ग्रँड स्लॅममध्ये ‘युवा’शक्तीचा नारा

ग्रँड स्लॅममध्ये ‘युवा’शक्तीचा नारा
Published on
Updated on

कार्लोस अल्कारेझ व इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटात एकेरीचे विजेतेपद मिळवत 'ग्रँड स्लॅम स्पर्धां'मध्ये युवा क्रांती घडत आहे, हे सिद्ध केले. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.

ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये गेली अनेक वर्षे नोवाक जोकोविच, रॅफेल नदाल व रॉजर फेडरर यांचेच निर्विवाद साम्राज्य होते. या स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी वयाचा अडथळा येत नाही हे जोकोविच, राफेल नदाल यांच्या कामगिरीवरून नेहमीच दिसले आहे. टेनिसच्या द़ृष्टीने प्रौढ असलेल्या या खेळाडूंकडे कदाचित युवा खेळाडूंइतके चापल्य नसेल. परंतु पराभवाच्या छायेतून सामन्यास कलाटणी कशी द्यायची, आपल्याला अपेक्षित असलेले यश कसे खेचून आणायचे, याचा प्रत्यय या खेळाडूंनी नेहमीच दिला आहे.

फोरहँड व बॅक हँडचे परतीचे फटके, क्रॉसकोर्ट व जमिनीलगत फटके, अचूक व बिनतोड सर्व्हिस, नेटजवळून प्लेसिंग इत्यादी कौशल्यपूर्ण खेळ कसा करायचा याचे दाखलेही ते देत असतात. त्यांचे कौशल्य बहारदार आणि चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारे असले तरीही टेनिस चाहत्यांना युवा खेळाडूंकडूनही सर्वोच्च कामगिरीची अपेक्षा असते. अल्कारेझ व स्विआतेक यांच्यासह काही युवा खेळाडूंनी गेल्या दीड-दोन वर्षांत ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अनेक चमकदार यश मिळवले आहे. किंबहुना बुजुर्ग खेळाडूंप्रमाणे जागतिक टेनिस क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची क्षमता आपल्याकडे आहे, याचा परिपाठ त्यांनी दिला आहे.

स्पॅनिश खेळाडू अल्कारेझ याने गेल्या दोन वर्षांत एटीपी टूर मालिकेतील अनेक स्पर्धांमध्ये धक्कादायक निकाल नोंदवले होते. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. यंदाच्या अमेरिकन स्पर्धेत मात्र त्याने हे अपयश धुऊन काढताना अनेक मातब्बर खेळाडूंवर सनसनाटी मात केली आहे. अल्कारेझ हा सहा फूट उंचीचा खेळाडू आहे. त्याचा फायदा त्याने घेतला नाही, तर नवलच. व्हॉलीज, परतीचे फोरहँड व क्रॉस कोर्ट व जमिनीलगत फटके, नेटजवळून प्लेसिंग अशी विविधता त्याच्या खेळात आहे. सर्व प्रकारच्या मैदानांवर परतीचे खणखणीत फटके तसेच वेगवान व अचूक सर्व्हिस करण्याबाबत त्याच्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

चतुरस्र खेळाडू

अल्कारेझ याला टेनिसचे बाळकडू त्याचे वडील व ज्येष्ठ खेळाडू कार्लोस यांच्याकडून मिळाले. त्यानंतर त्याने वडिलांच्या सल्ल्यानुसार जुआन कार्लोस फेरेरो यांच्या अकादमीत प्रवेश केला आणि तेथे त्याच्या भक्कम टेनिस करिअरची पायाभरणी झाली आहे. रॉजर फेडरर याला आदर्श मानणार्‍या अल्कारेझ याने अमेरिकन स्पर्धेतील सर्वच सामन्यांमध्ये परतीचे फटके मारताना फेडरर याच्या शैलीची आठवण लोकांना करून दिली. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यापूर्वी त्याला लागोपाठ तीन सामन्यांमध्ये पाच सेट्सपर्यंत झुंजावे लागले होते. दोन फेर्‍यांमध्ये जरी एक दिवस विश्रांतीचा असला तरीही अशा प्रदीर्घ लढतीनंतर मानसिक दमछाक होतच असते. मात्र, त्यावर मात करीत तो जिद्दीने अंतिम सामन्यात लढला आणि स्वप्नवत विजेतेपद खेचून आणले. या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा तो सर्वात युवा खेळाडू आहे.

महिला गटामध्ये विजेतेपद मिळविणारी स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते. पोलंडच्या या 21 वर्षीय खेळाडूने अमेरिकन स्पर्धेसह आतापर्यंत तीन ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली आहेत. यंदा तिने अमेरिकन स्पर्धेपूर्वी फ्रेंच स्पर्धेत दुसर्‍यांदा विजेतेपदावर नाव कोरले होते. यंदाच्या मोसमात तिने आतापर्यंत सात स्पर्धांमध्ये अजिंक्यपदाची कमाई केली आहे. एकाच मोसमात ग्रँड स्लॅमच्या दोन स्पर्धा जिंकण्याचा अनोखा पराक्रमही तिने केला. ही कामगिरी करताना सर्व प्रकारच्या मैदानांवर सर्वोत्तम खेळ करण्याची किमया आपल्याकडे आहे, हे तिने दाखवून दिले आहे. तिचे वडील तोमाझ हे ऑलिम्पिक रोईंगपटू असल्यामुळे तिला खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य मिळाले आहे. खोलवर व बिनतोड सर्व्हिस, परतीचे टॉपस्पीन व खणखणीत बॅकहँड फटके असे कौशल्य तिच्या खेळात पाहावयास मिळते.

स्विआतेकचा आदर्श

टेनिसमधील कौतुकास्पद यशामुळे तिला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहिराती मिळत असतात. आपल्याला जो नावलौकिक मिळाला आहे, त्यामध्ये समाजाचाही मोठा वाटा आहे, याची जाणीव ठेवीत आपल्याला मिळणार्‍या उत्पन्नाचा काही वाटा ती अनेक सामाजिक कामासाठी खर्च करीत असते. विशेषतः बहुविकलांग, दिव्यांग मुलांकरिता काम करणार्‍या संस्थांना ती सढळ हाताने मदत करीत असते. तिचा आदर्श अन्य खेळाडूंनी घेतला पाहिजे.

ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सनसनाटी निकाल नोंदविले गेले नाही, तर नवलच. कारकिर्दीत 22 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा नदाल याला चौथ्या फेरीत अमेरिकन खेळाडू फ्रान्सिस तियाफोई याच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. प्रौढत्वाकडे झुकलेल्या नदाल याच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. तियाफोई याने उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली. या स्पर्धेतील पुरुष गटात सोळा वर्षांनी अमेरिकन खेळाडूला उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे. एकेकाळी पीट सॅम्प्रास, आंद्रे आगासी, जिम कुरियर इत्यादी अमेरिकन खेळाडूंनी टेनिसमध्ये साम्राज्य निर्माण केले होते. खरं तर अमेरिकेमध्ये टेनिस खेळासाठी भरपूर प्रशिक्षण केंद्रे आणि सवलती, सुविधा उपलब्ध असताना त्यांच्याकडे पुरुष गटात अव्वल यश मिळविणारे नैपुण्य सध्यातरी नाही, हीच आश्चर्याची गोष्ट आहे.

सुपर मॉमची निवृत्ती

क्रीडा क्षेत्रातील सुपर मॉम म्हणून ख्याती मिळवलेल्या सेरेना विल्यम्स हिने स्पर्धात्मक टेनिस मधून निवृत्त होण्याचा निर्णय स्वतःच्या घरच्या मैदानावर घेतला. या स्पर्धेतील तिसर्‍या फेरीत पराभूत झाल्यानंतर तिने लगेचच हा निर्णय जाहीर केला. अमेरिकेच्या या खेळाडूने कारकिर्दीत ग्रँडस्लॅमची 23 विजेतेपदे मिळवली आहेत. सेरेना व तिची मोठी बहीण विल्यम्स यांनी घरची गरिबी दूर करण्यासाठी टेनिसचा जो मार्ग निवडला, तो खरोखरीच इतर युवा खेळाडूंसाठी आदर्श आहे.

ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरीत सर्वोच्च यश मिळवता आले नसले तरीही भारताच्या लियांडर पेस व महेश भूपती या जोडीने अनेक विजेतेपद मिळवली, तसेच इतरांच्या साहाय्यानेदेखील अजिंक्यपदावर आपली नावे कोरली. रोहन बोपण्णा व सानिया मिर्झा यांनीदेखील या जोडीचा वारसा पुढे चालवला. पेस याने 1996 मध्ये अटलांटा येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्राँझ पदकावर आपले नाव कोरले. त्यानंतर ते एकाही भारतीय खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये फारसे यश मिळवता आलेले नाही. चाळिशी उलटल्यानंतरही पेस व बोपण्णा हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळत असतात. या सर्वच खेळाडूंना फारशा सुविधा व सवलती उपलब्ध नसतानाही त्यांनी जागतिक टेनिस क्षेत्रात भारताचा ठसा उमटविला आहे. सुदैवाने हल्लीच्या खेळाडूंना परदेशातील स्पर्धांमध्ये सहभाग याच्यासह सर्व सुविधा व सवलती उपलब्ध असतानाही जागतिक स्तरावर विशेषतः ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी फारशी चमकदार होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

ग्रँड स्लॅम व जागतिक मालिकेतील विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या परदेशी युवा खेळाडूंकडून प्रेरणा घेत, भारतीय खेळाडूंनी देशाचा नावलौकिक उंचावण्याची गरज आहे. सर्वोत्तम शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, जिंकण्यासाठी आवश्यक असणारी विजिगिषावृत्ती, कठोर मेहनत यांच्या जोरावर खेळाडूंनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेबरोबरच सांघिक लढतींमध्येही

सर्वोच्च यश संपादन करण्याची गरज आहे. परदेशी लोकांचे अनुकरण करताना त्यांच्यात असलेले विजेतेपदाचे गुण व कौशल्य आत्मसात केले पाहिजेत. तरच खर्‍या अर्थाने खेळाडू म्हणून त्याचे कौतुक केले जाईल. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मालिकेतील अखेरची स्पर्धा म्हणून अमेरिकन स्पर्धेकडे पाहिले जाते. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या पुढच्या मोसमाकरिता अजून भरपूर अवधी आहे, हे लक्षात घेऊन भारतीय खेळाडूंनी त्या द़ृष्टीने आताापासूनच तयारी करण्याची गरज आहे.

मिलिंद ढमढेरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news