टेकइन्फो : ‘मोफत काहीच मिळणार नाही!’ | पुढारी

टेकइन्फो : ‘मोफत काहीच मिळणार नाही!’

‘ट्विटर’ या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक अ‍ॅलन मस्क यांनी आपल्या व्यासपीठावरून मोफत काहीच मिळणार नाही, असे जाहीर केले होते. त्यानुसार ‘ट्विटर’ने जगभरातील बडे नेते, अभिनेते आणि खेळाडूंसह सामान्य यूजर्सची ब्ल्यू टिक सर्व्हिस बंद केली आहे. हा निर्णय व्यावसायिक द़ृष्टीने घेण्यात आला आहे, यात शंकाच नाही.

सोशल मीडियाच्या विश्वात 2006 मध्ये प्रवेश करणार्‍या ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटने पाहता पाहता इंटरनेटप्रेमींमध्ये अग्रणी स्थान प्राप्त केले. आजघडीला जगभरात 353.90 दशलक्ष लोक ट्विटरचा वापर करताहेत. गेल्या वर्षभरामध्ये ट्विटर वापरणार्‍यांच्या संख्येत चार टक्क्यांची वाढ झाली आहे. राजकारण्यांपासून मनोरंजनविश्वातील तमाम वलयांकित व्यक्तींची आणि जगभरातील हजारो दिग्गज संस्था-संघटनांची आज ट्विटरवर खाती आहेत. सार्वजनिकरीत्या संदेश देण्याच्या पद्धतीला ट्विटरने नवा आयाम दिला. गेल्या काही वर्षांत जगभरातील प्रभावी व्यक्ती आपली मते किंवा एखाद्या मुद्द्यासंदर्भातील आपले विचार ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मांडताना दिसू लागली. यामुळे माध्यमांच्या विश्वात ट्विटरचा उल्लेख सतत दिसू लागला. दुसरीकडे, ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येवरून लोकप्रियतेची क्रमवारी लावली जाऊ लागली. जितके फॉलोअर्स जास्त तितकी त्या व्यक्तीची लोकप्रियता अधिक मानले जाऊ लागले. ट्विटरवरील ‘हॅशटॅग’ने तर चळवळी उभ्या राहताना दिसल्या. या हॅशटॅगमुळे अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर प्रभाव पडताना दिसला. अनेकदा विरोधातील हॅशटॅगमुळे धोरणकर्त्यांना निर्णय बदलावे लागले. यावरून ट्विटरचा नवसमाजमाध्यमांच्या विश्वातील दबदबा लक्षात येतो.

जगभरात लोकप्रिय होत चाललेल्या ट्विटरच्या जीवन प्रवासात गतवर्षी एक महत्त्वाचा टप्पा आला. जगप्रसिद्ध अब्जाधीश अ‍ॅलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर देऊन या कंपनीची खरेदी केली. अ‍ॅलन मस्क हे अतरंगी स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून जगभरात ओळखले जाते. पूर्वीच्या काळी जगाला हादरवून सोडणारी किंवा आश्चर्याचा धक्का देणारी ट्विटस् मस्क महाशयांनी केली होती. आता ही ट्विटरच आपल्या मालकीची झाल्यानंतर तर त्यांनी या कंपनीच्या पारंपरिक धोरणांबाबत अनेक उलटसुलट निर्णय घेण्याचे सूतोवाच करून सर्वांनाच गोंधळात टाकण्याचा सपाटाच लावला. मध्यंतरी ट्विटरचा लोगो असणारी चिमणी बदलण्याचा निर्णय घेतला; तर अलीकडेच ट्विटरवरील ब्ल्यू टिकबाबत नवे धोरण स्वीकारले.

सध्या ट्विटरवरचे मोफत ब्ल्यू टिक चिन्ह हे इतिहासजमा झाले आहे. आतापर्यंत एखादे ट्विटर हँडल अधिकृत असल्याची ओळख प्रस्थापित करण्याचे काम ब्ल्यू टिक करत होते. परिणामी, ब्ल्यू टिक असणार्‍या हँडलरवरून एखादी संस्था आणि व्यक्तीने मांडलेल्या मताला मान्यता मिळायची. ट्विटरवरचे ब्ल्यू टिक हे साधारणपणे पडताळणी झाल्यानंतरच मिळत होते. परंतु, आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

वास्तविक, एक एप्रिलपासूनच मोफत ब्ल्यू टिक धोक्यात आले होते; पण त्यावर 20 एप्रिल रोजी कुर्‍हाड कोसळली. या दिवशी जगभरातील अनेक प्रख्यात सेलिब्रिटींबरोबरच भारतात महानायक अमिताभ बच्चनपासून भारतरत्न सचिन तेंडुलकरपर्यंत असंख्य भारतीय सेलिब्रिटींचे ब्ल्यू टिक काढून घेण्यात आले; पण ब्ल्यू टिकचा मोह एवढा वाढला आहे की, पैसे भरल्यानंतर ब्ल्यू टिक तातडीने बहाल करावे, अशी मागणी महानायकाने केलेली दिसली. वास्तविक, ज्या मंडळींनी 20 एप्रिलच्या अगोदरपर्यंत ब्ल्यू टिकसाठी पैसे भरले होते, त्यांचे चिन्ह टिकून राहिले. परंतु, जी मंडळी हा निर्णय बदलेल अशा फुकट मिळण्याच्या आशेने शेवटपर्यंत थांबली होती, त्यांना झटका बसला आहे.

मुळात, अ‍ॅलन मस्क यांनी यापूर्वीच आपल्या व्यासपीठावरून मोफत काहीच मिळणार नाही, असे जाहीर केले होते. जगभरातील मोठ्या उद्योगपतींनी, सेलिब्रिटींनी, नेत्यांनी या व्यासपीठाचा भरपूर आणि मोफत वापर केला, हे जगजाहीर आहे. या माध्यमातून हजारो-लाखो जणांना लोकप्रियतादेखील मिळाली. अशावेळी ट्विटरने घेतलेला निर्णय हा व्यावसायिक द़ृष्टीने चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, अ‍ॅलन मस्क हे मुळात उद्योगपतीच आहेत. नफाकेंद्रीपणा हा त्यांच्यातील उद्योजकाच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच त्यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ कामगार कपातीचा बडगा उगारला आणि खर्चात कपात करण्यास सुरुवात केली. वास्तविक पाहता, ट्विटरचे जगभरात विस्तारलेले जाळे आणि त्याचा प्रभाव यांचा साकल्याने आणि व्यावसायिक द़ृष्टिकोनातून विचार करूनच मस्क यांनी या कंपनीची खरेदी केली असेल, यात शंकाच नाही.

कोणताही उद्योजक नवा व्यवसाय वा उद्योग अधिग्रहित केल्यानंतर अशाच प्रकारची रणनीती आखत असतो. पाश्चिमात्य प्रगत राष्ट्रांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली असता, आधी स्वस्तात किंवा मोफत स्वरूपात उत्पादने बाजारात आणणे, त्याची वारेमाप जाहिरात करणे, त्यातून त्या उत्पादनाचा खप वाढवणे, त्या उत्पादनाची लोकांना सवय लावणे, कमी किमतींबरोबरीने सवलतींचाही भडिमार करून आपल्याशी स्पर्धक असणार्‍या कंपन्यांना गाशा गुंडाळण्यास भाग पाडणे आणि नंतर आपली मक्तेदारी निर्माण करून मनमानी दरवाढ करणे, असा एक प्रवाह त्यात दिसतो. याची अनेक उदाहरणे भवताली दिसून येतील. अ‍ॅलन मस्कही त्याच मातीतले असल्याने त्यांनी ट्विटरबाबत अत्यंत व्यावसायिकपणा किंवा प्रोफेशनल द़ृष्टिकोन ठेवलेला स्पष्टपणाने दिसत आहे.

अर्थात, व्यावसायिक-उद्योजक म्हणून मस्क यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे गृहीत धरले तरी या निर्णयामुळे काही वेगळे परिणाम समोर येणार आहेत. ट्विटरच्या ब्ल्यू टिकला अलीकडील काळात समाजात एक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. स्टेटस सिम्बॉल म्हणून या ब्ल्यू टिकचा विचार केला जातो. आजवर यासाठी शुल्क नव्हते; पण आता जो पैसे भरेल, तोच खरा सेलिब्रिटी असे मानले जाऊ लागेल. ही बाब कोणत्या नैतिकतेत बसते? पैशाच्ंया बळावरच ओळख मिळवायची असेल, तर फसवणूक करणारी मंडळीदेखील पैसे भरून ओळख मिळवतील आणि प्रसिद्धी मिळवतील. ब्ल्यू टिक मिळवणार्‍या एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा घडवून आणला, तर त्याचे खापर ट्विटरवर फुटणार नाही का? एकप्रकारे ट्विटरपुढे हे मोठे आव्हानच असणार आहे. कंपनीने बनावट मंडळींना आणि कंपन्यांना ब्ल्यू टिकची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल. अर्थात, यासाठी काटेकोरपणे पडताळणी करणे गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, मस्क यांच्या ताज्या निर्णयानुसार, संगणक किंवा वेबवर ट्विटरचा वापर करणार्‍या मंडळींना दरमहा 650 रुपये भरावे लागणार आहेत आणि मोबाईलवर वापर केल्यास 900 रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम भारतीयांसाठी मोठी आहे. अमेरिकेत या ब्ल्यू टिकसाठी 8 डॉलर रक्कम भरावे लागेल. याचाच अर्थ भारत आणि अमेरिकेसाठी शुल्क आकारणी ही सारखीच आहे; पण अमेरिकेतील नागरिकांप्रमाणे भारतीय नागरिक श्रीमंत नाहीत. शुल्क आकारणीच्या निर्णयामुळे भविष्यात पैशांच्या बळावर सोशल मीडियावरही अधिकार गाजवता येऊ शकतो, असा संदेश जात आहे. ट्विटरची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक बनलेली असल्यामुळे ती सावरण्याच्या प्रयत्नात मस्क महाशयांकडून आणखी कोणकोणती पावले उचलली जातात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

महेश कोळी,
आयटी तज्ज्ञ

Back to top button