क्रीडा : एक शापित यक्ष

सलीम दुराणी
सलीम दुराणी
Published on
Updated on

सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार फलंदाजीनं, गोलंदाजीनं रसिकांना रिझवत राहिले. दुराणी यांचं क्रिकेट संपलं. प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतीत करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते.

सलीम दुराणी हा एक शापित यक्ष होता. फिरकी गोलंदाजीत वाकबगार असणार्‍या दुराणी यांची फलंदाजीसुद्धा दणकेबाज होती. क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यावा आणि त्यामध्ये प्रेक्षकांनासुद्धा सामील करून घ्यावं, असा त्यांचा एकंदर खाक्या होता. खेळ हा आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी खेळला पाहिजे, अशी त्यांची एकंदर वृत्ती होती. त्याप्रमाणंच ते कायम खेळत राहिले. त्यामुळंच असेल; पण दुराणी हा एक अत्यंत मूडी खेळाडू आहे, अशी एक समजूत होती. ती दूर करण्यासाठी दुराणी यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. कसोटी सामन्यात निवड झाल्यानंतर मात्र आपल्याला जे काही करणं शक्य आहे, ते सर्व त्यांनी केलं. कधी अप्रतिम गोलंदाजी करून, तर कधी बहारदार फलंदाजी करून त्यांनी आपल्यावर निवड समितीनं दाखविलेला विश्वास सार्थ केला. दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्यांना हवी तितकी संधी मिळाली नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या दौर्‍यावर त्यांची कधीही निवड करण्यात आली नाही; पण त्याची खंतही दुराणी यांनी बाळगली नाही. त्याबद्दल कडवटपणानं ते कुणाशी काही बोलले नाहीत. हा त्यांचा फारच मोठा विशेष होता.

दुराणी ज्या काळात क्रिकेट खेळत होते, त्या काळात अब्बास अली बेग, मन्सूर अली खान पतौडी, एम. एल. जयसिंह, फारूख इंजिनिअर असे अनेक देखणे आणि रुबाबदार खेळाडू भारतीय संघात होते. त्या सार्‍यांत दुराणी आपल्या अष्टपैलू खेळानं उठून दिसणारे होते. 1970-71 मध्ये कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. पहिली कसोटी अनिर्णीत राहिली. दुसरी कसोटी भारतानं जिंकली. त्या विजयात दुराणी यांनी अमोल कामगिरी केली. आपल्या फिरकीनं क्लाईव्ह लाईड आणि गॅरी सोबर्स यांना त्यांनी बाद केलं. विशेष म्हणजे, 'मी या दोघांना उद्या बाद करीन,' असं त्यांनी आदल्या दिवशीच्या संध्याकाळी कर्णधार अजित वाडेकर यांना सांगितलं होतं. बोलल्याप्रमाणं ते त्यांनी करून दाखवलं. त्यावेळी दुराणी यांनी अप्रतिमच गोलंदाजी केली. 17 षटकांमधली आठ षटकं निर्धाव टाकत आणि 21 धावा देत दोन महत्त्वाच्या खेळाडूंना बाद करण्याची किमया त्यांनी केली होती. भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती; पण दुराणी यांच्या या कामगिरीचं स्मरण नंतर फारसं कुणी ठेवलं नाही.

वेस्ट इंडिजपाठोपाठ भारतानं इंग्लंडचा दौरा केला; पण त्यावेळी दुराणी यांची संघात निवड झाली नाही. मात्र, त्यानंतर इंग्लंड संघ भारतात आल्यावर दुराणी दोन कसोटी सामन्यांत खेळले. दोन अर्धशतकं (73 आणि 53 धावा) त्यांनी केली. प्रेक्षकांनी षटकाराची मागणी करावी आणि दुराणी यांनी ती पूर्ण करावी, असा प्रकार त्यावेळी घडला. मात्र, या दोन कसोटी सामन्यांतली त्यांची निवड सहज झालेली नव्हती. मुंबई कसोटी सामन्याच्या अगोदर 'दुराणी नाही, तर कसोटी नाही,' असे फलक जागोजागी लागले. निवड समितीवर प्रचंड दबाव आला. दुराणींना संघात घेतलं गेलं आणि त्यांनी दुराणी ही काय चीज आहे, ते पुन्हा एकदा दाखवून दिलं; पण ती कसोटी ही दुराणी यांची अखेरची कसोटी ठरली. त्यानंतर दुराणी यांचा विचार कसोटी सामन्यांसाठी कधीही करण्यात आला नाही. 1960 ते 1973 अशा 13 वर्षांमध्ये 29 कसोटी सामने दुराणी खेळले. त्यामध्ये त्यांनी 1,204 धावा केल्या आणि 75 फलंदाजांना बाद केलं. आकडे हे पूर्ण सत्य सांगत नाहीत, हेच दुराणींच्या बाबतीतही दिसून येतं. दुराणी पहिली कसोटी खेळले, ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1960 सालात. त्यावेळी ब्रेबॉन स्टेडियमवर 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्यांनी 18 धावा केल्या. गोलंदाजीत ते काहीच करू शकले नाहीत, याचं कारण त्यांना एकच षटक मिळालं. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर आला होता. या मालिकेवर दुराणींचीच छाप पडली. कोलकाता येथील कसोटीत 43 धावा त्यांनी केल्याच; पण सामन्यात 113 धावा देऊन त्यांनी एकंदर आठ बळी घेतले. मद्रासमधील कसोटीत तर त्यांनी 105 धावा देऊन सहा फलंदाजांना बाद केलं, तर दुसर्‍या डावात 72 धावा देऊन चार फलंदाजांना बाद केलं. एकाच कसोटीत दहा बळी मिळविण्याचा पराक्रम त्यांनी केला. ही मालिका भारतानं 2-0 अशी जिंकली. त्या पाच कसोटी सामन्यांच्या मलिकेत दुराणींनी 27.04 च्या सरासरीनं 23 गडी बाद केले.

भारतानं 1962 मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला. त्यावेळी दुराणी यांनी तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करत 104 धावा फटकावल्या, त्या वेस्ली हॉल, गिब्ज, सोबर्स यांच्या गोलंदाजीपुढं! हे दुराणी यांचं कसोटीमधलं एकमेव शतक. मात्र, त्यांनी कसोटी सामन्यांत सात अर्धशतकं फटकावली, हे विसरून चालणार नाही. 1973 नंतर दुराणी यांना पुन्हा कसोटीत संधी मिळाली नाही. मात्र, त्यामुळं नाउमेद न होता ते कांगा लीग, रणजी, दुलीप सामने खेळत राहिले. गुजरात, सौराष्ट्र आणि राजस्थान या संघांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. दुलीप चषकाच्या सामन्यांत ते मध्य विभागाकडून खेळत.

1972 मध्ये दुलीप चषकाचा अंतिम सामना पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग असा झाला होता. पश्चिम विभागात त्यावेळी सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, रामनाथ पारकर, एकनाथ सोलकर, पद्माकर शिवलकर यांच्यासारखे खेळाडू होते; पण तो सामना मध्य विभागानं जिंकला. त्यामध्ये दुराणी यांचा सिंहाचा वाटा होता. पश्चिम विभागच्या पहिल्या डावात त्यांनी 38 धावांत तीन फलंदाजांना बाद केलं; तर दुसर्‍या डावात 44 धावांत सहा गडी बाद केले. फलंदाजी करताना पहिल्या डावात 20 आणि दुसर्‍या डावात नाबाद 83 धावा करून त्यांनी मध्य विभागाला विजय मिळवून दिला.

दुराणी हे मनःपूतपणं वागणारे आणि खेळणारे होते. क्रिकेटवर त्यांचं मनापासून प्रेम होतं आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा-द्यायचा हे त्यांना चांगलंच माहीत होतं. गॅरी सोबर्स आणि रोहन कन्हाय यांना दुराणी यांच्या गुणांची जाणीव होती. त्या दोघांशी त्याचे उत्तम संबंध होते. भारतीय वंशाचे कन्हाय अनेकदा भारतात येत असत. आल्यानंतर ते आवर्जून दुराणींना भेटत. मात्र, दुराणी यांचं मैत्र क्रिकेटपटूंपुरतंच मर्यादित नव्हतं. देव आनंद, हेमंत कुमार, अशोक कुमार, मीना कुमारी, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन यांच्याशीही त्यांची मैत्री होती. त्यांच्या देखणेपणामुळंच 'चरित्र' या हिंदी चित्रपटामध्ये ते नायक म्हणून चमकले. नायिका होती, परवीन बाबी! चित्रपट कलाकार, गायक, उद्योगपती यांच्यापासून ते लहान दुकानदार असा त्यांचा मित्र परिवार होता. जे मिळालं, त्यावर ते समाधानी होते का? सांगता येत नाही; पण जे मिळालं नाही, त्याबाबत त्यांचा कुणावरच राग नव्हता. रणजी आणि दुलीप चषकांच्या सामन्यात ते 1976-77 सालापर्यंत खेळत राहिले. त्या सामन्यांत 14 शतकं करत त्यांनी 8,545 धावा केल्या आणि 484 बळी मिळविले. कसोटी सामन्यांत संधी मिळत नाही, म्हणून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायचंच नाही, असं त्यांनी केलं नाही. अगदी कांगा लीगमध्येही ते मनापासून खेळत राहिले आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक गर्दी करत राहिले. प्रेक्षकांच्या अग्रहावरून ते षटकार मारत राहिले. हे कसं साध्य करता? असा प्रश्न त्यांना एकदा विचारला होता. तेव्हा निगर्वी स्वभावाच्या दुराणी यांनी ती केवळ 'बोला फुलाला गाठ पडते' असं सांगितलं!

मूळचे अफगाणिस्तानचे असलेले दुराणी काबूलहून कराची आणि मग जामनगरला आले. फाळणीनंतर त्यांचे वडील पाकिस्तानमध्ये गेले; पण सलीम दुराणी भारतातच राहिले. भारतात आणि भारतासाठी खेळत राहिले. आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार फलंदाजीनं, गोलंदाजीनं रसिकांना रिझवत राहिले. बघता बघता दुराणी यांचं क्रिकेट संपलं; मग त्यांच्या फटकेबाजीला आणि गोलंदाजीला दंतकथेचं स्वरूप येत गेलं. अधिक संधी मिळाली असती आणि त्यांनी आपल्या मनःपूतपणाला आवर घातला असता, तर त्यांच्या हातून अधिक उत्तम कामगिरी झाली असती. तसे गुण त्यांच्याकडं होते; पण प्रतिभावंतांना मनस्वी जगण्याचा, तसं आयुष्य व्यतीत करताना लौकिक जगाचा विचार न करण्याचा शाप असतो. दुराणी त्याला अपवाद नव्हते.

श्रीराम शिधये  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news