‘मौला जाट’च्या निमित्ताने… | पुढारी

‘मौला जाट’च्या निमित्ताने...

पाकिस्तानचा ‘शोले’ अशी ओळख असलेला ‘मौला जाट’ हा सिनेमा येऊन तेहतीस वर्षांचा काळ लोटलाय. मध्यंतरी पाकिस्तानच्या सिनेजगतावर बराच काळ ‘मौला जाट’ आणि त्याच्या धारदार ‘गंडासा’चा प्रभाव होता. आता ‘द लिजंड ऑफ मौला जाट’ने आठवड्याभरातच पाकिस्तानी बॉक्स ऑफिसचे अगणित रेकॉर्ड मोडलेत. या सिनेमाच्या निमित्ताने पाकिस्तानी सिनेजगताला आपला ‘बाहुबली’ मिळालाय, असं म्हणायला हरकत नाही.

भारतीय सिनेइतिहासाच्या जाडजूड चोपडीत मानाचं पान मिळवलेला ‘शोले’ रीलिज झाला 1975ला. लोकप्रिय भारतीय सिनेमांची यादी करायची झाली, तर त्यात ‘शोले’चं नाव नक्कीच वर असेल. त्याचवर्षी शेजारच्या पाकिस्तानात ‘वेहशी जाट’ रीलिज झाला होता. हा सिनेमा पाकिस्तानात ‘शोले’इतका लोकप्रिय झाला नसला, तरी पाकिस्तानी सिनेमाच्या नव्या इतिहासाला जन्म देणारा होता. चारच वर्षांनी या ‘वेहशी जाट’चा अनधिकृत सिक्वेल ‘मौला जाट’ पाकिस्तानात रीलिज झाला. सुलतान राही आणि मुस्तफा कुरेशी या दोन लोकप्रिय पाकिस्तानी नटांनी यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘मौला जाट’ हे पात्र पाकिस्तानी सिनेमाचं अविभाज्य अंग बनलं. तब्बल 75 आठवडे तिकीटबारीवर ठाण मांडून बसलेल्या या सिनेमाने पाकिस्तानी सिनेइतिहासात ‘गंडासा’ कल्ट आणला.

‘मौला जाट’ हा सुप्रसिद्ध पाकिस्तानी साहित्यिक अहमद नदीम कास्मी यांच्या ‘गंडासा’ या लघुकथेचा नायक. मोठ्या पडद्यावर ही कथा एक रिवेंज ड्रामा म्हणून रंगवली गेली. सतत रक्तपात, हिंसाचार आणि बदल्याच्या भावनेने बेभान झालेला गंडासाधारी मौला प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर पाहिला. मूळ कथेतही रक्तपात आहेच; पण कथेचा शेवट चंदेरी पडद्यावर दिसणार्‍या गोष्टींपेक्षा बराच वेगळा आहे. मूळ कथेत वाचकांना मौलाचं पहिलं दर्शन होतं, तेच मुळी गावातल्या कुस्तीच्या आखाड्यात. कुस्ती बघायला जमलेल्या प्रेक्षकांना शड्डू ठोकून अभिवादन करायच्या तयारीत असलेल्या मौलाच्या कानांवर त्याच्या आईचा हंबरडा पडतो, ‘मौला, तुझ्या बापाचा मलिक कुटुंबाने खून केला.’ आणि त्यानंतर सुरू होतो सूड उगवायचा खेळ. आईने वारंवार चिथावल्यानंतर मौला त्याच्या बापाच्या खुनाचा बदला घेतो खरा; पण बदल्याच्या नादात तो स्वतःच एक गावगुंड बनून जातो.

सगळ्यात शेवटी मलिक कुटुंबाचा शेवटचा वारस मौलाच्या हाती लागतो. पण मौला त्याला न मारता सोडून देतो आणि रडू लागतो. लांबून हा तमाशा बघणारी त्याची आई त्याला दूषणं देत रडण्याबद्दल जाब विचारते. त्यावर लहान मुलासारखा रडत मौला म्हणतो, ‘आता मी रडायचंही नाही का?’ समाजाने पुरुषांसाठी ठरवलेल्या अलिखित नियमावलीचा शिकार ठरलेला हा मौला कास्मींच्या लेखणीतून अवतरला होता ते एक हळवं मन घेऊनच. पण सिनेमात हा हळव्या मनाचा मौला काही क्षणांचा अपवाद वगळता कायमच सुडाच्या लाटेवर स्वार झालेला दिसला. कास्मींना अपेक्षित असलेला, हवेतल्या हवेत थांबलेला मौलाच्या हातातला गंडासा सिनेमात मात्र सतत रक्तानेच निथळत राहिलेला दिसला.

या रक्तपिपासू गंडासाच्या प्रभावातून पाकिस्तानी सिनेमाला बाहेर पडायला बराच वेळ गेला. ‘मौला जाट’च्या तुफान लोकप्रियतेमुळे नंतर या ‘गंडासा’ जॉनरच्या सिनेमांची लाटच आली. हा काळ पाकिस्तानचे हुकूमशहा मोहम्मद झिया-उल-हक यांच्या राजवटीचा काळ होता. सिनेमावर भरमसाट कर लादल्यानंतर आणि प्रेमकहाण्या सेन्सॉर होऊ लागल्यावर पाकिस्तानी सिनेउद्योग डबघाईला आला. पण ‘लॉलीवूड’चे मात्र दिवसच पालटले. जसं मुंबईचं हिंदी-मराठी बॉलीवूड तसंच लाहोरमधे पंजाबी-उर्दू लॉलीवूड आहे. तिकीटबारीवर यशस्वी ठरलेल्या ‘मौला जाट’च्या पावलावर पाऊल ठेवत लॉलीवूडने गंडासा कल्ट वाढीस लावला. नुसत्या गंडासाधारी नायक-खलनायकांनी माजवलेल्या हिंसाचाराच्या जोरावर लॉलीवूडचा पंजाबी सिनेमा दमदार पावलं टाकू लागला आणि उर्दू सिनेमांची मात्र वाताहत सुरू झाली. अर्थात, प्रेक्षकांनाही हे चित्र आवडू लागलं होतं.

पंजाब प्रांतातल्या ग्रामीण भागाशी आपली नाळ जोडलेले हे गंडासा सिनेमे प्रेक्षकांनी आपलेसे केले. ‘वेहशी गुज्जर’, ‘रोटी’, ‘मौला जाट इन लंडन’, ‘गंडासा’ असे अगणित सिनेमे येतच राहिले. ज्या लॉलीवूडने ऐंशीच्या दशकाची सुरुवात ‘हीर रांझा’सारखा सदाबहार रोमँटिक सिनेमा देत केली; तेच लॉलीवूड दशकाच्या शेवटाला रोमँटिक सिनेमांच्या कल्चरवर गंडासा उगारत होतं, हे निश्चितच पाकिस्तानी सिनेइतिहासातलं महत्त्वाचं स्थित्यंतर होतं.

गंडासा जॉनरच्या धर्तीवर बघायला गेलं, तर हॉलीवूडकडे वेस्टर्न सिनेमातलं काऊबॉय कल्चर होतं, तर भारतीय सिनेमात तेलुगू सिनेसृष्टी म्हणजेच टॉलीवूडला रायलसीमा भागातल्या तुफ्फान हाणामार्‍यांनी अजूनही झपाटलेलं आहे. सामाजिक संदेश मांडणारे किंवा समांतर सिनेमे यावर खर्च करायला प्रेक्षक बर्‍याचदा हात आखडता घेताना दिसतात. याउलट गंडासा, वेस्टर्न किंवा रायलसीमा जॉनरच्या भडक, मसाला सिनेमांवर ते हक्काने उधळपट्टी करतात.

भारतात हिंदू आणि शीखबहुल असलेला जाट समुदाय पाकिस्तानात प्रामुख्याने इस्लामचं आचरण करतो. त्याचबरोबर इथं गुज्जर समुदायाचंही वर्चस्व दिसून येतं. गंडासा जॉनरची मुहूर्तमेढ रोवणार्‍यांपैकी एक असलेले आणि मौला जाटचं पात्र साकारणारे सुलतान राही हे पुढं जाट, मलिक, चौधरी आणि गुज्जर अशा सरंजामी पार्श्वभूमी असलेल्या भूमिका साकारू लागले. हा लॉलीवूडचा हक्काचा प्रेक्षकवर्ग होता, जो या जॉनरवर पैसे उधळायला कायमच तयार असतो. गंडासा जॉनरचा पूर ओसरल्यानंतर गेला काही काळ पाकिस्तानी सिनेमा अडखळत वाटचाल करतोय. कोरोनाने पोखरलेल्या अर्थव्यवस्थेमुळे निर्माण झालेली मरगळ दूर करायला एक मोठा सिनेमा हवा, असं कुणालाही वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे जसं बॉलीवूड पोथ्यापुराणांकडे आणि मराठी सिनेमा शिवकालीन इतिहासाकडे झुकलाय, त्याच धर्तीवर ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने पाकिस्तानी सिनेमा गंडासा कल्चर परत आणू पाहतोय.

1979 ला आलेला ‘मौला जाट’ हा मूळ कथेचा पुढचा भाग होता, जो पटकथाकार नसीर आदीब यांनी लिहला होता. ‘वेहशी जाट’चा सिक्वल असलेल्या या सिनेमात नूरी नाट ही नवी खलनायकी भूमिका मुस्तफा कुरेशी यांनी वठवली होती. या सिनेमात मौला हा अन्यायाविरुद्ध लढणारा सरपंच दाखवला होता, तर नूरी नाट हा गावगुंड त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी दाखवला होता. मूळ कथेतल्या जाट-मलिक संघर्षाऐवजी या सिनेमात जाट-नाट संघर्ष दाखवला गेला.
‘द लिजंड ऑफ मौला जाट’ हा याच सिनेमाचा रिमेक आहे. 2013 मध्ये आलेला आपला ‘वार’ हा सिनेमा हिट झाल्यानंतर दिग्दर्शक बिलाल लाशरीने या सिनेमाची घोषणा केली. 2018 मध्ये सिनेमाचा ट्रेलरही आला, ज्यानुसार 2019 च्या रमजान ईदला ‘द लिजंड ऑफ मौला जाट’ रीलिज होणार होता. पण ‘मौला जाट’चे निर्माते मुहम्मद भट्टी यांनी मूळ कथेवर मालकी हक्क दाखवत सिनेमाचं रीलिज थांबवण्याचा प्रयत्न केला.

बराच काळ कोर्टाच्या पायर्‍या झिजवल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये भट्टीसाहेबांनी आवश्यक ते अधिकार देऊ केले. पण तोवर कोरोनाचं संकट उंबरठ्याशी येऊन थांबलं होतं. त्यामुळे रीलिज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली. शेवटी 13 ऑक्टोबर 2022 या तारखेवर शिक्कामोर्तब करत नवा ट्रेलर रीलिज केला गेला, ज्याला फक्त पाकिस्तानच नाही, तर भारतातूनही उदंड प्रतिसाद मिळतोय.

13 ऑक्टोबर 2022 ला रीलिज झालेल्या बिलाल लाशरी दिग्दर्शित ‘द लिजंड ऑफ मौला जाट’ने एका आठवड्याभरातच पाकिस्तानी बॉक्स ऑफिसचे अगणित रेकॉर्ड मोडलेत. आठ दिवसांतच 22 कोटींची कमाई करत या सिनेमाने सर्वाधिक कमाई करणार्‍या पाकिस्तानी सिनेमांच्या यादीत पहिलं स्थान मिळवलंय. 45 ते 54 कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा पाकिस्तानी सिनेमा ठरलाय. या सिनेमात ‘कपूर अँड सन्स’फेम अभिनेता फवाद खान मौला जाटची भूमिका साकारतोय, तर नूरी नाटच्या भूमिकेत हमझा अली अब्बासीने रंग भरलेत. ‘रईस’फेम माहिरा खान मौलाच्या प्रेयसीची म्हणजेच मुखू जाटणीची, तर हुमैमा मलिक ही नूरीच्या बहिणीची

म्हणजेच दारो जाटणीची भूमिका साकारतेय. या कथेला मोठ्या पडद्यावर रंगवताना एक पिरीयड ड्रामा असल्याच्या आविर्भावात रंगवलं गेलंय. दिग्दर्शक बिलाल लाशरीच्या मते, गंडासा जॉनरला पुन्हा एकदा साद घालून पाकिस्तानी सिनेमाला गतवैभव मिळवून देणं हा या सिनेमाचा उद्देश होता आणि तिकीटबारीवर होणारी उलाढाल ही उद्देश सफल झाल्याचंच चिन्ह आहे. त्यामुळे ‘द लिजंड ऑफ मौला जाट’च्या निमित्ताने का होईना; पण पाकिस्तानी सिनेजगताला आपला ‘बाहुबली’ मिळालाय, असं म्हणायला हरकत नाही.

प्रथमेश हळंदे

Back to top button