यामागे फक्त क्रिया आहेत. ना त्यात प्रेम आहे, ना विश्वास, आहे ती फक्त असुरक्षितता.

मला आठवतंय, पूर्वी आमच्या परीक्षा मार्च महिन्यात असायच्या आणि या सुमारास श्रीरामनवमी असायची. 9 दिवस परीक्षेच्या मागेपुढे असायचे. गणित अतिशय कठीण विषय! समाजायचाच नाही. गणितात पास कर, अशी विनवणी देवाला करायचो. मोठा हार करीन, असं सांगायचो. बीजगणिताची सूत्रं आठवावीत म्हणून कंपास पेटीत तुळशीची पानं ठेवली जायची. पेपर हातात पडेपर्यंत घाम सुटलेला असायचा. पण त्यामागे अंधश्रद्धा नसायची, तर भाबडी निरागस श्रद्धा होती. आज आठवतं असे कितीतरी हार त्याच्या गळ्यात मनानेच पडले असतील. परीक्षेची गणितं सुटली; मात्र आयुष्याची गणितं पार चुकली. नात्यांची गणितं पार चुकली

वय वाढत गेलं, शुभशकुनांचे संकेत, संदर्भ आपल्या सोयीनुसार बदलत गेले. कॉलेजच्या दिवसांत पिवळ्या चोचीच्या मैनेचा फार प्रभाव होता. एक मैना दिसली तर वन फॉर सॉरी, दोन दिसल्या तर टू फॉर जॉय असं असायचं. म्हणून दोघी जवळच दिसल्या पाहिजे, असा अट्टहास असायचा. रस्त्याने मांजर आडवं गेलं तर सात पावलं मागे जायचं, हे तर आजही पाळणारे लोक मी पाहिले आहेत. अशा चित्रविचित्र शकुन-अपशकुनांचा पगडा इतका जास्त असतो की, वाढत्या वयानुसार बदलल्या काळानुसार तो फारसा जात नाही.

उलट जसं वय वाढतं, तसं स्वत:चा स्वत:वरचा विश्वास कमी होत जातो. मग अशावेळी यू ट्यूबच्या लाकडी काड्यांचा आधार घ्यावासा वाटू लागतो. त्याचे प्रकार, प्रकटीकरण निश्चितच बदलतं आहे. फेंगशुई, वास्तुशास्त्र, घरातील बदल, रंगाचे फेरफार इत्यादींचे पीक दिसून येत आहे. कावळ्याला घास घालणं, मुंग्यांना पीठ घालणं हे निश्चितच चांगलं आहे. यामागे असणारा भूतदयेचा विचार निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्याकडे संतांनीही याचे अनुसरण करण्याचा सल्ला फार पूर्वीच दिलेला आहे.

दारी कावळा ओरडला की घरी आवडीचे पाहुणे येणार, असा संकेत मिळतो. विठूरायाचा निरोप आण, मग मी तुला दहीभात देईन, असे आश्वासन संत ज्ञानेश्वरांनी दिलेले आहे. यामागे अंधश्रद्धा नाही तर एक प्रेमयुक्त मनस्वी श्रद्धा आहे. निसर्गप्रेम आहे. कृतज्ञता आहे. पण असंबद्ध, फुटकळ आणि केवळ माणसांची विचारशक्ती खुंटवून ठेवणार्‍या गोष्टींमागे कसलीही श्रद्धा नसते ना विज्ञान! केवळ लोकांची बुद्धी भ्रमित करण्याचा प्रयत्न त्यातून केला जातो. परदेशातही राहणार्‍या पाश्चिमात्यांमध्येही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा दिसून येतात. त्यांच्या लेखी 13 आकडा अपशकुनी मनातात. ठरावीक दिवशी ठरावीक रंगाचे कपडे घालणे, वास्तुशास्त्र, फेंगशुई, अंकशास्त्र यांचा रोजच्या जीवनात वापर करणं या गोष्टी तेही अनुसरतात.

शेवटी काय, मनुष्याला शांत जीवन जगण्यासाठी कशाचा ना कशाचा आधार लागतोच. ही मनाची भावनिक बाजू जाणूनच यू ट्यूब गुरू आपल्याला ज्ञान देत असतो. पण ते किती आणि कसं घ्यायचं ते आपलं आपण निश्चित करायचं असतं! अनावश्यक गोष्टींना थारा द्यायचा की नाही याचा निर्णय ज्याचा त्यानं घ्यायचा आहे. त्याबाबत या माध्यमाला दोषी धरता येणार नाही. कारण आज कित्येक गोष्टी आपल्याला त्याच्यामुळे समजतात. कोरोना काळात दूरगावी राहणार्‍या मुला-मुलींचा तो कुक होता. त्याच्याकडूनच चुकून माकून स्वयंपाक शिकत आज कित्येक जण तज्ज्ञ कुक झालेले आहेत. त्यामुळं आपल्या वकुबाप्रमाणे घ्यावं, ग्रहण करावं आणि समृद्ध व्हावं! मानसिक शांतीसाठी आपल्या मनालाही न पटणारे तोडगे ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा यू ट्यूबवरील मेडिटेशनचे व्हिडीओ ऐकण्यानं मनाला शंभर टक्के शांतता लाभेल यात शंकाच नाही! त्याला विज्ञानाचा, अभ्यासाचा आधार आहे.

अरुणा सरनाईक

Back to top button