कुस्ती : ‘महाराष्ट्र केसरी’चे रिंगण

कुस्ती : ‘महाराष्ट्र केसरी’चे रिंगण
Published on
Updated on

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना, ट्रॅक्टर, थार जीप यांसह लाखांच्या पटीत रोख बक्षिसे देण्यात आली. यावरून महाराष्ट्र केसरीचे महत्त्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे. आपल्या मल्लांनी महाराष्ट्र केसरीचे रिंगण ओलांडून पुढे जाणे ही काळाची गरज आहे

महाराष्ट्र व कुस्ती हे नाते फार प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उघड्यावर असणारे कुस्तीचे आखाडे चार भिंतींच्या आत बंद केले, ज्याला तालीम म्हटले जाऊ लागले. या तालमीत पुढे लाठी-काठी, भाला, तलवार इत्यादी आयुधे व कुस्तीचा सराव केला जात असे. राजर्षी शाहू महाराजांनी हीच कुस्ती आपल्या उदार आश्रयाखाली कोल्हापुरात वैभवास आणली. नव्या तालमी बांधल्या. कुस्तीसाठी खासबाग मैदान बांधले. पैलवानांना खुराक स्वतःच्या संस्थानातून सुरू केला. पुढे ठेकेदारी पद्धत येऊन कुस्त्या होऊ लागल्या. लाखो लोक तिकिटे काढून कुस्त्या बघायला जाऊ लागले.

देश स्वतंत्र झाला आणि 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा दादासाहेब जाधव यांनी इतिहास रचला. देशासाठी पहिले-वहिले पदक जिंकून महाराष्ट्रातील-देशातील मल्लांपुढे एक आदर्श निर्माण केला. खाशाबांच्या कामगिरीनंतर मामासाहेब मोहोळ या कुस्तीवेड्या अवलियाने महाराष्ट्राच्या मल्लांसाठी काहीतरी ध्येय असावे म्हणून पैलवानांची संघटना स्थापन केली, ज्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नाव देण्यात आले. 1952 ते 1962 तमाम पैलवान एकत्र येऊन मेळावे घेतले जाऊ लागले.

1962 साली मात्र या मेळाव्याचे रूपांतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झाले. 1962 पासून अव्याहतपणे ही स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक घराणी या स्पर्धेत खेळली, मोठी झाली. आजमितीला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ऑलिम्पिकइतके महत्त्व महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी आणले आहे. नुकतेच कोथरुड – पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना बुलेट मोटारसायकल, ट्रॅक्टर, थार जीप आदी बक्षिसे यासह लाखांच्या पटीत रोख बक्षिसे देण्यात आली. ही बक्षिसांची पद्धत पाहता 'महाराष्ट्र केसरी'चे महत्त्व आपल्याला लक्षात येईल. पण हे सर्व होत असताना महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांच्या समोर 'महाराष्ट्र केसरी'नंतर करिअर संपले की काय, अशी परिस्थिती होऊ शकते.

राज्य स्तरच्या पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व त्यातही मानाच्या अन्य स्पर्धा, ज्यात जगाच्या तुलनेत भारत व महाराष्ट्र कुठे याचा विचार व्हावा.
हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, रुस्तुम-ए-हिंद दादू चौगुले यांसारखे मातीच्या कुस्तीत बलाढ्य असणारे महाराष्ट्राचे मल्ल पुढे राष्ट्रकुल, आशियाई, जागतिक कुस्ती स्पर्धेपर्यंत गेले. अशा मानाच्या स्पर्धेत त्यांनी पदके मिळवली. त्यांचा आदर्श समोर ठेवत महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीने मार्गक्रमण केले पाहिजे.

इराणसारखा 70 दशलक्ष लोकसंख्येच्या देशात 20 लाख नोंदणीकृत फक्त पैलवान आहेत. त्यातही पारंपरिक कुस्तीसह आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारणारे अनेक आहेत. हसन याझदाणीसारखा इराणी तर ऑलिम्पिक्समध्ये धुमाकूळ घालत आहे. ज्यावेळी खाशाबा जाधव यांनी हेलसिंकीमध्ये पदक मिळवले त्याच वर्षी 1952 साली इराणी मल्ल घोलमिरझा तखती यांनीही पदक मिळवले होते. तखती साहेबांचा आदर्श इराणने ठेवत पुढे अनेक ऑलिम्पियन घडवले. सध्या तरी तखती कप नावाने जागतिक कुस्ती स्पर्धाही भरते. आपण मात्र खाशाबांना विसरलो आणि त्यांना केवळ महाराष्ट्रात ठेवले. त्यांच्याही नावे राज्यस्तरीय स्पर्धा का? ते जर देशासाठी पदक जिंकले होते तर किमान ही स्पर्धा राष्ट्रीय व्हायला हवी व कालांतराने खाशाबा जाधव जागतिक स्पर्धा झाली तरच आपला देश आदर्शवादी म्हणायला हरकत नाही. सध्या तरी याच्या विरुद्ध कृती घडताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांनी आपल्यासमोर घातलेले महाराष्ट्र केसरीचे रिंगण लांघून आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारणे काळाची गरज आहे. हरिश्चंद्र बिराजदार यांनी पुण्यात गोकुळ वस्ताद तालमीच्या माध्यमाने केवळ मातीतले मल्ल नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल घडवले. त्यांच्या शिष्यानी ही परंपरा पुढे आणली. काकासाहेब पवार यांनी एशियन गेम्स, जागतिक व ऑलिम्पिक्सपर्यंतचा प्रवास केला. त्यांचे दुसरे शिष्य राहुल आवारे यांनी राष्ट्रकुल, जागतिक ऑलिम्पिक्सपर्यंत मजल मारली. महाराष्ट्र सध्या नक्कीच बदलाच्या उंबरठ्यावर आहे. कारण पूर्वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत दीर्घ काळ एकही पदक महाराष्ट्रातील मल्लांसाठी दुरापास्त होते.

मात्र यावर्षी महाराष्ट्रातील मल्लांनी तब्बल 15 पदके वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत मिळवली. ती सुद्धा अशा वेळी, ज्यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करून इथे अस्थायी समिती काम करत होती. अस्थिर कुस्ती संघटना असूनही महाराष्ट्राचे मल्ल पदक मिळवत असतील तर हे यश नक्कीच अशी दूरदृष्टी असणारे पालक, मल्ल, प्रशिक्षक, वस्ताद यांचे यश म्हटले पाहिजे. कुस्ती संघटनांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे व कुस्तीत बदल घडवण्यासाठी नव्या दमाचे लोक पुढे आले पाहिजेत, ज्यांना खरंच कुस्तीत काम करण्याचा मानस आहे, महाराष्ट्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके जास्त न येण्याचे दुसरे कारण म्हणजे तांत्रिक कुस्ती, गुणात्मक कुस्ती याची फारशी माहिती नसणे. आजही कोणतेही कुस्ती मैदान असो किंवा स्पर्धा वयोवृद्ध कुस्तीप्रेमी, ज्यांना मातीतील बेमुदत निकाली कुस्ती माहिती आहे असेच लोक गर्दी करतात.

मैदानी कुस्तीला होणारी ही गर्दी महाराष्ट्र केसरी सोडले तरी कोणत्याही स्पर्धेला नसते. मातीतल्या कुस्तीत गोडी मानणारा वर्ग तांत्रिक कुस्तीत फारसा रस दाखवत नाही किंबहुना याची गोडी लागावी असे उपक्रमसुद्धा कुठे होताना दिसून येत नाहीत. मैदानी कुस्तीत मिळणारा ताजा पैसा हा मल्लांच्या उपजीविकेचे माध्यम आहे. जिथे एका कुस्तीत जास्त पैसा मिळतो तिथे मॅट स्पर्धेत इतक्या कुस्त्या कोण करेल हासुद्धा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. दिल्लीत भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध ऑलिम्पियन मल्लांनी जंतर-मंतर याठिकाणी आंदोलन केले आहे. जर पैलवान अध्यक्षाविरुद्ध एकत्रित येत असतील तर अशा क्रीडा संघटना कितपत समाधानी आहेत याचाही विचार करणे गरजेचे आहे. कुस्तीत क्रीडा संघटनांचे राजकारण हा मुद्दा जितका महत्त्वाचा वाटतो, तसाच उत्तेजक द्रव्यांचा अतिरेकी वापर हासुद्धा होय.

अनेक लहान जोडीपासून ते मोठ्यापर्यंत व तालुका कुस्ती स्पर्धापासून ते राष्ट्रीयपर्यंत सर्रास स्टेरॉईडस् घेऊन खेळाडू खेळताना दिसतात. वेगवेगळ्या इंजेक्शनच्या सुया त्याठिकाणी दिसतात. यावर बंधने घालणार्‍या उत्तेजक द्रव्य विरोधक संस्था आहेत. मात्र त्यांची आरोपी पकडायची पद्धत वेगळी असते. शिवाय राज्यस्तरीयला डोप टेस्ट होत नाही. त्यामुळे बंधने नसल्याने याचा अतिरेक होतो व खेळाडूंना याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळतात. या सर्व बाबींचा विचार करून कुस्तीसारख्या खेळात करिअर करून पुढे जायचे असते. त्यामुळे याचेही नियोजन पालक व वस्ताद यांनी केले पाहिजे. येणार्‍या काळात भव्य ध्येय ठेवूनच कुस्ती हा खेळ करिअर म्हणून घेतला तरच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडभरारी मारेल यात शंका नाही.

पै.गणेश मानुगडे
कुस्ती अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news