गुन्हा : आसारामच्या जन्मठेपेनंतर | पुढारी

गुन्हा : आसारामच्या जन्मठेपेनंतर

सम्यक पवार

आसारामबापू ही आजची समस्या नाही. इतिहासात याची अनेक उदाहरणे सापडतात. आसाराम ही विकृती भक्तांच्या पाठिंब्यामुळेच आणि काही राज्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच मोठी झाली, हे विसरून चालणार नाही.

पुण्यात 30 ऑगस्ट 2022 रोजी विविध संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यांची मागणी होती की, गेली दहा वर्षे तुरुंगात बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेल्या आसारामबापूची सुटका व्हावी. त्या आसारामबापूला गांधीनगर कोर्टाने बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बलात्काराच्या प्रकरणात आसारामबापूची ही दुसरी शिक्षा आहे. आज या आसारामबापूबद्दल टीका करणारे, त्याची दुष्कृत्ये मांडणारे हजारो लेख, व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. आजही अनेकांना सत्पुरुष वगैरे वाटत असलेल्या आसारामबापूची गेल्या दहा वर्षांत उघड झालेली कृत्ये ही माणूसपणाला लाज आणणारी आहेत. एक टांगेवाला असलेला हा अर्धशिक्षित माणूस पुढे हजारो कोटी रुपये कमावणारा बाबा बनला. त्याच्या या साम्राज्याला पहिला धक्का बसला तो 2008 मध्ये. 3 जुलै 2008 रोजी आसारामबापू याच्या ट्रस्टद्वारे चालवलेल्या निवासी गुरुकुलात शिकणारी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली. दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह साबरमती नदीपात्रात सापडले. या घटनेनंतर आसारामबापूवर काही लोकांनी जाहीर बोलायला सुरुवात केली. लोक दबावामुळे सातजणांवर गुन्हा दाखल झाला; पण दोन्ही मुलांचे पालक या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करत होते. त्यानंतर डी. के. त्रिवेदी आयोगाने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला. ज्यामध्ये आयोगाने आसारामबापूला क्लीन चिट दिली.

संबंधित बातम्या

2013 मध्येे थेट आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साईवर जोधपूर आणि गांधीनगर इथे बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. संबंधित सर्व गुन्ह्यांतले अनेक साक्षीदार मृतावस्थेत आढळले. 2014 मध्ये अमृत प्रजापती यांना राजकोटमध्ये गोळ्या घालून ठार मारले होेते. ही हत्या आसारामबापूच्या एका अनुयायाने केल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर आसारामला जन्मठेप सुनावण्यात आली आणि तिथून आसाराम हा भोंदूबाबा असल्यावर शिक्कामोर्तब झाले. 2013 च्या या घटनेनंतर आसारामबापूविरोधात दररोज नवनवीन खुलासे होऊ लागले. देशातल्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत त्याच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या जाऊ लागल्या. त्याच्या आश्रमांवर छापे पडू लागले. त्याचवेळी त्याचा सहायक शिवा याला पोलिसांनी बोलते केले. त्याने आसारामबापू रात्री एकांतात महिलांना ‘ध्यान की कुटिया’मध्ये भेटायचा, अशी खळबळजनक माहिती दिली.

त्याच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या क्लिपमुळे तर आसारामबापूच्या ‘लीला’ पोलिसांना प्रत्यक्ष दिसल्या, असेही सांगितले जाते. आता हे सगळे एकीकडे पेटत असताना त्याच्या आश्रमातल्या व्यवहारांबद्दलही चर्चा होऊ लागली. पैशांची अफरातफर, जमिनी हडप करणे, आत्महत्यांना उद्युक्त करणे इथपासून वेश्या व्यवसायापर्यंतची अनेक प्रकरणे आश्रमातून मीडियापर्यंत आणि पोलिस ठाण्यांपर्यंत येऊ लागली.

2018 मध्ये नाशिकच्या गोदापात्रात आसारामबापूच्या आश्रमावर अतिक्रमणविरोधी पथकाने छापा टाकला होता. त्यावेळीही आश्रमाच्या सभामंडपाखाली आणि गोदावरीच्या किनार्‍यालगत असलेल्या दहा-बारा खोल्या आढळून आल्या होत्या. आश्रमाच्या साधकांकडून या खोल्या ध्यानधारणेसाठी वापरत असल्याचा दावा केला गेला; पण तिथे प्रत्यक्षात काय चालत असेल याची कल्पना पुढे सिद्ध झालेल्या सर्व आरोपांमधून येते.

मला अटक केलीत, तर निवडणुकीत त्याची जबर किंमत मोजण्याची तयारी ठेवा, हे आसारामने उच्चारलेले वाक्य खूप काही सांगून जाते. या बाबाच्या पायाला लागलेल्या नेत्यांमध्ये सर्वपक्षीय नेते आहेत. या सगळ्यावरून एकच मुद्दा पुढे येतो की, या बाबा-बुवांच्या नादाला लागलेली जी भक्त मंडळी आहेत, त्यांच्यातली व्होट बँक ही भल्याभल्या राजकारण्यांना टाळता येत नाही. तसेच या भक्त मंडळींकडे असलेली आर्थिक आणि सामाजिक ताकदही राजकारणात आवश्यक असते. या सगळ्याच्या परिणामी हे बाबा-बुवा राजकारण्यांवरही प्रभाव टाकून स्वतःची कुकर्मे लपवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात.

आसारामबापू ही आजची समस्या नाही. इतिहासात याची अनेक उदाहरणे सापडतात. या भोंदूबाबांची नावे लिहायची म्हटली तरी यादी लांबच लांब होत जाईल. अनेक नाटकांनीही या किळसवाण्या प्रवृत्तीवर भाष्य करत, लोकप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. आचार्य अत्रे यांनी 1960 च्या दशकात लिहिलेले ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक असो किंवा ज्ञानेश महाराव यांनी 2010 मध्ये लिहिलेले ‘संगीत घालीन लोटांगण’सारख्या नाटकांनी या विकृतीवर थेट भाष्य केले आहे, तरीही लोक काही ऐकत नाहीत, हे वास्तव आहे.

आसाराम ही विकृती अशा भक्तांच्या पाठिंब्यामुळेच आणि काही राज्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच मोठी झाली, हे विसरून चालणार नाही. आजही अनेक भक्तांना असे वाटतेय की, आसाराम निर्दोष आहे. आजही अनेक राजकारण्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. हे सगळं काय आहे? हे समजून घेतल्याशिवाय आसाराम या प्रवृत्तीचा शोध घेता येणार नाही. कारण, आसाराम ही फक्त व्यक्ती नसून पिढ्यान्पिढ्या समाज पोखरणारी प्रवृत्ती आहे.

मतांचे राजकारण असो किंवा आर्थिक व्यवहारांचे हितसंबंध; पण अशा कारणांमुळे राजकारणी आणि हे बाबा-बुवा यांच्यात कायमच जवळीक असलेली आढळते. तसेच आयुष्यातल्या प्रापंचिक अडचणींनी वैतागलेले भक्त किंवा कोणत्या तरी किरकोळ फायद्यासाठी किंवा ‘हा जातो म्हणून मी जातो’ अशा लोकानुनयातून आलेले भक्त अशा बाबा-बुवांकडून नागवले जातात. हे बाबा-बुवा त्यांना असे घोळात घेतात की, शेवटपर्यंत त्यांना खरे काय ते कळत नाही.

आसाराम आज तुरुंगात आहे. त्याचे वय आज 81 आहे. त्यामुळे तो तुरुंगातून बाहेर येईल, असे आज तरी वाटत नाही. तरीही त्याच्या देशभरातल्या संपत्तीचा आकडा हा दहा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून, तिचे मुख्यालय अहमदाबाद इथे आहे. त्याचा मुलगा नारायण साई आरोपांनी बदनाम झाला असल्याने, त्याची मुलगी भारतश्री सगळा व्यवहार पाहते. आसारामबापूच्या साम्राज्यामध्ये 400 हून अधिक आश्रम, 1,500 हून अधिक सेवा समित्या, 17,000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 पेक्षा जास्त गुरुकुल आहेत, अशी माहिती इंटरनेटवर मिळते. ती किती खरी आहे, हे तपासून पाहता येत नाही. तसेच किती सुरू आहेत, हेही कळत नाही; पण बापूचे भक्त अद्यापही देशात विविध ठिकाणी सक्रिय आहेत, एवढे स्पष्टपणे दिसते.

आता मुद्दा उरतो तो हाच की, या भक्तांचे काय करायचे? आणखी काय सिद्ध झाले की, ते बापूविषयीचे वास्तव स्वीकारतील? हे सगळे भक्त अशिक्षित नाहीत. त्यातले अनेक उच्चविद्याविभूषित आणि श्रीमंत वर्गातलेही आहेत. त्यामुळे या सगळ्याचे सामाजिक, मानसिक विश्लेषण करत राहावे लागणार आहे. नाही तर ही विकृती पुन:पुन्हा डोके वर काढत राहते, हे आजवर इतिहासाने दाखवून दिलेलेच आहे.

 

Back to top button