ललित : ऐकणं… एक संयमित कला

ललित : ऐकणं… एक संयमित कला
Published on
Updated on

अरुणा सरनाईक

ऐकणं ही एक संयमित कला आहे; पण अलीकडील काळात कोणाला ऐकायला वेळच नसतो. आईला मुलांचं ऐकायचं नसतं, मुलांना पालकांचं ऐकायचं नसतं, नवर्‍याला बायकोचं बोलणं ऐकायचं नसतं… असं न ऐकणंच हल्ली सर्वदूर दिसतं. तशातच जर कुणी अतिबोलणारं असेल, तेच तेच बोलणारं असेल; तर अशा व्यक्तींना सोयीस्करपणानं टाळलं जातं; पण मंडळी ऐकणं, शांतपणानं ऐकणं, यामुळं खूप काही साध्य होत असतं. आपल्यालाही आणि बोलणार्‍यालाही..!

जगात सर्वात कठीण काय असेल तर समोरच्याचे ऐकणे, तेही शांतपणे… खरंच कठीण आहे. बोलायचे नाही, मत द्यायचे नाही, फक्त ऐकायचं! जीवनाचा सुखाचा मार्ग म्हणजे समोरच्याचे ऐकणे! या ठिकाणी वयाचा मोठेपणा, लहानपणा कामास येत नाही. अवघड गणित आहे; पण ते काही सुटत नाही. जे शांतपणे ऐकतात, प्रतिक्रिया देत नाहीत, ते माझ्या द़ृष्टीने संतपदाचे वारकरी होय. एकदा तरी ऐका माझं! असं वर्षानुवर्षे सांगत जाणारे संपून जातात; पण त्यांची दखल घेतली जात नाही. कधी तरी लक्षात येतंही. तेव्हा ऐकलं असतं तर? पण नंतर पश्चा त्तापाला काहीच अर्थ नसतो. ही खरी आयुष्याची शोकांतिका आहे! कोणालाच कोणाचं ऐकायची गरज आणि सवड नसते. घरीदारी हीच परिस्थिती आहे. 'नंतर सवडीनं बोलू.' हेच उत्तर देऊन वेळ मारली जाते. मुलांचं काही ऐकायला पालकांना वेळ नसतो आणि हीच मुलं मोठी झाल्यावर पालकांचं ऐकायला तयार नसतात. मुलांच्या वाढीच्या वयात तर त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं असतं.

बरीच वर्षं झालीत. काही तरी कार्यक्रम होता. मी बर्‍यापैकी तयार झाले. मुलाला विचारलं, 'काय रे, बरी दिसतेय ना मी!' 'वा, वा, फारच छान.' मुलगा म्हणाला; पण मी आरशातून बघत म्हणाले, 'अरे, तू तर पाहिलेदेखील नाहीस माझ्याकडे. न बघताच कसा बोलतोस!'
त्याचं उत्तर विचार करायला लावणारं होतं. 'आई गं, आठव जरा मी लहान असताना एकदा गणपतीचे चित्र काढले होते. तुला दाखवायला आलो होतो. तेव्हा तू काही तरी कामात होतीस. न बघताच मला म्हणालीस, छान आहे रे; पण नंतर सावकाश बघेन. आता वेळ नाहीये. मग आज मी पण जरा कामात आहे.'

'याची देही याची डोळा' मला माझी चूक दाखविणार्‍या मुलाकडे मी आश्चर्याने फक्त बघत राहिले. कारण, तो खरं बोलत होता ना! मी तेव्हाच नाही, तर बरेचदा त्याचं ऐकलेलंच नव्हतं. 'ऐकावे जनाचे करावे मनाचे!' अशी म्हण आहे. ती मला अगदी तंतोतंत पटते; पण यात एक खुबी आहे. ऐकणं आवश्यकच आहे. उत्तम वक्ता तेव्हाच उत्तम होतो, जेव्हा ऐकणारा श्रोतावर्ग आहे. म्हणूनच ऐकणं ही एक संयमित कला आहे. कित्येकदा आपण समोरच्याचं बोलणं पुरतं ऐकायच्या आतच बोलायला सुरुवात करतो. हा प्रकार कामकरीवर्गाच्या बाबतीत हमखास आपण करतो. आमच्या नर्सिंग होममध्ये हा प्रकार नेहमी घडायचा; मग ती नर्स असो, आयाबाई असो किंवा पेशंट! 'मॅडम, ऐका तर खरं! मी का आले नाही वेळेवर ते मला सांगू द्या!' कधी तरी मी रागवायचे. किती खोटी कारणं सांगता म्हणून बोलायचे! पण एका प्रसंगी तर मला गप्प बसावं लागलं. झालं असं की, आमची एक मावशी सलग दोन दिवस आली नाही. तिसर्‍या दिवशी आली. आल्याबरोबर माझ्यासमोर येत नव्हती. मला टाळत होती. रागावल्यावर रडायला लागली. मी त्या दिवशी रागातच होते. 'रडणं बंद कर, खोटी कारणं देऊ नकोस. (खोटी कारणं सांगून सुट्ट्या मारायचा इतिहास सर्वच ठिकाणी असतो.) आणि चेहरा का झाकतेस…' इत्यादी… इत्यादी म्हणत मी बरंच बोलले. दुसरी मावशी आली आणि तिच्या चेहर्‍यावरचा पदर बाजूला करत म्हणाली, 'मॅडम, दोन दिवसांपूर्वी हिच्या नवर्‍यानं दारू पिऊन हिला मारलं. चेहरा खूप सुजला होता.' क्षणात मी अवाक् झाले. तिला जवळ घेऊन समजावलं. औषध द्यायला सांगितलं. माझीच मला प्रचंड लाज वाटली. न ऐकण्याची माझी वृत्ती मला लाजीरवाणी करून गेली. हा एक अनुभव मला खूप काही शिकवून गेला. आपल्याच आयुष्यात अशा गोष्टी बर्‍याच वेळा घडून गेलेल्या असतात. त्यावेळी थोडंफार ऐकलं असतं, तर आज आयुष्य वेगळं असतं, असं मग नंतर वाटतही असतं. बर्‍याचदा काही अशा चुका आपल्या हातून घडतात, त्याचा पश्चात्ताप कधीच विसरला जाऊ शकत नाही. कारण, 'तेव्हा न ऐकल्यानं' झालेलं नुकसान आपण पुढील जन्मभर आठवत राहतो. काही काहीवेळा ऐकूनही दुर्लक्ष करतो. म्हणूनच असं म्हणावसं कसं थोडा तरी समोरच्याचे ऐकण्याचा संयम असावा. योग्य सल्ला असेल तर जरूर मानावा.

एखाद्या समाजसेवी संस्थेत तर यासाठी खास नेमणूक असते. एक काऊंटर असते. तिथे तुम्ही तुमच्या तक्रारी, सूचना सांगायच्या आणि त्यावर उपाययोजना दिली जाते; पण बर्‍याच वेळेला तेथील कर्मचारी पाट्या टाकण्याचेच काम जास्त करतात. सहानुभूतीपूर्वक, शांतपणे एखाद्याचे म्हणणे ऐकावे, यावरून जुनी दु:खद आठवण माझ्या मनाशी अजूनही ताजी आहे. आमच्या शेजारी राहणारं एक वयस्क जोडपं होतं. त्यांचा मुलगा-सून कधी या गावात, तर कधी मुंबईला राहायचे. काका-काकू मात्र शेजारीपाजारी यांच्या भरवशावर राहायचे. आनंदी जोडपं होतं. काका जितके शांत, तितक्या काकू बोलक्या होत्या; किंबहुना जास्तच आणि तेच तेच बोलायच्या. कधीही घरी गेलं की, त्यांचं बोलणं सुरू असायचं. विषय पण नेहमीचा… मुलगा आणि सून! बर्‍याचदा कंटाळा यायचा! मी बर्‍यापैकी त्यांच्या जवळची होते. कधी कधी मी जरा टाळायचे; मग मलाच अपराधी वाटलं की, पुन्हा जाऊन यायचे. काका फार हुशार… समोरच्याला पटकन समजून घेणारे. माझ्या मनातला चोर त्यांनी केव्हाच पकडला होता. एकदा रस्त्यातच त्यांनी मला गाठलं. म्हणाले, 'अगं, मी तुझं मन वाचलंय बरंका, काकूच्या त्याच त्याच बोलण्याचा कंटाळा येतो ना?' पण एक सांगू… त्यांच्या बोलण्यानं मला फारच ओशाळल्यासारखं झालं! मी त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, 'नाही हो काका, तसं काहीच नाही.' मी काही तरी बोलत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत होते. मनात वाईटही वाटत होते. काका म्हणाले, 'थांब बेटा, इथे बस. एक मोलाचे बोल सांगतो. फार मोठं नाही हं! तुझा वेळ घेणार नाही जास्त…'

मी अगदी खजील झाले. शेजारी बसून काही तरी बोलून शांत बसले. काका म्हणाले, 'अगं, तुझी काकू फार सोशिक आहे. माझ्या गरिबाच्या संसारात तिने मनापासून साथ दिली; पण आयुष्याची काही गणितं चुकली गं! सूनबाई तिच्या परीने चांगली; पण… ही सारी तळमळ तिला सारखी जाचत राहते. तुम्हा मुलींशी बोलते तेवढी ती शांत राहते. फक्त तिला मोकळं व्हायचं असतं गं! बाकी नाही काही! आपलं दु:ख, मनातील भावना कोणी तरी मनापासून ऐकतंय, एवढंच तिला हवं असतं बरं का!' माझ्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं. काकांनी न बोलता माझ्या डोक्यावर हात ठेवला. फक्त आपण कोणाचं बोलणं ऐकलं, तर किती फरक पडतो. आजही कोणी 'अमुक व्यक्ती तेच तेच बोलतात. त्याचा कंटाळा येतो, जावंसं वाटतं नाही त्यांच्याकडे,' असं बोललं की मी मनात उघडपणे बोलते, असं करू नका. त्यांना थोडा वेळ द्या आणि न बोलता, सल्ला न देता, त्यांच्या चुका न दाखविता फक्त ऐका!

उत्तमरीत्या, शांतपणे समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकणारा हा उत्तम समुपदेशक असतो, असे म्हणतात आणि खरंच आहे. महागड्या फी देऊन आपण पुढील वयात काही समस्या आल्यावर त्यांच्याकडे धाव घेतो. आजकाल तर समुपदेशन काळाची, प्रतिष्ठेेची बाब आहे. ज्यांच्याशी आपले जवळचे, रक्ताचे संबंध आहेत त्यांच्याशी संवाद नेहमीच चालू द्या. कितीही कोणी मोठं झालं तरी संवादाची, ऐकण्याची नाळ तोडू नका, कापू नका! बस्स एवढंच..!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news