समाजमाध्यम : ‘रिल्स’च्या व्यसनात तरुणाई | पुढारी

समाजमाध्यम : ‘रिल्स’च्या व्यसनात तरुणाई

फेसबुकवर पोस्ट टाकणं, व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस बदलणं, मेसेजेस पाठवणं आणि त्यांवरील ‘रिप्लाय’, ‘लाईक्स’, ‘कमेंटस्’ पाहणं, त्यासाठी तासन्तासाचा वेळ खर्ची घालणं ही आज असंख्य तरुण-तरुणींची दिनचर्या झाली आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स टाकण्यासाठी तर जीवावर बेतणार्‍या मार्गांचा अवलंब केला जात आहे. एका पाहणीनुसार भारतात दररोज 60 लाखांहून अधिक रिल्स समाजमाध्यमांवर अपलोड केल्या जातात.

समाजमाध्यमांवर व्हिडीओ तयार करण्यापायी अहोरात्र सक्रिय असणारे तरुण-तरुणी वेळेचा अपव्यय करण्याबरोबरच स्वत:चा जीवही धोक्यात घालत आहेत. विशेषत: इन्स्टाग्रामवर रील्स तयार करण्यासाठी बराच वेळ खर्ची करणारी ही मंडळी नकळतपणे चुकीच्या सवयींच्या आहारी जात आहेत. या सवयीचे सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम पाहावयास मिळत असून प्रसंगी त्यांचे हकनाक बळी जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी रील्स तयार करण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे लोकांनाही त्रास होत आहे. मुंबईतील लोकल, दिल्ली मेट्रो ही रील तयार करणार्‍या लोकांसाठी जणू पर्यटनस्थळेच बनली आहेत. या रेल्वेंमधील रिल्सची अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत.

अधिक व्ह्यूूज व लाईक्सच्या प्रेमापोटी भरधाव धावणार्‍या रेल्वे, मेट्रोंमध्ये इन्स्टाग्राम रील केल्या जात आहेत. कित्येकदा अशा व्हिडीआमुळे अन्य प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अलीकडील काळात अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामधील बहुतांश द़ृश्यांचे चित्रीकरण मेट्रो अथवा लोकलमध्ये झालेले आहे. या प्रकाराची दखल घेत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला कडक इशारा देण्याची वेळ आली. अलीकडेच दिल्ली मेट्रोने ट्विट करत व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यावर बंदी घातल्याचे जाहीर केले. या ट्विटमध्ये असे म्हटले की, प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ शूट करता येणार नाही. मेट्रोच्या प्रवाशांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन करू नये. यानिमित्ताने दिल्ली मेट्रोने एक ग्राफ शेअर केला असून त्यात म्हटले की, मेट्रोचे प्रवासी व्हा, उपद्रवी नको.

रील हे इन्स्टाग्रामचे फीचर आहे. यामध्ये युजर्स छोटे व्हिडीओ तयार करतात. भारतात टिकटॉकवर बंदी घातली गेली तेव्हा टिकटॉकवर व्हिडीओ बनवणारे बहुतांश जण इन्स्टाग्रामकडे वळले. अलीकडील काळात प्रचलित झालेला इन्फ्ल्युएन्सर हा शब्द इन्स्टावरील रिल्सच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या व्यक्तींना उद्देशून वापरला जातो. कोणत्याही म्हणजे अगदी शब्दशः कोणत्याही प्रसंगाचे छोटे छोटे व्हिडीओ बनवून त्या रिल्स आपल्या अकौंटवर अपलोड करायच्या आणि आपल्याशी जोडल्या गेलेल्यांच्या प्रतिक्रियांमध्ये रमून जायचे हा आज बहुतांश जणांचा ‘उद्योग’ बनला आहे. यामध्ये ज्यांचे लाखोंनी फॉलोअर्स आहेत, त्यांना तर या माध्यमातून कमाईच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. कारण आपल्या 60 सेकंदांच्या रिल्समधून ते एखाद्या उत्पादनाची जाहिरातही करू शकतात. यासाठी अनेक ब—ँडस्कडून त्यांना संपर्क साधण्यात येतो. त्यातून हे इन्फ्ल्युएन्सर आणि ब—ँडस् यांच्यात मध्यस्थी करणार्‍यांचे जाळे तयार झाले आहे. या रिल्स आकर्षक स्वरूपात शूट करण्यासाठीच्या तंत्रज्ञांची भाऊगर्दी झाली आहे. त्यासाठीचा कंटेंट लिहिणारे तयार झाले आहेत. एक प्रकारे या रिल्सभोवती एक छोटीशी अर्थव्यवस्थाच उभी राहिली आहे. ही याची सकारात्मक बाजू म्हटली जाऊ शकते. पण दुसर्‍या बाजूला सतत अशा रिल्स पाहण्यामध्ये आपला लाखमोलाचा वेळ वाया घालवणार्‍या तरुणाईचे प्रमाणही मोठे आहे.

इंटरनेटच्या आहारी जाणे याला मानसशास्त्रीय परिभाषेत सोशल मीडिया अ‍ॅडिक्शन या नावाने ओळखले जाते. समाजमाध्यमातून धोकादायक स्टंट करण्याबरोबरच रील्स आणि सेल्फीची ही क्रेझ अनेक युवकांचा बळी घेणारी ठरत आहे. आपल्या अकाऊंटला फॉलोअर्स, लाईक आणि कमेंट वाढविण्याच्या नादात युवक कोणत्याही थराला जात आहेत. शस्त्राबरोबर खेळण्यासारखे स्टंट करत आहेत. अलीकडच्या काळात भारताबरोबर संपूर्ण जगात या शॉर्ट व्हिडीओचे मार्केट एवढे वाढले आहे की, कोट्यवधी आणि अब्जावधींच्या संख्येने लोक व्हिडीओ पाहण्यास आणि तयार करण्यास आतूर झालेले असतात. रील्स हे ट्रेंडी आणि चित्तथरारक असतात आणि खूपच कमी वेळेत लोकांचे चांगले मनोरंजन करतात आणि हीच बाब सोशल मीडिया वापरकर्त्यांना रील्सशी बांधून ठेवते. परंतु त्याची आणखी एक बाजू असून ती कदाचित ठाऊक नसेल. ती म्हणजे चटक आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध होण्यासाठी सुरू असलेली धडपड. रिल्सचा वापर करून घेत सोशल मीडिया स्टार बनण्यासाठीची अहमहमिका लागल्याचे आजचे चित्र आहे. यातील घातक बाब म्हणजे त्याचा होणारा गैरवापर.

2021 मध्ये मध्य प्रदेशातील इंदौरमधील 16 वर्षाच्या एका मुलाला इन्स्टाग्रामसाठी थरारक रील तयार करत असताना चुकून गळफास बसला. इंदौर पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केला असता 16 वर्षाच्या विक्की हा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी बनावट व्हिडीओ तयार करण्याच्या प्रयत्नात होता. पण ही स्टंटबाजी त्याच्या जीवावर बेतली आणि स्वत:च्या गळ्याला फास लावून घेतला. याच वर्षात जयपूरमधील जवाहरनगर येथे एका मुलाने एका मैत्रिणीसमवेत टिकटॉक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या मुलीच्या भावांनी त्या मुलाची गावात नग्न करून धिंड काढली आणि मारहाणही केली. अर्थात पोलिसांनी त्या मुलांवरही कारवाई केली. यावरून हा व्हिडीओ सोशल मीडियावर कितपत व्हायरल झाला असेल, याची कल्पना येईल. 25 डिसेंबर 2021 रोजी जयपूरच्या ट्रायटन मॉलवरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता 22 वर्षीय मुलगा हा मॉलच्या गच्चीवर उभा राहून रिल्स शूट करत होता आणि अचानक संतुलन ढासळल्याने खाली पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशी अनेक उदाहरणे सांगता येईल. या रिल्सपोटी अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. लाईक, कॉमेंट आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात तरुण-तरुणी आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत, ही बाब चिंताजनक आहे.

एका पाहणीनुसार भारतात दररोज 60 लाखांपेक्षा अधिक रिल्स तयार होतात. हे सर्व रिल्स सोशल मीडियावर अपलोड केले जातात. रिल्सच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुण काल्पनिक जगात जगण्याचा प्रयत्न करत आहेत. युवकांना आता आभासी जग आवडू लागले आहे. या जगातच ते स्वत:च्या सुख-दु:खाचा शोध घेत आहेत. परिणामी ते मानसिकद़ृष्ट्या कमकुवत होत आहेत. त्यांची स्मरणशक्ती देखील कमी होत असल्याचे दिसून येते. एखाद्याला जशी सिगारेटची चटक लागते, तशीच चटक रिल्स तयार करण्याची लागत आहे. अनेक प्रयत्न करूनही ती सवय सुटत नाहीये. यामुळे अनेक प्रकारचे नुकसानही युवकांना सहन करावे लागत आहे. शारीरिक रूपाने अनेक तास एकाच ठिकाणी बसून रिल्स पाहण्याच्या सवयींमुळे आजार बळावत आहेत. रिल्ससाठी युवक कोणत्याही थराला जात आहेत. रिल्सच्या माध्यमातून अश्लीलतेला देखील प्रोत्साहन मिळत आहे. व्हिडीओवर व्ह्यूज मिळवण्यासाठी शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून अश्लील आणि खूपच सुमार गोष्टी तयार केल्या जात आहेत.

समाजमाध्यमांचा प्रसार आणि वापर जितक्या कमालीच्या वेगाने वाढत चालला आहे, तितक्याच गतीने नवनवीन फिचर्सचा वापर करन ‘प्रसिद्ध’ होण्याचं वेड फोफावत आहे. फेसबुकवर पोस्ट टाकणं, व्हॉटस्अ‍ॅपवर स्टेटस बदलणं, मेसेजेस पाठवणं आणि त्यांवरील ‘रिप्लाय’, ‘लाईक्स’, ‘कमेंटस्’ पाहणं, त्यासाठी तासन्तासाचा वेळ खर्ची घालणं ही आज असंख्य तरुण-तरुणींची दिनचर्या झाली आहे. यातून आभासी जगातलं रमलेपण विलक्षण वाढत असून ते चिंताजनक आहे.

सुचित्रा दिवाकर 

Back to top button