Kane Williamson : तारणहार | पुढारी

Kane Williamson : तारणहार

सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक व मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता, वेग इत्यादींबाबत मर्यादा दिसू लागतात. तथापि केन विल्यमसन (Kane Williamson) याने आपण अजूनही पूर्वीइतकेच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केले आहे. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या सामन्यांमध्ये स्वतःचा नावलौकिक कसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे.

कितीही मोठे आव्हान समोर असले तरी आत्मविश्वासाला कष्ट व जिद्द याची जोड दिली की आपोआप असाध्य गोष्टही साध्य करता येते हे न्यूझीलंडचा हुकमी फलंदाज केन विल्यमसन याने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत दाखवून दिले. शेवटपर्यंत संयम राखत त्याने आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने शेवटच्या चेंडूवर ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याची आणि पर्यायाने न्यूझीलंडची ही कामगिरी सर्वांसाठी धक्कादायकच होती. तुल्यबळ असलेल्या या दोन संघांबरोबरच अन्य देशांमधील क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये या सामन्यात कोण विजयी होणार याची उत्सुकता निर्माण झाली होती. हा सामना श्रीलंकेने जिंकला असता तर भारतीय संघाचे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीचे स्थान डळमळीत झाले असते. ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

विजयासाठी दुसर्‍या डावात 285 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर होते. खरं तर त्यांच्याकडे असलेल्या अनुभवी फलंदाजांचा ताफा लक्षात घेतला तर हे आव्हान त्यांच्याकरिता माफक होते. मात्र लंकेकडे देखील द्रुत आणि मध्यम गोलंदाजांचा ताफा होता. हवेतील ओलसरपणाचा फायदा घेण्याबाबत हे गोलंदाज अतिशय निष्णात मानले जातात. त्याखेरीज त्यांच्याकडे अनुभवी फिरकी गोलंदाजी होते. या गोलंदाजांच्या जोरावर न्यूझीलंडला 284 धावांमध्ये गुंडाळण्याचे नियोजन लंकेने केले होते. त्यातच पहिली विकेट झटपट घेतल्यामुळे लंकेच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. शेवटच्या दिवशी 52 षटकांमध्ये 257 धावा करण्याचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर होते.

विल्यमसन हा जरी आक्रमक फलंदाज मानला जात असला तरी संघास आवश्यक असेल त्याप्रमाणे चिकाटी आणि संयमाने फलंदाजी करण्याबाबत तो हुकमी खेळाडू मानला जातो. अनेक वेळेला त्याने जिद्दीच्या जोरावर संघाला पराभवाच्या छायेतून विजय मिळवून दिला आहे. खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी करतानाच आवश्यक त्यावेळी आक्रमक फटका मारण्याच्या संधीही तो सोडत नाही हे त्याने आजपर्यंत अनेक वेळा दाखवून दिले आहे. लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डॅरील मिचेल याच्याबरोबर 142 धावांची भरभक्कम भागीदारी केल्यानंतर त्याने संघाच्या विजयाची जबाबदारी सर्वार्थाने आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. आपल्या संघाचा कर्णधार टीम साऊदी याने आपल्यावर टाकलेला विश्वास त्याने सार्थ ठरविला.

विल्यमसन (Kane Williamson) याच्याबरोबरच वॅग्नर हा देखील कौतुकास पात्र आहे. खरं तर मोठ्या दुखापतीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आपल्या संघाला आपली गरज आहे हे त्याने ओळखले आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही फलंदाजीस आला. त्याने विल्यमसन याला योग्य साथ देत संघास विजयश्री मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. शेवटची विजयी धाव या दोन खेळाडूंनी काढली तेव्हा खरं तर वॅग्नर याची दुखापत आणखी गंभीर होण्याची शक्यता होती. मात्र त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता विलक्षण मुसंडी मारून विजयी धाव घेतली.

दुसर्‍या टोकाला विल्यमसन याने सूर मारून क्रीझमध्ये पोहोचण्यात यश मिळविले. यावेळी त्याने दाखवलेले चापल्य खरोखरीच कौतुकास्पद आणि टीकाकारांना चोख उत्तर देणारे होते. या मालिकेपूर्वी विल्यमसन याला प्रसारमाध्यमांनी निवृत्त केव्हा होणार असे प्रश्न विचारले होते. एवढेच नव्हे तर त्याने निवृत्त होऊन युवा खेळाडूसाठी जागा रिकामी करावी, असाही सल्ला देण्यात आला होता. मात्र पहिल्या कसोटीत त्याने केलेली 94 चेंडूंमध्ये नाबाद 121 धावांची खेळी त्याच्याकडे असलेल्या अतुलनीय कौशल्याचे द्योतकच आहे.

कितीही कठीण प्रसंग असला तरी शांतपणे आणि खंबीर मनोधैर्य ठेवत त्याला सामोरे गेले की, आपोआपच सर्व समस्या दूर होऊ शकतात याचे बाळकडू विल्यमसन याला घरातच मिळाले आहे. त्याचे वडील ब—ेट हे स्वतः सतरा वर्षाखालील गटात राष्ट्रीय स्तरावर आणि क्लब स्तरावर क्रिकेट खेळले आहेत तर त्याची आई सॅन्ड्रा या स्वतः बास्केटबॉलपटू होत्या. विल्यमसन याच्या किली व सैफा तसेच जुळा भाऊ लोगान उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आहेत. घरातच खेळासाठी पोषक वातावरण असल्यामुळे लहानपणीच विल्यमसन याच्या क्रिकेट कारकिर्दीला प्रोत्साहन दिले गेले. वयाच्या चौदाव्या वर्षीच तो वरिष्ठ खेळाडूंबरोबर सामने खेळू लागला तर 16 व्या वर्षी त्याने प्रथम श्रेणीच्या सामन्यांच्या करिअरला सुरुवात केली. (Kane Williamson)

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला फलंदाजीत सपशेल अपयश आले होते. तेव्हा त्याच्याविषयी प्रसार माध्यमांनी तोंडसुख घेतले होते. मात्र या टीकेकडे दुर्लक्ष करीत त्याने चांगले यश मिळवले आणि त्यानंतर सतत यशाचे नवीन टप्पे ओलांडले. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी आक्षेप घेण्यात आले होते. त्यांच्याजागी दुसरा कोणी खेळाडू असता तर त्याने सततच छान टीकेमुळे खेळाला रामराम ठोकला असता. तथापि जिगरबाज आणि सतत आव्हानास सामोरे जाण्याची क्षमता असलेल्या या खेळाडूने आपल्या गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा केली. त्यानंतर त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये हुकमी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

गेल्या सोळा वर्षांच्या कारकिर्दीत (Kane Williamson) त्याने कसोटी सामन्यांमध्ये जवळजवळ आठ हजार धावा व त्यामध्ये सत्तावीस शतके व तेहतीस अर्धशतके अशी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. कसोटीमध्ये 53.8 धावांची सरासरी व 51.06 धाव गती (स्ट्रायकिंग रेट) ही त्याची कामगिरी खूपच बोलकी आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांबाबतही तो अतिशय नामांकित खेळाडू मानला जातो. एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 शतके व 42 अर्धशतकांसह 6500 पेक्षा अधिक धावा तर टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये 17 अर्धशतकांसह 2400 हून अधिक धावा करण्याची किमया त्याने साध्य केली आहे. प्रतिस्पर्धी संघातील द्रुत व मध्यम गती गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाजांचाही खरपूस समाचार घेण्याची शैली त्याच्याकडे आहे हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे.

दोन वर्षांपूर्वी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धांच्या विजेतेपदावर न्यूझीलंडने नाव कोरले, त्यावेळी या संघाचे नेतृत्व विल्यमसन याने केले होते. अंतिम सामन्यात त्यांच्यापेक्षा भारताचे पारडे जड मानले जात होते, मात्र आपल्या सहकार्‍यांकडून इप्सित ध्येय कसे चांगल्या रीतीने साकार करता येते हे त्याने दाखवून दिले. या विजेतेपदाबरोबरच त्याने आपल्या संघास कसोटी आणि अन्य मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्येही देदीप्यमान विजय मिळवून दिला आहे. कर्णधार असो वा नसो, आपल्या संघाचा भरवशाचा सदस्य म्हणून विजयाची मदार आपल्यावर आहे हे ओळखून वेळोवेळी त्याने या सर्व जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडल्या आहेत.

सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक व मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता, वेग इत्यादींबाबत मर्यादा दिसू लागतात. तथापि विल्यमसन याने आपण अजूनही पूर्वी इतकेच प्रभावी कौशल्य दाखवू शकतो हे सातत्याने अलीकडच्या काळात सिद्ध केले आहे. क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या सामन्यांमध्ये आपण संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकतो हे त्याच्या खेळात सातत्याने दिसून आले आहे. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या सर्व स्वरूपाच्या सामन्यांमध्ये स्वतःचा नावलौकिककसा उंचावता येईल याचा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे जिद्द व महत्त्वाकांक्षेला कष्ट आणि त्यागाची जोड दिली पाहिजे.

मिलिंद ढमढेरे

Back to top button