राज्‍यरंग : ईशान्येतील विजयाची ‘त्रिवेणी’ | पुढारी

राज्‍यरंग : ईशान्येतील विजयाची ‘त्रिवेणी’

मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा अनेकार्थांनी दिशादर्शक आहे. या विजयाचे वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘त्रिवेणी’ असा जो शब्दप्रयोग केला होता, तो समर्पक आहे. भाजप सरकारचे काम, कार्यशैली आणि कार्यकर्ते यांच्या जोरावरच ईशान्येतील हे यश मिळवणे भाजपला शक्य झाले आहे.

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निडणुकीच्या निकालांचे अनेकार्थांनी महत्त्व आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. ईशान्येतील या तीन राज्यांत 25 लोकसभा मतदारसंघ असून विधानसभेतील विजयानंतर आता येथील राजकीय डावपेच आखले जात आहेत. भाजपसाठी हे निकाल उत्साह वाढवणारे आहेत; तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांसाठी हे निकाल चिंता करायला लावणारे आहेत.

ईशान्य भारतात भाजपला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन योजनेचे फलित असल्याचे मानले जाते. 2014 मध्ये मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा ईशान्य भारतात भाजपची सत्ता नव्हती. आज त्रिपुरा आणि अन्य दोन राज्यांत घटक पक्षांना पाठिंबा देत भाजपने आपले स्थान बळकट केले आहे. त्रिपुरामध्ये सत्तारूढ भाजप-त्रिपुरा (आयपीएफटी) आघाडीला सलग दुसर्‍यांदा सत्ता राखण्यात यश मिळाले असले तरी यावेळी त्यांचे संख्याबळ कमी झाले आहे. परंतु यंदाच्या निकालांमधून मेघालय आणि नागालँड येथे भाजपची राजकीय शक्ती दिसून आली आहे. याउलट कधीकाळी ज्या ईशान्य भारतात काँग्रेसचा प्रचंड दबदबा होता, तेथे आज काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहे. 2014 मध्ये काँग्रेसकडे ईशान्येतील आठपैकी पाच राज्ये होती. त्रिपुरा हा तर डाव्यांचा भक्कम गड – बालेकिल्ला मानला जात होता. पण तेथेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांची ताकद 16 जागांवरून 11 जागांवर येऊन थांबली. ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या काँग्रेसला मेघालयात पाच आणि त्रिपुरात तीन जागा मिळाल्या आहेत. नागालँडमध्ये आणखी एका कार्यकाळासाठी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाहीये. पक्षासाठी ही अत्यंत नामुष्कीजनक बाब आहे.

भाजप आणि मित्रपक्षांना पुन्हा सत्तेत राहण्याबाबत आणि स्थिती बळकट करण्याबाबत सरसकट सर्व पक्षांना दोष देता येणार नाही. त्रिपुरात डावे पक्ष आणि काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा कसलाही फायदा झाला नाही, हे निकालातून स्पष्ट झाले. उलट या दोन राष्ट्रीय पक्षांच्या मतांमध्ये मोठी घसरण झालेली दिसून येते. अर्थात निवडणुकांचे राजकारण हे आकड्यांवर आधारित असते. दुसरीकडे भाजपने आघाडी करण्यासाठी योग्य घटक पक्षांची निवड केली. दोन्ही काँग्रेस आणि डावे या राष्ट्रीय पक्षांनी चुकीचे अंदाज बांधले. त्यामुळे काँग्रेस – माकपला संयुक्त शक्तीतूनही निवडणुकीत लाभ मिळवता आला नाही.

दुसरे म्हणजे या निकालातून ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये भाजप आणि प्रादेशिक पक्षांचे बळकटीकरण दिसून येते. तीन राज्यांतील 119 जागांपैकी 83 टक्के विजय प्रादेशिक पक्षांनी मिळवला. त्यात नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) हा मेघालयात तर नॅशनल डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) हा नागालँडमध्ये महत्त्वाचा पक्ष म्हणून समोर आले. त्रिपुरातील दुसरा सर्वात मोठा पक्ष तिप्रा मोथा हा ईशान्यकडील प्रादेशिक पक्षांच्या वाढत्या प्राबल्याचे संकेत देत आहे.

तिसरे म्हणजे मोदी यांचे काँग्रेसमुक्त भारत हे आता वास्तवात उतरत आहे. आता काँग्रेस आणि माकपची पकड सैल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विजयाची रंजक व्याख्या केली आहे. या यशाचे कारण ‘त्रिवेणी’ आहे, असा शब्दप्रयोग त्यांनी वापरला असून तो समर्पक आहे. त्यांच्या मते, पहिली शक्ती म्हणजे भाजप सरकारचे विकासाभिमुख कार्य, दुसरे म्हणजे भाजपची कार्यशैली आणि शेवटचे म्हणजे भाजपचा कार्यकर्ता. याशिवाय भाजपने मतदारांशी चांगल्यारीतीने संवाद साधला आणि मोफत धान्य, निवासी घरकुल योजना, वेतन आयोगाचे लाभ आणि महिलांच्या सुरक्षेबाबतच्या गोष्टी जनतेसमोर मांडल्या. यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपचा उदय होण्यामागे त्याची जिंकण्याची इच्छाशक्ती होय. ईशान्येकडील प्रादेशिक पक्ष हे भाजपसमवेत जाण्याचे फायदे ओळखून आहेत. म्हणूनच केंद्रात सत्ताधारी असल्याने भाजपसमवेत आघाडी करण्यास ते इच्छुक आहेत. मोदींनी म्हटल्याप्रमाणेच घडले आणि मेघालय, नागालँड येथील ख्रिश्चन मतदारांनी पक्षाला पाठिंबा दिला. यातून भाजप हा अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, ही विरोधी पक्षांकडून केली जाणारी मांडणी खोटी असल्याचे सिद्ध करण्यास भाजप यशस्वी ठरला आहे, असे म्हणावे लागेल.

भाजपने पक्षाला मिळणार्‍या पाठबळाचा अचूक लाभ उचलला. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी ईशान्येकडील राज्यांचे दौरे केले. काँग्रेस आणि माकप यांची अभद्र युती असल्याचे त्रिपुरातील लोकांच्या मनावर ठसविण्यात त्यांना यश आले. याउपरही भाजप स्वत:ला एक अखिल भारतीय राष्ट्रीय पक्ष म्हणून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात ईशान्येकडील विजय हा महत्त्वाचा ठरू शकतो. लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी राहिले असून भाजपला हाच वेग कायम ठेवायचा आहे. पक्षाला काही वेळा गटबाजीचा देखील सामना करावा लागला आहे. काँग्रेसचा विचार केल्यास त्यांनी या राज्यांकडे लक्ष देणे गरजेचे होते. भाजपप्रमाणेच प्रादेशिक पक्षांशी आघाडी करायला हवी होती. अर्थात निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे वरिष्ठ नेते फारसे फिरकले नाहीत आणि भाजपच्या तुलनेत कमी प्रचार केला.

वास्तविक पाहता काँग्रेसने इतिहासात रमणे सोडायला हवे आणि त्याच त्याच जुन्या गौरवगाथेत राहणे बंद करायला हवे. त्यांच्याकडे सेकिया यांच्यासारखा सक्षम प्रादेशिक नेता असून त्याने पक्षाला वेळोवळी वाचविले आहे. पण काँग्रेसने या भागात कुठेतरी संपर्कच गमावला असल्याचे दिसून येते. ही निवडणूक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांच्या मते, ईशान्येकडील राज्ये लहान आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्षासमवेत प्रादेशिक पक्षांची होणारी आघाडी लक्षात घेऊन काँग्रेसला एक पारदर्शक निवडणूक रणनीती आखण्याची गरज दर्शवणारी आहे. ही रणनीती काँग्रेस कधी आणि कशी आखणार हे पाहायचे.

कल्याणी शंकर,
ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली

Back to top button