आता तरी ऐकणार का ‘एलिफंट व्हिस्पर्स’?

एलिफंट व्हिस्पर्स
एलिफंट व्हिस्पर्स
Published on
Updated on

'द एलिफंट व्हिस्पर्स' या माहितीपटाला मिळालेल्या ऑस्करमुळे देशप्रेम ओसंडून वाहतंय. या सगळ्या आनंदोत्सवात माहितीपटाच्या आशयाकडे दुर्लक्ष होते आहे. आज हत्ती आणि माणसामधला संघर्ष प्रचंड वाढतोय. माणसांच्या वस्तीत हत्ती घुसतायत आणि माणूस हत्तींना संपवतोय. हे सारं थांबेल का? आता तरी आपण हत्तीच्या हाका ऐकणार का?

तामिळनाडूतील वन्यजीव फोटोग्राफर कार्तिकी गोन्साल्विस ही पाच-सहा वर्षांपूर्वी उटी परिसरातल्या जंगलातून चालली होती. तिथं तिला एक तीन महिन्यांचं हत्तीचं पिल्लू एका माणसाबरोबर मजेत निघालेलं दिसलं. गंमत म्हणून कार्तिकी त्या माणसाच्या पाठून निघाली. त्या माणसाचं नाव होतं बोम्मन आणि हत्तीच्या पिल्लाचं नाव होतं 'रघू'.

पुढे त्या प्रवासातच कार्तिकीला बोम्मनची जीवनसाथी बेल्लीही भेटते. जखमी आणि मरणप्राय अवस्थेत सापडलेल्या 'रघू'ला जीव लावून या जोडप्यानं त्याचं संगोपन केलेलं असतं. आज एकीकडे माणूस हत्तीच्या जीवावर उठला असताना, हत्तीवर पोटच्या पोराची माया करणारी ही जोडगोळी तिला वेगळी वाटली. हे दोघे जीवनसाथी आणि रघू हाथीची गोष्ट म्हणजे ऑस्कर पुरस्कार विजेता माहितीपट 'द एलिफंट व्हिस्पर्स'.

लॉस एंजिलिसमध्ये झालेल्या ऑस्कर नाईटमध्ये तामिळनाडूतल्या कार्तिकी गोन्साल्विसनं दिग्दर्शित केलेल्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला यंदाचा सर्वोत्कृष्ट माहिती ऑस्कर मिळाला. गुनीत मोंगा यांनी या माहितीपटाची निर्मिती केलीय. 'नाटू नाटू' या लोकप्रिय गाण्याला मिळालेलं गाण्यासाठीचं ऑस्कर आणि 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला एक ऑस्कर अशा दोन ऑस्करच्या बाहुल्या यंदा भारतात आल्या आहेत. संपूर्ण देशभर या ऑस्कर विजयाचा आनंद साजरा झाला. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर तर पोस्टचा पाऊसच पडला. पण, त्या बिचार्‍या मुक्या हत्तींना त्याचं काय कौतुक? ते कौतुक त्यांच्यापर्यंत तेव्हाच पोचेल जेव्हा हा माहितीपट अधिकाधिक लोक पाहतील. नुसता पाहूनही काही उपयोग नाही, तर त्यातले प्रश्न समजून घेतील. हत्ती समजून घेतील. कारण आज हत्ती आणि माणसातला वाद हा एका अवघड टप्प्प्यावर येऊन पोचलाय.

देशात दरवर्षी सरासरी 500 माणसांचा हत्तींच्या हल्ल्यांत मृत्यू होतो. त्याचप्रमाणे, लोकांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात 100-150 हत्तीही मृत्युमुखी पडतात. हे आकडे सरासरीचे आहेत. त्यामुळे त्याच्या पलीकडे हे आकडे आहेत. या संघर्षांमध्ये 2015-2018 या काळात 2,381 माणसं आणि 490 हत्ती तर 2018-2020 या काळात 1401 माणसं आणि 301 हत्ती मृत्युमुखी पडलेत. हे सगळं का होतंय, ते सर्वांना कळायला हवं.

माणूस आज शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या आहारी गेलाय. त्यामुळे सगळ्या जंगलांचे आकार कमी होत चाललेत. जी जंगलं उरली आहेत, त्यातूनही रस्ते गेले आहेत. नद्यांची पात्रं ओस पडली आहेत. जंगलातली जैवविविधता धोक्यात आल्यामुळे हत्तीसारख्या प्राण्याला अन्नपाण्यासाठी रानोरान भटकावं लागतंय. हे सगळं माणसानं निसर्गावर केलेल्या अत्याचारामुळं घडतंय.

ठाण्यात राहणारा आनंद शिंदे हा एक धडपड्या फोटो जर्नलिस्ट हत्तीच्या प्रेमात पडून हत्तींशी संवाद साधू शकणारा एलिफंट एक्सपर्ट बनलाय. त्यानं हत्ती वाचवण्यासाठी 'ट्रंक कॉल, द वाइल्डलाइफ फाऊंडेशन' ही संस्थाही स्थापन केलीय. तो गेले अनेक वर्षे हत्ती आणि माणसांच्या नात्यासंदर्भात लोकांना समजावून सांगतोय. तो म्हणतो की, हत्ती माणसांच्या भागात दोन कारणांसाठी येतात. एक तर त्याच्या अधिवासाजवळचं अन्न-पाणी नष्ट झाल्यामुळे नव्या अन्नाच्या शोधात ते येतात. त्यात त्यांना अन्नाचा वास पटकन् येतो. दुसरं म्हणजे हत्तीची जेनिटिक मेमरी प्रचंड असते. त्यामुळे ते आपली वाट पिढ्यान्पिढ्या विसरत नाहीत. त्यामुळे हत्ती एका भागात सतत येत राहतात.

आपण हत्तीचं घर सुरक्षित ठेवू शकलो तर तो आपल्या घरात येणार नाही. गेली वीस वर्षे आपण हत्तींना पळवून लावतो आहोत. आता पुढची वीस वर्षे आपण त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी दिली, तर ते आपल्या परिसरात येणं नक्की कमी करतील. आपलं घर सुरक्षित राहण्यासाठी हत्तीचे अधिवास सुरक्षित राहायला हवेत. कारण हत्ती वाचले तर माणूसही वाचणार आहे, असं आनंदच्या संस्थेचं ब—ीदवाक्यच आहे.

आसाममध्ये या हत्ती-मानव संघर्षानं आजवर हजारो जीव गेलेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून आसाममधल्या नागाव इथं एक अनोखा प्रयोग करण्यात आला. त्याला चांगलं यशही मिळतंय. तिथले निसर्गप्रेमी बिनोद डुलू बोरा यांनी हा प्रयोगाची कल्पना मांडली आणि स्थानिक ग्रामवासीयांच्या सहकार्याने ती प्रत्यक्षातही आणली गेली. या सर्वांनी मिळून गावात सभा घेतल्या. हत्तीचा प्रश्न समजावून सांगितला. ग्रामस्थांना पटवून देऊन लोकसहभागातून 200 बिघा म्हणजे जवळपास 33 हेक्टर जमीन दान मिळवली.

या दान जमिनीमध्ये हत्तीला आवडणार्‍या भात, नेपियर गवत, केळी, ऊस अशा झाडांची लागवड करण्यात आली आणि हत्तींसाठी फूडझोन तयार करण्यात आला. नागावमध्ये राबवलेली ही योजना यशस्वी झाल्याचं पाहून शेजारच्या सामागुरी आणि बेहरामपूर भागातल्या नागरिकांनीही ही कल्पना उचलून धरली. त्यांनी 10 हेक्टर जागेवर हत्तींसाठी फूडझोन तयार केला. त्यामुळे आता हत्ती शेतात येणं कमी झालंय. निसर्गावर जसा माणसाचा अधिकार आहे तसाच प्राण्यांचाही आहे, हे आपण विसरल्यामुळे हा संघर्ष होतो आहे, हे पटल्यानंच हा बदल त्यांनी स्वीकारला. हे आसाम मॉडेल सर्वत्र अनुकरण्याची आज गरज निर्माण झालीय.

भारत जगातल्या 60 टक्के हत्तींचं घर मानलं जातं; पण बिचारा मुका, शांत स्वभावाचा हा विशालकाय पशू आपल्या जीवन-मरणाची लढाई लढतो आहे. हस्तिदंतासाठी होणारी हत्तींची शिकार आणि रहिवासाची ठिकाणं लुप्त होत असल्यानं हत्तींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. त्यामुळे 'आययूसीएन'च्या लाल यादीत म्हणजेच धोक्यात असलेल्या प्रजातीच्या यादीत हत्तींचा समावेश करण्यात आला आहे.

भारताने गेल्या शतकभरात 50 टक्क्यांहून अधिक हत्ती गमावलेत. हत्तींसाठी संरक्षित असलेले अधिवास नष्ट होत असल्यानं त्यांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढतंय. हत्तींच्या बहुतांश अधिवासांमधून रेल्वेमार्ग गेले आहेत. या मार्गावर रेल्वेची गती कमी असावी, अशी मागणी वारंवार होत आहे. एकीकडे माणसाचा अमर्याद विकास आणि शिकारीचा हव्यास यामुळे हा महाकाय प्राणी आज अडचणीत आला आहे.

रेल्वेच्या धडकेत हत्तींच्या मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. याशिवाय विजेच्या तारेमुळे बसणार्‍या धक्क्यांनीही हत्तीचे मृत्यू होतात. जंगलातली संपत चाललेली वनसंपत्ती, पारंपरिक जलस्रोतांचा आणि मार्गिकांचा र्‍हास यामुळेही अनेक हत्ती आपला प्राण गमावत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत हत्ती संवर्धनासाठी विविध पातळ्यांवर काम सुरू आहे. पण अजूनही म्हणावं तसं यश मिळालेलं नाही.

माणूस आणि हत्ती यांच्या नात्याच्या अनेक गोष्टी आपण इसापनीती, पंचतंत्रापासून अगदी 'हाथी मेरे साथी'सारख्या हिंदी सिनेमापर्यंत पाहिल्या आहेत. असा हा हत्ती आज माणसाच्या वागण्याचा बळी ठरतोय. तो झुंडीने शेतात, वस्तीत घुसतोय. शेकडो एकर शेती नष्ट करतोय. मग माणसं चवताळून त्याच्या अंगावर फटाके फोडताहेत. त्याला ठार मारताहेत आणि नको नको ते अघोरी उपाय करताहेत. पण हे सगळं करण्यापेक्षी हत्ती असा का वागतोय, ते समजून घ्यायला हवं.

नीलेश बने 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news