बहार विशेष : प्रदूषणाची ‘धुळ’वड | पुढारी

बहार विशेष : प्रदूषणाची ‘धुळ’वड

डॉ. योगेश प्र. जाधव

देशातील महानगरांमध्ये हवेतील प्रदूषण इतके वाढले आहे की, त्याने नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. भौतिक विकास साध्य करण्यासाठी या महानगरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. पण या निमित्ताने निर्माण होणारी धूळ आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. हवेतील प्रदूषणात सर्वाधिक वाटा या धुळीचाच आहे.

गेल्या मंगळवारीच देशभरात धुळवड साजरी झाली. त्यानिमित्ताने लावलेले आणि उधळलेले रंग एव्हाना निघाले असतील, खाली बसले असतील. मात्र देशातील महानगरांमध्ये अलीकडच्या काही वर्षांत विकासाच्या नावावर जी धुळवड सुरू आहे, ती काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. ती लोकांच्या जीवाशी खेळते आहे. मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद या महानगरांमध्ये हवेतील प्रदूषण इतके वाढले आहे की, त्याने नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. भौतिक विकास साध्य करण्यासाठी या महानगरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. पण या निमित्ताने निर्माण होणारी धूळ आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. हवेतील प्रदूषणात सर्वाधिक वाटा या धुळीचाच आहे.

देशात प्रचंड गतीने वाढत असलेली लोकसंख्या अनेक समस्यांचे मूळ असली, तरी रोजगारासाठी महानगरांकडे धावणारी पावले रोखण्यात आपल्या यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. प्रगतीचा मार्ग शहरातूनच सुरू होतो, ही कल्पना भारतीयांच्या डोक्यात घट्ट बसली आहे. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडत चालली आहेत. खेड्यांकडे चला, असा संदेश महात्मा गांधींनी सुमारे 80 वर्षांपूर्वी दिला होता. खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे त्यांचे ठाम मत होते. पण स्वातंत्र्यानंतर नेमके उलटे घडले. शहरांचा झपाट्याने विकास झाला. गाव खेड्यातून आलेल्या लोकांना सामावून घेताना शहरे आडवी-तिडवी वाढली. त्यांचे सौंदर्य लोप पावले. त्यांना एक प्रकारचा बकालपणा प्राप्त झाला. प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकामे वाढली. पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या. आजही त्याची गती प्रचंड आहे. पण हे करताना जी धूळ निर्माण होते, तिला रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी उपायोजना शोधली गेलेली नाही. परिणामी हवेतील धुळीचे प्रमाण वाढून ती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली. त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहे. हवेतील प्रदूषणाचा प्रादुर्भाव होऊन दिल्लीमध्ये दरवर्षी 30 हजार लोक फुप्फुसाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडतात. यात अनेक लोक फुप्फुसाच्या कर्करोगाला बळी पडलेले असतात.

देशातील प्रत्येक महानगराची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. त्यानुसार तेथे प्रदूषणाची पातळी वर-खाली होत असते. दिल्लीची जमीन समतल आहे. दुसर्‍या बाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. त्यामुळे या शहरात हवा खेळती राहात नाही. विशेषतः हिवाळ्यात वार्‍याचा वेग कमी असल्याने प्रदूषणाची सर्वाधिक पातळी याच काळात असते. दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणात सर्वांत मोठा वाटा बांधकामांपासून निर्माण झालेल्या धुळीचा आहे. तब्बल 38 टक्के प्रदूषण या धुळीमुळे होते. त्याखालोखाल वाहनांमधून होणारे धुराचे उत्सर्जन 20 टक्के आहे. घरगुती गॅसमुळे 10 टक्के तर 11 टक्के औद्योगिक क्षेत्रातून होणार्‍या प्रदूषणाचा वाटा आहे. याशिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमा दिल्लीला भिडलेल्या आहेत. तेथील शेतकरी दरवर्षी जवळपास 35 दशलक्ष टन इतके शेतीतील तण जळतात. त्याचाही परिणाम हवेवर होतो.

दिल्लीतील हवेचा निर्देशांक सर्वसाधारणपणे 150 ते 200 या दरम्यान हेलकावे खात असतो. ही हवा प्रकृतीसाठी खराब समजली जाते. श्वास घेण्यास त्रास होणे, श्वसनाचे विकार जडणे, डोळ्यांचे आजार होणे आदी समस्या या प्रकारच्या हवेमुळे होऊ शकतात. हवा खराब झाल्यानंतर शाळा बंद ठेवणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करणे, प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करणे, असे जुजबी उपाय दिल्ली सरकारकडून केले जातात. पण अविरत चालणार्‍या बांधकामांपासून निर्माण होणार्‍या धुळीवर कसा आळा घालावा यावर अजूनही ठोस उपाय सापडलेला नाही.

दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची अवस्थाही बिकट आहे. दिल्लीपाठोपाठ देशातील दुसर्‍या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून मुंबईची नवी ओळख सांगितली जाते. यावर्षीच्या फेब—ुवारी महिन्याच्या सुरुवातीला तर मुंबई पहिल्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले होते. मुंबईच्या अनेक भागातील हवेचा निर्देशांक 200 च्या आसपास रेंगाळत राहिला होता; तर मुंबईला लागूनच असणार्‍या नवी मुंबईतील नेरूळ येथे एका दिवशी हा निर्देशांक तब्बल 400 वर गेला होता. हवेची ही स्थिती अत्यंत धोकादायक मानली जाते. अर्थात असे असले तरीही दिल्लीच्या तुलनेत मुंबईची हवा चांगली मानली जाते. याचे कारण समुद्रावरून येणारे वेगवान वारे. या वार्‍यामुळे मुंबईवर साचणार्‍या प्रदूषणाचा थर मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होते. पण त्याने प्रदूषण टाळले जात नाही हेही तितकेच खरे. इतर कोणत्याही महानगरापेक्षा मुंबईत पायाभूत सुविधा उभारण्याची कामे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नवे रस्ते तसेच पूल उभारणी, मेट्रोची कामे, गगनचुंबी गृह संकुले उभारण्याचे कामही अविरत सुरू असते. त्याशिवाय दररोज तब्बल 45 लाख वाहने मुंबईच्या रस्त्यावरून धावत असतात. त्यात प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे इतर घटक देखील आहेतच.

महानगरांमध्ये तयार होणारा घनकचरादेखील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालतो. मुंबईचे उदाहरण घ्यायचे झाल्यास या शहरामध्ये दररोज नऊ हजार टन इतका घनकचरा निर्माण होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला घनकचरा ठेवण्यासाठी जागा अपुर्‍या पडत आहेत. त्यामुळे तो घनकचरा जाळण्याचे प्रकार घडतात. त्यातूनही हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होते. बहुतेक मोठ्या शहरांचा हाच प्रश्न आहे. मात्र या कचर्‍यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा अजूनही बाल्यावस्थेतच आहे.

मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी गोराई आणि नवी मुंबई येथे प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रतिदिन बाराशे टन कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तथापि हा उपाय नंतरचा आहे. बांधकामे होत असताना आणि ती पाडली जात असताना होणारी धूळ कशी रोखायची ही या घडीची सर्वात मोठी समस्या आहे. अमेरिका आणि युरोप येथे धुळीला अटकाव करणारी यंत्रणा अस्तित्वात आहे. चीनमध्येही अशी यंत्रणा मोठ्या शहरांमध्ये उभारण्यात आली आहे. मुंबईतही त्याच धर्तीवर काही ठिकाणी अशी यंत्रणा करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आता ही यंत्रणा केव्हा उभारली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हवेच्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य खराब होत चालले आहे. विशेषतः घशाचे विकार वाढले आहेत. त्याचबरोबर वयोवृद्धांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. डोळ्यांचे विकार वाढत आहेत. हवेतील प्रदूषणामुळे दरवर्षी मुंबईत पंचवीस हजार लोकांचा मृत्यू होतो. म्हणजेच दिल्लीच्या खालोखाल सर्वाधिक मृत्यू मुंबईत होतात. एकीकडे नागरिकांच्या सुविधांसाठी पायाभूत सोयी उभ्या करायच्या आणि त्या करत असताना उद्भवलेल्या धुळीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आणण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. बरे, ही प्रक्रिया थांबवता येत नाही. महानगरांवर दररोज आढळणारे लोकांचे लोंढे थोपवता येत नाहीत. कारण या लोकांना त्यांच्या घराजवळ काम उपलब्ध होत नाही. मनरेगासारख्या योजनेतून होणारी रस्त्याची कामे वगळता शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरतील, अशी व्यवस्था गाव-खेड्यातून उभारणे हे अजूनही स्वप्नच राहिले आहे. शिक्षण आरोग्यापासून ते उत्पादन निर्मितीपर्यंतच्या गोष्टी शहरात, त्यातूनही महानगरात आणि त्याच्या लगतच्या भागात उभारण्यावरच भर आहे. युरोपमध्ये जशी छोटी शहरे विकसित झाली आहेत, तशी प्रक्रिया आपल्याकडे अजून सुरूही झालेली नाही.

अन्न-वस्त्र-निवारा यांबरोबरच आरोग्य ही माणसाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे विकास करताना आरोग्याचे भान राखणेही तितकेच गरजेचे आहे. वाहतुकीसाठी रस्ते उभारणी करताना आपण जल वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये जल वाहतुकीवर भर द्यायला हवा. त्याचबरोबर महानगरांमधील नागरिकांना अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासाठी भाग पाडावे लागेल. इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण केंद्र सरकारने आखले आहेच. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न करावे लागतील. नागरिकांनाही हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ते सर्व नियम पाळावे लागतील. कारण स्वतःबरोबरच पुढील पिढीसाठी आरोग्यदायी हवा राखण्याची जबाबदारी सरकारबरोबरच नागरिकांचीही आहे.

Back to top button