परंपरा : एकात्मतेचा संदेश देणारा पाडवा | पुढारी

परंपरा : एकात्मतेचा संदेश देणारा पाडवा

वर्षप्रतिपदेस येणारा गुढीपाडवा हा भारतीय सण आपल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत गुढीपाडवा या सणाचे अखंड असे समान सांस्कृतिक सूत्र आहे. विविधतेतील एकता या आपल्या परंपरेनुसार या सणाचे भारताच्या विविध भागातील स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. 22 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने…

गुढीपाडवा हा हिंदू समाजजीवनातील एक महत्त्वाचा क्षण असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुढी का उभारली जाते, तिच्यामागे कोणकोणते संदर्भ आहेत, गुढी हा शब्द कोणकोणत्या ग्रंथांतून आला आहे, संत साहित्यात गुढीविषयी काय म्हटले आहे या सर्व पैलूंचा ऊहापोह प्रस्तुत लेखातून करण्यात आला आहे. आपण साजरा करत असलेल्या सण-उत्सवांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट झाल्यास राष्ट्राचे सांस्कृतिक व सामाजिक ऐक्य अभंग व अखंड राहू शकते. त्यामुळे या सण समारंभांना भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेत विशेष महत्त्व आहे हे लक्षात घेतले पाहिजे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत गुढीपाडवा या सणाचे अखंड असे समान सांस्कृतिक सूत्र आहे. विविधतेतील एकता या आपल्या परंपरेनुसार या सणाचे भारताच्या विविध भागातील स्वरूपही लक्षात घेण्यासारखे आहे. आपल्या सण समारंभांनी विविध सुंदर सुवर्णकण मागे ठेवले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे कण संकलित करून गुंफल्यास जणू एक आकर्षक अलंकारच तयार होऊ शकतो.

वर्षप्रतिपदेस येणारा हा भारतीय सण आपल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस हा सण महाराष्ट्रासह देशभरात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या सातवाहन ऊर्फ शालिवाहन या राज्यकर्त्याच्या इतिहासात या सणाचे विशेष संदर्भ आहेत. शालिवाहनाच्या पराक्रमाप्रमाणेच त्यांच्या सांस्कृतिक जीवनाची एक वेगळी खूण आहे. ‘वेदांग उपनिषद’ या ग्रंथामध्ये या सणाचे महत्त्व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असे वर्णन करण्यात आले आहे. या दिवशी मंगलदायी, शुभकार्यास प्रारंभ आणि त्यांचा संकल्प करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. प्रत्येकाने आपल्या घरी उभी केलेली गुढी हे सांस्कृतिक विजयाचे, संपन्नतेचे आणि समृद्धतेचे प्रतीक आहे, असे भारतीय परंपरेत मानले जाते. या दिवसापासून राम जन्मोत्सवाच्या उत्सवासही प्रारंभ केला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सुप्रभाती मंगल स्नान करून सूर्योदयानंतर लगेचच घरोघरी गुढी उभारली जाते. बांबूच्या काठीला कडुनिंबाची डहाळी, आंब्याची डहाळी, साखरेची माळ आणि सुंदर वस्त्राने सजवले जाते. गुढीची पूजा कस्रून त्या दिवशी नैवेद्यही दाखवण्यात येतो आणि आनंदाचे आदान-प्रदान करून शुभेच्छा दिल्या जातात. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात म्हणजेच शालिवाहनाची सत्ता असलेल्या सबंध दक्षिण भारतात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. गौतमीपुत्र सातकर्मी या शालिवाहन सम्राटाची सत्ता भारताच्या दक्षिण भागात होती आणि शिवाय ती आग्नेय आशियातही पसरलेली होती. त्यामुळे या सम्राटाच्या विजयोत्सवाचा जागर करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी शालिवाहन संवत्सरास प्रारंभ झाल्याने सातवाहनांच्या पराक्रमांचे गीत दरवर्षी पुन्हा पुन्हा गायले जाते. सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरी येथील तीर्थकल्प या स्तंभापासून दरवर्षी मोठी मिरवणूकही काढली जाते आणि सातवाहनांचे पोवाडे गायिले जातात.

याखेरीज गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे वाचन करून फलश्रवण केले जाते आणि संवत्सराचे महत्त्व सांगितले जाते. कोपरगावमध्ये संवत्सर नावाचे छोटेसे खेडे असून तेथून ही परंपरा सुरू झाली असावी, असा संकेत आहे. चंद्र, नक्षत्र आणि सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश या अनुषंगाने हे संवत्सर फल दिलेले असते. पंचागांतील संवत्सर फल देशातील सर्व लोकांना मिळावे अशी यामागची धारणा आहे. देशाच्या कोणत्या भागात यानंतर समृद्धी येईल आणि कुठे सांस्कृतिक विजयाचे ढोल वाजवले जातील, हे संक्षेपाने या संवत्सर फलामध्ये नमूद केले जाते. वर्षप्रतिपदेच्या दिवशी विविध ग्रहांची स्थिती आणि कुटुंब व समाजास होणारा लाभ या अनुषंगाने नववर्षाच्या आगमनाची सुखदशी चाहूल प्रकट करण्यासाठी संवत्सरफलाचे वाचन केले जाते. संवत्सर चक्रातील आठवा भाग नावाच्या पर्वाचा प्रारंभ 27 व्या संवत्सरापर्यंत आणि 20 व्या संवत्सराचा स्वामी हा पालनकर्ता विष्णू आहे असे मानण्यात येते. ब्रह्मदेवाने पहिली तिथी सर्वांत श्रेष्ठ म्हणून घोषित केली. तिचे पहिले पद म्हणून ही वर्षप्रतिपदा मानण्यात आले आहे. या तिथीला कर्नाटक व आंध्रात उगादी असेही म्हटले जाते. पंचांग श्रवणाचे फलित म्हणजे गंगा स्नानाइतके पवित्र आहे, असे परंपरेनुसार मानण्यात येते.

महाराष्ट्रातील गुढीपाडव्याचा सण किती प्राचीन आहे याचे संशोधन केले असता असे लक्षात येते की, महाभारताच्या आदीपर्वात म्हणजे अध्याय पहिला श्लोक 63 मध्ये उपरिचर या कुरुवंशीय राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदराप्रीत्यर्थ त्याने जमिनीत रोवली आणि दुसर्‍या दिवशी म्हणजेच नववर्षप्रारंभीच्या दिवशी त्याने या काठीची मनोभावे पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले. ही गुढी म्हणजे यशाचे प्रतीक मानली जाते.

गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक परंपरेचे पाच महत्त्वाचे संदर्भ आहेत. पहिला संदर्भ म्हणजे ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मतिी केली असे सांगितले जाते. पृथ्वीवरील कालगणतीची सुरुवात या दिवशी झाली, असे भारतीय परंपरेत मानले जाते. दुसरे महत्त्व असे की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्येला परत आले. त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ अयोध्यानगरीत सर्वत्र गुढ्या उभ्या करण्यात आल्याचे मानले जाते. तिसरा संदर्भ म्हणजे शालिवाहन या सातवाहनांच्या प्रमुख सम्राटाने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांंना संजीवन करून त्यांच्या सामर्थ्याच्या सहाय्याने या दिवशी त्याने शक आक्रमकांचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे.

गुढी या शब्दाची उकल करणे फार महत्त्वाचे आहे. तेलगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ काठी असा होतो. तसाच तोरण असाही याचा अर्थ सांगितला जातो. महाराष्ट्र शब्दकोशाचा आधार घेतला असता असे म्हणता येईल की, गुढी उभारण्याची परंपरा ही विजयाचे प्रतीक आहे. प्राचीन युगाबरोबरच मध्ययुगातही गुढी उभारण्याची परंपरा कायम होती. संतसाहित्यातही गुढीचा उल्लेख आढळतो. ज्ञानेश्वरीतील चौथ्या, सहाव्या आणि 14 व्या अध्यायात गुढीचे संदर्भ दिलेले आहेत. यातील एका अध्यायात

अधर्माची अवघी तोडी ।
दोषांची लिहिली फाडी ।
सज्जनाकरवी गुढी ।
सुखाची उभवी ।

असे म्हटले आहे. भगवंत अवतार धारण करतात तेव्हा ते समाजातील नकारात्मक प्रवृत्तींचा नाश करून, नाना प्रकारच्या दोषांचे निराकरण करून सज्जन व्यक्तींच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखाची गुढी उभारतात, असा याचा आशयार्थ आहे. संत नामदेवांच्या अभंगरचनांमध्येही गुढीचा संदर्भ आलेला आहे. तसेच संत चोखामेळांच्या रचनांमध्येही इसवी सन 1338 च्या काळात गुढीचा उल्लेख आला आहे. चोखोबा एका अभंगात म्हणतात की, ‘टाळी वाजवावी, गुढी उभारावी? वाट ही चालावी, पंढरीची?’ सोळाव्या शतकातील संत एकनाथांनी त्यांच्या अनेक प्रतीकांतून गुढी हा शब्द वापरलेला आहे. आपल्या अनुभूतीवर आधारलेल्या कल्पनांना मूर्त स्वरूप देताना संत एकनाथ महाराज ‘रणांगणी, तिन्ही लोकी आणि वैकुंठी’ गुढी उभारण्याचाही उल्लेख करतात. तुकाराम गाथेतील अभंगात संत तुकाराम म्हणतात, ‘पुढे पाठविले गोविंद गोपाळा। देऊनी चपळा हाती गुढी?’ लोकसंस्कृतीच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर या गुढीपाडव्याच्या सणाचा संबंध लोकसंस्कृतीत सर्जनाला मिळणार्‍या ऊर्जेशी जोडतात. कृषी संस्कृतीशी या सणाची नाळ जोडलेली आपल्याला पटवून देतात.

प्राचीन भारतीय ग्रंथ तसेच संत साहित्यातील संदर्भांवरून आपणास गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते. गुढीपाडव्याचे पावित्र्य आणि सामर्थ्य हे लोकसाहित्यातून प्रकटले आहे. तसेच त्याविषयी ऋषी आणि कृषी संस्कृतीतील साधर्म्य लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना या दोन्ही संस्कृतींचे महन्मीलन गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रकट झाले आहे.

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर 

Back to top button