टेक इन्फो : ’टेक-वॉर’चा पुढील अध्याय | पुढारी

टेक इन्फो : ’टेक-वॉर’चा पुढील अध्याय

डॉ. योगेश प्र. जाधव

‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’ या दिग्गज कंपन्यांमध्ये ’एआय’च्या वापराबाबत प्रचंड स्पर्धा सुरू आहे. विशेषतः, ’चॅट जीपीटी’ ही भन्नाट संकल्पना अवतरल्यानंतर या स्पर्धेला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. जगातील सर्वात वेगवान सर्च इंजिन म्हणून अनभिषिक्त मक्तेदारी निर्माण केलेल्या ’गुगल’ला ’मायक्रोसॉफ्ट’ने ’चॅट जीपीटी’च्या माध्यमातून दिलेला शह मोठा होता. मात्र, नवी ’बार्ड’ ही चॅटबॉट सेवा विकसित करून ’गुगल’ने ‘मायक्रोसॉफ्ट’च्या आव्हानाला टक्कर देण्याचे ठरवले आहे.

माहिती-तंत्रज्ञानाच्या विश्वात आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाल्यापासून नवनवीन तंत्राविष्कार समोर येत आहेत. एखादा बुद्धिवंत, प्रज्ञावान मुलगा वय वाढत जाईल तसतसा अभ्यासानं, अनुभवानं समृद्ध होत जातो आणि आपल्या प्रतिभेतून अभूतपूर्व कार्य घडवण्यास सुरुवात करतो, तसेच काहीसे कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत होत आहे. औद्योगिक आस्थापनांमध्ये ‘एआय’च्या साहाय्याने मानवी श्रमातून-कौशल्यातून केली जाणारी कामे किती जलदगतीने, अचूकतेने आणि अथक-अविरतपणाने केली जात आहेत, हे आता जागोजागी दिसू लागले आहे.

आता माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांमध्ये ‘एआय’च्या वापराबाबत प्रचंड स्पर्धा सुरू झाली आहे. विशेषतः ‘चॅट जीपीटी’ नावाची संकल्पना अवतरल्यानंतर तर या स्पर्धेला नवे आयाम प्राप्त झाले आहेत. वास्तविक पाहता, ‘चॅट जीपीटी’ची सुरुवात सॅम अल्टमॅन नावाच्या व्यक्तीने अ‍ॅलन मस्क यांच्यासोबत 2015 मध्ये केली होती. त्यावेळी ही एक एनजीओ कंपनी होती; परंतु काही कारणांमुळे मस्क यांनी हा प्रकल्प सोडून दिला. परंतु, तंत्रज्ञानाच्या विश्वातील भीष्माचार्य म्हणवल्या जाणार्‍या बिल गेटस् यांनी याचे महत्त्व अचूकपणाने हेरले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे यामध्ये गुंतवणूक केली.

30 नोव्हेंबर 2022 रोजी ‘चॅट जीपीटी’ एक प्रोटोटाईप म्हणून लाँच करण्यात आले. ‘चॅट जीपीटी’ हे एक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक स्वरूप आहे. कोणतेही काम करण्यासाठी माणासाला लागणारा वेळ एका चुटकीसरशी करण्याची किमया यामध्ये आहे. हे एक सॉफ्टवेअर असून, त्याचे पूर्ण नाव जनरेटिव्ह प्रेंटेंड ट्रान्स्फॉर्मर आहे. याला न्यूरल नेटवर्क बेस्ड मशिन लर्निंग मॉडेल असेही म्हणतात. हे सॉफ्टवेअर वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांचे तत्काळ आणि अतिवेगवानपणे उत्तर देते. लाँच झाल्यानंतर या अभिनव संकल्पनेला इतका उदंड प्रतिसाद मिळाला की, एका आठवड्याच्या आत किमान 10 लाख यूझर्सपर्यंत हे सॉफ्टवेअर पोहोचले. असे म्हणतात की, नेटफ्लिक्सला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी 3.5 वर्षे लागली होती; तर ट्विटर आणि फेसबुकला 10 महिन्यांचा आणि इन्स्टाग्रामला 3 महिने लागले होते.

इतका भरभरून प्रतिसाद मिळाल्याचा भरघोस फायदा कंपनीला झाला आणि आज या कंपनीचे मूल्यांकन 20 अब्ज डॉलरच्या पार गेले आहे. ‘चॅट जीपीटी’ला कोणताही प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या डेटाबेसमधून त्याचे उत्तर शोधून काढतो आणि योग्य भाषेत लेखाच्या स्वरूपात ते वापरकर्त्यासमोर मांडतो. यूझर्सना त्यांच्या प्रश्नांची संपूर्ण माहिती मिळते. तसेच दिलेल्या उत्तराने आपण समाधानी आहात की नाही, हे सांगण्याचा पर्यायही यामध्ये आहे. इतकेच नव्हे, तर यूझर्सनी दिलेल्या उत्तरानुसार ते त्याचा डेटा सतत अपडेट करत राहते. याचा वापर कंटेंट तयार करण्यासाठी, अर्ज, निबंध, चरित्र तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

वापरकर्त्याने एखादा चुकीचा प्रश्न विचारल्यास तेही लक्षात आणून दिले जाते. तसेच आपण लिहिलेला मजकूर कवितारूपात हवा असेल, तर तेही ‘चॅट जीपीटी’ला सहज शक्य आहे. इतकेच नव्हे, तर एखाद्या मित्राप्रमाणे ‘चॅट जीपीटी’ तुमच्याशी गप्पा मारते. आजवर आपण अशा काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यासाठी ‘गुगल’चा वापर करत होतो.

‘गुगल’वर काहीही शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सर्च रिझल्टनंतर वेगवेगळ्या वेबसाईट दिसतात; पण ‘चॅट जीपीटी’वर असे होत नाही. येथे तुम्हाला थेट संबंधित निकालावर नेले जाते. त्यामुळेच ‘चॅट जीपीटी’ ही ‘गुगल’च्या पुढची पायरी मानली गेली. दुसर्‍या भाषेत सांगायचे झाल्यास, गेली अनेक वर्षे जगातील सर्वात वेगवान सर्च इंजिन म्हणून अनभिषिक्त मक्तेदारी निर्माण केलेल्या ‘गुगल’ला एका अर्थाने ‘मायक्रोसॉफ्ट’ या त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीने दिलेला हा एक मोठा शह होता. इंटरनेटवरील शोधमोहिमेसाठी आज अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी जगभरात सर्वत्र ‘गुगल’ला पहिली पसंती दिली जाते.

भारताचाच विचार केल्यास मोबाईलवरून केल्या जाणार्‍या सर्चमध्ये गतवर्षाखेरीस ‘गुगल’चा हिस्सा 99.74 टक्के इतका होता. यावरून ‘गुगल’च्या मक्तेदारीची कल्पना येते. इंटरनेट तंत्रज्ञानावर आधारित अशा कंपन्यांचे अर्थकारण हे यूझर्सच्या संख्येवर अवलंबून असते. म्हणजेच यूझर्स हे त्यांच्यासाठी ग्राहक असतात. साहजिकच, ग्राहकांची संख्या जितकी जास्त तितके उत्पन्न अधिक असते. आज ‘गुगल’चा वापर करणार्‍यांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे इथे जाहिरात झळकावण्यासाठी, गुगल सर्चमधील क्रमवारीत अग्रस्थान मिळवण्यासाठी, गुगल मॅपवर झळकण्यासाठी ही कंपनी सांगेल त्या दराने पैसे मोजणार्‍यांची संख्या मोठी आहे. तसेच अब्जावधी लोकांच्या सर्चमधून मिळणार्‍या माहितीचे पृथक्करण करून त्याचाही बाजार-व्यापार केला जातो, हेही आता लपून राहिलेले नाहीये. गेल्या दशक-दोन दशकांमध्ये ‘गुगल’ला टक्कर देणारा पर्यायच उभा राहू न शकल्यामुळे या कंपनीचे सर्च इंजिनच्या क्षेत्रातील स्थान ध्रुवतार्‍यासारखे अढळ राहिले. परंतु, ‘चॅट जीपीटी’च्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने या अढळ स्थानाला हादरा देण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याकडे ‘चॅट जीपीटी’चा वापर फारसा केला जात नाही; पण जगभराचा विचार करता या सॉफ्टवेअरचे सक्रिय वापरकर्ते सुमारे 100 दशलक्षांहून अधिक आहेत. अवघ्या दोन-अडीच महिन्यांमध्ये ‘चॅट जीपीटी’ला मिळालेले हे यश लक्षणीय आहे. त्यामुळेच येत्या काही वर्षांमध्ये गुगलच्या सर्च इंजिनचे अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी भीती टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जाऊ लागली होती. परंतु, एक नवी चॅटबॉट सेवा विकसित करून ‘गुगल’ने मायक्रोसॉफ्टच्या या आव्हानाला टक्कर देण्याचे ठरवले आहे.

‘अल्फाबेट’ या गुगलच्या मातृसंस्थेकडून एआय चॅटबॉट सर्व्हिस डेव्हलप केली जात आहे. या चॅटबॉटचे नाव आहे ‘बार्ड.’ सध्या याला यूझर्सच्या फीडबॅकसाठी जारी करण्यात आले आहे. कंपनी आगामी काही आठवड्यांत याचे लाँचिंग करू शकते. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वतः याला दुजोरा दिला आहे. अलीकडेच एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, कंपनी यूझर्सचा फीडबॅक घेण्यासाठी ‘बार्ड’ नावाचे एक कन्व्हर्सेशनल एआय सर्व्हिस सुरू करीत आहे. टेस्टिंगनंतर आगामी काही आठवड्यांत याला रीलिज केले जाईल. ब्लॉग पोस्टनुसार, एक्सपेरिमेंटल कन्व्हर्सेशनल ‘बार्ड’ला लँग्वेज मॉडल आणि डायलॉग अ‍ॅप्लिकेशन ऊर्फ ‘लाम्बडा’द्वारे तयार केले जाईल. ‘लाम्बडा’ हे एखाद्या व्यक्तीप्रमाणे विचार करते. कंपनी सुरुवातीला ‘बार्ड’च्या हलक्या मॉडल व्हर्जनसोबत टेस्टरसाठी एआय सिस्टीमला रोलआऊट करेल. भविष्यात याच्या एआय सिस्टीमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल.

‘गुगल’ गेल्या सहा वर्षांपासून यावर काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे. ही बाब व्यावसायिक म्हणून या कंपनीचा दूरदर्शीपणा दर्शवणारी आहे. कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारी किंवा अव्वल स्थान मिळवणे जितके कठीण असते तितकेच ते टिकवून ठेवणेही अवघड असते. यासाठी आपल्या समकक्ष एखादा पर्याय विकसित होऊ शकतो याचे भान सदोदित ठेवणे गरजेचे असते. त्याद़ृष्टीने सतत अद्ययावत राहून नवनवीन गोष्टींचा अवलंब करत राहावा लागतो; अन्यथा बुद्धिबळाच्या खेळामध्ये जसे एखादे प्यादेही वजिराला आणि राजाला शह देऊन मात करते, तशा प्रकारे एखादा नवोदितही प्रस्थापितांना धक्का देऊन जाऊ शकतो. ‘चॅट जीपीटी’च्या यशाचे गोडवे गायिले जात असताना ‘गुगल’चे यावर बारकाईने लक्ष असेल, हे वेगळे सांगायला नको. कारण, तंत्रज्ञानाच्या विश्वात ‘गुगल’ने इतक्या खोलवर पाय विस्तारले आहेत की, अशाप्रकारच्या छोट्या प्रयत्नांची चुणूकही कंपनीला क्षणार्धात लागू शकते. ‘चॅट जीपीटी’ हे ज्या प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाते तेही ‘गुगल’चेच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच ‘बार्ड’ ही नवी प्रणाली आणून, ‘गुगल’ने ‘शेर आखिर शेर ही होता है’ याची प्रचिती आणून दिली आहे.

‘बार्ड’मुळे आता येत्या काळात ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’मधील स्पर्धा तीव्र होताना दिसणार आहे. गतवर्षाखेरीपर्यंत ‘चॅट जीपीटी’साठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते; पण आता ते सशुल्क झाले आहे. तसेच ‘चॅट जीपीटी’कडची माहिती 2021 पर्यंत मर्यादित आहे. त्यानंतरची माहिती हे टूल देऊ शकत नाही. ‘बार्ड’बाबत तसे होणार नाही. हे टूल ‘गुगल’चेच असल्यामुळे इंटरनेटच्या विश्वातून नवी-जुनी माहिती सहजगत्या शोधून यूझर्सना देईल. आजच्या काळात अद्ययावत माहिती अत्यल्प काळात उपलब्ध होण्याला यूझर्सच्या लेखी महत्त्व असते. ‘गुगल’कडे असणारा माहितीचा अफाट महासागर पाहता ‘बार्ड’ हे ‘चॅट जीपीटी’वर भारी पडेल, असे दिसते.

‘गुगल बार्ड’च्या मदतीने दैनंदिन कामे अधिक सुलभ होणार आहेत. यूझरला वाटल्यास ते ‘बार्ड’च्या मदतीने अगदी दोन चित्रपटांमध्येही तुलना करू शकतात. इतकेच नव्हे, तर आपल्या घरामध्ये असणार्‍या फ्रिजमध्ये असलेल्या पदार्थांपासून आज जेवणासाठी काय बनवता येईल, याचेही उत्तर ‘बार्ड’ देऊ शकणार आहे. ‘बार्ड’ सर्च इंजिनच्या माध्यमातून गुंतागुंतीच्या गोष्टीही सोप्या करू शकतो. सुंदर पिचाई यांनी ब्लॉगमध्ये लिहिल्यानुसार, तुम्ही ‘बार्ड’च्या मदतीने गिटार किंवा पियानोसारख्या वाद्यापैकी काय शिकणं सोपं आहे, याचे उत्तरही मिळवू शकता.

‘गुगल’चा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि त्याच्या साहाय्याने सेवांमध्ये आणली जाणारी सुलभता याचा प्रत्यय इंटरनेटचा वापर करणार्‍यांना पदोपदी येत असतो. उदाहरणच घ्यायचे झाल्यास स्मार्टफोनवरील ‘गुगल’चा की-बोर्ड हा काही वर्षांपूर्वी प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध झाला. मराठीमध्येही तो उपलब्ध आहे. त्याच्या आधारे टायपिंग करताना एखादे अक्षर टाईप केल्यानंतर आधीच्या शब्दाच्या-वाक्याच्या आशयाशी मिळतेजुळते असणारे मराठी शब्द अचूकपणाने पर्याय म्हणून दिसतात. ते पाहून काही वेळा आश्चर्यही वाटते. जी-मेलमध्ये तर ई-मेल बॉक्समध्ये एखादे औपचारिक पत्र इंग्रजीतून टाईप करण्यास सुरुवात केल्यास बहुतांश वाक्ये आपोआप पुढे सुचवली जातात. त्यानंतर टाईप केलेल्या मजकुरातील स्पेलिंग दुरुस्तीची सुविधाही आहे. तसेच एखादे विशेषण, क्रियापद, काळ चुकला असेल तर तोही अचूक शब्द कोणता आहे, हे दाखवले जाते. अर्थातच, यामध्ये प्रोग्रामिंगचा आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर होत असेल; पण त्यावरून किती सूक्ष्म पातळीवर यूझर्सचे काम सुकर होण्यासाठीचा प्रयत्न कंपनीकडून किंवा त्यांच्या तंत्रज्ञानाकडून केला जातो, हे लक्षात येते.

‘बार्ड’ अद्याप प्रायोगिक तत्त्वावर आहे. येत्या काळात ते प्रत्यक्षात सामान्य यूझर्सना वापरण्यासाठी उपलब्ध झाल्यानंतर त्यातील विविध गोष्टी समोर येतील. तसेच ‘चॅट जीपीटी’पेक्षा ते किती आणि कसे सरस आहे, याची कल्पना येईल. ‘गुगल’ला दीर्घकालीनद़ृष्ट्या माहिती-तंत्रज्ञानाच्या महाकाय विश्वावर आपली अधिसत्ता कायम ठेवायची आहे, त्यामुळे ‘बार्ड’मध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असण्याची शक्यता आहे. ती पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या सर्व घडामोडींचा भारत देश म्हणून विचार करताना आपल्याला या क्षेत्रात खूप मोठी मजल मारण्यासाठीच्या संधींचा ऊहापोह व्हायला हवा.

अलीकडेच भारतात बहुराष्ट्रीय विदेशी दिग्गज टेक कंपन्यांना शह देण्यासाठी ‘भार’ नावाची स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम लाँच करण्यात आली. ती अद्याप पूर्णपणाने अँड्रॉईडला शह देण्यासाठी सक्षम नसली, तरी येत्या काळात त्यावर बरेचसे काम होऊन ती अधिक अद्ययावत बनवण्याचा विचार करायला हवा. जगभरातील आयटी कंपन्यांमध्ये भारतीय प्रज्ञावंत, तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आपापले योगदान देत असताना भारत या शर्यतीमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. येणार्‍या काही वर्षांसाठी भारताने आर्थिक विकास दराबाबत जशी उद्दिष्टे ठेवली आहेत तशाच प्रकारे तंत्रज्ञानाच्या विश्वात ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठीही नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Back to top button