दिलीपकुमार : अमिताभ बच्चन यांच्या नजरेतून

दिलीपकुमार
दिलीपकुमार

दिलीपकुमार यांचं काम मी पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच ते माझा आदर्श बनले. केवळ मलाच नव्हे, तर चित्रपटसृष्टीत पदार्पण करून कॅमेर्‍याला सामोरं जाण्याचं स्वप्न बाळगणार्‍या हजारो लोकांना प्रेरणा देणारं व्यक्‍तिमत्त्व म्हणजे दिलीपकुमार. कॅमेर्‍यासमोरचा त्यांचा वावर, त्यांचा प्रभाव आणि चित्रपटसृष्टीशी त्यांची असलेली निष्ठा या बाबी विचारात घेता 'दिलीपकुमार यांच्यापूर्वी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर' अशी चित्रपटसृष्टीच्या प्रवासाची विभागणी करावी लागेल.

श्रेष्ठता, परिपूर्णता आणि निर्दोष अभिनयाचे उच्च मापदंड दिलीपकुमार यांनी आपल्या सादरीकरणातून चित्रपटसृष्टीत प्रस्थापित केले आहेत. कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये त्यांच्यासमोर जी व्यक्‍ती असेल, तिच्याशी समरस होण्याची ताकद हा त्यांच्या अभिनयाचा सर्वश्रेष्ठ पैलू मानावा लागेल. कोणत्याही भूमिकेशी तादात्म्य पावण्याची त्यांची क्षमता आणि संवादफेकीची शैली एकमेवाद्वितीय होती. कुणालाही ती उंची गाठता येणं शक्य नाही.

त्यांच्या घरी माझं जाणं-येणं फारसं झालं नसलं, तरी जितक्या वेळा हा योग आला, तितक्या आठवणी माझ्यासोबत राहिल्या. किरकोळ बदल वगळता त्यांचं प्रशस्त घर अनेक दशकांनंतरही होतं तसंच राहिलं. दिलीपकुमार यांच्याशी झालेली माझी प्रत्येक भेट संस्मरणीय ठरली आहे. कलावंत आणि चित्रपटसृष्टीतल्या लोकांबरोबर झालेली बैठक असो, मध्यरात्री सहज केलेला फोन असो, दिलीप साहेबांचं बॅडमिंटनमधलं कौशल्य पाहण्यासाठी दिलेली सदिच्छा भेट असो, दिलीपकुमार आणि त्यांच्या पत्नी सायरा बानू यांच्याबरोबर त्यांच्या प्रशस्त लॉनवर 'जमीर' चित्रपटाचं झालेलं झालेलं शूटिंग असो.

त्यांच्या घरी जाण्याचा प्रत्येक प्रसंग माझ्या स्मृतींवर कोरला गेला आहे. साहजिकच आहे! दिलीपकुमार हे असे अभिनेते होते, ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी मी विद्यापीठातल्या माझ्या मित्रांसह रात्रीच्या वेळी अनेकदा वसतिगृहाचे नियम मोडले आहेत. आन आणि शहीद हे त्यांचे ऐतिहासिक धाटणीचे चित्रपट मी अतिशय अपुर्‍या सोयीसुविधा असलेल्या अंधार्‍या चित्रपटगृहात पाहिल्याचं अजून आठवतं.

चार आण्याचं तिकीट काढून आम्ही चित्रपटगृहांच्या पहिल्या रांगेत, लाकडी बाकड्यांवर बसत असू आणि आमच्या या लाडक्या हिरोचा अभिनय पाहून थक्‍क होत असू. आम्ही अनेकांचे चित्रपट पाहिले; पण माझ्या मनात दिलीपकुमार यांचं स्थान नेहमीच वेगळं आणि प्रतिष्ठेचं राहिलं आहे. दिलीप साहेब लहानपणापासूनच माझे आदर्श होते. 'गंगा जमुना' हा मला त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट वाटतो. परंतु या चित्रपटासाठी त्यांना कोणतंही पारितोषिक मिळालं नाही, याची खंत वाटते.

अशा या माझ्या आदर्श अभिनेत्याबरोबर जेव्हा मी 'शक्‍ती' चित्रपटाच्या मुहूर्ताचा शॉट देण्यासाठी जुहू बीचवरच्या वाळूत कॅमेर्‍यासमोर उभा राहिलो, तो अविस्मरणीय क्षण ठरला. आमच्या दोघांचा एकत्रित असा हा एकमेव चित्रपट. आमच्या दोघांवर चित्रीत झालेला या चित्रपटातला पहिला सीन तुरुंगातला होता. पोलिस अधिकारी असलेले माझे वडील म्हणजेच दिलीपकुमार मला भेटायला येतात आणि आयुष्यात मी चुकीच्या दिशेने जात आहे, हे मला समजावून सांगू पाहतात.

मी त्यांचं म्हणणं नाकारतो, असा तो सीन होता. ज्या अभिनेत्यावर वर्षानुवर्षं जीवापाड प्रेम केलं, त्याच्या समोर उभं राहणं, एवढंच नव्हे तर त्याच्याशी मतभेद व्यक्‍त करणं… खरोखर कठीण होतं. चित्रपटातले अनेक सीन असेच होते आणि शूटिंग संपेपर्यंत अनेक दिवस हेच सुरू राहिलं. श्रेष्ठ लेखकद्वयी सलीम-जावेद यांनी चित्रपटात आम्हा दोघांमधील संघर्षाचे अनेक धारदार सीन रेखाटले होते. प्रत्येक सीनमध्ये उत्तम आणि प्रभावी नाट्य ठासून भरलेलं होतं.

या चित्रपटाचं काम संपलं त्याच काळात 'कूली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी जखमी झालो. जेव्हा रुग्णालयातून घरी आलो, तेव्हाही पूर्णपणे बरा झालो नव्हतो. घराबाहेर पडण्याइतका मी तंदुरुस्त झालो नव्हतो, म्हणून 'प्रतीक्षा' या माझ्या घरातच मला 'शक्‍ती'ची फायनल प्रिंट दाखवली गेली.

ती पाहताना मला नेपाळमधलं, काठमांडूच्या एका कोपर्‍यातलं एक जुनाट थिएटर आठवत होतं… तिथं बसून मी 1954 च्या सुमारास दिलीपकुमार यांचा चित्रपट पाहिला होता. याच कलावंतासोबत, त्याच्या पुढ्यात उभं राहून मला अभिनय करण्याची संधी मिळेल, असं त्यावेळी वाटलं होतं का? अजिबात नाही. आजही खरं वाटत नाही. अशा महान अभिनेत्यासोबत आपण एक चित्रपट केला, हे मला आजही स्वप्नच वाटतं. परमेश्‍वर खूप उदार आहे. दिलीप साहेबांसोबत काम करण्याची संधी मला दिली.

ज्यांना आदर्श मानलं, त्या दिलीप साहेबांसोबत केलेल्या 'शक्‍ती' चित्रपटाच्या अनेक आठवणी स्मृतिपटलावर कोरल्या गेल्या आहेत. या चित्रपटात माझ्या मृत्यूचा सीन मुंबई विमानतळावर चित्रित करण्यात आला आहे. त्यावेळी ते सहार विमानतळ म्हणून ओळखलं जात असे आणि चित्रीकरणासाठी खास परवानगी घेण्यात आली होती. आता अशी परवानगी मिळणं जवळजवळ अशक्य आहे.

माझ्या सीनची रिहर्सल मी करीत होतो. आजूबाजूला चित्रीकरणासाठी आलेल्या कर्मचार्‍यांचा कलकलाट आणि उपकरणांचा आवाज सुरू होता. लोक गप्पा मारत होते आणि दिलीपकुमार यांचा सीन चित्रित होण्यास वेळ असल्यामुळं ते माझ्याबरोबर रिहर्सल करीत नव्हते. अचानक ते कर्मचार्‍यांवर ओरडले. त्यांना शांत राहायला सांगितलं आणि रिहर्सल करीत असलेल्या कलावंताचा आदर करा, असा सल्लाही थोड्या चढ्या आवाजातच दिला.

या क्षेत्रात लोकप्रियतेची, यशाची उंची गाठलेल्या त्यांच्यासारख्या कलावंतानं दुसर्‍या कलावंताची इतक्या आस्थेनं दखल घेण्यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. 'शक्‍ती'चं चित्रीकरण सुरू असताना कॅमेर्‍याच्या मागं मी त्यांच्यासोबत खूपच अनमोल क्षण अनुभवले. एकदा मी, सलीम आणि जावेद साहेब रात्री दोन वाजता दिलीप साहेबांना भेटायला गेलो. अर्थातच तेव्हा ते झोपलेले होते. परंतु आम्ही आलो आहोत, हे कळताच उठून ते ड्रॉइंग रूममध्ये आले. त्यानंतर दोन तास आम्ही गप्पा मारल्या. असे क्षण त्यांच्यासोबत अनुभवायला मिळाले, हे मी माझं भाग्य समजतो.

एक अभिनेता म्हणून दिलीपकुमार यांची थोरवी माझ्या शब्दांत सांगायची झाल्यास मी एवढंच म्हणेन, की दिलीपकुमार यांनी केलेला कोणताही सीन पाहिल्यावर मला नेहमी असं वाटत आलंय की, हा सीन यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करताच येऊ शकत नाही. याला म्हणतात परिपूर्ण अभिनेता!

अमिताभ बच्चन ज्येष्ठ अभिनेते

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news