बॉयकॉट गँग आणि ‘ब्रह्मास्त्र’चा वाद | पुढारी

बॉयकॉट गँग आणि ‘ब्रह्मास्त्र’चा वाद

अनेक बिग बजेट सिनेमांना गेल्या काही महिन्यांत बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडावं लागलं. कित्येकांची तर गुंतवणूकही वसूल झालेली नाही. मात्र, प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या अडथळ्यांवर मात केलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ची कमाई बॉलीवूडसाठी दिलासादायक ठरली आहे.

कोरोनाआधी आणि नंतरही अपेक्षित यशासाठी बॉलीवूड झगडताना दिसतंय. काही मोजक्या सिनेमांचा अपवाद वगळता, लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये रिलीज झालेल्या बर्‍याचशा बॉलीवूड सिनेमांना प्रेक्षकांनी अतिशय थंड प्रतिसाद दिल्याचं दिसून येतं. त्यामुळे कित्येक बॉलीवूड सितार्‍यांनी आपला सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज करण्यात धन्यता मानली.

अनेक बिग बजेट सिनेमांना गेल्या काही महिन्यांत बॉक्स ऑफिसवर तोंडघशी पडावं लागलं. कित्येकांची तर गुंतवणूकही वसूल झालेली नाही. मनोरंजनाची भरघोस आश्वासनं देत तिकीटबारी जिंकायची स्वप्नं बघणार्‍या कित्येक सिनेमांना प्रेक्षकांनी अस्मान दाखवलं. या सगळ्यात प्रादेशिक सिनेमांची वाढती क्रेझ आणि बॉयकॉट गँगसारख्या मोठ्या अडथळ्यांना पार करत उभा राहिलेला ‘ब्रह्मास्त्र’ बॉलीवूडसाठी आशेचा किरण ठरलाय.

रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात शाहरूख खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलीय. ‘ब्रह्मास्त्र भाग 1 : शिवा’ नावाने रिलीज झालेल्या या सिनेमाचे आणखी दोन भाग येत्या काळात पाहायला मिळणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ ही सिनेत्रयी ‘अस्त्रावर्स’ या आगामी काळातल्या मोठ्या प्रकल्पाचाच एक भाग आहे.

देव-दानवांच्या युद्धावर आधारित असलेल्या अनेक पौराणिक कथांमध्ये आपल्याला अस्त्रांबद्दल माहिती मिळते. त्यात ‘ब्रह्मास्त्र’ हे शक्तिशाली अस्त्रांपैकी एक मानलं जातं. या सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक आयान मुखर्जीने याच संकल्पनेचा आधार घेत ‘अस्त्रावर्स’ म्हणजेच अस्त्रांच्या युनिव्हर्सची मांडणी केलीय. भारतात मार्वल आणि डीसीच्या तोडीस तोड सिनेमॅटिक युनिव्हर्स उभारण्याची महत्त्वाकांक्षा या प्रकल्पामध्ये आहे. 2011 पासून आयान या अस्त्रांच्या मालिकेसाठी संशोधन आणि लेखन करतोय. त्यांची ही मेहनत अकरा वर्षांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आलीय.

खरं तर हा सिनेमा डिसेंबर 2016 ला प्रदर्शित होणार होता. पण, आर्थिक अडचणी आणि कोरोनामुळे रिलीज लांबत गेलं. शेवटी डिसेंबर 2021 मध्ये 9 सप्टेंबर 2022 ही तारीख निश्चित केली गेली. साधारणतः 2 सप्टेंबर 2022 पासून पीव्हीआर आणि मोठ्या मल्टिप्लेक्समधे ‘ब्रह्मास्त्र’ची थ्रीडी व्हर्जनसाठी तिकिटांच्या आगाऊ विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. बघता बघता आगाऊ विक्रीचे आकडे फुगतच गेले. केवळ तीन दिवसांतच 2.30 कोटींचं आगाऊ बुकिंग मिळवत ‘ब्रह्मास्त्र’ने यावर्षी आलेल्या ‘आरआरआर’ आणि ‘भुलभुलय्या 2’च्या आगाऊ बुकिंगचे आकडे मागे टाकले. आगाऊ बुकिंगचा उच्चांक गाठणार्‍या सर्वकालीन सिनेमांच्या यादीत ‘ब्रह्मास्त्र’ 28 कोटींच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे. यावर्षी ‘केजीएफ : चाप्टर 2’ नंतर सर्वाधिक आगाऊ बुकिंग मिळवणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा दुसराच सिनेमा ठरलाय. रिलीज होण्यापूर्वीच एवढा प्रतिसाद मिळवणं, ही ‘ब्रह्मास्त्र’ आणि त्यातल्या त्यात बॉलीवूडसाठी कधीच सोपी गोष्ट नव्हती.

गेल्या डिसेंबरमध्ये देशभर रिलीज झालेल्या ‘पुष्पा’ या तेलुगु सिनेमानंतर प्रादेशिक, विशेषतः दक्षिणेकडून येणार्‍या सिनेमांचं जंगी स्वागत होऊ लागलं. ‘पुष्पा’नंतर आलेल्या ‘वलिमाई’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’ आणि ‘केजीएफ चाप्टर 2’सारख्या सिनेमांना मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद तर बॉलीवूडच्या उरात धडकी भरवणाराच होता. या सर्वच सिनेमांनी कोट्यवधींची कमाई करत अनेक विक्रम नोंदवले. ‘आरआरआर’ हा 1200 कोटींची कमाई करणारा तेलुगु सिनेमा तर चक्क ‘द ग्लोरी ऑफ इंडियन सिनेमा’ म्हणजेच भारतीय सिनेमाचं वैभव म्हणून सादर केला जात होता. एकेकाळी जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाच्या नावाखाली निव्वळ हिंदी सिनेमांचा भडिमार करणार्‍या बॉलीवूडपुढे प्रादेशिक सिनेमांचं मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

या प्रादेशिक सिनेमांची ताकद काय आहे, हे बॉलीवूडला बर्‍याच आधी कळलं होतं. पण, रिमेकचं अस्त्र वापरून प्रादेशिक सिनेमांचा प्रभाव कमी करण्यात बॉलीवूड तेव्हा यशस्वी ठरला होता. 2010नंतर हिंदीत डब झालेल्या तेलुगू, कन्नड आणि तमिळ सिनेमांचा टक्का जसजसा वाढू लागला, तसतसं बॉलीवूडचं रिमेकास्त्र प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटू लागलं. पण यावरून काही धडा न घेता लॉकडाऊननंतर पुन्हा रिमेकच्या नादी लागणं बॉलीवूडला चांगलंच भोवलंय. यात मूळच्या तमिळ ‘कंचना’चा रिमेक ‘लक्ष्मी बाँब’ आणि ‘जिगरथंडा’चा रिमेक ‘बच्चन पांडे’ या अभिनेता अक्षय कुमारच्या सिनेमांचा समावेश होता. शरद केळकरचा उत्तम अभिनय वगळता ‘लक्ष्मी’च्या वाट्याला टीकाच जास्त आली. ‘बच्चन पांडे’ तर आपली निम्मी गुंतवणूकही वसूल करू शकला नाही. तेलुगु ‘जर्सी’चा रिमेक असलेल्या ‘जर्सी’ला बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाण्यापासून शाहीद कपूरचा अभिनयही वाचवू शकला नाही.

इतकं होऊनही, येत्या 30 सप्टेंबरला ‘विक्रम वेधा’च्या निमित्ताने बॉलीवूड आणखी एक रिमेक बाजारात आणतोय. मूळ तमिळ ‘विक्रम वेदा’चा रिमेक असलेल्या या सिनेमात हृतिक रोशन आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईमुळे सध्या बॉलीवूडच्या वातावरणात दिलासा असला तरी बॉयकॉट गँगची टांगती तलवार अजूनही बॉलीवूडच्या डोक्यावर आहेच.

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड हिंदूविरोधी विचारसरणी पसरवत असल्याच्या अपप्रचाराला जोर आलाय. त्यामुळे बॉलीवूडला रोखण्यासाठी बॉयकॉट म्हणजेच बहिष्कार तंत्राचा अवलंब हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय. अप्रत्यक्षपणे मिळणारा राजकीय वरदहस्त ही या बॉयकॉट गँगची विशेष ताकद ठरलीय. राजकीय वरदहस्ताच्या जोरावर यावर्षी आलेला ‘द काश्मीर फाईल्स’सारखा सिनेमा हिट ठरला. बॉलीवूडच्या यावर्षीच्या बॉक्स ऑफिसवर यश मिळवणार्‍या सिनेमांच्या यादीत हाही सिनेमा आहे. पण, हा सिनेमा प्रमोट न केल्यानं अनेकांवर बॉयकॉट गँग नाराज आहे आणि ती नाराजी गेल्या काही महिन्यांत तिकीटबारीवर उघडपणे दिसलीय.

आमीर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ असेल किंवा विजय देवरकोंडाचा ‘लायगर’, दोन्हीकडे बॉयकॉट गँगने आपली दहशत दाखवली. 2015 मध्ये आमीरने देशातल्या वाढत्या असहिष्णुतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या या विधानाचा परिणाम ‘लाल सिंग चढ्ढा’वर झाला. या बॉयकॉट गँगला आपण फारसं महत्त्व देत नाही म्हणणार्‍या विजयच्या ‘लायगर’लाही सरतेशेवटी मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. बॉयकॉट गँगची दहशत अनुभवलेला असाच एक सिनेमा म्हणजे यावर्षी आलेला ‘शमशेरा.’ ‘ब्रह्मास्त्र’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार्‍या रणबीरने पहिल्यांदाच या सिनेमात दुहेरी भूमिका साकारली होती. यावर्षी आलेला ‘यश राज फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर दणकून आपटल्यामुळे ‘शमशेरा’कडे ‘यशराज फिल्म्स’सह सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.

या सिनेमात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. कपाळावर भस्म लावलेला हिंदू खलनायक आणि समोर दलित नायक हे चित्र अर्थातच बॉयकॉट गँगच्या पचनी पडणारं नव्हतं. त्यामुळे ‘शमशेरा’ला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर गव्हासंगे रगडल्या जाणार्‍या किड्यासारखा रणबीर आणि त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ही बॉयकॉट गँगच्या हिटलिस्टवर आला. ‘ब्रह्मास्त्र’ फ्लॉप करण्यासाठी बॉयकॉट गँग मोठ्या जोमाने तयारीला लागली. पण या सगळ्याच्या नाकावर टिच्चून ‘ब्रह्मास्त्र’ अजूनही तिकीटबारीवर गर्दी खेचताना दिसतोय.

लॉकडाऊननंतर बॉलीवूड तिकीटबारीवर आपली जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करताना दिसतंय. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वरचष्म्यामुळे प्रेक्षकांची बदललेली चव, प्रादेशिक सिनेमांच्या परड्यात सिनेरसिकांनी टाकलेलं झुकतं माप आणि बॉयकॉट गँगचा उपद्रव, अशा एक ना दोन अडथळ्यांना तोंड देता देता बॉलीवूडची चांगलीच दमछाक झालीय. त्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’ने केलेली 265 कोटींहून अधिकची कमाई बॉलीवूडसाठी नवसंजीवनी ठरलीय.

‘ब्रह्मास्त्र’ने केलेलं प्रमोशन आणि मार्केटिंग प्रभावी ठरल्याचं बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनी दाखवून दिलंय. त्याचबरोबर बॉयकॉट गँगच्या टांगत्या तलवारीची धार बोथट झाल्याचंही या कमाईतून सिद्ध झालंय. सिनेमाच्या आशय आणि वीएफएक्सबद्दल प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. पण ‘ब्रह्मास्त्र’च्या निमित्ताने, गेला काही काळ कंटाळवाण्या वाटणार्‍या बॉलीवूडकडून अपेक्षित असलेल्या मनोरंजनाची भूक भागवली जातेय, हेही तितकंच खरं.

प्रथमेश हळंदे

Back to top button