निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश | पुढारी

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश

सु. ल. हिंगणे, अध्यात्म व संत साहित्याचे अभ्यासक

गणेश या नावातच निसर्गाशी असलेल्या त्याच्या एकात्मतेचे रहस्य दडलेले आहे. काव्याच्या छंदांची उत्पत्ती निसर्गातील विविध ध्वनींपासून झाली हे सर्वांना ठाऊक आहेच. छंद शास्त्राच्या आठ गणांचा अधिष्ठाता म्हणजे श्रीगणेश. त्याला गणेश हे नाव देण्यामागील हेही एक कारण आहे. हिरव्यागार दुर्वा गणेशाला खूपच प्रिय आहेत. निसर्ग, पर्यावरण आणि जीवनाला सन्मान आणि संरक्षण देऊन आपण आपल्या अंतरंगातील गणेशाला जागृत करू शकतो. गणेशचतुर्थी निमित्ताने…

शिव आणि पार्वती यांचा पुत्र मानला जाणारा श्रीगणेश हे वस्तुतः निसर्गाच्या शक्तींचे एक विराट रूपक आहे. याच रूपकासाठी असंख्य मिथके आहेत. वरवर पाहता सर्व काही अजब वाटणारे आहे; परंतु त्यात अनेक गहन अर्थ सामावलेले आहेत. गणेशाच्या रूपात निसर्ग आणि मनुष्य यांच्यामधील संपूर्ण एकरूपतेचे एक आदर्श प्रतीक सामावलेले आहे. गणेशाचे मस्तक हत्तीचे आहे. उंदीर त्याचे वाहन आहे. नंदी त्याचा मित्र, तर मोर आणि साप हे कुटुंबातील सदस्य आहेत.

पर्वत हे त्याचे निवासस्थान आहे, जंगल हे क्रीडास्थळ आहे. आकाशाच्याच छताखाली त्याचे वास्तव्य आहे. त्याचे प्रचलित रूप आकार घेण्यात नदीची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. असे सांगितले जाते की, पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक आकृती तयार केली आणि तिला गंगेत स्नान घातले. गंगेच्या स्पर्शाने ती आकृती सजीव झाली. पार्वतीने त्याला पुत्र म्हटले तर देवांनी त्याला गांगेय म्हणून संबोधित केले.

गणपती या रूपात गणेश म्हणजे गणांचा अधिपती. त्याला जल अर्थात पाण्याचाही अधिपती मानले गेले आहे. गणेशाच्या चार हातांपैकी एका हातात असलेला शंख हे पाण्याचे प्रतीक आहे. दुसर्‍या हातात सौंदर्याचे प्रतीक असणारे कमळ आहे. तिसर्‍या हातात संगीताचे प्रतीक असलेली वीणा आहे तर चौथ्या हातात शक्तीचे प्रतीक असलेले परशू किंवा त्रिशूळ आहे.

पहिल्या शतकातील सातवाहनाने गाथा सप्तशतीत गणपतीचे स्तवन केले आहे. त्यातून गणपतीच्या श्रेष्ठत्वाची वर्णने आपल्याला मिळतात. याचा अर्थ गणपतीच्या इतिहासात प्रमुख चार टप्पे दिसतात. एक वेदकालीन ब्रह्मणस्पती म्हणजे गणपती. दुसरा टप्पा म्हणजे त्या गणपतीचा विनायक होणे आणि त्यात त्याने असुरांचा नाश करणे. तिसरा टप्पा म्हणजे त्याचे ॐकार रूप. गणेशाचा आकार हा ॐकारासारखा आहे. ॐकार हे शब्दब्रह्माचे स्थान आहे.

गणपतीच्या विविध वर्णनात ॐकाराची वर्णने भरपूर आहेत. गणपतीची पूजा ओम या शब्दापासून सुरू होते. म्हणूनच ॐकार आणि गणेश हा अभेद मानला आहे. चौथा प्रकार म्हणजे गणेशाचे गणपतीत रूपांतर होणे. या टप्प्यामध्ये प्रत्येक मंगल कार्यामध्ये गणपतीची पूजा सुरू केली. त्यामुळे ती पूजा सगळ्या प्रकारच्या देवतांच्या पूजेत मान्य झाली आणि त्यातून गणेशाची पूजा प्रचलित झाली. आपल्या पुराणांमध्ये, उपनिषदांमध्ये या गणेशाच्या पूजेचे विविध उल्लेख मिळतात.

गणेश या नावातच निसर्गाशी असलेल्या त्याच्या एकात्मतेचे रहस्य दडलेले आहे. काव्याच्या छंदांची उत्पत्ती निसर्गातील विविध ध्वनींपासून झाली हे सर्वांना ठाऊक आहेच. छंद शास्त्राच्या आठ गणांचा अधिष्ठाता म्हणजे श्रीगणेश. त्याला गणेश हे नाव देण्यात येण्यामागील हेही एक कारण आहे. निसर्गात सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्‍या हिरव्यागार दुर्वा म्हणजे हरळी ही श्रीगणेश ला खूपच प्रिय आहे. एकवीस दुर्वांची जुडी अर्पण केल्याविना गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते.

आंबा, पिंपळ आणि निंबाच्या पानांसह गणेशमूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यास सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो, असा उल्लेख शास्त्रांत आहे. गणेशाचे मातीशी असलेले नाते जोपासले जाते, याचे आणखी एक प्रमाण असे की, मंदिर असो किंवा घर किंवा दुकान असो, गणेशाची मूर्ती ठेवताना त्याचे पाय जमिनीला स्पर्श करतील, याची काळजी घेतली जाते. गणेशाचे पाय जमिनीला टेकलेले नसतील तर ते चांगले मानले जात नाही.

निसर्गातील शक्तींचे प्रतीक असल्यामुळे गणेश अत्यंत निरागस, शक्तिशाली, योद्धा, विद्वान, कल्याणकारी, शुभ-लाभदायी आणि क्षेमकुशल करणारी देवता म्हणून वंदनीय आहे. गणेशाप्रती असलेल्या सन्मानाच्या भावनेचा अर्थ चराचर सृष्टीतील जीवजंतू, जल, हवा, जंगल आणि पर्वत आदींचा सन्मान. गणेशाला आदिदेवता, म्हणजे देवतांमध्ये प्रथम वंदनीय देवता, आदिपूज्य मानले आहे. याचा अर्थ आहे निसर्ग सर्वांत प्रथम. बाकी सर्व शक्ती आणि यशापयश हे नंतर! हिंदू धर्मात आणि संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी ‘श्री गणेशाय नमः’ म्हणण्याची आणि लिहिण्याची परंपरा आहे.

आपल्या पूर्वजांकडून गणेशाच्या या अद्भुत रूपाची कल्पना कदाचित हेच सांगण्यासाठी केली गेली असावी, की निसर्गाचा सन्मान करून, त्याच्या शक्तींशी ताळमेळ साधून मनुष्य शक्ती, बुद्धी, कला, सौंदर्य, संगीत, भौतिक सुख, लौकिक सिद्धी, दिव्यता आणि आध्यात्मिक ज्ञानासह कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो, हे सामान्यजनांना समजावे. याच कारणामुळे संपत्ती, समृद्धी आणि सौंदर्याची देवता लक्ष्मी तसेच ज्ञान, कला आणि संगीताची देवता सरस्वतीची पूजाही श्री गणेशाच्या पूजेविना अपूर्ण मानली जाते.

गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्तृत्व. कर्तृत्वाच्या सारणामध्ये आनंदाच्या पाच पाकळ्या त्याच्यात टाकायच्या असतात. म्हणून मोदक हा पाच कळ्यांचा करतात. शास्त्रीय पद्धतीच्या मोदकाचे स्वरूप असे आहे. त्याला वरती पाच कळ्या आल्या पाहिजेत. या पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची पाच साधने आहेत. ती साधने म्हणजे अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन आणि आकलन. यांनी मिळून कर्तृत्वाच्या सारणातून जो आनंद मिळतो त्याला मोदक म्हणतात. म्हणून गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. पंचामृतातून स्नेह मिळतो, चिंतन मिळते.

विविध प्रकारच्या फुलांमधून निसर्गाच्या विलोभनीय रूपाचा आनंद घेता येतो आणि माझ्या घराला मांगल्यपण देता येते. म्हणून पत्री, शमी हे सगळे गणेशाला वाहायचे असते. हे सगळे अतिशय साधेपणाने करायचे असते. यामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा भाग काहीही नसतो. अगदी साधेपणाने मातीची गणपतीची मूर्ती आणून तिची पूजा करायची असते. आज निसर्गासमोर आतापर्यंतचे सर्वांत भीषण संकट उभे ठाकले आहे आणि या संकटात आपण निसर्गाच्या बाजूने नव्हे तर त्याच्या विरोधात उभे आहोत.

गणेशाचे अद्भुत स्वरूप समजून घेणे आणि त्याला प्रसन्न करून घेणे शक्य करायचे असेल तर त्यासाठी असंख्य मंदिरे आणि मूर्तींची प्रतिष्ठापना, मंत्र आणि भजन-कीर्तन करतानाच श्रीगणेश आपल्या अंतरंगात आहे याचे विस्मरण होता कामा नये. निसर्ग, पर्यावरण आणि जीवनाला सन्मान आणि संरक्षण देऊनही आपण आपल्या अंतरंगातील गणेशाला जागृत करू शकतो. उत्सवातून समाज पुढे जातो, समृद्ध होतो. त्यामुळे उत्सवात आवाजी दणकेपणा असण्यापेक्षा उत्सवातून समाज किती समृद्ध होतो, उत्सवातून त्याला काय मिळते ते सगळ्यात महत्त्वाचे असते. त्याद़ृष्टीनेच गणेशोत्सवाकडे पाहिले जायला हवे.

Back to top button