करमणूक : डॉक्युसीरिजचा फॉर्म्युला..! | पुढारी

करमणूक : डॉक्युसीरिजचा फॉर्म्युला..!

काही महिन्यांपूर्वी भारतातून गाशा गुंडाळायच्या तयारीत असलेलं नेटफ्लिक्स आता पुन्हा एकदा सावरू पाहतंय. डॉक्युसीरिजचा भारतीयांसाठी नवा असलेला जॉनर यावेळी नेटफ्लिक्सच्या मदतीला धावून आलाय. त्यातही भारतातल्या गुन्हेगारी घटनांवर आधारित डॉक्युसीरिजकडे प्रेक्षकांचा कल वाढताना दिसतोय. यावर्षी आलेल्या ‘इंडियन प्रिडेटर’ डॉक्युसीरिजने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलंय.

श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशभर मोठी खळबळ उडालीय. तिचा बॉयफ्रेंड आफताब पूनावाला या निर्घृण हत्याकांडासाठी जबाबदार आहे. आरोपी आफताबने श्रद्धाच्या खुनामागे ‘डेक्स्टर’ या सीरिजचा प्रभाव असल्याचं पोलिस चौकशीत कबूल केलंय. आपल्या प्रेयसीच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून त्यांची विल्हेवाट लावण्याचा क्रूरपणा आफताबमध्ये कुठून आला, याचा तपास करताना त्याने केलेला ‘डेक्स्टर’चा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो.

श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आधीही ‘डेक्स्टर’ किंवा अशाच इतर सीरिजवरून प्रेरणा घेऊन अनेक ठिकाणी हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. एखाद्या सीरिजचा इतका चांगला किंवा वाईट प्रभाव असणं, ही तिच्या निर्मितीमागे राबलेल्या हातांसाठी आर्थिक फायद्याचीच गोष्ट असते. त्यातही व्यवस्थेला आव्हान देणार्‍या एखाद्या गुन्ह्यावर ती सीरिज आधारित असेल, तर तिला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद नेहमीच जास्त असतो.

प्रेक्षकांचं ‘बेला चाव’

‘मनी हाईस्ट’ ही स्पॅनिश वेबसीरिज नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक. या सीरिजमध्ये बँकेवर दरोडा घालणार्‍यांनी स्वतःला क्रांतिकारी म्हणून रंगवून घेतलं होतं. ‘बेला चाव’ हे इटालियन क्रांतिगीत या वेबसीरिजचं आकर्षणही बनलं होतं. आर्थिकद़ृष्ट्या देशातल्या महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या बँकांवर दरोडा घालणं आणि प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पसार होणं, ही एकप्रकारची क्रांतीच समजली जात होती.

अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं पाठबळ लाभलेलं लष्कर बँकेबाहेर तैनात असतानाही ही मूठभर चोरट्यांची फौज सगळे पैसे, सोनं लुटते आणि तिथून पसार होते, हा प्रशासकीय व्यवस्थेवर मोठा कलंकच होता. या सीरिजमुळे दरोड्यासारखा गंभीर गुन्हा हा प्रस्थापित व्यवस्थेविरोधातल्या बंडाचं प्रतीक बनला. याच कारणामुळे प्रेक्षकांनीही या सीरिजला उत्तम प्रतिसाद दिला.

साऊथ कोरियामधल्या वर्गसंघर्षाची जाणीव करून देणारी ‘स्क्विड गेम’ ही नेटफ्लिक्सची वेबसीरिज मागच्या वर्षी प्रचंड गाजली. यातले भव्यदिव्य सेट, भावनिक आणि थरारक उपकथानकं हे सगळंच कौतुकास पात्र ठरलं; पण खेळाच्या नावाखाली वर्गसंघर्षाआडून घडणारे गुन्हे मात्र म्हणावे तितके अधोरेखित केले गेले नाहीत. प्रशासनाच्या नकळत एवढं घडतंय, याचं आश्चर्य आणि कौतुक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामधून स्पष्ट होतं.

भारतात काय चालणार?

‘मनी हाईस्ट’ असेल किंवा ‘स्क्विड गेम,’ या आणि अशा बर्‍याच सीरिजनी आपल्या कंटेंटच्या जोरावर भाषिक आणि प्रादेशिक चौकटींना सुरुंग लावला. त्यामुळे ‘बाहेरचा कंटेंट इतका चालतो, तर आपल्याकडे असा कंटेंट का बनत नाही?’ अशी प्रश्नांची फैरी भारतात झडणं स्वाभाविकच होतं. त्यामुळे भारतात काय चालू शकतं, याचा विचार नेटफ्लिक्सने सुरू केला.

बॉलीवूडची ‘धूम’ ही सिनेमालिका काहीशी ‘मनी हाईस्ट’च्याच अंगाने जाणारी होती; पण बंड म्हणावं इतकी मोठी व्याप्ती त्यातल्या चोर्‍यांची नव्हती. नेटफ्लिक्सवरच्या ‘सॅक्रेड गेम्स’, ‘बेताल’ असतील किंवा अ‍ॅमेझॉन प्राईमवरच्या ‘मिर्झापूर’, ‘पाताल लोक’ असतील, भारतीयांना गुन्हेगारी, रक्तपात, हिंसाचार कितपत भावतो, हे या वेबसीरिजच्या लोकप्रियतेने आधीही दाखवून दिलं होतं.

या सगळ्याचा समावेश असलेल्या कल्पोकल्पित कथानकांचा भडिमार करण्यापेक्षा खर्‍याखुर्‍या घटनांनाच सादर करायची कल्पना नेटफ्लिक्स इंडियाच्या डोक्यात आली आणि त्यातून ‘डॉक्युसीरिज’ हा परदेशात गाजलेला जॉनर भारतीय नेटफ्लिक्सवरही आला. डॉक्युसीरिज म्हणजे डॉक्युमेंटरींची मालिका. 2019 ला आलेली ‘क्रिकेट फिव्हर : मुंबई इंडियन्स’ ही नेटफ्लिक्सची पहिली भारतीय डॉक्युसीरिज. क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून ही डॉक्युसीरिज बनवली गेली.

त्यानंतर ‘बॅड बॉय बिलेनियर्स : इंडिया’ ही देश सोडून पळालेल्या कर्जबुडव्या उद्योगपतींवर आधारित डॉक्युसीरिज नेटफ्लिक्सने 2020 मध्ये प्रदर्शित केली. 2021 ला आलेली ‘अल्मा मॅटर्स : इन्साईड द आयआयटी ड्रीम’ ही डॉक्युसीरिज आयआयटीमधल्या घडामोडींवर प्रकाश टाकते. एवढं होऊनही नेटफ्लिक्सच्या कंटेंटला भारतीय प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा नेटफ्लिक्सने एक नवा जॉनर सादर करायचं ठरवलं. तो म्हणजे ‘ट्रू क्राईम’!

भारतीय ‘ट्रू क्राईम’ डॉक्युसीरिज

2015 मध्ये नेटफ्लिक्सने ‘मेकिंग अ मर्डरर’ नावाची डॉक्युसीरिज बनवली. या सीरिजला तर 2016 मध्ये चार एमी पुरस्कारही मिळाले. त्यामुळे हा जॉनर भारतातही चालू शकतो, याचा नेटफ्लिक्सला विश्वास होता. नेटफ्लिक्सची पहिली भारतीय ‘ट्रू क्राईम’ डॉक्युसीरिज होती ‘क्राईम स्टोरीज : इंडिया डिटेक्टिव्हज्.’ सप्टेंबर 2021 ला आलेल्या या डॉक्युसीरिजमधून बंगळूरमधले पोलिस तीन खून आणि एक अपहरणाचं प्रकरण कशाप्रकारे सोडवतात, याचा मागोवा घेतला गेला होता.

‘क्राईम स्टोरीज : इंडिया डिटेक्टिव्हज्’ला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आधीच नेटफ्लिक्सला भारतात मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागत होतं. त्यात जगभर गाजणारा डॉक्युसीरिज आणि त्यातल्या त्यात ‘ट्रू क्राईम’सारखा जॉनर भारतात न चालणं अधिकच निराशादायक होतं. अशातच तीन आठवड्यांनी नेटफ्लिक्सने ‘हाऊस ऑफ सिक्रेटस् : द बुराडी डेथ्स’ ही नवी डॉक्युसीरिज रीलिज केली.

या सीरिजला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने नेटफ्लिक्सचं आर्थिक नुकसान भरून निघालं नसलं, तरी त्यांना भारतीय प्रेक्षकांची नस सापडल्याचा विश्वास मात्र मिळाला. ‘हाऊस ऑफ सिक्रेटस् : द बुराडी डेथ्स’च्या यशानंतर ‘इंडियन प्रिडेटर’ ही डॉक्युसीरिजची नवी मालिकाच नेटफ्लिक्सने सुरू केलीय. आतापर्यंत या मालिकेंतर्गत गेल्या पाच महिन्यांतच तीन डॉक्युसीरिज प्रदर्शित झाल्या असून, त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

काय आहेत या डॉक्युसीरिज?

‘हाऊस ऑफ सिक्रेटस् : द बुराडी डेथ्स’ ही दिल्लीच्या बुराडीत घडलेल्या सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणावर आधारित होती.
30 जूनच्या रात्री बुराडीच्या संतनगर कॉलनीत राहणार्‍या भाटिया कुटुंबातल्या 11 जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाने मोठी खळबळ माजली. त्या प्रकरणाचा पोलिसांनी केलेला तपास, भाटिया कुटुंबाविषयी त्यांच्या परिचितांनी नोंदवलेली मतं, हे सगळं या डॉक्युसीरिजमध्ये पाहायला मिळतं.

2006-07 च्या आसपास तिहार जेलबाहेर मृतदेह ठेवणार्‍या चंद्रकांत झा या सीरियल किलरचं प्रकरण बरंच गाजलं. चंद्रकांतने तब्बल 18 खून केले होते. तिहार जेलबाहेर त्याने वेगवेगळ्या दिवशी तीन मृतदेह ठेवून त्यासोबत चिठ्ठी ठेवली होती. त्या चिठ्ठीत पोलिसांना शिव्या आणि आव्हान
दिलं होतं. ‘इंडियन प्रिडेटर : द बचर ऑफ देल्ही’ ही डॉक्युसीरिज या प्रकरणाचा मागोवा घेते.

‘इंडियन प्रिडेटर : द डायरी ऑफ अ सीरियल किलर’ ही डॉक्युसीरिज 2001 ला पकडल्या गेलेल्या राजा कोलंदर या नरभक्षक सीरियल किलरची गोष्ट सांगते. राजा कोलंदरने चौदा खून केले होते आणि त्याची नोंद एका डायरीत होती. राम निरंजन असं मूळ नाव असलेल्या राजाला खून केलेल्यांचे मेंदू शिजवून खायची सवय असल्याचंही पोलिसांनी आपल्या तपासात सांगितलं होतं.

‘इंडियन प्रिडेटर : मर्डर इन अ कोर्टरूम’ची कथा महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात घडते. नागपूरच्या कस्तुरबा वस्तीतला कुख्यात गुन्हेगार अक्कू यादवची ही कथा. अक्कूने 40 दलित महिलांवर बलात्कार केला होता. अक्कूच्या वाढत्या दादागिरीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी कस्तुरबा वस्तीतल्या महिलांनी अक्कूची कोर्टातच हत्या करत न्याय मिळवला. या प्रकरणावर बरीच उलटसुलट चर्चा झाली.

वादाच्या भोवर्‍यात ‘नेटफ्लिक्स’

नेटफ्लिक्स आणि वाद हे एक जुनं समीकरण. आता नेटफ्लिक्सच्या डॉक्युसीरिजच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘इंडियन प्रिडेटर’च्या माध्यमातून नेटफ्लिक्स विशिष्ट जात समूहांना गुन्हेगाराच्या कठड्यात नकळत उभं करू पाहतंय. याआधीही ‘देल्ही क्राईम’च्या दुसर्‍या सीझनमध्ये भटक्या विमुक्त जात समूहांना चड्डी-बनियान या खुनशी दरोडेखोर टोळीचे सदस्य म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झालाय.

इंग्रजांनी क्रांतिकारकांना आळा बसावा म्हणून विशिष्ट जात समूहांना गुन्हेगारांच्या पिंजर्‍यात उभं केलं. तेव्हापासून कुठलाही गुन्हा घडल्यावर संशयाची सुई पहिल्यांदा या जात समूहांकडे वळवली जाते. गुन्ह्याचा तपास करणारे सवर्ण अधिकारी ‘हे लोक असेच असतात’ या मानसिकतेतूनच तपास करतात. या मानसिकतेला योग्य ठरवण्यासाठी ऐतिहासिक समाजशास्त्रीय पुराव्यांचा आधार घेतला जातो.

राजा कोलंदर नरभक्षक असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. ते फक्त पोलिसांचं एक निरीक्षण आहे. तरीही कोल आदिवासींना त्यांच्या आहार पद्धतींवरून, संस्कृतीवरून गुन्हेगार ठरवत हिणवण्याचा प्रयत्न ‘इंडियन प्रिडेटर : द डायरी ऑफ अ सीरियल किलर’मधून केला जातोय. भटक्या विमुक्त जाती-जमाती, आदिवासींविषयी कित्येक वर्षांपासून चालत आलेले दूषित पूर्वग्रह कसे योग्य आहेत, हे या डॉक्युसीरिजच्या मालिकेत मांडलं जातंय.

एक सवर्ण गुन्हेगार वस्तीत धुमाकूळ घालताना न्यायव्यवस्था मुकी राहते. हतबल होऊन जेव्हा वस्तीतल्या महिला कायदा हातात घेतात, तेव्हा त्याचं चित्रण ‘मर्डर’ म्हणून केलं जातं. हिंसेचं समर्थन होऊ शकत नाही; पण अक्कू यादवची खरी दादागिरी न दाखवणं आणि त्या महिलांनी मिळवलेल्या न्यायाला खुनाचं रूप देऊन त्यांना आरोपी बनवणंही योग्य नाही, हे सुजाण नागरिक आणि प्रेक्षक म्हणून आपण मान्य करायला हवं.

प्रथमेश हळंदे

Back to top button