ग्रीन पिरियडच्या दिशेने टाकलेले स्वागतार्ह पाऊल

ग्रीन पिरियडच्या दिशेने टाकलेले स्वागतार्ह पाऊल

आजही ग्रामीण भागात मासिक पाळीच्या काळात महिला कापड वापरतात. त्या कापडापासून महिला सॅनिटरी नॅपकिनकडे वळल्या. आता याच सॅनिटरी नॅपकिनला मेनस्ट्रुएशन कपचा पर्याय उभा राहतोय. हा पर्याय म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी ग्रीन पिरियडच्या दिशेनं टाकलेलं स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे पोहोचायला हवा.

तुम्ही मासिक पाळी आल्यावर काय वापरता? अर्थातच शहरी भागातल्या महिलांचं पहिलं उत्तर असेल सॅनिटरी नॅपकिन. हे सॅनिटरी नॅपकिन वापरल्यानंतर त्याचं काय होतं, याचा विचार तुम्ही केलाय का? तुमचं सॅनिटरी नॅपकिन कचर्‍यात फेकल्यानंतर हाताळणारे हात मग त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष, यांच्यासाठी ते प्रचंड अनहायजेनिकच असतं. फक्त हेच नाही तर तुम्ही जे सॅनिटरी नॅपकिन वापरता, त्यात वापरलं जाणारं मिक्स मटेरियल हे तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठीही घातकच असतं.या सगळ्या द़ृष्टिकोनातून विचार करता सध्या चर्चेत असलेली ग्रीन पिरियडची संकल्पना फार महत्त्वाची आहे.

नावातच ग्रीन अर्थात निसर्ग असल्यामुळे ही पर्यावरणाशीच निगडित भानगड असणार, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पण यातला शेवटचा शब्द जो इंग्रजीमधला पिरियड म्हणजे मराठीमधला पूर्णविराम आहे असं नाही. ग्रीन पिरियड ही संकल्पना पर्यावरण संवर्धनाची सुरुवात आहे. सॅनिटरी नॅपकीनला पर्याय ठरत असलेल्या मेनस्ट्रुएशन कपमुळे ग्रीन पिरियडची चर्चा होतेय.

गेली 10 ते 15 वर्षे कचरा व्यवस्थापन या विषयावर काम करणार्‍या पर्यावरण तज्ज्ञ प्राची पाठक सांगतात, जशी कचर्‍यात फेकलेली काच विरघळली की त्याचं रिसायकलिंग काचेतच होतं तसंच मेन्स्ट्रुअल कपचं रिसायकलिंग करून त्यापासून पुन्हा मेन्यस्ट्रअल कपच बनवणं शक्य आहे. सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत असं घडत नाही. कारण सॅनिटरी नॅपकिनसाठी मुळातच मिक्स मटेरियल वापरलं जातं. ते बायोडिग्रेडेबल असतं, असा कंपन्यांकडून कितीही दावा करण्यात आला तरीही त्यात तथ्य नाही. मुळात आपल्याकडे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. पण या यंत्रणेवर वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा कमी क्षमतेत रिसायकल होणारा मेन्सट्रुएशन कप वापरणं केव्हाही योग्यच.

'फायनॅन्शिअल एक्स्प्रेस'च्या 20 नोव्हेंबर 2022 च्या बातमीनुसार, भारतात वर्षाला 12.3 अब्ज सॅनिटरी पॅड वापरले जातात. आता पर्यंत 50 टक्के महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळी बाळगाव्या लागणार्‍या स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. अशावेळी आपल्या देशातल्या बायका, मुख्यत: खेड्यापाड्यातल्या मुली, ज्या मासिक पाळीत वापरल्या जाणार्‍या कपड्यांच्या वापरातून मुक्त होऊन आता कुठे पॅड वापरायला लागल्या आहेत; त्यांना परत कपडे वापरायला सांगायचं का? तर नाही. त्यासाठी मेनस्ट्रुएशन कप हा एक उत्तम पर्याय आहे. हा सगळा प्रवास जरी लांबचा असला तरी हळूहळू त्याची वाट निर्माण करायला हवी. प्रोजेक्ट दाग हे कॅम्पेन चालवणार्‍या अवनी या कंपनीच्या सहसंस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता पवार सांगतात, 90 टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिनमुळे त्वचारोग, अ‍ॅलर्जीचा सामना करावा लागतो. त्या रियुजेबल पॅड, मेन्स्ट्रुएशन कप, ऑर्गेनिक कॉटन पँटी विकतात. त्यांचा वर्षभराचा व्यवसाय 1.5 करोडपर्यंत मिळकत देतो. यावरून धिम्या गतीने का होईना, पण ही वाट निर्माण होतेय हे सिद्ध होतं. पॉकेट फ्रेंडली कप या संदर्भात कोरो एनजीओसोबत काम करणारी प्रियांका तुपे एक वेगळा पण महत्त्वाचा मुद्दा मांडते. तिच्या मते, निसर्गाचं संवर्धन तर हवंच; पण त्याहीपेक्षा बाईच्या कम्फर्टचा विचार जास्त व्हायला हवा.

तिच्यासाठी मेन्यस्ट्रुएशन कप म्हणजेच कम्फर्ट! हे कप अगदी 250- 350 रुपयांपासून मिळतात. पॉकेट फ्रेंडली असणं म्हणजे खिशाला परवडतोय हा त्याचा आणखी एक फायदा आहेच. प्रियांका म्हणते, "एक कप दिवसाचे 10 ते 12 तास टिकतो. बरं कप लावल्यावर तो लावला आहे याची जाणीवही होत नाही. इतकं सहज त्याचा वापर आणि कम्फर्ट आहे. मी स्कुटीवरून अगदी बिनधास्त फिरू शकते. ऑफिसमध्ये दर 4 तासांनी पॅड बदलायची झंझट नाही." हा कप विकत आणल्यानंतर तो गरम पाण्यात 3 ते 5 मिनिटं ठेवायचा. त्यामुळे तो निर्जंतुक होतो. त्यानंतर योनी मार्गात तो व्यवस्थित इनसर्ट करायचा. त्यानंतर त्याचा वापर झाल्यावर सोबत मिळालेल्या लोशनने स्वच्छ धुवायचा. सुरुवातीला याची भीती वाटते पण तुम्ही तो कप इन्सर्ट करताना रिलॅक्स पोझिशनमधे बसलात तर त्याने ही कृती सहज शक्य होते. सबुरी कर्वेसाठी तर हा मेनस्ट्रुएशन कप म्हणजे एम्पॉवरमेंट आहे.

ती म्हणते, मेन्सट्रुएशन कपमुळे तिला तिच्या शरीराविषयी माहिती मिळाली. सबुरी कॉर्पोरेट कंपन्या आणि राजकारण्यांची कम्युनिकेशन स्ट्रॅटजी बनवण्यासाठी फ्रीलान्सर म्हणून काम करते. तिने सांगितलं की, सिलिकॉन मटेरियलचा वापर करून हा कप बनवला जातो, जो अत्यंत सॉफ्ट आहे. मी बाराशे रुपयांचा सेट विकत घेतला आहे. ज्याची मला 10 वर्षांची वॉरंटी मिळालीय.

पुन्हा वापरता येणारी उत्पादनं कमी कचरा निर्माण करतात. महिला त्यांच्या पूर्ण आयुष्यात अंदाजे 5 ते 15 हजार पॅड वापरतात. दरवर्षी डम्पिंग ग्राऊंडमधे टाकल्या जाणार्‍या या डिस्पोजेबल मासिक पाळीच्या उत्पादनांपैकी कोट्यवधी बायोडिग्रेडेबल नसतात. पुन्हा न वापरता येण्याजोग्या मासिक पाळीच्या उत्पादनांचा वापर केल्याने डंपिंग ग्राऊंडमधील नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा वेगळा करावा लागतो. हा जैविक कचरा आहे. त्यामुळे उत्पादनांमधल्या केमिकलमुळे होणारे उत्सर्जन पर्यावरण आणि तो कचरा हाताळणार्‍यांच्या आरोग्यासाठी हानीसाठी कारण ठरतं. यासंदर्भात प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर संगीता पिकले यांचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणतात की, आदिवासी पाड्यांमध्ये मुली जेव्हा हा मेनस्ट्रुअल कप वापरतात, तेव्हा तिथं पाण्याचा कमीत कमी वापर करणं त्यांना शक्य होतं. कारण पॅड किंवा कपडा धुण्यासाठी पाणी लागतं. त्यानंतर पाळीचा स्राव योनीच्या बाह्यभागाला चिकटल्यामुळे त्याचीही नीट स्वच्छता करावी लागते. पण हा कप वापरल्यावर मात्र फक्त कप धुण्याइतकचं पाणी लागतं.

तसंच महिलांनी टॅम्पॉनऐवजी रियुजेबल पॅड आणि मेनस्ट्रुअल कप वापराव्यात यावर आम्ही जास्त भर देतो. मासिक पाळीतल्या उत्पादनांचा वापर करून पर्यावरण संवर्धन करणं ही एकट्या स्त्रीची जबाबदारी नाही. पुरुष म्हणून आपल्या आयांना, बहिणींना याचं महत्त्व पटवून देण्यासाठी पुरुषांचाही यात हातभार लागलाच पाहिजे. त्यासाठी मासिक पाळीविषयी पुरुषांनीही पुढाकार घेऊन माहिती घ्यायला हवी. त्याआधी केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागापर्यंत आणि केवळ महिलाच नाही तर पुरुषांपर्यंतही हा विषय नीटपणे
पोहोचायला हवा.

अश्विनी पारकर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news