कर्नल अभय पटवर्धन , (निवृत्त)
भारतीय सेनेचा उगम ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेतून झाला. ब्रिटिश राजवटीत त्याचे परिवर्तन ब्रिटिश इंडियन आर्मीत झाले आणि स्वातंत्र्यानंतर ते भारताचे राष्ट्रीय लष्कर म्हणून ओळखले जाऊ लागले. 15 जानेवारी 1949 रोजी भारताला पहिले लष्करप्रमुख मिळाले. आज या घटनेला 75 वर्षे पूर्ण होताहेत. हा दिवस दरवर्षी 'स्थलसेना दिन' म्हणून साजरा होतो. भारताचे पहिले लष्करप्रमुख जनरल करिअप्पा यांच्या गौरवशाली कारकिर्दीत लष्कराचा पाया रचला गेला.
एक एप्रिल 1895 रोजी भारतीय लष्कर अधिकृतपणं अस्तित्वात आले आणि 15 जानेवारी 1949 रोजी भारताला पहिले लष्करप्रमुख मिळाले. आज या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस दरवर्षी 'स्थलसेना दिन' म्हणून साजरा होतो. भारतीय सेनेचा उगम ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेतून झाला. भारतात ब्रिटिश राजवट आल्यावर त्याचे परिवर्तन ब्रिटिश इंडियन आर्मीत झाले आणि स्वातंत्र्यानंतर ते भारताचे राष्ट्रीय लष्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
ऑगस्ट 1947 मध्ये भारताची फाळणी होत असताना देशात सर्वदूर जातीय दंगली भडकल्या होत्या आणि निर्वासितांचे मोठे कळप पूर्व व पश्चिम पाकिस्तानातून भारतात येत होते आणि येथून स्थलांतरित होत होते. या स्फोटक, अराजकी वातावरणामुळे अनेक प्रशासकीय समस्या निर्माण झाल्या आणि लष्कराला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोलावले गेले. त्याच वेळी पाकिस्तानने काश्मीर हस्तगत करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. त्यावेळी भारतीय लष्कराची कमान ब्रिटिश जनरल सर फ्रान्सिस रॉय बुचर यांच्या हाती होती. त्यांनी जनरल करिअप्पांवर काश्मीरला वाचवण्याची जवाबदारी सोपवली. पण पहिल्या भारत – पाक युद्धानंतर मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारत आणि भारतीय लष्कराचे संपूर्ण व्यवस्थापन तत्कालीन भारत सरकारच्या हवाली करण्याचा विवेकी निर्णय घेतला आणि त्या प्रक्रियेदरम्यान करिअप्पा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख बनले.
जानेवारी 1947 मध्ये करिअप्पा यांच्यावर पाकिस्तान आणि भारत यांच्यात ब्रिटिशकालीन भारतीय लष्कराचे प्रमाणबद्ध विभाजन (प्रपोर्शनेट डिव्हिजन ऑफ मिलिटरी रिसोर्सेस) करण्याची जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी इतक्या चोखरीत्या पार पाडली की, पाकिस्तान त्यात एकही खोट काढू शकला नाही. हे करण्याआधी करिअप्पा यांना मेजर जनरल पदावर बढती देण्यात आली.
एप्रिल 1947 मध्ये लेफ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती दिल्यानंतर त्यांची पूर्व आर्मी कमांड प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. फाळणीनंतरच्या संभाव्य आणि अनपेक्षित संकटांना दूर ठेवण्यासाठी करिअप्पांना जून, 1947 मध्ये दिल्ली आणि पूर्व पंजाब कमांड प्रमुख करण्यात आले.
सप्टेंबर 1947 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या भारत-पाक युद्धात त्यांनी काश्मीरमध्येे तैनात भारतीय सेनेची धुरा सांभाळली. करिअप्पा यांच्या नेतृत्वात सेनेने काश्मीर खोर्याचे यशस्वीपणे रक्षण तर केलेच; पण झोजिला, द्रास आणि कारगिल हस्तगत करून लेहशी परत एकदा संबंध देखील प्रस्थापित केला. काश्मीर रक्षणार्थ त्यांनी केलेल्या कामगिरीच्या कृतज्ञतेप्रती खोर्यातील नागरिकांनी काश्मीरच्या बारामुल्ला येथे झेलम नदीच्या काठावर करिअप्पा पार्क उभारला.
पहिले भारतीय कमांडर इन चीफ या नात्याने करिअप्पा यांना ब्रिटिश काळातील भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलाचे भारताच्या राष्ट्रीय लष्करात रूपांतरित करण्याचे काम सोपविण्यात आले. दूरदर्शी, शिस्तप्रिय व करिअप्पांनी ते इतक्या निष्ठेने केले की आजही लष्करात त्याची वाखाणणी केली जाते. अस्थिर व तरल परिस्थितीत भारतीय लष्कराला एकसंध राखण्यात करिअप्पांनी महत्त्वाची भूमिका निभावली. राज्यकर्त्यांना लष्करापासून दूर ठेवत, पंतप्रधानांचा हस्तक्षेप नाकारत, लष्कराचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यात ते यशस्वी झाले.
करिअप्पा यांच्या 1919-53 मधील गौरवशाली लष्करी कारकिर्दीत ते भारताच्या लष्करी इतिहासात पहिल्यांदाच अनेक गोष्टी / कामे करणारे सेनाधिकारी होते. इंदूरच्या डॅली कॉलेजातील भारतीय कॅडेटस्च्या पहिल्या तुकडीत सामील होणारा हा पहिला दक्षिण भारतीय आणि कुर्गी कोडावा तरुण होता. क्वेटा येथील स्टाफ कॉलेजमध्ये प्रवेश करणारा आणि ब्रिटिश सेनेत ब्रिगेडियर बनणारा हा पहिला भारतीय सेनाधिकारी होता.
इंपिरियल डिफेन्स कॉलेज, कॅम्बर्ली, ब्रिटनमध्ये प्रवेश करणारा हा पहिला भारतीय सेनाधिकारी होता. हा 1947 मध्ये बढती मिळालेला पहिला भारतीय मेजर जनरल होता आणि तो पहिला भारतीय कमांडर इन चीफ होता. 1953 मध्ये भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर, करिअप्पा 1956 पर्यंत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये भारताचे उच्चायुक्त होते.
तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. दुसर्या महायुद्धात त्यांना मिळालेल्या ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायरच्या जोडीला कोरियात भारतीय शांतिसेनेच्या लक्षणीय नेतृत्वासाठी ऑर्डर ऑफ द चीफ कमांडर ऑफ द लीजन ऑफ मेरिट हा भारतीय सेनाधिकार्याला मिळालेला पहिला व एकमेव वीरता पुरस्कार, अमेरिकन राष्ट्रपती हॅरी ट्रुमन यांनी करिअप्पांना प्रदान केला.
1953 मध्ये निवृत्त झाल्यानंतर केलेल्या निरोपाच्या भाषणात, करिअप्पा यांनी आपल्या सैनिकांना सांगितले होते की, लष्कराचे काम राजकारणात हस्तक्षेप करणे नसून निवडून आलेल्या सरकारवर अखंड निष्ठा ठेवणे आहे. करिअप्पा यांनी चांगल्या परिणामकारकतेसाठी भारतीय सेनेत अनेक संरचनात्मक बदल केले. सेनेसाठी त्यांनी 'जय हिंद' ही घोषणा स्वीकारली. 1983 मध्ये त्यांना फिल्ड मार्शल (फाइव्ह स्टार जनरल) ही पदवी देण्यात आली. 15 मे 1993 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे झोपेत निधन झाले.
या अधिकार्याच्या नेतृत्वात भारतीय लष्कराचा पाय रचला गेल्यामुळे त्यांनी आगमी काळात देदीप्यमान प्रगती केली. हे 1953 मध्ये भारतीय शांतिसेनेने कोरियन युद्ध समाप्तीला लागू करण्यासाठी, कुठल्याही आंतरराष्ट्रीय दबावापुढे न झुकता केलेल्या निःपक्षपाती प्रयत्नांवरून सिद्ध झाले होते. म्हणूनच भारतीय सेनेत स्थलसेना दिवसाचे एवढे महत्त्व आहे.
विदेशी राजवटीतून झालेले लष्करी हस्तांतर ही भारतीय सेनेसाठी अत्यंत लक्षणीय व उल्लेखनीय घटना असल्यामुळे दरवर्षी हा दिवस 'लष्कर दिन' म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ही परंपरा आजही सुरूच आहे. प्रत्येक वर्षी 15 जानेवारीला हा दिवस सर्व आर्मी कमांड हेडक्वार्टर्स आणि राष्ट्रीय राजधानीत सेना संचालन व इतर लष्करी कारनामे (आर्मी परेड अँड शोज) आयोजित करून साजरा केला जातो.
दिल्ली छावणीच्या करिअप्पा परेड मैदानावर दरवर्षी भव्य परेड आयोजित केली जाते. यात नौदल आणि हवाई दल प्रमुख आणि संरक्षण सचिव उपस्थित असतात. परेडची सलामी सेनाध्यक्ष घेतात. या दिवशी निःस्वार्थपणे देशाची सेवा करताना, त्याग व बंधुत्वाचे सर्वोच्च उदाहरण लोकांसमोर ठेवत, मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी आणि भारताची अखंडता राखण्यासाठी आपल्या प्राणांसोबतच सर्व काही देणार्या भारतीय सेनेतील शूर वीरांना सन्मानित केले जाते.
चालू वर्षीपासून आता नवी दिल्ली व्यतिरिक्त अन्य इतर ठिकाणीही आर्मी डे परेड आयोजित केली जाईल. देशभरातील लोकांना त्यांच्या लाडक्या लष्कराची भव्यता पाहता यावी, त्याचा थरार अनुभवता यावा आणि त्यांचे कौतुक करता यावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशी पहिली परेड रविवार, 15 जानेवारी 2023 रोजी दक्षिण भारतातील बंगळूर येथे होणार आहे.
राष्ट्रीय महत्त्वांच्या कार्यक्रमांमध्ये देशातील सर्व नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी 2023 पासून असे कार्यक्रम राष्ट्रीय राजधानीच्या बाहेर, विविध मोठ्या शहरांमध्ये आयोजित करण्याच्या सरकारच्या निर्णयाशी हे सुसंगत आहे. बंगळूरच्या पहिल्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण भारतीयांचे शौर्य आणि त्यांनी राष्ट्रासाठी केलेल्या बलिदानाची दखल घेत कर्नाटकच्या फिल्ड मार्शल केएम करिअप्पा यांना दिलेली योग्य श्रद्धांजली आहे असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.