शिवाजी पार्कचे सभापर्व | पुढारी

शिवाजी पार्कचे सभापर्व

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात सर्वच राजकीय आणि सामाजिक चळवळींचा केंद्रबिंदू म्हणून शिवाजी पार्क मैदानाकडे बघावे लागते. स्वातंत्र्याच्या लढाईतील अनेक आंदोलने, सभा या मैदानात झाल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचेही हे मैदान केंद्रबिंदू राहिले. मुंबईत मराठी हक्काचा हुंकार देत शिवसेनेचे सभापर्व शिवतीर्थावरून सुरू झाले. गेल्या 50 वर्षांत हे मैदान खास करून राजकीय सभांनी चर्चेत अधिक राहिले आणि आता तर तीन सेनांच्या संघर्षाची युद्धभूमी ठरते आहे.

शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा कुणाचा? शिवसेनेचा की शिंदेसेनेचा? या प्रश्नांनी मुंबईचे हे ऐतिहासिक मैदान पुन्हा चर्चेत आले. सालाबादाप्रमाणे शिवसेनेचा अर्ज महापालिकेत सर्वप्रथम गेला. एक सोडून दोन अर्ज शिवसेनेने दाखल केले. शिवसेना दसरा मेळाव्याच्या तयारीला लागल्याचे दिसताच, शिंदे गटही जागा झाला. खरी शिवसेना तर आपण आहोत. त्यानुसार दसरा मेळावा घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. हा अधिकार एकनाथ शिंदे यांचाच आहे, असा दावा करत शिंदे गटाचाही शिवाजी पार्क मैदान मागणारा अर्ज मुंबई महापालिकेत दाखल झाला. यावर निर्णय घेण्याची घाई महापालिकेला नाही. धोरण-नियम तपासून निर्णय होईल, असे प्रशासन कानात सांगते. ज्याचा आधी अर्ज त्याला परवानगी, हा पहिला संकेत. ही परवानगी मागणार्‍या संघटनेचे कार्यक्रम वर्षानुवर्षे होत आले असतील, तर त्याच संघटनेला प्राधान्य दिले जाते, हा दुसरा संकेत. ही दोन्ही संकेत शिवसेनेला लागू पडतात. तरीही दसरा मेळावा कुणाचा होणार? यावरून एक संभ्रम मुंबईसह महाराष्ट्रात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण करण्यात आला. शिवसेना कुणाची? जसा हा प्रश्न तसाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? हा प्रश्नही भ्रमिष्ट राजकारणाचा एक डाव समजावा लागतो.

शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का? हा मुळात प्रश्न असूच शकत नाही. मधला कोरोना टाळेबंदीचा काळ सोडला, तर या मैदानावर शिवसेनेचे दसरा मेळावे अखंड होत आले आहेत. याच मेळाव्यांनी शिवसेनेचे नाते शिवाजी पार्कशी कायमचे जोडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तर या मैदानाला कधीही शिवाजी पार्क म्हणत नसत. ‘शिवतीर्थ’ असे ते संबोधत. वाजत-गाजत, गुलाल उधळत ‘चलो शिवतीर्थ’, असे दसरा मेळाव्याचे नारे घुमत. कदाचित आता तसा नारा देण्यात एक अडचण असू शकेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या नव्या घराचे नावच ‘शिवतीर्थ’ ठेवले. राज ठाकरे असे शिवतीर्थावर कायम मुक्कामी असताना ऐतिहासिक शिवतीर्थावर वर्षातून एकदा दसरा मेळावा घेणार्‍या उद्धव ठाकरेंची एवढी चर्चा कशासाठी? त्याची अनेक कारणे आहेत. शिवाजी पार्क हे शिवसेनेचे जन्मस्थळ. शिवसेनाप्रमुखांच्या घरी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिवसेनेच्या जन्माचा नारळ वाढवला. मात्र, या शिवसेनेची पहिली जाहीर सभा 1966 ला शिवसेनाप्रमुखांनी याच शिवाजी पार्कवर घेतली. 28 एकरांचे हे विस्तीर्ण मैदान भरेल काय? गर्दी होईल काय? अशी शंका शिवसेनाप्रमखांच्या मनात होती. मात्र, या पहिल्याच सभेत शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी मराठी माणसाने महासागर उभा केला, तो कायमचा! त्यानंतर शिवसेनाप्रमुखांच्या असंख्य सभा हे मैदान पाहत आले.

निवडणुकांच्या सभाही इथे होत आणि निवडणुकीनंतरचे विजयी मेळावेदेखील. या सार्‍यांत ऐतिहासिक उपक्रम ठरला, तो दसरा मेळावा. शिवसेनाप्रमुखांचा एकही दसरा मेळावा कधी चुकला नाही. नंतर नंतर शिवसेनाप्रमुखांनी आपल्या या विचारपीठावर विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांना निमंत्रित करण्यास सुरुवात केली. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, जॉर्ज फर्नांडिस, शरद पवारही दसरा मेळाव्याच्या विचारपीठाचे निमंत्रित राहिले आहेत. (पवार आणि ठाकरे राजकीय मैत्रीचा आणि शत्रुत्वाचा आलेख असा दसरा मेळाव्यापर्यंत जाऊन पोहोचतो.)

2012 नंतर उद्धव ठाकरे यांनीही तो चुकू दिला नाही. कोरोना टाळेबंदीचा तेवढा अपवाद. ही टाळेबंदी उठल्यानंतर येऊ घातलेला दसरा मेळावाही त्यांनी जाहीर केलाच आहे. शिवसेनेची ही परंपरा गेली 56 वर्षे मुंबई-महाराष्ट्राने अनुभवली. शिवसेनेचा राजकीय विचार या मेळाव्यात मांडला जातो. शिवसैनिकांच्या हाती हा विचार दिला जातो. राजकीय धोरण सांगितले जाते. त्यानुसार शिवसैनिक मार्गस्थ होतो. त्यामुळे शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. या मेळाव्याला आडवे जावे, असा विचारही आजवर कुणाच्या मनाला शिवलेला नाही.

शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतच शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले. मीच खरी शिवसेना, असे ते म्हणाले नव्हते. तसे म्हटले तरी कुणी विश्वास ठेवत नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उत्तम उदाहरण. मध्यंतरी त्यांच्या आंदोलनाचा जोर वाढला तेव्हा जो तो आपल्या डोक्यावर ‘मी अण्णा’ लिहिलेली टोपी घालत असे. तसे प्रत्यक्षात घडले असते, तर महाराष्ट्रात अण्णांची संख्या वाढली असती आणि सामाजिक चळवळींचे भले झाले असते. तसे घडले नाही. राज ठाकरे यांनी राजकीय परिपक्वता दाखवली. शिवसेनाप्रमुखांच्या समक्ष शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ ठोकत त्यांनी आपली नवी सेना स्थापन केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मात्र, या सेनेचेही एक अतूट नाते शिवाजी पार्कशी जन्मापासून जुळले. राज यांची पहिली सभाही शिवाजी पार्कवरच झाली. आपल्या वार्षिक मेळाव्यासाठी राज यांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त पक्का केला आणि त्यासाठीही शिवाजी पार्कचीच निवड केली. दसरा मेळाव्याला आडवे न जाता, त्यांनी आपली गुढी उभारली व मनसेची नवी परंपरा निर्माण करू पाहिली.

ठाकरेंसाठी शिवाजी पार्कचे राजकीय आणि व्यक्तिगत महत्त्व कायम राहिले आहे. मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून 14 मार्च 1995 ला याच शिवाजी पार्कवर शपथ घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या हातून तलवार घेत आदित्य ठाकरे भारतीय युवा सेनेचे प्रमुख झाले, ते शिवाजी पार्कवरच. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथ सोहळाही शिवाजी पार्कवरच झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा देह पंचत्वात विलीन झाला, तोही याच ऐतिहासिक मैदानावर. आजही या मैदानावर शिवसेनाप्रमुखांचे स्मृतिस्थळ अहोरात्र तेवत असते.

अर्थात, शिवाजी पार्कचे नाते फक्त शिवसेनेशी नाही. या मैदानाला शिवसेनेचे शिवबंधन बांधलेले नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही सर्वच राजकीय आणि सामाजिक चळवळींचा केंद्रबिंदू म्हणून शिवाजी पार्क मैदानाकडे बघावे लागते. 1896-97 ला मुंबईत प्लेगची साथ आली आणि या महानगरीला विस्ताराची स्वप्ने पडू लागली. त्यातून 1898 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे सिटी इम्प्रुव्हमेेंट ट्रस्टने (बीसीट) माहीम बेटावर कोळी, भंडारी, सूर्यवंशी व अन्य जमीनदारांकडून जमिनी घेत दादर पूर्व, माटुंगा आणि सायनची उभारणी हाती घेतली. 1925 ला ‘माहीम पार्क’ म्हणूनच शिवाजी पार्क खुले झाले.

काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका व गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक अवंतिकाबाई गोखले यांनी लोकभावनेचा जागर करत, या मैदानाला ‘शिवाजी पार्क’ नाव देण्याची मागणी केली. 1927 ला छत्रपती शिवरायांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात या मैदानाला ‘शिवाजी पार्क’ असे नाव दिले गेले. स्वातंत्र्याच्या लढाईतील अनेक आंदोलने, सभा या मैदानात झाल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचेही हे मैदान केंद्रबिंदू राहिले.

आचार्य प्र. के. अत्रे यांच्या नेतृत्वाखाली ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!’ हा नारा इथे घुमला आणि 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. उद्धव ठाकरे यांचे आजोबा केशव सीताराम ठाकरे ‘प्रबोधन’ साप्ताहिक चालवत. त्यांच्याही चळवळी या मैदानातूनच सुरू झाल्या. मुंबईत मराठी हक्काचा हुंकार देत मग शिवसेनेचे सभापर्व शिवतीर्थावरून सुरू झाले. 1977 च्या आणीबाणीच्या पर्वात जे. पी. नारायणसारख्या लोकनेत्याच्या सभाही या मैदानाने पाहिल्या. स्व. यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्रीपद सोडून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून गेले. हिमालयाच्या मदतीला धावलेल्या सह्याद्रीला निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर झालेली सभाही महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय परंपरेचे उदाहरण म्हणून सांगितली जाते.

राजकीय, सामाजिक चळवळींच्या धामधुमीत क्रिकेटच्या पंढरीचा जन्मही या मैदानात झाला. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, सचिन तेंडुलकरसारखे क्रिकेटपटू शिवाजी पार्कवरच तयार झाले. पण, गेल्या 50 वर्षांत हे मैदान खास करून राजकीय सभांनी चर्चेत अधिक राहिले आणि आता तर ते एक सोडून दोन दोन-तीन तीन सेनांच्या संघर्षाची युद्धभूमी ठरते आहे.
मुंबईसह महाराष्ट्राला विविध कला, साहित्य, संस्कृती आणि वैचारिक क्षेत्रातील नेतृत्व देणारा शिवाजी पार्कचा परिसर होय. हे केवळ मैदान नव्हे! या मैदानाभोवती प्रतिभावंतांची घरे आहेत. विचारवंतांची घरे आहेत. मुंबईच्या रचनेत सिंहाचा वाटा उचलणारे एन. व्ही. मोडक इथलेच. ‘रुचिरा’च्या लेखिका कमलाबाई ओगले, ख्यातनाम गायिका केसरबाई केरकर, प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो, संगीतकार वसंत देसाई, हेलन आणि बिना रायसारख्या अभिनेत्री, प्रायोगिक रंगभूमीची मोठी चळवळ उभारणारे अरविंद आणि सुलभा देशपांडे अशी काही नावे उदाहरणादाखल सांगता येतात. अशा नावांसाठी शिवाजी पार्कची ‘मधली गल्ली’ ख्यातकीर्त आहे.

शिवाजी पार्कवर वर्षातून 9 कार्यक्रमांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेते. उर्वरित 44 दिवसांची परवानगी महापालिकेच्या अखत्यारित येते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मागणारा अर्ज म्हणूनच महापालिकेकडे तूर्त पडून आहे. पण, शिवाजी पार्कचे एक वैशिष्ट्य आजवर सातत्याने टिकून राहिले. या शिवाजी पार्कभोवती बांधलेल्या सिमेंटच्या बसक्या भिंतीवर ठिकठिकाणी ‘कट्टे’ सुरू असतात. जवळपास राहणारा कुणी विद्वान, कुणी शास्त्रज्ञ, कुणी विचारवंत, कुणी गायक, कुणी खेळाडू आणि अगदी नेतादेखील या भिंतीवर येऊन ‘कट्टा’ टाकतो. त्या गप्पाष्टकात सारेच सहभागी असतात. लहान-थोर असा भेद नसतो. आचार्य अत्रे संध्याकाळी या मैदानाभोवती चालायला जात. अमरेंद्र धनेश्वरांनी एके ठिकाणी लिहिले, ‘मी आचार्य अत्रेंचा मोठा चाहता होतो. ते संध्याकाळी शिवाजी पार्कला चालायला येत. मी त्यांचा पाठलाग करी. अनेक मुद्द्यांवर मी त्यांच्याशी चर्चा करत असे आणि ते देखील त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार विस्ताराने ऐकवत.’

आपल्याशी कोण बोलतो, का बोलतो आणि समोरच्याशी आपण का बोलायचे, असे प्रश्न इथे रोज येणार्‍या प्रतिभावंतांनी कधी पाडून घेतले नाहीत. या अर्थाने या मैदानाभोवती एक ‘सभापर्व’ अखंड सुरू आहे. या सभापर्वाला कधी कुणाच्या परवानगीची गरज लागली नाही. अलीकडे पुनर्विकासाच्या झपाट्यात तीन तीन मजली इमारतींचे बहुमजली टॉवर होऊ लागले आणि कट्ट्यावर येऊन बसणारे शिवाजी पार्क दरवाजाबंद होत चालले.

एक संवाद खंडित होत आहे. थांबू पाहत आहे. तो सुरू राहिला पाहिजे. शिवाजी पार्क मैदानावर परवानगी घेऊन सभा होत राहतील. त्या सभांकडे शिवाजी पार्कची जाणती जनता सहसा फिरकत नाही. तिला ‘कट्ट्या’वरचे रोजचे ‘सभापर्व’ अधिक सकस आणि म्हणून महत्त्वाचे वाटते. या कट्ट्यांनीच शिवाजी पार्कला विविध सामाजिक, राजकीय सांस्कृतिक प्रवाहांशी जोडून दिले. आजच्या राजकारण्यांनी या सर्वसमावेशक प्रवाहाचा धागा आपल्याशी जोडून घेतला, तर शिवाजी पार्कवर सभा घेण्याचे काही सार्थक होईल.

विवेक गिरधारी 

Back to top button