Cenematic Libarty : सिनेमॅटिक लिबर्टी आणि शिवचरित्राची मोडतोड | पुढारी

Cenematic Libarty : सिनेमॅटिक लिबर्टी आणि शिवचरित्राची मोडतोड

Cenematic Libarty : ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केले जाते, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती बाब सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. दुर्दैवाने अलीकडील काळात युगपुरुष, युगनायक असणार्‍या छत्रपती शिवाजीराजांवर आधारित चित्रपटांमधून ही विकृती सातत्याने समोर येताना दिसत आहे.

इतिहास हे जसे शास्त्र आहे तसेच ते आता राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक लढ्याचे शस्त्र झालेले आहे. वर्चस्ववादासाठी इतिहासाचा वापर केला जातो, असे जगद्विख्यात नवमार्क्सवादी इतिहासकार अँतोनिओ ग्राम्सी सांगतात. ते म्हणतात, “मोठ्या समुदायावर वर्चस्व प्रस्थापित करून त्यांना गुलाम बनवण्यासाठी त्यांच्या इतिहासाची सोयीनुसार मांडणी केली जाते.” त्यालाच ‘ग्राम्सी हेजिमिनी’ अशी संज्ञा वापरली जाते. यालाच प्रचलित भाषेत ‘धुरिणत्व’ असे म्हटले जाते. सांस्कृतिक धुरिणत्वातूनच सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धुरिणत्वाकडे वाटचाल होते. म्हणून इतिहास हे जसे शास्त्र आहे तसेच ते सांस्कृतिक लढ्यातील शस्त्रदेखील आहे. त्यामुळे जगद्विख्यात विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच आपला इतिहास घडवू शकत नाही. अन्यथा चुकीचा इतिहास सांगून गुलाम बनविले जाते. त्यामुळे वास्तव इतिहास ज्ञात असणे अत्यावश्यक आहे.

Cenematic Libarty : भारतीय परिप्रेक्ष्यात सातत्याने काहींनी सांस्कृतिक वर्चस्वासाठी इतिहासाची मोडतोड केलेली आहे, याबाबत अनेक वेळा वादही झालेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली. अर्थातच संविधानिक हक्क, अधिकार आणि कर्तव्याची संधी आपणाला मिळाली. आपले विचार लेखन, भाषण, वाचन, चित्रकला, तसेच कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले. त्याचाच एक भाग म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी होय. लोकशाहीवर विश्वास असणारा प्रत्येक नागरिक ‘सिनेमॅटिक लिबर्टीचा’ समर्थकच आहे. आपण सिनेमॅटिक लिबर्टीचे स्वागतच केले पाहिजे. चित्रपट अधिक प्रभावी होण्यासाठी काही विधायक मूल्ये रुजविण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टीची गरजच असते.

झुंड, जय भीम यांसारख्या चित्रपटांनी सिनेमॅटिक लिबर्टीचा विधायकतेसाठी उपयोग केला आहे. अक्षय कुमारने भूमिका केलेल्या ‘पृथ्वीराज चौहान’ चित्रपटाबाबत काही मतभिन्नता असू शकते. परंतु त्यामध्ये स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार अनैतिहासिक असला तरी तो विधायक आहे.

Cenematic Libarty : राजपुतांची मध्ययुगीन मानसिकता स्त्री स्वातंत्र्याची नव्हती. परंतु चित्रपटातील नायक पृथ्वीराज चौहान महाराणीला दरबारात सहभागी करून बोलण्याचे स्वातंत्र्य देतो आणि तो स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. ही घटना नव्या पिढीला प्रेरणादायक आहे. अशा सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरस्कार करणे समाजहिताचे असते. परंतु ज्यामधून एखाद्या जातसमूहाला अपमानित केले जाते, नायकाची निंदानालस्ती केली जाते, ज्यातून इतिहासाची मोडतोड करून बदनामी केली जाते, ती बाब सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली विकृतीच ठरते. सध्या चर्चेत असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरेपूर गैरवापर करून शिवचरित्राची यथेच्छ विटंबना केलेली दिसते.

शिवकाळात म्हणजेच मध्ययुगीन काळात शिवइतिहासाला मराठा कालखंड, मराठा इतिहास असेच संबोधले जाते. अगदी आधुनिक काळाच्या ऐन भरात देखील राजारामशास्त्री भागवतांसारखे प्रागतिक विचारांचे अभ्यासक ‘मराठा’ असाच शब्द प्रयोग करतात. अगदी न्या. महादेव गोविंद रानडे देखील ‘राईज ऑफ दी मराठा पॉवर’ म्हणजेच मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष असाच उल्लेख करतात. शिवरायांच्या राज्याभिषेकप्रसंगी जनतेला प्रचंड आनंद झाला.

अफगाणिस्तानापासून बांगलादेशपर्यंत आणि जम्मू-काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत मोगलांचेे राज्य असताना त्यांना प्रतिकार करून शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. याचे वर्णन समकालीन कृष्णाजी अनंत सभासद ‘हा मर्‍हाटा पातशाहा येवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही’ असे करतात. ते मराठी पातशाहा म्हणत नाहीत; तर मराठा पातशाहा असे म्हणतात. राजाराम महाराज देखील सरदारांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात ‘मराठा राज्याचे रक्षण करणे, हे तो स्वामीकार्य आहे.’ ते मराठी राज्य म्हणत नाहीत. म्हणजे समकालीन ‘मराठा’ राज्य असाच उल्लेख आहे. ‘मराठा’ ही संकल्पना व्यापक आहे. ती जातिवाचक नसून ती समूहवाचक आहे.

Cenematic Libarty : अठरापगड जाती बारा बलुतेदारांना ‘मराठा’ असे संबोधले जात असे. समूहाला मराठा आणि भाषेला मराठी म्हटले जात असे. परंतु ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आणि अलीकडच्या अनेक चित्रपटांत, लेखनात, बोलण्यात मराठी माणूस मराठी मुलूख असा शब्दप्रयोग केला जात आहे. मराठा ही व्यापक संकल्पना नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे. ‘मराठा’ शब्दप्रयोग करण्यासाठी संकोच का? याबाबत न्यूनगंड का? ही समकालीन इतिहासाची मोडतोड आहे. हा मोठा अधिक्षेप आहे. राष्ट्रगीतात देखील ‘पंजाब सिंध गुजरात मराठा…’ असेच आपण म्हणतो. तिथे ‘मराठा’ हा शब्दप्रयोग जातिवाचक ठरत नाही, मग चित्रपटातच ‘मराठा’ शब्दप्रयोगाबाबत वावडं का? मराठा शब्दप्रयोग बदलून त्याला मराठी करण्याचा अधिकार निर्माता दिग्दर्शकांना कोणी दिला?

छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष आहेत. ते युगनायक आहेत. त्यांनी अशक्य कार्य शक्य करून दाखविले. औरंगजेबासारख्या कपटी, कारस्थानी बादशहाला न घाबरता त्याविरुद्ध लढा दिला. अफजलखानासारख्या दुष्टाला धडा शिकविला. जीव धोक्यात घालून शाहिस्तेखानाला धडा शिकविला. आग्रा कैदेतून मोठ्या धैर्याने, कौशल्याने सुटका करून घेतली. लोककल्याणकारी राज्य निर्माण केले. शिवाजी महाराज महानायक आहेत, परंतु अलीकडच्या काळात त्यांना सहनायक ठरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांना दुय्यम ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, मुरारजबाजी, जिवाजी महाले, शिवाजी काशिद, बहिर्जी नाईक, वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे महानच आहेत. त्यांच्या शौर्याला, त्यागाला, समर्पणाला तोड नाही. पण ते नायक आणि शिवाजी महाराज सहनायक असे ठरविणे महाअपराध आहे आणि तसा प्रयत्न सुरू आहे.

Cenematic Libarty : ‘हर हर महादेव’ या चित्रपटात तो महाअपराध केलेला आहे. बाजीप्रभू देशपांडेंची निष्ठा, शौर्य, त्याग, बलिदान प्रेरणादायकच आहे. परंतु बाजीप्रभू शिवरायांविरुद्ध लढतात, ते सिद्दी जौहरकडे जातात, तेच शिवा काशिदांना घेऊन येतात, तेच शिवाजी महाराज पन्हाळ्यातून निसटण्याचे नियोजन करतात ही सर्व द़ृश्ये जसा शिवरायांचा अवमान करणारी आहेत, तशीच ती बाजीप्रभूंच्या कार्यकर्तृत्वाचे भंजन करणारी आहेत. बाजीप्रभू एकनिष्ठ होते. त्यांनी घोडखिंडीत शौर्य गाजविले. ते प्रामाणिक होाते. स्वराज्यनिष्ठ होते. परंतु ते आततायी, उथळ, उर्मट आणि शिवरायांच्या अंगावर धावून जाणारे नव्हते. तसे दाखवून निर्माता-दिग्दर्शकांनी जसा शिवरायांचा उपमर्द केला आहे, तसाच बाजीप्रभूंचा देखील उपमर्द केलेला आहे.

बाजीप्रभूंबद्दल घृणा निर्माण व्हावी, असा हा चित्रपट आहे. बाजीप्रभू महान होते. परंतु ते बांदलांचे नेते नव्हते, बांदलांच्या फौजेतील ते एक प्रामाणिक सैनिक होते. समकालीन जेधे शकावलीत अफजलखानाच्या भेटीप्रसंगी उल्लेख येतो की ‘कान्होजी नाईक जेधे जमावाशिंसी व बादल देखील यांनी पारावरी चालोन घेऊन लस्करांत मारामारी केली, अगदी लस्कर बुडविले.’ यामध्ये बाजीप्रभूंचा उल्लेख नाही. पन्हाळा सुटकेच्या प्रसंगी जेधे शकावलीत उल्लेख येतो ‘पनालिस यावरून राजश्री स्वामी उतरोन खळवियांस गेले ते समई सिद्दी जोहार यांची फौज पाठीवरी आली। युद्धाची दाटी बहुत जाली तेव्हा बांदलाच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. लोक स्वस्त झाले.

बाजीप्रभु देश कुळकर्णी ठार झाला’ असा उल्लेख येतो. बांदलाच्या फौजेने लढा दिला. अनेक बांदल सैनिक ठार झाले. त्यामध्ये बाजीप्रभू ठार झाले, असा उल्लेख आहे. या चित्रपटात जिजाऊंच्या तोंडी असे एक वाक्य घातले आहे की, जे अनैतिहासिक आहे, ते म्हणजे ‘प्रभू रामाला जसे हनुमंत होते तसे शिवबाला हा बाजी.’ जेधे शकावलीमध्ये असे म्हटलेले नाही. तर ‘हनुमंत अंगद रघुनाथाला जेधे बांदल सिवाजीला’ असे म्हटले आहे. जेधे-बांदल हटवून केवळ बाजीप्रभूला आणणे हा ‘हर हर महादेव’ चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाचा संकुचितपणा, जातीयवादी द़ृष्टिकोन नाही का?

शिवरायांनी अफजलखानाला ठार मारले त्याप्रसंगी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर वार केला. हा भाग या चित्रपटातून वगळलेला आहे. याउलट अफजलखान शिवरायांच्या डोक्यात वार करतो असे दाखविलेले आहे. शिवाजीराजे अफजलखानाला मांडीवर आडवे बसवून हिरण्यकशपूप्रमाणे त्याचे पोट फाडतात असे दाखवून शिवरायांना नृसिंह अवताराशी जोडले आहे, की जे अनैतिहासिक आहे.

चित्रपटातील भाषेचे, कलेचे, कलाकारांचे सौंदर्यशास्त्र सनातनी आहे. बाजीप्रभू बलदंड, राकट, पिळदार, भारदस्त दाखविले आणि शिवाजीराजांची भूमिका दुय्यम दर्जाच्या कलाकाराला देणे, मावळे राकट, दणकट, पिळदार, दुय्यम दर्जाचे दाखविणे ही बाब शिवकालीन भाषा, पेहराव, शरीरयष्टी याला काळिमा फासणारी आहे.

Cenematic Libarty : चित्रपट हे समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम आहे. समाजात धैर्य, शौर्य, राष्ट्रभक्ती, समता, स्त्रियांचा सन्मान, प्रागतिक विचार रुजविण्याचे प्रभाव माध्यम आहे. परंतु ‘हर हर महादेव’ सारखे चित्रपट समाजात दुही निर्माण करण्याचे काम करत आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या सवंगड्यांचा अर्थात शिवचरित्राचा अवमान करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा महामानव कलेच्या कवेत मावण्याएवढा लहान नाही. पण त्यांचा भव्य चित्रपट निर्माण करणार्‍या हॉलीवूड टॉलीवूड सारख्या निर्मात्या-दिग्दर्शकाची आज गरज आहे. अत्यंत दु:खाने म्हणावे वाटते की, काही अपवाद वगळता शिवाजी महाराज व त्यांच्या सहकार्‍यांवर चित्रपट काढायची आज तर कित्येक मराठी चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शकांची लायकी नाही.

डॉ. श्रीमंत कोकाटे,
इतिहास संशोधक

Back to top button