कौन है ये रिंकू…

कौन है ये रिंकू…

क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतील आणखी एक नाव. रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमदेखील आहे; पण सलग पाच षटकार खेचत त्याने आपल्याकडे वाघाचे काळीजदेखील आहे, हे दाखवून दिले.

एलपीजी सिलिंडर्स घरोघरी पोच करणे हा रिंकूच्या वडिलांचा व्यवसाय. घरी वातावरण पाहावे तर अठराविश्वे दारिद्य्र. रोजंदारी केली तरच संध्याकाळी घरची चूल पेटणार, हे त्रिकालाबाधित सत्य. रिंकू 16 वर्षांखालील गटातून खेळत होता, त्यावेळी त्याच्या वडिलांनी रिंकूला सल्ला दिला होता, ट्यूशन क्लास सुरू होण्याआधी तेथील फरशी पुसण्याचे काम कर, थोडे फार पैसे मिळतील, आपले घर चालेल. पण, म्हणतात ना, 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे.' रिंकूने तेच केले. रिंकूच्या नसानसात क्रिकेट पुरते भिनले होते. त्याने आपल्या मनाचे ऐकले. ना फरशा पुसल्या, ना कधी अशी छोटी छोटी कामं केली. त्यानं पूर्ण वेळ स्वतःला क्रिकेटप्रति समर्पित केलं आणि आता मागील आठवड्यात 5 चेंडूंवर सलग 5 षटकार खेचत त्याने केकेआरला एकहाती, स्वप्नवत विजय मिळवून दिल्यानंतर वेळ अशी आली आहे की, अवघ्या क्रिकेटविश्वातून एकच प्रश्न विचारला जातोय, 'कौन है ये रिंकू?'

क्रिकेट जगताला नेहमी नवनवे हिरो लागतात. रिंकू सिंग हे त्याच मांदियाळीतील आणखी एक नाव. वास्तविक, अलीगढ हे देशातील महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक. 148 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात या शहराने अनेक दिग्गज घडवले. एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे लेखक, कवी, साहित्यिक, कित्येक बुद्धिवंत, विद्वान या शहराने दिले. अगदी मेजर ध्यानचंद व लाला अमरनाथ हेदेखील मूळचे अलिगढचेच. क्रीडाविश्वात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, ते माजी भारतीय हॉकी कर्णधार जफर इक्बाल हेदेखील याच शहराची देन. योगायोग म्हणजे रिंकूदेखील याच भूमीत घडला आहे.

घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. एकूण सातजणांचे कुटुंब. रिंकूसह एकूण पाच भावंडे आणि त्यांचे पालक असा मोठा लवाजमा. आश्चर्य वाटेल; पण रिंकूसह सर्व भावंडे लहान असताना खानचंद यांच्या जीवावर सर्व कुटुंब चालायचे. खानचंद एलपीजी सिलिंडर्सचे घरोघरी वितरण करायचे. नंतर रिंकूसह सर्व मुले मोठी होऊ लागली आणि ज्यावेळी वडिलांना आणखी एखाद्या कामासाठी बाहेर जावे लागायचे, त्यावेळी सिलिंडर वितरणाची जबाबदारी त्यांच्या या पाच मुलांवर असायची.

मुळात अवजड एलपीजी सिलिंडरची ने-आण करण्यासाठी, ते उचलून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मोठी ताकद लागते. शरीर धष्टपुष्ट, काटक असावे लागते. वडील एखाद वेळेस नसल्यास त्यांच्याऐवजी रिंकू व त्याचे भाऊ दुचाकीवरून सिलिंडरचे घरोघरी, हॉटेल्सवर वितरण करायचे. अशा या प्रतिकूल परिस्थितीत रिंकूचे क्रिकेट खेळणे त्याच्या वडिलांना वेळ वाया घालवण्यासारखे वाटत असे. पाच मुलांपैकी कोणी सिलिंडर पोचते करण्यास नकार दिला, तर वडिलांचा मार मिळणे निश्चित असायचे.

जोवर सिलिंडर पोचते करून परतत नाही, तोवर वडील हातात काठी घेऊन दारात बसलेले असायचे. कधी कुठल्या मुलाने जर यात कंटाळा केला, तर छडी बसायचीच. रिंकू या आठवणीला उजाळा देताना एकदा म्हणाला होता, 'पापा से हम पाँचो भाईयोंको बहोत मार पडी है.'

रिंकू अभ्यासही करत नाही, कामात मदतदेखील करत नाही आणि जे करायचे ते सोडून क्रिकेट खेळत बसतो, हे त्याच्या वडिलांना अजिबात रूचत नसे. या पार्श्वभूमीवर, रिंकूला क्रिकेट खेळण्यासाठी मार खावा लागणे केव्हा थांबले, तेही रंजक आहे. डीपीएस अलीगढने शालेय विश्वचषक नावाची स्पर्धा आयोजित केली होती आणि रिंकूला त्यात मालिकावीरचा पुरस्कार लाभला. आश्चर्य म्हणजे, त्यावेळी प्रथमच रिंकूचा खेळ पाहण्यासाठी त्याचे वडील थेट स्टेडियमवर आले होते. रिंकूला त्यांच्यासमोरच मालिकावीरसाठी दिली जाणारी मोटारबाईक प्रदान करण्यात आली आणि रिंकूला त्यानंतर त्याच्या वडिलांकडून कधीही मार खावा लागला नाही.

रिंकू खेळत असताना इंटर कॉलनी किंवा क्लब मॅचेस खेळण्यासाठी लेदर चेंडू विकत घ्यावा लागत असे आणि आश्चर्य म्हणजे, रिंकूकडे यासाठीही पैसे नसायचे. एकदा तर रिंकूला कानपूरला खेळण्यासाठी जायचे होते, त्यावेळी त्याच्या आईने जवळच्या एका किराणा दुकानदाराकडून एक हजार रुपये उसने घेतले आणि रिंकूला कानपूरला पाठवले.

रिंकूला आपल्या क्रिकेट कारकिर्दीतही अनेक चढ-उतार पाहावे लागले आहेत. बर्‍याचदा त्याच्या पदरी निराशाही आली; पण, तो क्षणिक अपयशाने ना कधी खचला, ना कधी निराश झाला. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेच्या 16 वर्षांखालील वयोगटात त्याच्याकडे दोनवेळा दुर्लक्ष करण्यात आले होते; पण 2012 मध्ये त्याने विजय मर्चंट चषक स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात 154 धावांची शानदार खेळी साकारली आणि आपण इलाईट क्रिकेट खेळू शकतो, हा विश्वास त्याला मिळाला. पुढे दोनएक वर्षातच त्याची 19 वर्षांखालील गटात वर्णी लागली आणि नंतर थेट उत्तर प्रदेश वन-डे संघातदेखील एन्ट्री झाली. त्यानंतर रिंकूला अजिबात मागे वळून पाहावे लागले नाही.

मध्यंतरी 2021 प्रथमश्रेणी हंगामात रिंकूला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गुडघ्याची गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याच्या वडिलांनीदेखील ते खूप मनाला लावून घेतले होते. काही दिवस तर त्यांनी जेवणखाणही बंद केले; पण रिंकू यातून सावरला आणि त्याने आपल्या वडिलांना समजावून सांगितले की, अशा दुखापती या कोणत्याही व्यावसायिक खेळाडूसाठी खेळाचा एक अविभाज्य घटकच असतात.

एकदा व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतात. रिंकूनेदेखील असे बरेच त्याग केले आहेत. आपल्या आजवरच्या वाटचालीत बालपणापासूनचे प्रशिक्षक मसूद अमिनी, मोहम्मद झिशान, अर्जुनसिंग फकिरा, नील सिंग, स्वप्निल जैन यांनी आपल्याला वेळोवेळी बरीच मदत केली, याचाही तो सातत्याने उल्लेख करतो. रिंकूचे प्रशिक्षक अमिनी अभिमानाने सांगतात की, रिंकूमध्ये एक्स फॅक्टर आहे. हा एक्स फॅक्टरच त्याला नवनव्या उंचीवर घेऊन जाईल. त्याची आक्रमकता त्याला उत्तम कसोटीपटू बनवेल, अगदी आघाडीचा, स्फोटक सलामीवीरही बनवेल.

मागील तीन वर्षांत आयपीएलमुळे रिंकूचे आयुष्य बरेच बदलले आहे. अगदी अभिमानाने तो सांगतो, 'सारी दिक्कते दूर हो गयी है.'
रिंकूकडे गुणवत्ता आहे आणि तो सक्षमदेखील आहे; पण मागील रविवारी आयपीएलमध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या पाच चेंडूंवर सलग 5 षटकार खेचत त्याने हेदेखील दाखवून दिले की, लाखभर लोकांच्या साक्षीने, सारे अनामिक दडपण झुगारून, प्रतिस्पर्धी संघाला पुरते नेस्तनाबूत करण्यासाठी जे वाघाचे काळीज लागते, ते काळीजदेखील त्याच्याकडे आहे. असेल रिंकू तर नक्की जिंकू, हा विश्वासदेखील या रिंकूने दिलाय.

रिंकूने सलग पाच षटकारांचा विक्रम नोंदवला, त्यावेळी ईयान बिशप समालोचन करत होते. रिंकूचे लागोपाठ 5 षटकार, त्याने खेचून आणलेला दुर्दम्य विजय, याचे वर्णन करता करता बिशप सहजपणे बोलून गेले. 'रिंकू सिंग, रिमेम्बर द नेम.' खरे आहे ते. अलिगढच्या या छोर्‍याचे नाव आता सातत्याने प्रकाशझोतात राहणार आहे.

-विवेक कुलकर्णी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news