पर्यावरण : मधमाश्यांपुढे अस्तित्वाची लढाई | पुढारी

पर्यावरण : मधमाश्यांपुढे अस्तित्वाची लढाई

रंगनाथ कोकणे

जगभरात मधमाश्यांच्या जवळपास 20 हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढते प्रदूषण आणि कीटकनाशकांमुळे या मधमाश्यांचे सरासरी आयुर्मान कमी झाले आहे. मधमाशीला आपल्या जैवसृष्टीत एक विशिष्ट स्थान आहे. परागीकरणामध्ये त्यांची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्यांची संख्या घटत गेल्यास खाद्यान्न संकट निर्माण होऊ शकते.

मधमाश्यांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रूपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाश्या फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाश्यांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण, मधमाश्या जैवसाखळीमध्ये, अन्नसाखळीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पृथ्वीवरील अगणित वनस्पतींची परागीकरणाची प्रक्रिया मधमाश्यांमुळेच शक्य होते. मधमाश्या सुमारे 70 टक्के पिकांचे परागीकरण करतात. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, आपण जे अन्न खातो, त्याचा दोन तृतीयांश हिस्सा मधमाश्यांनी केलेल्या परागीकरणातूनच आपल्याला मिळतो. त्यामुळेच विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले होते, ‘ज्यावेळी मधमाश्या या पृथ्वीतलावरून नामशेष होतील, तिथून पुढे मानवी वंशाला जगण्यासाठी अवघी चार वर्षे मिळतील. मधमाश्या राहिल्या नाहीत तर परागीकरण होणार नाही आणि पशूंसह माणसेही जगू शकणार नाहीत.’
हा धोका त्यांनी अनेक वर्षांपूर्वी निर्देशित केला होता. परंतु, त्यातून कोणताही बोध मानवी समूहाने घेतला नाही. परिणामी, आज मधमाश्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. नुकतेच काही शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन करून मांडलेल्या निष्कर्षांनुसार जगभरात मधमाश्यांवर अनेक प्रकारची संकटे घोंघावत आहेत. प्रचंड वेगाने वाढणारे वायू प्रदूषण आणि कीटकनाशके व रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आज मधमाश्यांचे आयुर्मान कमी झाले आहे.

संबंधित बातम्या

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जगभरात मधमाश्यांच्या जवळपास 20 हजार प्रजाती आढळतात. यापैकी अधिक प्रजाती प्रामुख्याने जंगलांमध्ये वास्तव्यास असतात; तर काही प्रजाती मानवी वस्त्यांमध्ये असलेल्या झाडांवर, इमारतींवर आपले पोळं बनवितात. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत.

जगभरात सतत वाढणारे प्रदूषण, मधमाश्यांचे प्रमुख अन्न असलेल्या फुलांच्या झाडाझुडपांची झपाट्याने कमी होणारी संख्या, अपरिमित वृक्षतोड, कृषी आणि बागबगिच्यांत वाढता कीटकनाशकांचा वापर, याचा दुष्परिणाम मधमाश्यांवर दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी फ्रान्सिसी नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर अ‍ॅग्रीकल्चर, फूड अँड एन्व्हायरमेंटने आपल्या एका अहवालात असे म्हटले होते की, परागीकरण करणार्‍या कीटकांना शेतात वापरण्यात येणार्‍या कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या अहवालानुसार, जंगलातील झाडाझुडपांच्या अनेक प्रजातींच्या फुलांमध्ये परागकण आणि रसाचे म्हणजेच मकरंदाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फटका मधमाश्यांनाही बसतो आहे. अनेक अभ्यासकांच्या मते, जागतिक तापमानवाढीचा (ग्लोबल वॉर्मिंगचाही) फटका मधमाश्यांना बसतो आहे. वातावरण बदलामुळे सृष्टीचक्र बदलले आहे. असमान पाऊसमान, दुष्काळ, पूर यांचाही मोठा परिणाम मधमाश्यांवर पडतो आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मते, मानवासाठी उपयुक्त असणारी 75 टक्के फळे आणि बीजधारक शेती पिके परागीकरण करणार्‍या कीटकजीवांवर अवलंबून आहेत. 2019 मध्ये शास्त्रज्ञांनी समोर आणलेल्या माहितीनुसार, जगभरात कीटकांच्या एकूण प्रजातींपैकी जवळपास 50 टक्के प्रजाती नष्ट होत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कीटकांची एकतृतीयांश संख्या या शतकाच्या शेवटी पृथ्वीवरून नामशेष होऊ शकते. संशोधन अहवाल आणि आकडे हे बाजूला ठेवले, तरी मधमाश्यांसारखे कीटक अलीकडील काळात फारसे दिसत नाहीहेत, ही बाब स्पष्ट आहे. भारतातील ओडिशा प्रांतातील शेतकरी 2002 पासून दरवर्षी आपल्या शेतात जाणार्‍या मधमाश्यांची संख्या कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवितात. मधमाश्यांची केवळ एकच नव्हे; तर अनेक प्रजाती लुप्त होत आहेत. एपिस मेलिफेरा, एपिस डोरसाटा, एपिस सेरॅना इंडिका अशा अनेक प्रजातींचा त्यात समावेश आहे. मधमाश्या शेताकडे कमी प्रमाणात जातात, हा अनुभव एकट्या ओडिशातील शेतकर्‍यांनाच आलेला नाही. पंजाब, केरळ, महाराष्ट्र आणि त्रिपुरातील शेतकर्‍यांकडूनही अशाच स्वरूपाची माहिती मिळत आहे. मधमाश्यांच्या अनेक प्रजाती लुप्त होत असल्याच्या बातम्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येत आहेत.

काही वर्षांपूर्वी मधमाश्यांचे पोळे सर्रास द़ृष्टीस पडायचे; पण आता महानगरांतून तर ते जवळपास हद्दपारच झाले आहे. ग्रामीण भागातसुद्धा मधमाश्यांची पोळं क्वचितच आढळून येताहेत. यामागचे खरे कारण म्हणजे त्यांच्यासाठी अनुकूल असलेल्या घटकांची कमतरता. पाण्याचे स्रोत, फूलझाडे ही मधमाश्यांची प्राथमिक गरज आहे; पण त्यामध्ये घट झाल्यामुळे मधमाश्यांचे जीवन धोक्यात आले आहे. याशिवाय बदलत्या पर्यावरण परिस्थितीमुळेही कीटकांपुढे वेगवेगळी संकटे उभी राहिली आहेत. शेतापासून बगिच्यांपर्यंत कीटकनाशक आणि रसायनांचा वाढता वापर मधमाश्यांच्या प्रजननास मारक ठरत आहे. काही अभ्यासांमधून नियोनिकोटिनॉईडस् हा कीटकनाशकातील घटकच मधमाश्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. हा घटक मधमाश्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीतच अडथळा ठरला आहे.

फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मतानुसार, जगभरात उत्पादित अन्नधान्यापैकी एकतृतीयांश अन्नधान्यांचे उत्पादन मधमाश्यांवर निर्भर असते. संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणासंबंधी संस्थेच्या मतानुसार, कीटकनाशकांमुळे मधमाश्यांच्या स्मरणशक्तीवर थेट परिणाम होतो आहे. फुले किंवा फळे यांचा गंध घेण्याची मधमाश्यांची शक्ती कीटकनाशकांच्या संपर्कात येताच कमी होते. त्यामुळे त्या नेमक्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत आणि परागीकरणाची प्रक्रिया विस्कळीत होते. पिकांवर फवारलेली रसायने परागकणांसोबत मधमाश्यांच्या शरीरात पोहोचतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात अनेक संशोधने मागील दोन दशकांपासून सुरू असून, त्यातून एक सार्वत्रिक चित्र समोर येत आहे, ते म्हणजे मधमाश्या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आता प्रश्न उरतो तो यामुळे उद्भवणार्‍या संकटाचा सामना करण्यास आपण तयार आहोत का? ज्या वेगाने जगभरात कीटकजीवांची संख्या झपाट्याने कमी होत आहे, त्यामुळे अन्नधान्योत्पादनात घट झाल्यास मानव काय करणार? ज्या क्षणी मधमाश्या पूर्णांशाने नामशेष होतील, त्या क्षणापासून तीन महिन्यांच्या आत जगभरातील पिकांचे उत्पादन घटेल. किराणा दुकानातला माल जवळजवळ निम्म्यावर येईल. सहाच महिन्यांत आपल्याला सर्व शेतांमध्ये केवळ गहू आणि मक्याची पेरणी करावी लागेल; कारण याच दोन पिकांचे परागीकरण हवेद्वारे होते. आपला आहार मर्यादित होईल. आहारातील विविधता आणि पौष्टिकता संपून जाईल. कुपोषणामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या डोके वर काढतील. औषधपाण्यावरचा खर्च वाढेल. ही भयावह स्थिती ओढावू द्यायची नसेल, तर आपल्याला हे संकट मुळापासून समजून घ्यावे लागेल आणि त्या दिशेने योग्य पावले उचलावी लागतील. यामध्ये शेतांमधील कीटकनाशकांचा वापर नियंत्रणात आणणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापर कमी करणे, जैविक-सेंद्रिय शेतीकडे वळणे, सर्वोच्च प्राधान्य देऊन वायू प्रदूषण कमी करणे, यासारख्या उपाययोजनांबाबत गांभीर्याने कृती झाली पाहिजे; अन्यथा मधमाश्यांच्या पाठोपाठ मानवजातीच्या र्‍हासाची सुरुवात होऊ शकते.

Back to top button