राजकीय : निवडणूक गुजरातची, उत्सुकता ‘तिघांची’ | पुढारी

राजकीय : निवडणूक गुजरातची, उत्सुकता ‘तिघांची’

गुजरातमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले असले, तरी या निवडणुकांमध्ये सर्वाधिक उत्सुकता आहे ती तीन उमेदवारांची. एक म्हणजे हार्दिक पटेल, दुसरे अल्पेश ठाकूर आणि तिसरे म्हणजे जिग्नेश मेवानी. भाजपने जातीय समीकरणांचा विचार करून अचूक डावपेच टाकत विरोधकांच्या मैदानावरून उडणार्‍या या तिन्ही तोफा आपल्या तंबूत घेण्यात यश मिळवले खरे; परंतु आता जनतेच्या न्यायालयातील लढाईमध्ये या तिघांच्या पदरी यश येते की अपयश, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राजकारणात कोणीही कुणाचा मित्र नसतो आणि कोणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. गेल्या 70-75 वर्षांमध्ये भारतीय मतदारांनी याचा अनुभव असंख्य वेळा घेतला आहे. मतदारांचा विचार न करता होणार्‍या राजकीय सोयीनुसार होणार्‍या युत्या-आघाड्या हा भारतीय लोकशाहीचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांची पक्षांतरे हीदेखील आता नित्याची आणि सवयीची झाली आहेत. तथापि, या सर्वांकडे जनता कशाप्रकारे पाहते, जनतेला राजकारण्यांची ही सोयीस्करवादी भूमिका रुचलेली असते की नाही, याचा निकाल निवडणुकांमधून लागत असतो. याविषयीची जनतेची भूमिका मतदारांच्या मतांमधून प्रतिबिंबित होत असते. त्यामुळेच निवडणुकांचे निकाल हे केवळ सत्ताधारी आणि विरोधक किंवा प्रस्थापित पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील मताधिक्याबरोबरच अशा नेत्यांच्या-उमेदवारांच्या जय-पराजयाच्या अनुषंगानेही महत्त्वाचे ठरतात. किंबहुना, त्याची उत्कंठा अधिक असते. सध्या अशीच उत्सुकता आहे ती गुजरातमधील तीन उमेदवारांची.

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजप, आम आदमी पक्ष, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी आपापली शक्ती पणाला लावली आहे. सत्ताधारी भाजप गड राखण्याचा प्रयत्न करत आहे; तर आम आदमी पक्ष गुजरातवर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. अर्थात, गेल्या पाच वर्षांत या राज्यात व्यापक प्रमाणात सामाजिक आणि राजकीय बदल झाले आहेत. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपपुढे तगडे आव्हान उभे करू पाहणारे आणि थेट पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका करत गर्जना करणारे हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवानी हे तिन्ही फायरब्रँड तरुण नेते आज भाजपच्या गोटात असून, ते या पक्षाकडून सध्याच्या निवडणुकीच्या रिंगणातही उतरलेले आहेत.

गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राहिलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे निवडणुकीच्या काही महिने अगोदर भाजपमध्ये गेले. भाजपने त्यांना काँग्रेसचा गड असणार्‍या विरमगाम येथून उमेदवारी दिली आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2012 मध्ये विरमगाम जागेवर काँग्रेसच्या तेजश्री पटेल यांनी भाजपचे प्रागजीभाई पटेल यांना 16,983 मतांनी पराभूत केले. 2017 मध्ये तेजश्री पटेल या भाजपच्या उमेदवार होत्या. काँग्रेसच्या लाखा भरवाडने तेजश्री यांना 21,839 मतदांनी पराभूत केले. आता भाजपने हार्दिक पटेल यांना उमेदवारी दिली असली, तरी त्यांना रांगेत उभे राहून तिकीट घ्यावे लागले.

उमेदवारी अर्ज दाखल करतानाही त्यांंच्यासमवेत कोणताही मोठा नेता नव्हता. भाजपचे नेते आणि कार्यकर्तेदेखील त्यांना सहकार्य करत नसल्याचे चित्र आहे. विरमगाम मतदारसंघात जातीय समीकरणेदेखील हार्दिक यांच्यासाठी अनुकूल नसल्याची स्थिती आहे. या ठिकाणी पटेल समाजाचे 50 हजार मतदार असून, ठाकूर समाजाचे सर्वाधिक 65 हजार मतदार आहेत. मुस्लिमांची संख्या जवळपास 20 हजार, भरवाड आणि रबारी समाजातील 20 हजार आणि अनुसूचित जातीचे 30 हजार मतदार आहेत. हार्दिक यांची प्रतिमा ही प्रस्थापित आरक्षणाला विरोध करणारी राहिली आहे.

परिणामी, मागास आणि दलितवर्गात हार्दिक यांना तीव्र विरोध दिसून येत आहे. याची भरपाई ते मुस्लिम मतदारांकडून करू इच्छित आहेत. काँग्रेसमध्ये असताना हार्दिक यांनी मुस्लिम मतदारांमध्ये चांगला संवाद-संपर्क वाढवला होता. काँग्रेसचे सध्याचे आमदार आणि उमेदवार लाखा भरवाड हे मागासवर्गातील आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकूर समाजातील आहेत. काँग्रेसची ठाकूर मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांना विजयासाठीचा मार्ग तितकासा सुकर नाही. गुजरातमध्ये मागासवर्गातील लोकसंख्या सुमारे 54 टक्के आहे. त्यात सर्वाधिक 24 टक्के कोळी-ठाकूर समाजातील आहेत.

अल्पेश ठाकूर हे मागासवर्गातील बहुचर्चित नेते आहेत. अल्पेश 2017 मध्ये काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर राधनपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. परंतु, 2019 मध्ये काँग्रेसचा राजीनामा देत ते भाजपवासी झाले. 2019 च्या बनासकांठाच्या राधनपूर जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रघू देसाई यांच्याकडून सुमारे 3,800 मतांनी अल्पेश यांचा पराभव झाला. राधनपूर जागेवर अल्पेश सुरक्षित नव्हते. म्हणून भाजपने त्यांना गांधीनगर दक्षिण येथून तिकीट दिले. भाजपच्या शंभू जी ठाकूरने या मतदारसंघातून 2012 मध्ये 8,011 मतांनी आणि 2017 मध्ये 11,530 मतांनी विजय मिळवला होता. या ठिकाणी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेते अल्पेश ठाकूर यांना विरोध करत होते. यंदाही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे अल्पेश यांच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

जिग्नेश यांच्यासमोरील आव्हाने

जिग्नेश नटवरलाल मेवानी हे गुजरातमधील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व वकील आहेत. ते दलित समाजाचे तरुण नेते व आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. जिग्नेश मेवानी हे 2017 मध्ये काँग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. मेवानी यांनी भाजपचे विजयकुमार चक्रवर्ती यांना 19,696 मतांनी पराभूत केले. मेवानी हे सामाजिक कार्यकर्ते असून, आंदोलनकर्ते अशी त्यांची ओळख आहे. विशेषतः, ऊना आंदोलनामुळे ते अधिक चर्चेत आले. त्यांनी भूमिहीन दलितांना जमीन मिळवून देण्याबरोबरच 2022 मध्ये दंगलग्रस्त मुस्लिमांसाठी आणि बनावट चकमकीत मारल्या गेलेल्या मुस्लिमांसाठी काम केले. त्यामुळे त्यांची मुस्लिम समाजावर चांगली पकड आहे. मात्र, ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ आंदोलनाच्या काळात वडगाम येथे पडलेल्या छाप्यांमध्ये ज्या मुस्लिमांना अटक करण्यात आली त्यांना मेवानी यांनी मदत केली नसल्याचा काही मुस्लिमांचा आरोप आहे. याचा लाभ घेण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांनी या मतदारसंघात ‘एमआयएम’कडून उमेदवार उभा केला आहे. मेवानी यांची मोठी व्होटबँक फोडण्याचा प्रयत्न ओवैसी यांनी केला आहे. म्हणूनच मुस्लिम मते सांभाळून ठेवण्याचे मोठे आव्हान मेवानी यांना आहे. गेल्या निवडणुकीत दलित, मुस्लिम आणि ठाकोर समाजातील एकगठ्ठा मतदान मेवानी यांना मिळाले. आपल्या ताफ्यात या मतदारांना सांभाळून ठेवण्यात यंदा ते कितपत यशस्वी होतात, हे पाहावे लागेल.

गेल्या पाच वर्षांत गुजरातमध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक बदल झाले आहेत. जातीय समीकरणेदेखील बदलत आहेत. अशावेळी गतवेळच्या निवडणुकीत भाजपला जेरीस आणणारे हे तिघेजण भाजपच्याच रथामध्ये बसून लोकांना कितपत आकृष्ट करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात, या तिघांचाही पराभव झाल्यास त्यातून भाजप पक्षनेतृत्वाविषयी एक चुकीचा संदेश जाऊ शकतो. राजकारणात आपल्याविरोधात उठणार्‍या आवाजांना आपलेसे करून नामशेष करण्याची एक जुनी परंपरा आहे. त्या परंपरेशी भाजप नेतृत्वाला जोडले जाऊ शकते. पाहूया, निकाल काय येतोय ते!

विनिता शाह

Back to top button