माध्यम : ‘चॅट जीपीटी’ : ए.आय.मधील नवी क्रांती | पुढारी

माध्यम : ‘चॅट जीपीटी’ : ए.आय.मधील नवी क्रांती

डॉ. योगेश प्र. जाधव

‘गुगल’ला प्रश्न विचारून एखाद्या गोष्टीची माहिती मिळवणं, हा आता आपल्या सवयीचा भाग झाला आहे. परंतु, ‘गुगल’ला मागे टाकत संदर्भासह स्पष्टीकरण देण्याची ताकद ‘चॅट जीपीटी’मध्ये आहे. ही कदाचित ‘गुगल’ची पुढची आवृत्ती असू शकते. ही तंत्रज्ञानाच्या युगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात घडलेली सर्वात मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे…

आर्टिफिशयल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाने आता मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये बर्‍यापैकी जम बसवला आहे. सुरुवातीला काही जुजबी कामं करू शकणारं हे तंत्रज्ञान आता गुंतागुंतीची कामं मानवी हस्तक्षेपाशिवाय करू लागलं आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काळात हे तंत्रज्ञान माणसापेक्षा जास्त बुद्धिमान होऊन त्यातून अनेक माणसांच्या नोकर्‍या जातील की काय, अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी ‘ओपन ए.आय.’ नावाच्या एका कंपनीने आपलं नवीन ‘ए.आय.’ लोकांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिलं. ‘चॅट जीपीटी’ हे त्या ‘ए.आय.’चं नाव. नैसर्गिक भाषानिर्मिती तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या ‘ए.आय.’ने एकाच आठवड्यात तब्बल दहा लाखांहून अधिक यूझर्स मिळवले. मशिन लर्निंग आणि ॠझढ – 3.5 नावाचे भाषा मॉडेल वापरून हा चॅटबॉट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो. या ‘ए.आय.’ चॅटबॉटच्या मदतीने अनेक कामे सहज करता येतात आणि कोडही लिहिता येतात.

अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं हा चॅटबॉट देऊ शकतो. थोडक्यात काय, तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या प्रणालीत मानवी संभाषणाची कला अंतर्भूत करण्यात आली आहे. म्हणजे, ही संगणकीय प्रणाली वापरकर्त्याला परस्परसंवादाचा आभास आणि काही प्रमाणात संवादाचा दर्जा देऊन लिखित मजकूर तयार करू शकते. इंटरनेटवरची अगणित माहिती चाळून त्यातून तुम्हाला नेमकं हव्या असलेल्या गोष्टीचं उत्तर हा चॅटबॉट देतो; पण तो चुकणारच नाही याची खात्री कंपनी देत नाही. या नवीन तंत्रज्ञानामुळे येत्या काळात कोणकोणत्या क्षेत्रात मूलभूत बदल होऊ शकतात आणि त्याचे एकंदरीतच मानवी व्यवहारावर काय परिणाम होतील, यावर आता चर्चा होऊ लागली आहे.

मागच्याच महिन्यात, ‘चॅट जीपीटी’ लाँच होण्याच्या आधी ‘ओपन ए.आय.’ या कंपनीने आपला ‘डॉल-ई’ नावाचा आणखी एक ‘ए.आय.’ लाँच केला होता. एखाद्या द़ृश्याचे वर्णन या ‘ए.आय.’ला दिल्यानंतर तसं छायाचित्र बनवून देण्याचं काम हा ‘ए.आय.’ करू शकतो. वापरकर्त्याने दिलेल्या लिखित स्वरूपातील माहितीवरून न्यूरल नेटवर्क अल्गोरिदम वापरून हा ‘ए.आय.’ तशी इमेज तयार करतो.

त्यानंतर काही दिवसांनी ‘चॅट जीपीटी’ वापरण्यासाठी उपलब्ध झाले. ‘गुगल’ला प्रश्न विचारून एखाद्या गोष्टीची माहिती मिळवणं, हा आता आपल्या सवयीचा भाग झाला आहे. परंतु, ‘गुगल’ला मागे टाकत संदर्भासह स्पष्टीकरण देण्याची ताकद ‘चॅट जीपीटी’मध्ये आहे. ही कदाचित ‘गुगल’ची पुढची आवृत्ती असू शकते. ‘चॅट जीपीटी’ एखाद्या मित्राप्रमाणे तुमच्याशी बोलत असल्याने तुम्ही सहजपणे त्याला विचारू शकता. आधीच्या प्रश्नावर आधारित प्रतिप्रश्नही तुम्ही त्याला करू शकता. उदाहरणार्थ, तुम्हाला कविता स्वरूपात उत्तर हवं असेल, तर ‘चॅट जीपीटी’ त्या प्रारूपात उत्तर देऊ शकते.

आधीचं संभाषण आणि कॉमेंट हे सगळं लक्षात ठेवून ‘चॅट जीपीटी’ पुढची उत्तरं देते. कथा, कविता, निबंध, आकडेवारी अशा कोणत्याही प्रकारात ‘चॅट जीपीटी’ प्रतिसाद देऊ शकते. दोन माणसं जेव्हा चर्चा करतात, बोलतात तेव्हा जसं संभाषण होतं तसं ‘चॅट जीपीटी’ प्रतिसाद देतं. ‘चॅट जीपीटी’ची ही काम करण्याची पद्धत अभ्यासली, तर या नव्या तंत्रज्ञानामुळे कोणत्या प्रकारच्या नोकर्‍यांवर गदा येऊ शकते, हे सहज समजून घेता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेवरील प्रत्येक चर्चेत ‘आता यामुळे आपल्या नोकर्‍या जाणार की काय?’ हा मुद्दा असतोच असतो. ‘चॅट जीपीटी’ही याला अपवाद नाही.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या साधनाचा सगळ्या मोठा दुष्परिणाम लेखनकलेवर होऊ शकतो. ‘चॅट जीपीटी’ हे साधन वापरून कोणीही विनासायास कुठल्याही विषयावर निबंध लिहू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःचा म्हणून खपवू शकतो. इंटरनेटचा स्रोत म्हणून वापर करून; पण त्या लिखाणाची थेट नक्कल न करता हा चॅटबॉट एखाद्या विषयावरील माहिती समोर आणतो. लिहिणं ही एक कला आहे. ठराविक इयत्तेतील काही मुलांना एखाद्या विषयावर लिहायला सांगितल्यास त्या प्रत्येक मुलाचं त्या विषयावरचं लिखाण वेगळं असतं. हे वेगळं असणं एखाद्या तंत्रज्ञानाला जमू लागलं, तर लिहिण्याचं कला म्हणून असलेलं महत्त्व कमी होईल का, हा मूलभूत प्रश्न यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारितेत आणि स्वतंत्र लेखनात सर्वाधिक प्रमाणात केला जाऊ शकतो. हे अतिशय धोकादायक ठरू शकतं. फेक न्यूज, डिसइन्फॉर्मेशन हा माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या उत्क्रांतीला मिळालेला शाप आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. वेगवान इंटरनेट आणि ते वापरण्याची साधनं उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही बातमीचा प्रसार अत्यंत झपाट्याने होण्याच्या या काळात फेक न्यूज शोधून तिचा प्रसार थांबवणं हे आव्हान बनलं आहे. सध्या राजकीय लाभासाठी समाजमाध्यमांचा वापर करणं, त्यावर चुकीची माहिती पेरणं हा एक पायंडाच पडला आहे. बातमी लवकरात लवकर देण्याच्या नादात, त्यातील सत्य-असत्याची शहानिशा न करता आहे ते लिहून टाकलं जातं. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या याच माहितीच्या आधारे जर ‘चॅट जीपीटी’ आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार असेल, तर त्यावरून मिळालेली माहिती किती विश्वासार्ह मानायची, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

इंटरनेटवरची माहिती जितकी निर्दोष असेल, तितकं ‘चॅट जीपीटी’चा वापर करून केलेलं लेखन निर्दोष असेल, निदान सत्याच्या पातळीवर; पण हीच माहिती जितकी चुकीची, विपर्यास्त, दिशाभूल करणारी असेल, तितकं ‘चॅट जीपीटी’चा वापर करून केलेलं लेखनही चुकीचं असेल. हाच या नवीन तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा धोका आहे. राजकीय पक्ष, त्यांचे नेते, तथाकथित समाजकंटक, अपप्रचारक या प्रणालीचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना शह देण्यापासून सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यापर्यंत कशाही प्रकारे करू शकतात.

येत्या काळात जेव्हा वर्तमानपत्रांत, मासिकांत किंवा ऑनलाईन माध्यमांतलं लेखन ‘चॅट जीपीटी’ प्रणालीचा वापर करून केलं जाईल आणि त्या लिखाणावर कुणी तरी दावा सांगेल तेव्हा? ती त्या लेखकाची लबाडी असेल आणि वाचकांची मोठी फसवणूक. हे तंत्रज्ञान प्रसारमाध्यमांमध्ये बातम्यांसाठी जास्त प्रमाणात वापरले जाण्याची शक्यता आहे; पण त्याचा वापर ब्लॉग, सोशलमीडिया, व्हॉटसअ‍ॅपवरील लेखन, यांसाठी जास्त प्रमाणात होऊ शकतो.

एखादी गोष्ट जसजशी विपुल प्रमाणात उपलब्ध होत जाते, तसतशी तिचं महत्त्व आणि मागणी कमी होत जाते हा सार्वत्रिक नियम आहे. इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात ममाहितीफ ही गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तिचं मूल्य जास्त होतं. इंटरनेटची उत्क्रांती आणि झपाट्याने वाढत गेलेली उपलब्धता, त्यावर आपलं मत मांडण्याचं आणि माहिती प्रसारित करण्याचं स्वातंत्र्य, या गोष्टी जशा वाढत गेल्या, तशी माहितीची उपलब्धताही प्रचंड प्रमाणात वाढली. सुरुवातीच्या टप्प्यावर लिखित मजकुराला काहीएक ठराविक मूल्य आलं, आणि नंतर हे मूल्य कमी होत गेलं.

चॅटजीपीटी हे नवीन तंत्रज्ञान थेट माहितीच उपलब्ध करून देणार असेल, आणि त्या माहितीच्या उत्पादनाला मर्यादा नसेल तर मुळात माहितीचं मूल्यच कमी होण्याचा धोका येत्या काळात तयार होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. माहितीची विश्वासार्हता ही आणखी एक समस्या. एखादा मजकूर आपण वाचतो तेव्हा तो कोणत्या व्यक्तीकडून किंवा ज्या माध्यमातून आला आहे, यावर त्याची आपल्यासाठीची विश्वासार्हता अवलंबून असते. पण मुळात तो मजकूर त्याच व्यक्तीने किंवा माध्यमाने लिहिला आहे की नाही याबद्दलच शंका असेल तर? अशा वेळी नेमका त्या माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय करणंच अवघड होऊन बसेल.

सुरुवातीला उल्लेख केलेल्या मडॉल-ईफ आणि नवीन आलेल्या चॅट जीपीटी या दोन एआयची सांगड घालून इमेज आणि मजकूर या दोन्ही गोष्टी वापरून एखाद्या विषयावरील माहिती अत्यंत प्रभावीपणे प्रसारित केली जाऊ शकते. सध्या ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. ती वापरताना मिळणारा डेटा तिच्यात सुधारणा करण्याकरता वापरला जाणार आहे. तो डेटा वापरून हे तंत्रज्ञान अधिकाधिक अद्ययावत बनविण्यात येईल. त्यातून त्याची क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. यामुळेच ही तंत्रज्ञानाच्या युगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात घडलेली सर्वात मोठी क्रांतिकारक गोष्ट आहे. आजवर ब्लॉकचेन आणि नंतर मेटावर्स ही आपल्याला क्रांतिकारी इनोव्हेशन वाटत होती. पण ओपन एआय जगाचा चेहरामोहरा बदलवून टाकणार्‍या गोष्टी समोर आणत आहे.

डीप लर्नींग आणि आर्टीफिशिअल इंटेलिजंस आजवर आपण थेअरी, फॉर्म्यूला किंवा पुस्तकांतच वाचत आलोय, पण प्रत्यक्षात ते कसं असेल याचा चॅटजीपीटी ने प्रत्यक्ष प्रत्यय दिला आहे. मशीन लर्निंगच्या तत्त्वाच्या आधारावर हे तंत्रज्ञान मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमता ओलांडून पुढे जाईल का, हे येणारा काळ सांगेल. तूर्तास त्याच्या मर्यादा आणि त्यातून उद्भवणारे संभाव्य धोके समजून घेणे, ते तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात आल्यानंतर त्याच्याशी जुळवून घेत काम करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य विकसित करणे, या गोष्टी करणे ही मानवी भविष्याच्या दृष्टीने सर्वात आवश्यक गोष्ट आहे.

Back to top button